भाग ९: समारोप

Submitted by माझेमन on 4 April, 2025 - 12:15

काश्मीरविषयक चर्चेचा अवकाश आजमितीला पर्यटन आणि भूराजकीय परिस्थिती या दोनच विषयांनी पूर्णपणे व्यापलेला दिसतो. एक तर “हमीं अस्तो” नाही तर दहशतवाद. हौशी प्रवासी लेह, लडाख आणि कारगिल युद्धानंतर द्रासलाही जातात. पण काश्मीर आणि लडाखची जातकुळी एवढी वेगळी की आपण एकाच राज्याविषयी बोलतोय असं वाटत नसेल कुणाला.

अगदी श्रीनगरला शंकराचार्यांच्या मंदिरात गेल्यावरही तिथे जाताना कसं कडक चेकिंग आहे आणि तिथून अख्खं शहर कसं दिसतं यापलीकडचा विचार मी तरी केला नव्हता. सांगायला खरं तर लाज वाटते पण शंकराचार्यांचे मंदिर श्रीनगरमध्ये का आहे असा
प्रश्नही मला पडला नव्हता.

त्यामुळे शारदामंदिराविषयी माहिती करून घेताना 'अरे, हे तर आपल्याला माहीतच नव्हतं' हेच सतत मनात येत होतं. त्यामुळे
काश्मीरविषयी मिळेल ते पुस्तक आणि आर्टिकल हावऱ्यासारखं वाचण्याचा सपाटा लावला.

त्यातून मग पुराणकथांना (वराह मूल - बारामुल्लाची निर्मिती) भूगर्भीय हालचालीच्या पुराव्यांची मिळणारी जोड, जैन, बौद्ध, शैव, तिबेटी बॉन धर्मीय, पुढं रेषी (ऋषी) म्हणवून घेणारे सुफी संत या सर्वांची इथली सरमिसळ, सिल्क रूटमुळे मध्य पूर्व, मध्य आशिया, तिबेट, चीन, यूरोप पर्यंत निर्माण झालेले संबंध, तिबेटला मांडलिक करणारा, वायव्येला चित्रलपासून पश्चिमेला गुजरातपर्यंत व
पूर्वेला बंगालपर्यंत राज्य करणारा सम्राट असा अलिबाबाच्या गुहेतला खजिना समोर यायला लागला.

शेवटी एवढंच म्हणेन की भारताच्या नकाशातल्या काश्मीरच्या भौगोलिक स्थानापेक्षा भारताच्या सांस्कृतिक इतिहासातलं
काश्मीरचं स्थान जास्त मोलाचं आहे. त्याची ही छोटीशी झलक आणि अर्थातच इदं न मम्|

महत्वाच्या लिंक्स:

सेव्ह शारदा समितीची वेबसाईट
E-PASS ऍप्लिकेशन साईट
शारदा लिपी कन्व्हर्टर

सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा.
भाग १ : प्रस्तावना
भाग २ : नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि
भाग ३: शारदापीठ
भाग ४: ही वाट दूर जाते
भाग ५: साधना पास
भाग ६: तीर्थबल शारदा मंदिर
भाग ७ : इतनी कुर्बत है तो फिर...
भाग ८: जरा याद करो कुर्बानी
भाग ९: समारोप

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच लेखमाला.
संदर्भ सूची दिल्याबद्दल धन्यवाद.
सा मां पातु सरस्वती भगवती _/\_

थोडक्यात मोठ्या आवाक्याचा विषय कव्हर केला आहे. अशी भटकंती “once in a lifetime” प्रकाराची. देवी शारदेचे नवे मंदिर मात्र कश्मीरी स्थापत्याला अगदीच विजोड दिसते आहे.

करतारपुर साहिब प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकतो तर सीमेपलीकडे शारदापीठाचाही होऊच शकतो. त्यासाठी प्रयत्न होत राहायला हवेत.

रच्याकने एका मराठी लेखकानी भारत, अफगाणीस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, उज़्बेकिस्तान इथे विखुरलेल्या एकूण ५० शक्तिपीठांना प्रत्यक्ष भेट दिल्याचे थरारक वर्णन वाचले होते. कुठे ते विसरलो.

@अनिंद्य >>> सेव्ह शरद समितीच्या रवींद्र पंडितांनी सांगितले की या मंदिराची संकल्पना शृंगेरी मठाची आहे आणि ग्रॅनाईटचा वापर करण्याबद्दलही त्यांनीच सुचवले. बाकी मला स्थापत्य शास्त्रातली किंवा इन जनरल काश्मिरी वास्तुकलेतील काही समज नाही.

अफगाणीस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, उज़्बेकिस्तान इथे विखुरलेल्या एकूण ५० शक्तिपीठांना प्रत्यक्ष भेट दिल्याचे थरारक वर्णन वाचले होते.>>>
हे फारच इंटरेस्टिंग आहे. आठवलं तर जरूर शेअर करा. उज़्बेकिस्तानामध्ये शक्तीपीठ आहे हे ही मला माहिती नव्हते. अझरबैजानमध्ये fire temple आहे. ते एका बॉण्डपटात दाखवले होते. तिथे संस्कृत श्लोक का लेख आहे हे नंतर कळले.
पाकिस्तानातल्या हिंगलाज मातेचे देऊळ (शक्तीपीठ) एका पाकिस्तानी वलॉंगरच्या व्हिडिओत पाहिले होते. ते बलोचिस्तानात आहे.

ते अजरबैजान असावे, उझबेकचा उल्लेख माझ्या स्मृतीचा दोष असू शकेल,.

लिखित स्त्रोतांमधे शक्तिपीठांचा आकडा ५० ते १०८ असा बदलता दिसतो. सतीच्या शवाचे तुकडे विखरून पडले ते ते स्थान शक्तिपीठ.

एक संस्कृत भाषेतील १६ वर्ण व ३४ व्यंजने अशा ५० मातृकांचा काही संबंध आहे बहुतेक.

त्या ५० जागांची नावे असलेले अन्नदा मंगल नामक बंगाली काव्य प्रसिद्ध आहे. असो

जाण्याची इच्छा होत आहे खूपच हे वाचून...अशीच इच्छा कैलास यात्रेविषयी झाली होती मायबोलीवरची लेख मालिका वाचून... कुणी तरी pls लिंक टाकाल का त्या मालिकेची.

पूर्ण लेखमाला वाचली आज आणि फार फार छान वाटलं.

छोटीशी झलक >>> खूप माहितीपूर्ण आहे ही झलक. मनापासून धन्यवाद तुला, माझेमन.

पूर्ण लेखनाला अतिशय उत्तम झाली. काश्मीर आणि तिथल्या एकंदर संस्कृती बद्दल आपल्याला किती कमी माहिती आहे याची जाणीव झाली.
>>>>एका मराठी लेखकानी भारत, अफगाणीस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, उज़्बेकिस्तान इथे विखुरलेल्या एकूण ५० शक्तिपीठांना प्रत्यक्ष भेट दिल्याचे थरारक वर्णन वाचले होते. कुठे ते विसरलो.
Submitted by अनिंद्य>>>>

याबद्द्ल वाचायला आवडेल. आठवलं तर नक्की सांगा.
BTW पाकिस्तानातील हिंगलाज मंदिरावर तेथील लोकांनी बुलडोझर फिरवली असा youtube video नुकताच पाहण्यात आला आहे. Sad

अतिशय माहितीपूर्ण आणि तरीही रोचक लेखन. काश्मीरचे सांस्कृतिक स्थान हा उल्लेख महत्त्वाचा.
एका अनवट स्थळाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

अजिबात माहीत नसलेल्या ठिकाणची ट्रिप
छान लिहिलंय
आदिशंकराचार्य , ह्यांच्याविषयी हल्ली ह्या वर्षातच कळालं.
त्यांनी केलेलं अफाट काम अजिबात माहीत नव्हतं.
काश्मीर आणि त्यांचा संबंध माहीत होता पण तुरळक.
हे शारदापिठ pok मध्ये आहे हे नव्हते माहीत.
आणि लेखात लिहिलेल्या सर्व घडामोडी देखील नव्हत्या माहीत.
चांगला दस्तावेज तयार झालाय लेखानिमित्त.

शारदा/ सरस्वती मूर्ती फोटो पाहताना हरखून गेलो.
कितीतरी वेळ पहात होतो.
आवर्जून मुलाला दाखवले फोटो आणि थोडक्यात माहिती सांगितली.

धन्यवाद माझेमन.

खुप सुंदर लेखमाला माम… खरेच नशीब लागते अशा अनवट जागी जायला.

किती खर्च आला या धाडसाला?(सांगायचे नसल्यास नो प्रोऑब) अगदी बॉर्डर पर्यंत जाऊन आलात. भिती नाही वाटलीका,?

झकासराव, फक्त ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या आदी शंकराचार्यांनी त्या काळात केरळ ते काश्मिर प्रवास केला. हिमाचलला जोशीमठातही वास्तव्य होते, बद्रिनाथ स्थापना पण यांनीच केली बहुतेक.

देवाचे कुठलेही श्लोक बघा, ते बहुतेकदा यांनीच लिहिलेले असतात. केरळात जन्मलेल्या माणसाचे संस्कृतवरही किती प्रभुत्व!! मला जितके माहित आहेत ते सगळे आवडतातच पण त्यातही सर्वाधिक आवडणारा म्हणजे निर्वाणषटकम… तु कोण ह्या कोणीतरी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणुन जी षट्पदी लिहिलीय ती वाचुन अगाढ प्रतिभेचा अंदाज येतो व थक्क व्हायला होते. त्या उत्तरात जे त्यांनी स्वतःबद्दल लिहिलेय त्या दिशेने पाऊल उचलायची ईच्छा जरी आपल्याला झाली तरी आपण कायमचे सुखी होऊ.

साधना चांगला प्रश्न आहे. खर्चाचा अंदाज इतरांना उपयोगी ठरेल म्हणून जरा सविस्तर लिहिते आहे.

फक्त श्रीनगर ते तीथवाल व परत एवढा खर्च अडीच माणसांना साधारण १२००० एवढा आला.
१. हाच प्रवास ६-७ जणांच्या ग्रुपने केला तर अजून इकॉनॉमिकल ठरेल.
२. शेअर टॅक्सीने माणशी २००० रु प्रवास व प्रतिदिन १००० रु निवास असा होईल. जम्मू काश्मीर राज्य परिवहनाचं अस्तित्व या भागात तरी दिसलं नाही. पण कुपवाड्यापर्यंत प्रायव्हेट बसेस दिसत होत्या. पुढे शेअर टॅक्सी/छोटी वाहनेच दिसली.
३. तीथवालमधलं यात्री निवास निःशुल्क वापरता येईल.
४. श्रीनगरमध्ये ज्येष्ठा देवी मंदिराच्या यात्री निवासात आगाऊ सुचना देऊन कमी खर्चात राहता येईल.
हे मंदीर अत्यंत प्राईम ठिकाणी ( दल लेकजवळ गुपकार रोडवर, राजभवनाच्या जवळ) आहे. काही काश्मिरी पंडीतांची कुलदेवी ज्येष्ठा देवी असून ज्येष्ठ कृष्ण पंचमीला इथे देवीचा उत्सव भरतो.
मंदिराचा परीसर अतिशय रम्य व शांत आहे. समुद्र मंथनातून निघालेल्या लक्ष्मीने विष्णूला वरले. तेव्हा तिच्यावर मोहित झालेल्या असुरांनी तिला पळवून गुप्तगार (आजचे गुपकार) या ठिकाणी गुहेत लपवून ठेवले. त्यामुळे शंकराने रागावून ज्येष्ठा देवी व वीर वेताळाची निर्मिती करून गुप्तगारातल्या असुरांचा पाडाव केला Wink व लक्ष्मीला मुक्त केले अशी कथा आहे.

रविंद्र पंडीता यांच्याशी बोलताना त्यांनी बजेट ट्रॅव्हलिंगसाठी पॉईंट नंबर २ व ३ सुचवले होते.

इथे प्रवास करण्यासाठी स्मॉल कार किंवा सिडानपेक्षा सुमो/अर्टीगा/ ४ व्हील ड्राईव्ह/ SUV उपयोगी ठरेल. मैदानी प्रदेशात गाडी चालवायची सवय असेल तर स्वतः गाडी चालवणे धाडसाचे ठरेल. ड्रायव्हरला हिमालयातल्या घाटांची सवय असणे गरजेचे आहे.
यात्री निवासमध्ये ब्लँकेट्स वगैरे असली तरी बेड दिसला नाही. त्यामुळे तापमान पाहून त्याप्रमाणे हीटेड ब्लॅंकेट वगैरे नेलं तर बरं पडेल.
जनरली जेकेटीडीसीच्या हटमध्ये हीटेड ब्लॅंकेट असते. पण इथे फॉरेस्ट हटमध्ये हीटेड ब्लॅंकेट नव्हते. अर्थात सामान्य ब्लँकेट्स भरपूर होती आणि आमच्याकडे भरपूर गरम कपडे होते. त्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही.

गावात देवळापर्यंत गाडी रस्त्याचे काम चालू आहे, पूर्ण झालेले नाही. शिवाय होम स्टे मध्ये जाण्यासाठी चढ उतार करणे गरजेचे आहे. फॉरेस्ट हटपर्यंत गाडी जाते परंतु पायऱ्या चढायला पर्याय नाही. त्यामुळे मोबिलिटीचा त्रास असलेल्या प्रवाश्यांना, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ शकतो.

गावात सरकारी हेल्थ सेंटर आहे. त्यामुळे आरोग्याच्या बेसिक सुविधा मिळू शकतील. पण काही कॉम्प्लिकेटेड इश्यू असतील तर प्रवास करण्यापूर्वी डॉक्टरी सल्ला घेणे उत्तम.

LOC पर्यंत मुलीला न्यावे का यावरून थोडी चलबिचल होती. मग विचार केला की परिस्थिती एवढी अस्थिर असेल तर LOC पर्यटनाची परवानगी मिळणार नाही नसती किंवा वाटेतून परतवून लावतील. कारण डेंजरस सिच्यूएशनमध्ये पर्यटक अडकणे ही सैन्यासाठी पण वाढीव जबाबदारी असते.

तिथे मात्र फॉरेस्ट हटच्या अंगणात जावेदच्या मुली कोंबड्यांबरोबर मुक्तपणे फिरत होत्या. काही काळाने आमचं रत्नही त्यांना सामील झालं.

मामे धन्यवाद. कधी आलाच योग तर पाहु. भेट द्यायला नक्कीच आवडेल. loc वर जायला थोडी धाकधुक मात्र नक्कीच वाटेल.