कोलंबीचे कालवण ( आमचेही )

Submitted by दिनेश. on 3 July, 2009 - 13:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मध्यम आकाराच्या बारा ते पंधरा कोलंबी, एक मध्यम कांदा, एक मध्यम टोमॅटो, एक छोटा टिन नारळाचे दूध, कोलंबीला लावण्यासाठी हळद, हिंग, लिंबाचा रस वा व्हीनीगर ( दोन टेबलस्पून ), मिठ, लाल तिखट, चिली फ्लेक्स, थोडी कोथिंबीर, तेल.

क्रमवार पाककृती: 

कोलंबी साफ कशी करायची ते बघू.
करड्या रंगाची असते ती कच्ची व शेंदरी असते ती शिजवलेली असते. कोलंबी घेताना तिचे पाय मऊ पडलेले नसावेत, म्हणजे ती ताजी असते.
आधी तिचा डोक्याचा भाग व त्यामागे असणारा पिवळसर द्रव पदार्थ काढून टाकावा. मग शेपटीला धरुन, शेंग सोलतो तसा कोष काढून घ्यावा ( या कोषाचे सूप करतात ) या बरोबरच पायही निघतील. जर ते पाय चिकटलेले असतील तर तेही काढावेत. मग शेपटी तोडावी. तोंडाकडच्या भागात एक बारिक काळा ठिपका दिसतो. तो बोटाने धरुन ओढून काढावा. तो तुटला तर कोलंबीला वरुन चाकूने चीर द्यावी व तो काढावा. हा धागा काढणे अगदी आवश्यक आहे. मग हि कोलंबी धुवुन घ्यावी.
निथळून तिला लिंबाचा रस वा व्हीनीगर लावावे. मग हळद, हिंग व मीठ लावावे.
कांदा व टोमॅटो बारिक चिरावा. तेल तापवून त्यात कांदा परतावा. तो नीट शिजला कि टोमेटो घालून ते एकजीव होईपर्यंत परतावेत. मग त्यात कोलंबी घालावी. त्यात चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ घालावे. कोलंबीला मीठ लावलेले आहे हे लक्षात घ्यावे. जरासे परतून त्यावर एक कप पाणी घालावे. कोलंबी शिजायला वेळ लागत नाही. ( जास्त शिजवली तर ती वातड होते ) पाण्याला दाटपणा आला कि त्यावर नारळाचे दूध घालावे. मग त्यात चिली फ्लेक्स व कोथिंबीर घालून उतरवावे. दूध घातल्यावर उकळायचे नाही.

वाढणी/प्रमाण: 
दोन माणसांसाठी
अधिक टिपा: 

या कालवणाला छान पिवळसर रंग येतो. त्यावर लाल चिली फ्लेक्स व हिरवी कोथिंबीर उठून दिसते. चवीला सौम्य असल्याने पार्टीत हिट ठरते.

माहितीचा स्रोत: 
हं
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशजी, मस्त आहे हे कालवण.. मी नारळाचे दुध न वापरता नेहमी करते. मागे एकदा दुस-या रेसिपीसाठी काढलेले दुघ होते, ते ओतले शेवटी कोलंबीच्या कालवणात.. काय चव आली मस्त....

हिंग पण लावावा काय माशांना? मी फक्त मिठ आणि हळद लावते. तळायचे असतील तर भरपुर मिठ लावते आणि मग तळायच्या आधी परत एकदा धुते आणि कोरडे करुन मसाल्यात मुरवत ठेवते. बरोबर करते की नाही माहित नाही. पण ते मिठ लावुन तासभर ठेवलेले मासे परत धुतल्याशिवाय मला तळावेसे वाटतच नाही.

'आमचेही' - तुम्ही पक्के शाकाहारी ना??

मासे खाणे मांसाहार नाही असं मी काल कुठतरी वाचल होतं, कुणी ह्यावर सांगणार का माहीती ?
सॉरी हा प्रश्न कुठे विचारावा हे कळलं नाही म्हणून इथेच विचारतोय
--------------------------------------------
रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

साधना, खरे तर मासे फार मुरवत ठेवायची गरज नसते. त्याला हिंग हळद वगैरे लावायचे ते त्याचा वास जाण्यासाठी. (चिकन मटणाला मुरवावे लागते कारण त्यामुळे ते लवकर शिजते.) जर ते ताजे असतील तर जितक्या लवकर शिजवावे तेवढे चांगले.
समुद्रातील माश्याना फारसे मीठ्ही लावायची गरज नसते.
आणि हो मी कट्टर शाकाहारीच. हे असले उद्योग करतो ते मित्रमैत्रिणीना खाऊ घालण्यासाठी.

दीप, बंगाली लोक मासे शाकाहारात धरतात. युरपमधे पण साधारण तसाच विचार करतात. पण मी मात्र ते मासाहारातच धरतो.

माझ्या शेजारची कोळी फॅमिली कडकडीत श्रावण पाळते, म्हणजे अजिबात मटण चिकन खात नाही. पण मासे मात्र चालतात.
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

दिनेशजी मस्तच रेसिपी.

मला मासे आवडतात पण कोळंबी आवडत नाही. पण साफ करायला खुप आवडतं स्पेशली तो धागा काढायला खुप आवडतं.

तो धागा काढून कसं साफ करायचं..मला अवघड वाटतं आणि वेळखाऊ पण आहे ना ? म्हणून घरातल्यांना आवडत असून कोळंबी कधी बनवत नाही मी.

मला अवघड वाटतं आणि वेळखाऊ पण आहे ना>>>>> ज्यांच्याकडुन फिश घेतो ते अधिक पैसे घेऊन साफही करून देतात. सुरुवातीला विश्वास निर्माण होईपर्यंत आणि त्या विशिष्ट वेंडरबरोबर बॉंडिंग होईपर्यंत घरी आल्यावर नीट डीव्हेन केलं आहे ते तपासुन घ्यायचं, मग एकदा कळलं की पुढे नुसते वापरता येतात.
पर्याय 2, लिशिअसवरून साफ केलेले प्रॉन्स ऑर्डर करायचे. यांचं मीट आणि फिश सुपर क्लीन असतं ( आणि सुपर expensive). पण घाईत आणि खात्रीलायक हवं असेल तर लिशिअस द बेस्ट

तो धागा साफ करतात की नाही याचीच खात्री नसल्याने मी बाहेर शक्यतो कोळंबी खाणे टाळतोच.
मासेही मुळात जिथे खात्री आहे, ओळखीचे आहे तिथेच खातो. आमच्याकडे काही ठिकाणी तळायच्या आधी कच्चा मासा दाखवतात, बाहेरचे आणायचे झाल्यास वडील तिथूनच पार्सल आणतात.