भाग ८: जरा याद करो कुर्बानी

Submitted by माझेमन on 4 April, 2025 - 03:44
Madras Hill

तीथवाल आता केवळ जुने व्यापारी, सांस्कृतिक किंवा धार्मिक केंद्र उरलेले नाही. १९४७-४८ आणि नंतरच्या प्रत्येक पाकिस्तानी आक्रमणात भारतीय जवानांच्या विजिगिषु वृत्तीची कसून परीक्षा घेणारे रणमैदान ही नवीन ओळख याला प्राप्त झाली आहे.
काश्मीरच्या हाडं गोठवणाऱ्या हिवाळ्यात व पावसाळ्यात उत्तुंग डोंगररांगांनी व्यापलेल्या या प्रदेशाचे जीवाची बाजी लावून, प्रसंगी पाठीवर ओझे लादून पायी चालत जात भारतीय सैनिकांनी रक्षण केले आहे. या भूमीवर किती बांगड्या फुटल्या आणि किती मोहरा हरवल्या याची गणनाही करणे कठीण.

१९४८ साली पाकिस्तानी रेडर्सनी तीथवाल गाव ताब्यात घेतले होते. ६ राजपुताना रायफल्सवर गावातली एक महत्वाची शत्रूची
पोस्ट काबीज करण्याची जबाबदारी सोपवली होती. खोल दरीत असलेली ही पोस्ट पाकिस्तानच्या नजरेत आणि त्यांच्या ३ मिडीयम मशीनगनच्या टप्प्यात होती.

१८ जुलैला पहाटे १.३० वाजता C कंपनी पिरू सिंग यांच्या नेतृत्वात पोस्टवर चालून गेली. पुढच्या अर्ध्या तासात त्यांच्या तुकडीतील ५१ जवान पाकिस्तानी गोळीबारात शहीद झाले होते. पिरू सिंग यांनी उरलेल्या जवानांसकट एका मशीन गन पोस्टवर हल्ला केला व ती उद्ध्वस्त केली. या हल्ल्यात उरलेली तुकडी नष्ट झाली व एका ग्रेनेडच्या स्फोटात ते जबर जखमी झाले. तरीही एकट्याने दुसऱ्या मशीनगन पोस्टवर हल्ला करून तिथल्या सैनिकांना बायोनेट करून त्यांनी ती मशिनगन ताब्यात घेतली आणि तिसऱ्या मशीनगन पोस्टवर ग्रेनेड फेकून ती नष्ट केली. त्याच दरम्यान शत्रूच्या एका गोळीने त्यांचा वेध घेतला. पिरू सिंग यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्यामुळे तीथवाल गाव आणि किशनगंगेवरील पूल भारताच्या ताब्यात येण्यास मदत झाली.

१३ ऑक्टोबरला Richmar Gali परिसरात १ शीखच्या एका फॉरवर्ड पोस्टचे नेतृत्व करम सिंग करत होते. या तुकडीकडे शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. अचानक या पोस्टवर सर्व बाजूंनी पाकिस्तानने हल्ला केला. केला. करम सिंग
यांच्या नेतृत्वाखालील जवानांनी शत्रूचे ८ हल्ले फेटाळून लावले. अखेर आणि सर्व बाजूंनी शत्रूकडून वेढले गेल्यावर आणि
तुकडीतजवळचा दारुगोळा संपुष्टात आल्यावर त्यांना पोस्ट सोडून देण्याचा आदेश मिळाला. पोस्ट सोडून जात असताना स्वतः जखमी असून त्यांनी व त्यांच्या एका सहकाऱ्याने २ जखमी जवानांना सोबत घेऊन मूळ पोस्ट गाठली.

करम सिंग यांच्या पोस्टवर किमान ३००० गोळ्या झाडल्या गेल्या. या दरम्यान मूळ पोस्टला शत्रूच्या हल्ल्याची दिशा व संख्या लक्षात घेऊन Richmar Gali वाचवता आली.

१ शीख ज्या ब्रिगेडचा भाग आहे त्या १६३ इन्फ्रंट्री ब्रिगेडला शत्रूला माघारी धाडून ६ महिने सहा महिने तीथवाल झुंजत ठेवल्याबद्दल बॅटल ऑनर्स दिले गेले.

तीथवालच्या क्रॉसिंग ब्रिजपाशी तिरंग्यासोबत परमवीर चक्र विजेते लान्स नायक करम सिंग व कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग यांचे पुतळे
Paramveer chakras.jpg

१९६५च्या लढाईत 4 Kumaon च्या B कंपनीने कॅप्टन सुरेंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली अडीच तासाच्या हातघाईच्या लढाईत पॉईंट २७४७ जिंकून घेतला. त्याचे नामकरण Kumaon Hill करण्यात आले.
3/8 Gorakha Rifles नी sanjoi टॉप व lower sanjoi जिंकून घेतले. पुढच्या ३ दिवसात पाकिस्तानने ४ वेळा शर्थीचे हल्ले चढवूनही हे पॉईंट्स आपण राखून धरले होते.
1 SIKH ने पीर साहिबा पॉईंट जिंकून घेतला.
याव्यतिरिक्त पॅनोरमामध्ये सरळ समोर दिसणारा डोंगर Madras Rifles नी जिंकला व त्याचे नामकरण Madras Hill करण्यात आले.

युद्धात जिंकून ताश्कन्द करारात मात्र आपण हरलो. हे सगळे पॉईंट्स आपण तहाच्या टेबलवर गमावले. जय जवान घोषणा देणाऱ्या लाल बहादूर शास्त्रींची त्यावेळी काय मनस्थिती झाली असेल? कधीतरी तहामागची कारणं उलगडतील एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. व या सर्व वीर जवानांबद्दल फक्त कृतज्ञता बाळगू शकतो.

brave warriors.jpgPiru Singh.jpgKaram Singh PVC.jpgPir Sahiba Spur.jpg

सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा.
भाग १ : प्रस्तावना
भाग २ : नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि
भाग ३: शारदापीठ
भाग ४: ही वाट दूर जाते
भाग ५: साधना पास
भाग ६: तीर्थबल शारदा मंदिर
भाग ७ : इतनी कुर्बत है तो फिर...
भाग ८: जरा याद करो कुर्बानी
भाग ९: समारोप

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान लेखमाला. सलग वाचून काढली . काहीच माहिती नव्हते . खूपच माहितीपूर्ण ओघवते लेख आहेत. लेखनाची शैली आवडली .
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद .