भाग ५: साधना पास

Submitted by माझेमन on 3 April, 2025 - 10:19

चौकीबल ही पहिली चौकी.

इथेच तंगधार, तीथवाल कडे जाणाऱ्या बाहेरच्या लोकांचा E-PASS चेक केला जातो. शिवाय या चौकीवर रस्त्याचे स्टेटस
दाखवलेले असते. ब्लॅक/ रेड असेल तर रस्ता बंद. अतिशय बर्फ वृष्टीमुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे किंवा दरड कोसळल्याने रस्ता बंद होणे आणि आर्मीने जाहीर केलेली मौसम की जानकारी उर्फ़ ऍडव्हायजरी पाहून प्रवास करणे ही बऱ्याच भारतीयांसाठी नवलाई असलेली गोष्ट इथे कॉमन आहे.

प्रवास सुरु करण्यापूर्वी आठवडाभर आधी E-PASS घेतला होता. कुपवाड्याच्या डीएसपीनी E-PASS इश्यू करून वर “Welcome to Kashmir” म्हटल्याने शासकीय पातळीवरही LOC पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न होत आहेत याची खात्री पटली.

प्रत्येक चौकीवर देता यावेत म्हणून E-PASS च्या ढिगाने प्रिंट आऊट्सही घेतल्या होत्या. तीथवालमध्ये सेल्यूलर नेटवर्क मिळणार नाही असं बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं. इथे मात्र सुखद धक्का बसला. साधना पासचा रिस्ट्रिक्टेड भाग सोडल्यास सर्वत्र उत्तम
नेटवर्क मिळालं. इथे एअरटेल, जीओ आणि बीएसएनएलचे टॉवर्स आहेत.

हातात E-PASS असला तरी कोण, कुठून आलात, कुठे चाललात, कधी परतणार वगैरे प्रश्नोत्तरे होतात. E-PASS साठी अप्लाय करताना जी डॉक्युमेंट्स सबमिट केली होती तीच दाखवावी लागतात. किमान four eyes चेक होतो. सरकारी कागदपत्रांवरल्या फोटोवरून चेहरा ताडून पाहणाऱ्या सुरक्षाकर्मींबद्दल मला भयंकर आदर आहे. त्यांना खरं तर फेस रेकग्निशनसाठी खास भत्ता दिला पाहिजे. पण पोरंबाळं घेऊन फिरणारे आणि बॅगांचं ओझं ओढून आत्ताच दमलेले आणि गारठलेले हे टुरिष्ट आपल्यासाठी डोकेदुखी कॅटेगरीतले नाहीत हे ओळखून त्यांनी आम्हांला पुढे हाकलले.

मार्चचा शेवट हा काश्मीरमधला वसंत ऋतू. पण १०००० फुटावर थंडीमुळे नाक जागेवर आहे की नाही अशी शंका निर्माण करणारी ‘नाश्ताचून’ पास ओलांडून जायचे होते. त्यात काश्मीरमध्ये बर्फ पडणार हे सगळ्या वेदर चॅनेल्सनी एकमुखाने सांगितले होते. १९६५च्या युद्धानंतर जवानांच्या मनोरंजनासाठी अभिनेत्री साधना इथे येऊन गेली होती म्हणून नाश्ताचून पासला आता साधना पास म्हणतात.
sadhana pass.jpg
या कमनीय आणि विलोभनीय रस्त्याला इतकं सुटेबल नाव शोधून सापडलं नसतं. सूचिपर्णी वृक्षांनी आच्छादलेली जमीन, रस्त्याच्या कडेला साचलेलं शुभ्र बर्फ, त्यातून वाहणारे छोटे छोटे ओहोळ, झाडांतून पसरलेलं धुकं आणि निरव शांतता. एखाद्या गूढ
चित्रपटाची कथा हलकेच उलगडत आपल्याला गुंतवून ठेवत पुढे जावी तसा हा परिसर नजर खिळवून ठेवत होता. आमच्या
आयुष्यातला आत्तापर्यंतचा सर्वात रम्य प्रवास हे आम्ही तिथेच मान्य केलं. जसजसं शिखराच्या दिशेने प्रवास सुरु झाला तसं
झाडांचे प्रमाण कमी होत बर्फ़ाचे प्रमाण वाढत गेले पण प्रवासाची रंगत बदलली नाही.

वाटेत टीपी आणि बांगुस व्हॅलीच्या प्रवेशद्वारापाशी छोटे चहा पाण्याचे स्टॉल्स आहेत. तुरळक प्रवासी व रोजे चालू असल्याने तेही बंद होते. काश्मिरी समरमध्ये इथे निवांत बसून आसमंत न्याहाळत चहा-कॉफी घेण्यासारखं सुख नसेल. मात्र हे पॉईंट सोडल्यास या रस्त्यावर सुतळीचा तोडा देखील मिळणे मुश्किल आहे. पार कॅम्पापर्यंत सायकल हाणत जावं लागेल.

अर्थात हा सुंदर रस्ता जवळ जवळ ४ महिने बर्फामुळे बंद असतो, उरलेल्यापैकी निम्मा वेळ चाकांना चेन्स लावल्याशिवाय गाडी चालू शकत नाही, पाण्यामुळे रस्ता वाहून खडबडीत होतो, दरड कोसळणे वगैरे प्रकारांमुळे या भागाचा श्रीनगरशी आणि पर्यायाने भारताशी संपर्क तुटतो. पलीकडल्या नागरिकांसाठी हे त्रासदायकच आहे. काही काळानंतर या प्रश्नांवर उत्तर मिळेल अशी आशा आहे. कारण नितिनभौंनी इथे बोगद्यासाठी सर्वेक्षण केले आहे. या भागात राहणाऱ्या लोकांनी याचे सहर्ष स्वागत केले आहे.

sadhana top.jpg

साधना पासमध्ये परत एकदा चौकशी होते. तिथल्या जवानांनी सांगितले तर चाकांना चेन लावावी लागते. चेन नसेल तर परत फिरावे लागते.

हा डोंगर उतरल्यावर पहिले गाव लागले ते तंगधार. तंगधार सोडताना परत एकदा E-PASS चेकिंग, प्रश्नोत्तरे झाली. मग ‘मुंबईसे आये है’ म्हटल्यावर एका जवानाने ‘मराठी आती है क्या’ विचारले. तुम्ही कुठले विचारल्यावर तो बीडचा निघाला. या भागात पुढे बरेच मराठी जवान भेटले आणि घरापासून दूर मायबोली किती ओढ लावते याचा प्रत्यय जागोजागी येत गेला.
इथल्या एका चेकपोस्टवर शस्त्रसज्ज स्री सैनिक होत्या. या विषम हवामानात काम करणाऱ्या या स्री सैनिकांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच.

Tangdhar.jpg

तंगधार सोडल्यावर आपण तीथवालजवळ आलो म्हणून निश्वास सोडला. पण कसचं काय? ४० मिनिटं रस्ता नुसता उतरतच होता. आता काय थेट बळीच्या राज्यातच पोचतो का काय असेही विचार मनात येऊ लागले आणि गूगल मॅपमध्ये अंतर बघताना
एलिव्हेशन पण नीट चेक करायचं हा धडा मिळाला.

इथून जवळच पाकव्याप्त काश्मीर सुरु होते म्हणताना आम्ही उत्सुकतेने ड्रायव्हरला दिसेल तो डोंगर PoK आहे का विचारत होतो. तोही तत्परतेने 'नहीं साब, यह हमारा हिन्दोस्तां है, इसके आगेवाला पहाड़ भी हमारा हिंदोस्तां है' सांगत होता. एके काळी
अनंतनागमधल्या लहान मुलांकडुन 'तुम इंडियासे आये हो क्या' ऐकलं होतं. त्यामुळे सीमावर्ती भागात ‘हमारा हिंदोस्तां’ ऐकणं
आनंददायी होतंच. शिवाय आत्तापर्यंत काश्मीरी लोकांची इच्छा म्हणताना एका विशिष्ट भागातल्या राजकारणी व लोकांची इच्छा
इतरांवर लादली गेली होती का असाही प्रश्न पडत होता.

या भागातले रहिवासी स्वतःला पहाडी/पठाण समजतात. इथल्या मोजक्या लोकसंख्येतही बसक्या गालांचे मंगोलॉइड, तरतरीत किंवा पोपट नाकाचे काश्मिरी, लख्ख गोरे, निळसर डोळ्यांचे, पण मध्यम उंचीचे पठाण असे वैविध्य दिसून येते. त्यांची भाषा पहाडी + डोगरी थोडीशी पंजाबीला जवळ जाणारी आहे. ते एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा त्यातल्या पंजाबी अण्डरटोनमुळे (आणि
हिन्दी सिनेमाच्या कृपेने) आपल्याला गोषवारा समजतो. या सगळ्यांना काश्मिरी येतेच असं नाही. ज्यांचा काश्मीर खोऱ्याशी रेग्युलर संवाद आहे त्यांना काश्मिरी समजते.

पुढे तीथवालमध्ये आम्हाला गाईड करणाऱ्या म्हाताऱ्या चाचानेही बोलताना 'हमारे दादाजी के ज़माने में ८० % रिलेटिव उधर थे|
लेकिन अभी उनके और हमारे भी बच्चे, बच्चों के बच्चे हो गए| अभी हमारा क्या ताल्लुक?' अशी मॅटर ऑफ फॅक्ट भूमिका घेतली होती.

दक्षिण काश्मीरपेक्षा या भागात जास्त विषम तापमान, रोजगाराच्या कमी संधी आणि खडतर आयुष्य आहे. या लोकांचा एकेकाळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये थेट आर्थिक किंवा सामाजिक संबंध होता.

पण तीथवालचं शारदा मंदिर उभं आहे ते याच लोकांच्या सहकार्यामुळे.

सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा.
भाग १ : प्रस्तावना
भाग २ : नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि
भाग ३: शारदापीठ
भाग ४: ही वाट दूर जाते
भाग ५: साधना पास
भाग ६: तीर्थबल शारदा मंदिर
भाग ७ : इतनी कुर्बत है तो फिर...
भाग ८: जरा याद करो कुर्बानी
भाग ९: समारोप

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त शैलीत चालू आहे.
सुतळीचा तोड, मराठी सैनिक, स्त्रीया, गाईड, काश्मिरी जीवन - भावना असे वेगवेगळे आयाम आल्याने एकदम रंगतदार झालाय हा पण भाग.
भाग नंबर +१

अभिनेत्री साधना इथे येऊन गेली होती म्हणून नाश्ताचून पासला आता साधना पास म्हणतात. >> ओह !

फोटो खूपच सुंदर. छान लिहीले आहे.

सुरेख लिहिलेयस. 'हमारा हिंदोस्तां' फार आवडले.
सुतळीचा तोड, मराठी सैनिक, स्त्रीया, गाईड, काश्मिरी जीवन - भावना असे वेगवेगळे आयाम आल्याने एकदम रंगतदार झालाय हा पण भाग.+१

हा भाग पण मस्त.
सुतळीचा तोड, मराठी सैनिक, स्त्रीया, गाईड, काश्मिरी जीवन - भावना असे वेगवेगळे आयाम आल्याने एकदम रंगतदार झालाय हा पण भाग.+१>>>> ११
फोटो मस्त

हा भाग पण मस्त.
सुतळीचा तोड, मराठी सैनिक, स्त्रीया, गाईड, काश्मिरी जीवन - भावना असे वेगवेगळे आयाम आल्याने एकदम रंगतदार झालाय हा पण भाग.+१>>>> ११
फोटो मस्त

सुतळीचा तोड, मराठी सैनिक, स्त्रीया, गाईड, काश्मिरी जीवन - भावना असे वेगवेगळे आयाम आल्याने एकदम रंगतदार झालाय हा पण भाग >>> +१

छान वाटतंय वाचायला. आणि फोटो तर बेश्ट!! अगदी 'ये हंसीं वादियाँ' आठवून गेलं Happy