बिन-भांडवली धंदा...!!!

Submitted by tilakshree on 20 January, 2008 - 19:24

अथांग महासागराच्या किनारी वसलेल्या मुंबई या महानगरीचे सागराशी एका बाबतीत साधर्म्य आहे. समुद्राच्या उदरांत असंख्य मासे, जंतू, वनस्पती निवास करून असतात. त्यांच्या जगण्याला हवे असलेले खाद्य समुद्राच्या उदरातंच मुबलक प्रमाणांत उपलब्ध होतं. मुंबईचंही असंच आहे. देशाच्या कानाकोपर्‍या‍तून उदर्निवाहाचे साधन शोधत माणसं मुंबईकडे धावतात. या मुंबईत येऊन त्यांची निराशा होतं नाही. पोटापुरता किमान पैसा इथे नक्कींच मिळवता येतो. क्वचितच इथे कुणाची निराशा होईल... अति आळशी किंवा अति कल्पनादरिद्री माणसाची इथे उपासमार होत असेल. लहान किंवा बडी नोकरी, लहान किंवा बडा व्यवसाय असे पैसे मिळवण्यचे वैध मार्ग आपल्याला माहित असतात. हे मार्ग सोडून कमी वेळात, कमी श्रमात अधिक पैसा मिळवण्याचे अनेक अवैध, गुन्हेगारी मार्गही मुंबईत उपलब्ध असतात. मात्र बिन भांडवली पण भरपूर मोबदला देणारे,म्हटलं तर वैध, बेकायदेशीर नसणारे काही मार्ग या मुंबई नगरीत काही महाभागांनी शोधून काढ्ले आहेत. हे मार्ग पाहिले की या महाभागांच्या कल्पनाशक्तीनं थक्क व्हायला होतं.
मुंबई ही जशी राष्ट्राची आर्थिक राजधानी मानली जाते; तशीच ती भारतीय चित्रपटसृष्टीचीही आणि आता दूरचित्रवाणी मालिका जगताचीसुध्दा राजधानी आहे. 'नाईट लाईफ, ओल्या पार्ट्या' हा चित्रपट- मालिका जगताचा अविभाज्य घटक बनला आहे. चित्रपट- मालिकेच्या घोषणेपासून ते 'बॉक्स ऑफिस' वर चालण्या- आपटण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पार्टीचं आयोजन करून 'सेलिब्रेट' करण्याचा इथला रिवाज!!! त्यामुळे मुंबईत; खास करून दक्षिण- पश्चिम मुंबईत पार्ट्यांची रेल चेल असते. अशा पार्टीतही प्रसिध्दीच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी पत्रकार, छायाचित्रकारांना आवर्जून आमंत्रण असतं. मात्र वर्तमानपत्राशी काहीही संबंध नसणारे अनेक छायचित्रकार अशा पार्ट्यांमधे आवर्जून वावरताना दिसतात. त्यात त्यांचा तिहेरी हेतू असतो. असे छायाचित्रकार पार्टीत दिसणार्य एखाद्या नवख्याला हेरून त्याचा एखाद्या तारा- तारकेबरोबर फोटो काढून देतात अनि त्याचे दोन- पाचशे रुपये मिळवतात. त्यातून त्या पार्टीचा एखादा फोटो एखाद्या पेपरांत छापून आलांच तर आणखी दोने़क शे सुटतात आणि कदाचित बाय लाईन; म्हणजे नावंही छापून येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे; एरवी ज्या ठिकाणी फिरकण्याचं स्वप्नांतही येऊ शकणं कठीण... अशा ठिकाणी उंची खाणं अन पिणंही वरच्या वर सुटून जातं.
या बापड्यांचं एकवेळ ठीक.... बिचारे आपली कला, कष्ट, कॅमेरा आणि कॉन्टॅक्ट्स वापरून काही कमावतात... पण असे काही महाभाग इथे बघायला मिळतात की त्यांच्या 'व्यावसायिक कल्पनाशक्ती' समोर नतमस्तक होऊन त्यांची चरणधूळ कपाळी लावावी... असेच एक 'उद्योगपती' अशांच एका पार्टीमधे एका कोपर्‍यात बसून होते. उंची मद्याची आणि तर्‍हे- तर्‍हेच्या खाद्यपदार्थांची लयलूट होती. बहुतेकांच्या पोटात २-३ पेग गेलेले असल्यामुळे वातावरण कसं सैलावलं होतं. 'पेगा-पेगानं' वातावरणातली 'खेळी- मेळी' वाढंतंच चालली होती. मात्र हे गृहस्थ शांतपणे एका कोपर्‍यांत बसून होते. खाणं- पिणं तर नाहींच.... पण कुणाशी गप्पा- टप्पा पण नाही. इकडे 'बाईट' मिळवण्यासाठी वाहिन्यांचे प्रतिनिधी, कॅमेरामन आणि 'कोट' मिळवण्यासाठी सिने-पत्रकार यांचं नट- नट्यांभोवती जमलेलं कोंडाळं विखुरलं. छाया चित्रकारांसाठीचं ' दिल खेचक पोज' देऊन केलेलं 'फोटो सेशन'ही आटोपलं. मग मात्र 'हे' गृहस्थ उठले आणि कुठेसे गायब झाले. पुन्हा पंधरा- वीस मिनिटातंच ते पार्टीतून निघून गेलेले दिसले. जाताना त्यांच्याबरोबर आणखी दोघे जण होते. त्या दोघांनी शहरी पेहेराव केला असला तरीही त्यांच्या चेहेरेपट्टीवरची अस्सल रांगडी, ग्रामीण छाप आणि या त्यांना अनोळखी चमचमत्या दुनियेतलं त्यांचं भांबावलेपण लपंत नव्ह्तं. मात्र तिथून बाहेर पडताना काही तरी अनपेक्षित घबाड हाती लागल्याचा आनंद त्यांच्या चेहेर्‍यावर विलसंत होता...
ते तिथून निघून गेले तरीही त्या कोपर्‍यांत बसून रहाणार्‍या माणसाबद्दल माझी उत्सुकता ताणलेलींच होती. तो कोण होता? इथे येऊनही तो खाण्यां-पिण्यांत अगदी गप्पां- टप्पांतही तो सहभागी का नव्हता? त्याच्या
बरोबर असलेले कोण? ते जाताना एवढे खूष कशामुळे झाले?...... काहींच कळंत नव्ह्तं. शेवटी न रहावून मी तिथल्या एका छायाचित्रकाराला याबद्दल विचारलं; तर तो हसतंच सुटला... हसण्याचा ओघ आवरल्यानंतर त्याने 'त्या' माणसाबद्दल जे सांगितलं ते अवाक करणारं होतं....
त्या माणसाचा चित्रपट-मालिका सृष्टीशी काहीही संबंध नाही. तो प्रसारमाध्यमांतलाही नाही. मात्र फिल्मी पार्ट्यांचा अचूक ठाव ठिकाणा त्याच्याकडे असतो. बहुतेक पार्ट्यांना तो आवर्जून हजर असतो. मात्र तिथल्या खाद्य- पेयांना तो हातही लावत नाही. तो येताना चार-दोन 'गिर्‍हाईकं' बरोबर घेवून येतो. इथे आल्यावर तो त्यांना कुणा 'हौशी' किंवा 'कथित फ्री- लान्स' छायाचित्रकारांच्या हवाली करतो. तो छायाचित्रकार त्या 'गिर्‍हाईकां'चे 'तारे-तारकां'बरोबर फोटो काढतो. एवढं काम झालं की तो माणूस त्या 'गिर्‍हाईकां'सह निघून जातो. त्यानंतर कधीतरी ते फोटो तो त्या छायचित्रकाराकडून ताब्यात घेतो आणि टपालाद्वारे 'गिर्‍हाईका'कडे रवाना करतो. तारे-तारकांबरोबर फोटो काढण्याची हौस भागवल्याबद्दल तो 'गिर्‍हाईका'कडून प्रति फोटो दोन हजार रुपये 'फक्त' घेतो आणि त्यातले पाचशे फोटोग्राफरला देतो. पूर्वी हा त्याचा अर्धवेळ (पार्ट-टाईम)व्यवसाय होता. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्यामुळे त्याला पूर्ण वेळ यांच व्यवसायासाठी द्यावा लागतो आहे.
फिल्मी-टि.व्ही. सितार्‍यांबरोबर आपला फोटो काढण्याची जनसामान्यांची हौस हे त्याचं 'भांडवल'. दुसर्‍याच्या पैशाने होणार्‍या पार्ट्यांमधे जमणारा नट- नट्यांचा मेळा आणि स्वतःच्या कॅमेरा आणि ओळ्खीने फोटो काढणारा छायाचित्रकार हे त्याच्या व्यवसायाचे 'इन्फ्रास्ट्रक्चर'!!! मात्र या व्यवसायाचे 'मार्केटिंग' तो मोठ्या खुबीने करतो. त्यासाठी त्याने आपल्या मुंबईतल्या आणि गावकडंच्या घरीही आपले विविध तार्‍यांबरोबर काढलेले फोटो भिंतीवर लटकवलेले आहेत. नव्या जुन्या तार्‍यांच्या चलती- ढलती प्रमाणे आपली 'फोटो गॅलरी' वेळोवेळी 'अपडेट' करुन घेण्याचा कटाक्ष तो काटेकोरपणे पाळतो.अशा या बिन- भांडवली व्यवसायातून तो हजारो रुपये कमावतो आणि ते फोटो काढणर्‍या फोटोग्राफरलाही एरवीपेक्षा दोन- पाचशे रुपये जास्त मिळ्वून देतो. शिवाय फोटो काढून घेणाराही घरात तारे- तारकांबरोबरचा आपला फोटो लटकवून आल्या-गेल्या समोर मिजास मारतो!!!

गुलमोहर: 

अवाक करून टाकणारी कल्पनाशक्ति आहे! आवडलं!

झुकती है सिर्फ झुकानेवाला चाहिये! वर्णन करायची हातोटी आवडली.छान लेख आहे.

छान वर्णन केलत.
कालल पेज थ्री पाहिलाय त्यामुळे तर पटापट नजरेसमोर सगळ झळकुन गेल Happy

धन्यवाद! या पुढेही वाचा आणि परखड प्रतिसाद द्या.

धन्यवाद! या पुढेही वाचा. माझ्याकडे आणखी सांगायला खूप आहे. सांगत जाईन. तुम्ही प्रतिक्रिया द्या.

हा माझ्या प्रतिभेचा आविष्कार नाही तर प्रत्यक्ष अनुभव आहे. दुनिया में ऐसा भी होता है। इतना ही नही और भी बहोत कुछ होता हैं। देखते रहो।

सांगण्यासारखं खूप आहे. सांगत जाईन. वाचा आणि मनापासून प्रतिक्रिया द्या. आवडेल.

भन्नाट कल्पनाशक्तीचं हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे... टिळकश्री,तुमच्याकडे अश्या माहितीचा खूप खजिना दिसतोय... इथे असेच आपले अनुभव लिहित रहा..आम्ही मनापासुन प्रतिसाद देऊच....

एकदम भन्नाट धंदा आहे. श्री टिळक, नविन माहिती लवकर येऊ द्या. पण देव करो आणि कोणी ह्यापासून inspiration घेऊ दे नको....