मायबोलीचा वर्षाविहार-२००९ मावळसृष्टी येथे १९ जुलै २००९ रोजी संपन्न झाला.
या वविला खालील मायबोलीकरांची (व अर्थातच त्यातील काहींच्या कुटूंबियांची) उपस्थिती लाभली.
पुण्याहून-
yashwardhan, vegayan, atlya, utima, arun, arbhaat, devdattag, ankyno1, kmayuresh2002,
shyamali, dakshina, palli, chandanam, rajya, samir_ranade, kandapohe, himscool, Ramachandrac, aashu_D, krishnag, prabhuneyogesh, SAJIRA, sushya, aarfy, deepurza, limayeparesh
मुंबईहून-
ash_ananya, kavita.navare, pranav.kawle, ashwini_k, gharuanna, vinay_bhide, neel_ved, lalita-preeti, anand_suju, yo.rocks, reena, anandmaitri, chetnaa, Indradhanushya, kedar123, ashbaby, amruitsaya, ladaki, nandini2911, kishormundhe, kiru, amar_kulkarni, aavli, zankaar, needhapa, svalekar, amitdesai
काय काय झाले या ववित? मावळसृष्टीतल्या अरुंद रस्यावरून कशा गेल्या पुणे अन मुंबईच्या ५० सीटर बसेस? लोणावळ्यापेक्षाही उंच असलेल्या मावळसॄष्टीतल्या धबधब्याला गाठण्यासाठी पुन्हा शेकडो फुट खोल जाऊन कुणी कुणी काय काय कष्ट केले? सांस्कृतिक कार्यक्रमात कुणी काय धमाल उडवली? मुकाभिनयात कुणी मारली बाजी, अन कुणी केला अचाट नि अतर्क्य अभिनय? बसमध्ये येता-जाताना कसे कोसळले हास्याचे धबधबे, अन कशा वाहिल्या पांढर्या शाईच्या नद्या? 'मायबोली क्विझ' मध्ये कशी झाली मायबोलीकरांच्या 'ज्ञानाची' चाचणी? खान-पान कार्यक्रमात कोण ठरले सरस? सांस्कृतिक समितीने अन मायबोलीकरांनी कशी उडविली एकेमेकांची विकेट? ववि 'सुखरूप' पार पाडल्याबद्दल कसा झाला संयोजकांचा सत्कार?
प्रचंड उत्साह आणि मायबोलीकरांची विक्रमी हजेरी यासाठी हा 'ववि' लवकर विसरला जाणार नाही, यात शंकाच नाही. या धमाल सहलीत सहभागी झालेले मायबोलीकर, त्यांच्याच शब्दांतील वृत्तांत आणि त्यांच्याच खास भाषेतल्या प्रतिक्रिया लवकरच इथे येत आहेत..
तर, सावरून बसा लोकहो! सादर आहे, तुमच्याच मित्रांनी केलेल्या धमालीचा धमाल वृत्तांत..
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म आशू धन्स डिटेल वृ. बद्दल. आणि मी किती मिसलय ह्याची जाणिव करून दिल्याबद्दल
साज्या तू काय आकडे लावले होतेस काय रे? खोल्यांसाठी?
*********************
My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.
आयला,मी आज
आयला,मी आज ट्रेनिंगला काय होतो किती उच्छाद मांडला इथे वविकरांनी...
आशु,मस्त वृत्तांत ग.:).. पण अजुन वृत्तांत येऊ देत...
नविन लोकांपैकी म्हणजे ज्यांनी पहिल्यांदाच हा ववि अनुभवला त्यातल्या काही जणांनी तरी सविस्तर वृत्तांत लिहावेत असं आम्हा वविसंयोजकांचा त्यांना खास आग्रह आहे :)... आणि प्रतिक्रिया तर सगळ्यांच्याच यायला हव्यात
एकुणात हा वविही मस्त पार पडला.. वरुणराजाची कृपाही होतीच त्यामुळे वर्षाविहारही करता आला... :)या वविचे खास वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंतच्या सगळ्या वविंमधली वविकरांची सर्वात जास्त संख्या या वविला होती.. तब्बल ८१ वविकरांनी या ववित भाग घेतला... वविच्या यशामागे संयोजकांबरोबरच सर्व वविकरांचाही हात आहे तेव्हा सर्व संयोजकांतर्फे मी सहभागी वविकरांचे आभार मानतो आणि मायबोलीचे नविन प्रशासक `svsameer' यांनाही खास करून धन्यवाद कारण त्यांनी वेळोवेळी संयोजकांना मायबोलीच्या साईटवर वविसाठी लागणारी सगळी मदत तत्परतेने केली...
सर्वात
सर्वात प्रथम सुंदर वर्षाविहार (आणि पाऊस) यशस्वी रीत्या पार पाडल्याबद्दल संयोजकांचे धन्यवाद
आशू , साजीरा : मस्तच वॄ आणि प्रश्नपत्रिका
दीप्या : भेटच तू परत
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
साजिर्या
साजिर्या ते काही नाही ! उत्तम नाच केल्याचं बक्षीस राम्यालाच.. त्याने "मसक्कली मटक्कली" या गाण्यावर "यारी है इमान मेरा" या गाण्यात प्राण ज्याप्रमाणे नाचला आहे तो नाच केला आणि स्वताच्या टीमला गंडवलं.. (नंतर येऊन मला हळूच म्हटला पण "कसं गंडवलं". पहील्या आलेल्या गटाकडून राम्याने या मॅच फिक्सींगसाठी काय काय वसूल केलं याची अधिकृत माहीती अजून पर्यंत उपलब्ध होऊ शकलेली नाही) ... या बरोबरच दक्षिचा निषेध तिने गटातल्या लोकांचं वय विचारात न घेता क्लू काढले होते. अरे राम्याचं वय पहाता त्याला साधारण ७०-८० च्या दशकातली गाणी अभिनयाला द्यायला हवीत. त्यामुळे राम्यावर झालेल्या अन्यायाचा मी निषेध करते.
या वेळच्या वविमधे सर्वात छान वेळ धबधब्यात गेला. धबधब्यात बसून वरुन पडणार्या पावसाची तमा न बाळगता मी सर्व माबोकरांच्या अंगावर पाणी उडवलंच.. how very smart of me na agadi... आशुडी म्हणतेय तसा माझा हा स्मार्टनेसपणा सगळ्या विडीओमधे दिसेल बघा.
मी बसमधे चढल्याचढल्या मला बहुतेक साजिरा किंवा कोणातरी तत्पर संयोजकाने "तुला आटलांटावरुन फोन आला होता का ? " असा महत्त्वाचा प्रश्न विचारला. मोबाइल पडताळल्यावर "passing the batton" (मी नवा बॅनर पाहता पाहता "पासिंग द बॅनर" म्हणाले, असू दे होतं असं कधी कधी) साठी केलेला फोन मिस झालेला दिसला. मग मी पण तत्परतेने फोन लावला. राहुल जोग तसेच पुण्याचे अटलांटा जीटीजी मधे पेरलेले गुप्तहेर पराग सहस्त्रबुद्धे अका अॅडम यांच्याशी बोलताना त्यांचा मेनु वडापाव व पावभाजी होता ही महत्त्वाची माहिती मिळाली. हे विशिष्ट नविन कॉम्बिनेशन माबोवरच्या सुगरणींनी करुन पहावे ही नम्र विनंती. माझ्या गप्पा झाल्यावर अनुक्रमे अ.आ (द आजोबा), मयुरेश (द कार्याध्यक्ष), साजिरा (द संयोजक), अर्भाट (द अदर संयोजक) यांनी पण अटलांटा जीटीजी मधल्या लोकांशी गप्पा छाटल्या. साजिरा आणि अटलांटा मधून बोलणारे एक सदस्य दोघांनी एकमेकांना प्रेमाने वृत्तांताची वाट पहातो वगैरे सांगितले.
बसमधले खेळ सुरु करण्यासाठी मी उत्साहाने अंताक्षरीला सुरुवात केली. थोड्याच वेळात माझ्या चाणाक्षपणामुळे मला कळले की मी एकटीच आळीपाळीने दोन्ही गटांची गाणी म्हणून अंताक्षरी खेळत आहे. माझ्या सुमधुर आवाजात पूर्ण वेळ गाणी ऐकण्याचा पुण्यातल्या वविकरांचा कट मी हाणून पाडला व डंब शेराज या नव्याच खेळाची सुरूवात करुन दिली
बाकी डायवर सायेबांचे बी आबार बरं का वो.. एवडी मोट्टी बस .. येवड्या मोट्ट्या लोकांसकट .. त्या इलुशा पुलावरुन पल्याडला न्येली बगा..
बाकी तुमी काय बी मना राव .. काय बी क्येलं नाय क्येलं.. येवस्था चोख असली नसली.. तरी बी वविला लय मज्ज्या येती .. दरवर्साला आन वाडतच जाती
तळटीपः बाकी सुधारणांसाठी वाव नेहेमी असणार आहेच. सुधारणेसाठीच्या सूचना योग्य त्या संयोजकांकडे मी पोचवेनच त्यांची इथे चर्चा करण्याची आवश्यकता वाटत नाही.
>> पुण्याचे
>> पुण्याचे अटलांटा जीटीजी मधे पेरलेले गुप्तहेर पराग सहस्त्रबुद्धे अका अॅडम
आवडलं!
पण ह्या पुण्याच्या गुप्तहेरानं इथल्या बातम्या काढता काढता पुण्याच्याही बर्याच महत्त्वाच्या बातम्या उघड केल्या
गुप्तहेराला अजून जास्त प्रशिक्षित करणे गरजेचे आहे
पण
पण नीलवेदला रेखाच्या कोणत्याही ३ चित्रपटांची नावे सांगताना रेखावर त्याची विकेट पडून काय काय आठवावे हे न कळून त्याला तिसरे नाव सुचले नाही आणि आमचा गट विजयी झाला!
आशु डी, नीलला त्यावेळेस का कुणास ठावुक अचानक जॉर्ज बुश आठवला आणी घोळ झाला.
एकंदरीत ववीला जाम धम्माल आली , बसमध्ये आनंद ने जी करमणुक केली त्याला तोड नाही, परतीच्या प्रवासात वस्रहरणमधला अभिनय तर अतीशय जबरदस्त........
दक्षिणा, तुझ्या ऊत्तम सुत्रसंचालनाला मनापासुन दाद.
चांगल्या नियोजनाबद्दल संयोजकांचे आभार.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी !!
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी ! एवढ्या जगात माय मानतो मराठी !!
सगळ्यांचे
सगळ्यांचे वृत्तांत छान..
क्रिशभाव.. आणखिन क्रमशः येउदे
यंदाचा ववि केवळ उपस्थितीएवढाच पुढे नव्हता.. तर सगळ्याच बाबतीत..
अगदी छान छान बॅनर्स, मायबोलीचा झेंडा.. एकदम मस्तच ! खुप छान प्रगती !!
माझ्या सलग चौथ्या ववि चा सारांश :
यंदा कधी नव्हे ते बसच १०-१५ मिनीटे उशीरा आली नि त्यामुळे सगळेच दिलेल्या वेळेप्रमाणे आपपल्या ठिकाणी हजर होते ! (रीनाचे तर खास आभार.. नाहितर मावळसॄष्टीत थेट जेवणाच्या ताटावर बसावे लागले असते :G..)
एशबेबीला मागेच सोडुन पुढे गेलेली गाडी !! मागच्या वर्षी चेतना ने असा अनुभव घेतला होता.. "समोरुन बस गेली पण काही थांबली नाही.. ऑ ).. हे आता नेहमीचे झालेय..
"घरुन दिलेला डबा नि पाणी" ने भरलेली इंद्राची भारी बॅग ! (जल्ला तशीच्या तशी पुन्हा घरी घेउन गेला ते वेगळे.. जुईने गोफणीचे अस्त्र नक्कीच वापरले असावे असा अंदाज ! )
बसमधील मागच्या सीटवर चालु असलेली नॉनस्टॉप अंताक्षरी- गाण्यांची धमाल.. अगदी मुजिक सकट -:
#सारेगमप च्या धर्तीवर "गाण्यामागे एक गंमत आहे" असे पंडीतांच्या शैलीत सांगत गाण्याचा खुर्दा पाडणारे 'आनंदसुजू' नि 'मिस्टर नवरे'.. "पण छान झाले"
# "नाच रे मोरा" च्या गाण्यावर आनंदमैत्रीने फुलवलेला पिसारा मस्तच
# विनयने "ळ" वरुन शोधुन काढलेले गाणे..
# वाळेकर नि १२३ जोडपे केवळ श्रोत्याची भुमिक निभावत होते.
# असल्या धमाल अंताक्षरीला सोडुन बाहेरील निसर्ग कॅमेर्यात टिपण्यात मग्न असणारे अश्विन नि इंद्रा !! (फोटो येउंदेत मग कळेल.. कित्ती (छान)आले कित्ती (वाया) गेले.. ) नि ड्रायवरची दिशाभुल होउ नये म्हणुन मार्गदर्शन करणारे घारुअण्णा !!
# तर एकीकडे घारुअण्णांची छोटी नि कवितेची सानिका या लिटील चॅम्प्संचा रंगलेला खेळ, निलच्या छोटुने दिलेल्या 'जय शिवाजी' च्या घोषणा..
देखावे प्रवासातील-:
# वाटेत दिसलेला एक भलामोठा नयनरम्य धबधबा (नाव कुणाला माहित आहे का ??)
# तिकोना नि तुंगी या गडांचे खिडकीतुन दिसलेले पावसातील विहंगमय दृश्य.. (येत्या ऑगस्टमध्ये तिकडे जाण्याचा प्लॅनपण लगेच शिजवला गेलाय.. बघु किती काळ टिकतोय तो..)
सुंदर सुंदर देखावे दाखवत बसने सुरु केलेली शेवटच्या टप्प्यातील खडतर वाटचाल..! आता येईल आता येईल म्हणता म्हणता सामोरे आलेले कठीण रस्ते.. कठीण वळणे.. नि त्यात भलामोठा अरुंद पुल !! तो बघताच " बस ! आगे नही जायेगा" म्हणणारा ड्रायवर (बहुतेक त्याची पण खर्या अर्थाने ड्रायविंगची बरीच परिक्षा झाली).. अहाहा काय तो पुल ! वाटले आज आमची बस त्या पुलाच्या लोखंडी कडा वाकवणार!! पण निल, घारुअण्णा, अश्विन यांच्या हातवार्याच्या मदतीने ड्रायवरने पुल एकदाचा सर केला !
मावळसृष्टीत अवतरताच पुणेकरांनी केलेले सहर्षपुर्ण स्वागत..
दुपारच्या सुमारास झालेला पोटभर नाश्ता तर मस्तच ! (भुकही लागलीच होती ! काय करणार घारुअण्णांनी 'कामत' हॉटेलचे आमिष दाखवत इथवर आणले होते )
वजन स्पिकरचे -:
आपण आणलेला वजनदार लाउडस्पिकर उचलण्यासाठी इतरांना कामाला लावणारा कट्ट्याचा मालक ! तो भलामोठा स्पिकर ठरल्याप्रमाणे खाली (आम्हाला वाटले असेल फक्त १०-१५ पायर्या खाली.. त्यातकाय) हॉलवर घेउन जायचे होते.. नि त्यात आमचा वाटाड्या 'आरभट' मार्गदर्शन करत नेत होता (हा नक्कीच आमची वाट लावायला नेत होता.. :G.. जल्ला ५०-६० तरी पायर्या असतील पुढे.. त्यापण कुठल्या तरी किल्ल्यावर आहोत अशा भासवणार्या..)
आमचा (घारुअण्णा, योगायोग, मी, अमर, आनंदसुजू, अवली)तर तो स्पिकर चिखलरस्त्यातुन घेउन जाताना दम निघत होता.. नशिब कोणाच्या तरी खाली वीज पुरवठा नसल्याचे लक्षात आले नि त्यांनी तात्काळ आरभटांना संदेश धाडला 'तशेच परत या म्हणुन'.. भाग्य आमचे आम्ही जेमतेम १० च पायर्या उतरलो असू..
असाच अवजड अनुभव संध्याकाळी कार्यक्रम आटोपल्यानंतर पण आला.. फरक एवढाच की यात फक्त 'किरु' नावाच्या अजुन एका बळीची नोंद झाली..
(च्यामायला ! विन्या, तू परत स्पिकर्स आणायचे म्हण फक्त मग बघतोच !!)
धबधब्यात न्हाउन निघाले मायबोलीकर..
पावसाची जोरदार हजेरी त्यामुळे पाण्याचा प्रवाहसुद्धा जोरात होता.. पाणी सुद्धा थंडगार.. पाण्याचा खळखळाट नि आनंदीत माबोकरांचा आरडाओरडा याने तर सारा परिसर दुमदमुन गेला..
जेवण आटपताच सां स चे कार्यक्रम झाले.. नाईलाजास्तव मिळालेल्या कमी वेळेतही कार्यक्रम छानपणे नियोजीत केल्याबद्दल सां स चे अभिनंदन ! दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यक्रम रंगले ! सुत्रसंचालनदेखील छान झाले.. यातही केपी, रामा नि राज्या यांनी चित्रविचित्र अभिनय करत धमाल उडवुन दिली.. या सर्व हास्यकल्लोळात 'अतल्या'च्या खुर्चीने सोडलेला दम अजुनच हसवुन गेला.. अतल्या ला जेवण खुपच आवडले होते वाटते
वविच्या अंतिम क्षणी फोटोग्राफर्सना ग्रुप फोटो घेण्यासाठी मात्र खुप कष्ट घ्यावे लागले.. ! एकतर पावसात कॅमेरा ओला होण्याची भिती नि त्यात सगळेजण छोट्या छोट्या घोळक्यामध्ये विखुरलेले ! गप्पांमध्ये रमलेले.. सगळे निरोप घेत घेत जागीच थांबत होते !
पुणेकरांचा निरोप घेउन मुंबईकर परतीला निघाले.. येतानाही गाडीत तितकीच धमालमस्ती.. नाव घेण्याचा कार्यक्रमसुद्धा पार पडला.. '१२३' जोडप्याने एकमेकांची नावं घेउन धमालमस्तीमध्ये खर्या अर्थाने सहभागी झाले.. पण अश्विन ने तर कमाल केली.. नाव घेण्याची चक्क भलीमोठी लिस्ट खिशातुन बाहेर काढली.. !!!! कितीजणींची नाव घ्यायचा विचार होता कुणास ठाउक.. आनंदमैत्री, योगायोग असताना 'संथ, उदास, जुदाई' अशा प्रकारची दर्दभरी गाणी झाली नाहीत तर नवलच.. किरुनेदेखील अधुनमधुन शीळ घालत छानपैकी साद दिली.. मी पण जेमतेम नाच केला.. तर एकीकडे आनंदसुजु, निल यांनी 'वस्त्रहरण' नाटकाच्या आठवणी ताज्या केल्या..
अशा बर्याच गमतीजमती (ते बाकीचे लिहितील, मी दमलो.. :P) करत ववि पार पडला.. यावर्षी ज्यांनी कोणी ववि मिस केला त्यांना पुढच्या वर्षी उपस्थित राहण्यास हमखास संधी मिळुदे ! म्हणजे पुढील ववि ला अजुन मोठी उपस्थिती लाभुदे अशी सदिच्छा नि शुभेच्छा !
>>'१२३'
>>'१२३' जोडप्याने एकमेकांची नावं घेउन धमालमस्तीमध्ये खर्या अर्थाने सहभागी झाले..<<
अरेरे.. हे मिसलं.. पार्ल्यातून बरोबर येऊनही यांचे आवाज नीट लक्षात आले नव्हते.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
५ वर्षांनी
५ वर्षांनी वविला जाणे तेही मुंबईतून त्यामुळे जरा अतिच उत्साहात होते मी. त्या उत्साहाची सुई केदार आणि विज्ञालाही टोचली मी. पावणेसहाला जो-वि लिंक रोड आणि वे इ हायवेच्या जंक्शन वर पोचायचं होतं म्हणून पाच वाजता पार्ल्यात रिक्षा सांगून ठेवली.
चारच्या ऐवजी चार वीसला उठूनही पाच दहापर्यंत आवरलंच माझं. सव्वापाचला घरातून निघताना केदारला फोन करून उत्कर्ष ला पोचा असं सांगितलं तर ते आधीच उत्कर्षला पोचलेले होते. त्यामुळे तिथेही वेळ गेला नाही. वे इ हायवेला ट्रॅफिकही फारसा नव्हता त्यामुळे जेमतेम १०-१५ मिनिटात पार्ले ते जोगेश्वरी हा पल्ला गाठला. साडेपाच ला त्या स्पॉटला पोचलो.
अश्विनला फोन केला तेव्हा तो १५-२० मिनिटात येतोच असं म्हणाला. तेव्हा आम्ही १५ + २० = ३५ मिनिटे लागतील असा हिशोब केला.
आम्ही उभे होतो तो स्पॉट एकदमच जंक्शन स्पॉट होता. तिथे उभे राहून येणार्या वासेस मुळे मला आता गंध कुणाचा - भाग २ लिहावं लागणार की काय असं वाटलं. खूप रिक्षा अत्यंत आशेने आमच्याजवळ येऊन थांबत होत्या किंवा स्लो तरी होत होत्या.
६ वाजता अश्विनला फोन केला तेव्हा ते लोक कांदिवलीला पोचलोत आणि ५ मिनिटात येतोच असं त्याने सांगितलं. कांदिवली ते जोगेश्वरी ५ मिनिटात म्हणजे आपण ज्याला जोगेश्वरी समजतोय ते वेगळंच आहे की काय अशी शंका येऊन पाल बिल चुकचुकली मनात. पण मी दाखवलं नाही तसं.
साधारण पाउण तास त्या जंक्शन स्पॉटवर खडेखडे पुतळाबाई झाल्यावर ६.१५ ला एक बस आली. ज्यावर मायबोलीचे बॅनर नव्हते. एक न फडकणारा झेंडा होता. ती बस थांबल्यावर माना वाकड्या करूनच त्या झेंड्यावरचे मायबोली वाचता आले.
एकदाचे बसलो बसमधे. लगेच सॅण्डविच हवे का असा लाडीक प्रश्न आला. इतक्या सकाळी नवीन लोकांना हावरटपणा दिसायला नको म्हणून मी नको म्हणाले. मग थोड्यावेळाने मागून घेतले.
चक्क १५ मिनिटात मुलुंड आले. मुलुंडला खूप लोक चढले. ज्यातले २-४ च ओळखीचे चेहरे वाटले. बसवर ब्यानर लावले आणि मग बस पुढे निघाली. नवी मुंबईच्या काही लोकांना उचललं. रिना वेळेवर आल्याबद्दल तिच्या होणार्या अहोंचे अभिनंदन करण्यात आले. अश्विन सतत हातातली यादी चाळत होता. खुणा करत होत्या त्यावर पण तरी बिचार्या साधनाला सोडून बस आली पुढे. तिला घेतले
अश्विनची सगळी लिस्ट खुणांनी भरली होती. सगळे आले होते आणि आता प्रवास सुरू झाला. माझ्या लेखाला जागून मी संयोजकांपैकी कुणाला तरी सूचना केली की आता चहासाठी गाडी थांबवाल तेव्हा तिथे आम्हा बायांची सोय असेल असं बघा.
मग गाडीत पुढे लागलेला फड अचानक मागे शिफ्ट झाला तेव्हा मीही मागे गेले. त्या त्या गाण्याची सोडून कुठल्याही वेगळ्याच चालीत एखादे गाणे म्हणणे, गाण्यांची विडंबने, गाण्यांच्या आरत्या असा बराच स्टॉक आनंदने बाहेर काढला. चहाची गरज सगळ्यांना होती म्हणून कुठेतरी थांबायचे ठरले.
बस साधारण चारपाच वेळा यू टर्न घेऊन कुठेतरी चहासाठी थांबली. तेव्हा आपण नक्की कुठल्या दिशेला जात होतो मुळात हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. जिथे चहासाठी थांबलो तो बार असून तिथे सकाळी दूध असलेला चहा उपलब्ध नव्हता हे कळल्यावर चहा बारगळला. बायांची सोय नसल्याने तेही बारगळलं. घारूअण्णांनी तोंड भरून कामत चं आश्वासन दिलं.
गाडी मार्गस्थ झाली मग नॉनस्टॉप अंताक्षरी इत्यादी वर्णन यो रॉक्स प्रमाणेच..
मधेच खंडाळ्याच्या कामतच्या वरून गाडी निघाली तेव्हा मी अरे हे तर कामत थांबायचंय ना असं म्हणायचा क्षीण प्रयत्न केला पण गाण्यांच्या नादात तो मलाही ऐकू आला नाही.
परत एकदा नॉनस्टॉप अंताक्षरी आणि देखावे..
तेवढ्यात गाडीने खराब रस्त्यावर चाकार्पण(पदार्पणच्या चालीवर) केले. एक मोठ्ठा खड्डा, गाडी उडाली आणि अचानक माझ्या पायांवर काहीतरी जोरात कोसळले. मी साधारण साडेबत्तेचाळीस सेकंद फ्रीझ झाले होते 'द स्क्रीम' या पेंटींगसारखी. मग लक्षात आले कोसळले ते केश्विनी होते.
त्यानंतर तिला कम्पलसरी बसायला लावलं..
कठीण रस्ते, अरूंद पूल इत्यादी काही कळले नाही कारण तेव्हाही आमच्या गाण्यांमधे खंड पडला नव्हता आणि लवकरच कृष्ण होण्याची चिन्हे दिसत होती.
मावळसृष्टीत पोचलो एकदाचे. पोहे हादड हादड हादडले. (१२ वाजले होते राव... ते सॅण्डविच साडेसहाला खाल्लं होतं!)
मग पुणे बसवाल्यांशी भरतभेटी घडल्या. प्ल्यानमधे चेंज होतोय न होतोय काय होतोय याचा अदमास घेत घेत धबधब्याकडे कूच केले. धबधब्यात मनसोक्त भिजून घेतले. आधी मी जरा सांभाळून होते कारण खांद्याला क्यामेरा नी मोबाईलची ब्याग होती. नंदीनीने तिच्या अहोंना तापाचे कारण सांगून भिजण्यापासून वंचित ठेवले होते. आणि आपल्या सगळ्या वस्तू त्याच्याकडे सांभाळायला दिल्या होत्या. माझीही बॅग बिचार्या सतिशकडे गेली. आणि मग मनसोक्त भिजून घेतले धबधब्याखाली.
मग घारूअण्णांची शिट्टी वाजली, मेंबरं हाकणारा साजिरा दिसला आणि आम्ही जड अंतःकरणाने धबधब्यातून निघालो (असं लिहिलं की निबंधात मार्क जास्त मिळतात. खरंतर जड कपड्याने म्हणायला हवं होतं). वरती खोल्यांपर्यंत पोचेपर्यंत हवा टाइट झाली होती.
मग ओल्या कपड्यातून सुक्या कपड्यात येणे आणि एकुणात चाबरट बडबड अश्या एका कार्यक्रमानंतर जेवायला गेलो. आज्जींनी लग्गेच सांगितले की एकवाढीच करून घे.. सगळं जेवण संपतंय.. तोवर कढी संपली होती. पण बाकीचे जेवण मस्त होते.
जेवणानंतर सां कार्यक्रम सुरू झाले. अंताक्षरी मधे जे सगळ्यात उत्तम आणि अनन्यसाधारण असे लोक होते त्यांची टिम जिंकली (अर्थातच माझी टिम हे काय सांगायला हवे काय!)
अंताक्षरीच्या पहिल्या राउंडाच्या पहिल्या भागात पहिलं गाणं दक्षी म्हणे आणि मग पुढची गाणी भेंड्यांप्रमाणे एकेक गट. दुसर्या भागात पण हाच फॉर्मॅट असणार होता. पण हे लक्षात न राह्यल्याने आणि एकदम कार्यमग्नतेची सुरसुरी आल्याने विनयने पाचव्या गटाच्या गाण्यानंतर परत पुढच्या गटाकडे घाईघाईने वायरचा गुंता सोडवत वगैरे माइक नेऊन दिला. 'अरे पण दक्षी म्हणणारे ना आधी!' कोणीतरी म्हणालं. विनयने भांबरून (भांबावून व घाबरून) दक्षीकडे पाह्यलं. तिने नुसती नजरेतूनच 'थांब बघते तुझ्याकडे!' अशी जी खुन्नस दिली की विनय जीव मुठीत धरून तिथून पळाला.
मग शब्दखेळांचा कार्यक्रम झाला. केपीचे गाढव आणि ऊस, हिम्याचा मोठ्ठा अनिल कपूर अश्या विविधरंगी करमणुकीने प्रेक्षकांची ह ह पु वा केली.
नंतर \चहा आला एकदाचा. तो वेफर्स, बाकरवडी आणि कपकेकबरोबर प्यायला.
ववि संपलं होतं. परतीच्या प्रवासाची वेळ झाली होती. फोटो फोटो असं काय काय ऐकू येत होतं पण गप्पा संपत नव्हत्या..
शेवटी ज्या त्या बसमधले लोक ज्या त्या बसमधे गेले. मी पुणे बसमधे घुसले. सगळेच सुस्तावलेले होते पण तरीही साजिर्याचे अभिनंदन आणि त्याला प्रश्न विचारणे यासाठी आमच्याकडे उत्साह होता. (आता एखाद्याच्या आनंदावर आपण दमलो म्हणून पाणी टाकणं योग्य नाही की नाही!) तर खूप सारं प्रेममूलक बोलत आम्ही साजिराला विरह जाणवू दिला नाही..
मावळसृष्टीहून पुण्यापर्यंत अंतर फारच कमी आहे त्यामुळे पटकन पुण्यात पोचलो. आणि आपापल्या (म्हणजे मी तरी... बाकीच्यांचं माहीत नाही!) घरी गेले..
संयोजक, सांस्कृतिक समिती, टीशर्ट समिती... थ्री चिअर्स फॉर यू!!
मस्त
मस्त वृत्तांत नीरजा, मी एकदा पडून तुझा पाय बधिर झाला होता किकॉय? कारण मी अजून २ दा पडले होते ते तुला कळलंच नाही असं दिसतंय
यो दगडाचं वर्णन पण मस्त. आनंदमैत्रीचा नाच रे मोरा तर स्टार्ट टू फिनिश छान.
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
नाही गं पण
नाही गं पण मी तेव्हा तयारीत होते. त्यामुळे पाय वाचवू शकले!
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
नीरजा,
नीरजा, सह्हीच एकदम.
बस लागल्यामुळे मी 'मागचा फड' नाईलाजास्तव नुसता ऐकला स्वतःशीच तेव्हा किती चरफडले असेन ते माझं मलाच माहीत...
~~~
http://www.loksatta.com/daily/20090716/viva01.htm
मागचा फड
मागचा फड नुसता ऐकला>>>आणि लले दोन लिटिल चॅम्पस नी माझी खडी पारशीण केलेली त्यामुळे मला पण नुसत काठावरुन समाधान मानाव लागल.
-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार
वा! वा!
वा! वा! वृत्तांत जोरात हो !! धबधब्यातून बाहेर पडताना अंतःकरण जड झालं होतं हे मात्र खरं.. अगदी बाहेर येऊशी वाटत नवतं.
मला आणि अर्भाटाला कार्याध्यक्षांनी अंताक्षरीत भाग घेऊ दिला नाही. आम्हीच जिंकणार हे माहीत होतं ना म्हणून.. त्यांमुळे नीधपची टीम जिंकली हो की नाय रे आर्भाटा ?
नंदूच्या नवर्याला आधी भेटले नव्हते त्यामुळे गडबडीत तीला "तो कोण" असं विचारायला गेले आणि "तुझा कोणता नवरा आहे?" असा विचित्र प्रश्न विचारला
रच्याकने.. आशुडे तुझा नवरा ब्यानरच्या फोटुत लय चमकतोय की गं..
आता लवकरच
आता लवकरच केदार आणि दिप्याची म्याच रंगणार हाये पुन्यात
आता लवकरच
आता लवकरच केदार आणि दिप्याची म्याच रंगणार हाये पुन्यात >>> केदारीण आणि दिपुर्झीण यांची पण रंगेल?
"तुझा कोणता नवरा आहे?" >>>
आशुडे तुझा नवरा ब्यानरच्या फोटुत लय चमकतोय की गं.. >>> अगदी अगदी. मला पण बॅनर बघितल्यावर हेच वाटलं. जसा काही बॅनरचाच एक भाग. आशु
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
यो.रॉक्स,
यो.रॉक्स, नी झक्कास एकदम!!
वविला न येऊ शकलेल्यांना जळवण्याचं काम तुम्ही उत्तमरीत्या पार पाडताय यात शंकाच नाही..
मंजुडे, द्य
मंजुडे,
द्याट इज द व्होल प्वाइंट!
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
निबंधात
निबंधात मार्क जास्त मिळतात>> हाहाहा व्वा नी सहीए!
*********************
My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.
ववितली
ववितली फोटुग्राफर मंडळी, बिगी बिगी फोटो अपलोड करा की राव सांगितलेल्या ठिकाणी.. आणी या मंजुडीला अजिबात दाखवु नका ते फोटु .. जळु दे अजुन:फिदी:
नीधप,तुला ग मेलवर आमंत्रण पाठवलय..
१२३ जोडपे
१२३ जोडपे केवळ श्रोत्याची भुमिक निभावत होते >>>
१२३ म्हणजे केदार१२३ ना? मला तर वाटले, तो विडंबने करून धमाल करेल.
यो आणि नी स्स्स्सह्ह्ही वृत्तांत. दोघांचे पंचेस आवडले.
त्या 'अर्भाट' चा 'आरभट' झालाय रे. तेवढं बघ. (पुढच्या वविला आर्यभट्ट होणार वाटते.)
मीन्वा, स्वतःचंच नको लिहूस अजून लिहायला पायजेलाय. डिट्टेलमंदी.
रामची मसक्कली, अन हिम्याचा महानायक पण महान होते बरं का.
इतर लोखो, ओता इथे आपापल्या नजरेतले ववि.
---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..
योगी,
योगी, निरजा सही वृत्तांत...
घरी जाता जाता सगळ्या वविकरांनी आणि न आलेल्या सगळ्या मायबोलीकरांनी नक्कीच ठरवल असेल नाही की पुढच्या वविला नक्की जायचय
यो.. नी.
यो.. नी. मिनु... मस्त व्रुत्तान्त.. पुन्हा एकदा सर्व अनुभवता आले..
साजिरा, प्रश्नमन्जुषा मस्त..
आणी मन्जुडे.. पुढल्या वर्शी नक्की ये.. जळण्या पेक्षा भिजायला ये..
१२३ म्हणजे
१२३ म्हणजे केदार१२३ ना? मला तर वाटले, तो विडंबने करून धमाल करेल.
>>> हो, मी तर त्याला विडंबन म्हणायला ये असा आवाज पण दिला होता.
आमी परतताना बसमधे उखाण्याचा कार्यक्रम पार पाडला. तेव्हापण जाम मजा आली. तिथेपण मिसेस केदार यांची अर्ध्या वाक्यात उखाणा घेतला.
मीनुने मला अगाध प्रश्न विचारल्यावर तिला सांगितलं की खिडकीबाहेर उभा आहे तो माझा नवरा. परत खिडकीत येऊन खात्री केली तोच उभा आहे ना म्हणून.
मी ज्याना अज्जाब्ब्यात ओळखलं नाही: आशु आणी आर्फी. (हा शाळकरी पोरगा दिसतो.) रामचंद्रसी. (हे आजोबांच्या वयाचे आहेत.)
--------------
नंदिनी
--------------
मया,
मया, फितुरांकरवी मला फोटो मिळाले बरं (तुला टूकटूक)
लय भारी
लय भारी वृत्तांत लोकहो... पण हे सगळे जुन्या जाणत्या लोकांनी लिहिलेले आहेत..
नविन लोक कुठे हरवले.. का वृत्तांत लिहिण्यासाठी शब्द जुळवताहेत... 'चा ला म गा हा मो' ह्या च्या सारखे....
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
नंदिनी आणि
नंदिनी आणि माझा उखाणा गाडीत म्हणायचाच राहिला. घ्या वृ. नाही लिहीणार पण उखाणा वाचा
ऑफिसला आल्या आल्या मी उघडते माबोचा कट्टा
त्यावरुन विश्वेश करतो थट्टा नी सुरु होतो कविताच्या तोंडाचा पट्टा
-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार
कविता
कविता उखाणा बाद. तुझे नाव कुठाय यामधे?? बाकीच्यानी पण आपापले उखाणे लिहा. जमले नाही तर अश्विनकडे संपर्क साधा. त्याच्याकडे भली मोठी यादी आहे.
मीपण घेऊनच टाकते... उखाणा.
बाबांनी बांधलं जहाज, नाव तिचं समुद्र तरंगिणी.
सतिशचे नाव घेते वविच्या दिवशी मी नंदिनी.
--------------
नंदिनी
--------------
नंदिनी घे
नंदिनी घे आता घातलय माझ नाव पण त्यात
-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार
पुण्याच्य
पुण्याच्या बशीत दक्षिणाने डम शेराज खेळताना नवर्याला राखी बांधायचा अभिनय करुन सर्वांना गोंधळात पाडलं त्याबद्दल कुणीच कसं नाय लिहीते..
Pages