मायबोली गणेशोत्सव २००९ स्पर्धा घोषणा

Submitted by संयोजक on 7 August, 2009 - 00:25

Ganeshotsav_spardha_ghoshana2.jpgमायबोली गणेशोत्सव : हमखास यशस्वी पाककृती!

लागणारे जिन्नस : भरपूर उत्साह, आवडीनुसार कल्पनाशक्ती, विनोदाचा मसाला, कोपरखळ्यांची फोडणी, दाद आणि प्रतिसादांची सजावट आणि रांधायला-वाढायला-चाखायला लेखण्या, कॅमेरे, झारे, कढया, चॉपस्टिक्स आणि रंगपेट्या सुध्दा!!!

लागणारा वेळ : अथपासून इतिपर्यंत.

क्रमवार पाककृती :
१. गणरायाचे स्मरण करून मायबोली गणेशोत्सवासाठी सज्ज व्हावे.
२. संयोजकांनी स्पर्धा घोषणा केल्या की लगेच आपली कल्पना शक्ती वापरण्यास सुरूवात करावी. एकीकडे उत्साहाची कढई रटरटायला ठेवावी.
३. लेखण्या, कॅमेरे, झारे, कढया अशी यंदाच्या वर्षीची खास आयुधं वापरून आपली प्रवेशिका तयार करायला सुरवात करावी.
४. गणेशचतुर्थीच्या दिवशी गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाली की रोज न चुकता श्लोक, आरत्या, घोषणा, नैवेद्यासह मांडवात हजेरी लावावी.
५. प्रवेशिका स्वीकारण्याची पध्दत जाहीर होताच विनोदाचा मसाला आणि कल्पनाशक्ती उत्साहाच्या कढईत मिसळून प्रवेशिका पूर्ण करावी. ही पायरी वेळेत करणे अतिशय महत्त्वाचे आहे. उशीर झाल्यास भट्टी बिघडण्याचा संभव अधिक.
६. संयोजकांनी ऐन वेळच्या स्पर्धा, तसेच STY सारखे कार्यक्रम जाहीर केले की कोपरखळ्यांची छान खमंग फोडणी द्यावी. असे केल्याने ह्या पाककृतीची लज्जत वाढते.
७. सांस्कृतिक कार्यंक्रमांना उपस्थित राहून दाद आणि प्रतिसादाची आकर्षक सजावट करुन ह्या पाककृतीचा पुरेपूर आस्वाद घ्यावा.

अधिक माहिती आणि टिपा :
१. गणेशोत्सव ऑनलाइन असल्याने घरापासून दूर रहाणार्‍यांना ही कृती खूपच उपयोगी पडते. घरच्या गणेशोत्सवाची कसर भरून निघते.
२. घर-मुलं-नोकरी-रहदारी-बॉस इ. कसरतींमधून सहजासहजी सार्वजनिक गणेशोत्सवात भाग घेणे शक्य होते.
३. सांस्कृतिक कार्यक्रमांनिमित्त मान्यवरांना भेटता येते, तसेच आपले अंगभूत कला-गुण दाखवण्याची संधी मिळते.
४. गणरायाच्या निमित्ताने सगळे एका मांडवात येतात आणि वातावरण हसतंखेळतं होतं.
५. पाककृती करताना काही शंका आल्यास संयोजकांशी त्वरीत संपर्क साधावा.
६. पदार्थाचा अभिप्राय संयोजकांना नक्की कळवावा तसेच काही सूचना/सुधारणा असतील तर त्याही जरूर सांगाव्यात.

वाढणी/प्रमाण : सर्व मायबोलीकरांसाठी

माहितीचा स्रोत : गणेशोत्सव संयोजक मंडळ

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवाच्या मांडवात अशी पाककृती बनवूयात, जिची चव मनामधे कायमची रेंगाळत राहील!!!

मायबोली गणेशोत्सव २००९ घेऊन येत आहे वेगवेगळ्या स्पर्धा, लिखित आणि श्राव्य कार्यक्रम आणि भरपूर अवांतर गोष्टी.

ज्या स्पर्धांसाठी स्पर्धकांना वेळ लागणार आहे आणि पूर्वतयारी आवश्यक आहे अश्या स्पर्धा आधी जाहीर करत आहोत.
स्पर्धांची सुरवात गणेश चतुर्थीला होईल आणि आपापल्या प्रवेशिका कुठे आणि कशा पाठवायच्या हे लवकरच जाहीर करण्यात येईल.

---------------------------------------------------------------------------------------

फोटोग्राफी स्पर्धा क्र. १ : कृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी

फोटोग्राफी स्पर्धा क्र. २ : पर्यावरण - सकारात्मक आणि नकारात्मक

"रंगपेटी उघडू चला..!!!" - लहान मुलांची चित्रकला स्पर्धा

"नाव विदेशी-चव देशी" - पाककला स्पर्धा

---------------------------------------------------------------------------------------

स्पर्धेच्या नावावर टिचकी मारल्यास स्पर्धेची माहिती आणि नियम बघता येतील.

विषय: 

अरे वा सहीच की.. गणेशोत्सवाची तयारी जोरदार चालु झालीये तर... सर्व संयोजकांना या शुभकार्यासाठी अनेक शुभेच्छा.. Happy
गणपतीबाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया....

मस्त Happy

मस्तच. Happy

या वर्षीच्या स्थापनेकरता एक विनंती. लिंब्याच्या सहयोगाने जमते का बघा. त्याने मधे गणेशमुर्तीचे जे फोटो दाखवले होते तेच पेंटब्रशमधे कुणाला रंगवता आले तर यावर्षीची मायबोलीची गणेशमुर्ती म्हणुन काय हरकत आहे. ही आपली माझी एक विनंती बरका. करता आली तर.

वा, वा. किती प्रसन्न वाटलं, बाप्पाला बघून.

सगळ्या कार्यक्रमांसाठी अशी वेगवेगळी पोस्टरे बनवता येतील. त्या त्या कार्य्क्र्माच्या बीबीसाठी. गणेशोत्सवाचं जे मुख्य पान आहे, तिथे या सर्वांची थंबनेल्स करून टाकता येतील. मुख्य पान आकर्षक होईल, आणि ट्रॅफिकही थोडाफार वाढेल. Happy

गणपती बाप्पा मोरया!!
संयोजकांना शुभेच्छा!! पोस्टर सुरेख आहे. बाप्पाचं आगमन सुखदायी ठरो.

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. Happy

कांदापोहे,
आपल्या सुचनेचा नक्कीच विचार करू. मागच्या वर्षी सुद्धा लिंबुटिंबू ह्यांनी आधी मायबोलीवर प्रसिध्द केलेली गणपतीची छायाचित्रे मुर्ती सजावटीकरीता वापरण्याचा विचार झाला होता पण काही कारणांनी ते शक्य झाले नव्हते. सुचने बद्दल धन्यवाद.

लवकर या, लवकर या,
गणपती बाप्पा लवकर या
गणपती बाप्पा मोरया.

पोस्टर खूप आवडल. कार्यक्रमाची माहिती कुठे बघायला मिळेल.?

विक्रम अरे जरा धीर धर, वर लिहीलय ना लवकरच येत आहे, मग येतील ना बाप्पा लवकरच. Happy
आणि माहिती पण येईल लवकरच.

शुभेच्छा!!! लेखिकेंनो/लेखकांनो, आम्हा आतुर वाचकांसाठी खुप खुप लिहा..

अरे वा! गणेशोत्सवाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!
मला आमच्या जय हेरंब (http://www.jayheramb.com) गीतसंग्रहातील गीते streaming साठी उपलब्ध करून द्यायला निश्चितच आवडेल! कोणाला संपर्क करावे बरं?

अरे स्पर्धांची घोषणा झाली!
मस्तच आहेत सगळ्या स्पर्धा Happy पाककृती फंडू एकदम.

मोरया रे!

Pages