कोव्हिडनंतर आयुष्य हळू हळू ताळ्यावर येत होते. एक काश्मीर ट्रीप पेंडिंग होतीच. तिचं प्लॅनिंग पुन्हा सुरु झाले. तीथवालविषयी एवढे सगळे ऐकल्यामुळे तिथे जायची इच्छा होतीच. हे सहज ‘वाड्या’वर लिहिले तर अश्विनीने त्या देवळात ओटी पाठवली होती त्याची माहिती दिली. अजून काही डीटेल्स टाकले. आता उत्सुकता अगदी चरम सीमेला पोहोचली होती. पण मुलीला घेऊन LOC पर्यंत प्रवास करावा की नाही याविषयी चलबिचल होती.
LOC असल्यामुळे सरकारी परवानगीशिवाय इथे जाता येत नाही. शेवटी निर्धार करून E-PASS साठी अप्लाय केलं. पुढच्या अर्ध्या तासात फोन वाजला. पलीकडून कुपवाडा जिल्ह्याचे डीएसपी बोलत होते. त्यांनी प्रवासाची तारीख विचारून सांगितले की
आत्तापासून परमिशन देता येत नाही. तुम्ही जायच्या आठवडाभर आधी अप्लाय करा. शिवाय हे ही सांगितलं की तुम्ही अप्लाय
केलंत की मला फोन करा. सरकारी ऑफिसातून स्वतः फोन करून कुणीतरी एवढ्या सौजन्याने आपल्याशी बोलतंय म्हणताना मला भरूनच आलं. परमिशनचा विषय बाजूला ठेवून बाकी तयारी करायला घेतली.
पण प्रवास सोपा नव्हता. श्रीनगर - सोपोर - हंडवारा - कुपवाडा - चौकीबल- द्रंगयारी ओलांडत आपण तीथवालकडे जाणार असतो. यातली बरीचशी नावं एकेकाळी ‘आतंकवादियों से मुठभेड़ में…..' किंवा ‘आतंकवादी हमले में..‘ याच सदराखाली ऐकली होती.
श्रीनगर मध्ये पहिला प्रश्न यायचा तो ‘तीथवाल? वो किधर है? किंवा 'अरे, वहां का रास्ता बंद है'. गुलमर्ग, पहलगाम सारख्या
मळलेल्या वाटा ऐन सीझनमध्ये सोडून LOC वर जायची तसदी कोण घेतंय? मग ठरवलं की सेल्फ ड्राईव्ह करुया. कार बुक
केलीही. तर सकाळी कंपनीचा मेसेज की तुम्ही सिलेक्ट केलेल्या कारचं काम निघालंय तर तुम्हांला स्कॉर्पिओ देतो.
हिमालयातल्या अनोळखी आणि कठीण घाटरस्त्यांवर स्कॉर्पिओ सारखी मोठी गाडी चालवायची नव्हती. त्यामुळे ती कॅन्सल केली. आता काय?
हॉटेलवाल्याकडे चौकशी सुरु केली. ऐन टुरिस्ट सीझनमध्ये आत्ताच्या आत्ता गाडी मिळवणे हे काय दिव्य असते सांगायला नकोच. सुदैवाने सेव्ह शारदा कमिटीची वेबसाईट, त्यावर दिलेल्या लोकांचे नंबर सोबत होते. सहज म्हणून नवऱ्याने त्यातल्या एजाजभाईंना फोन लावला. त्यांनी सांगितले की तुम्ही कुपवाड्यापर्यंत या. मी तिथे तुम्हाला पीक अप करायला गाडी पाठवतो. ग्रेट!
आता कुपवाड्यापर्यंत जायच्या गाडीचा शोध सुरु झाला. मग हॉटेलवाला म्हणाला आता तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी कशाला शोधता? टॅक्सी स्टॅण्डवर जा. तुम्हांला शेअर टॅक्सी नक्की मिळेल. अडीच तीन तासाचा तर रस्ता आहे. ठीक आहे. टॅक्सी स्टॅन्ड कुठाय
म्हणता? 'वो लाल चौक में, सामनेही हैं' आमची वरात सामानासकट लाल चौकात!
कुपवाड्याकडे जाणाऱ्या शेअर टॅक्सीचा शोध सुरु झाला. मुलीला सकाळपासून थोडं बरं वाटत नव्हतं आणि नेमकं हवं ते औषध सोबत नव्हतं. मग नवऱ्याने टॅक्सीवर लक्ष कॉन्सट्रेट केलं आणि मी फार्मसीवर. थोडी शोधाशोध केल्यावर फार्मसी, औषध सापडलं. साधारण १० वर्षांपूर्वी, आमच्या जम्मूवासी ड्रायव्हरने जमेल तितक्या लांबूनच 'वो लाल चौक' दाखवला होता. त्या वेळी तू लहान
मुलीला घेऊन लाल चौकात फिरशील असं जर कुणी सांगितलं असते तर ड्रायव्हरनेच काय, मी सुद्धा सांगणाऱ्याला वेड्यात
काढलं असतं. आता मात्र तिथे सीआरपीएफची एकच आर्मर्ड गाडी “Peace is a delicate balance” हे दाखवत उभी होती.
टॅक्सी स्टॅण्डवर परत आले तोवर कुपवाड्याकडे जाणारी टॅक्सी मिळाली नव्हती, पण नवऱ्याने कुपवाड्याकडे जाणारी काश्मिरी
सुंदरी शोधली होती. ती तिच्या भाषेत टॅक्सीची चौकशी करत होती आणि तुम्ही हिच्याबरोबर रहा असे सांगून तो हिंदीत एक बाजू लावून धरत होता. शेवटी आम्हांला हव्या त्या सीट अव्हेलेबल असणारी एक टॅक्सी मिळाली, अर्ध्या एक तासांनी वाट पाहून इतर शीटाही भरल्या आणि आम्ही श्रीनगर स्पेशल वडापचा अनुभव घेत कुपवाड्याकडे मार्गस्थ झालो.
येणाऱ्या ईदसाठी लोक आपापल्या गावी चालले होते. ‘हिन्द देश के निवासी सभी जन एक है’ याचा जिता जागता प्रत्यय लॉन्ग
वीकेंडला मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, गणपतीला सायन-पनवेल रोड किंवा ईदच्या दरम्यान श्रीनगर हायवे असा कुठेही येत राहतो.
बुलेवार्ड रोड किंवा एयरपोर्ट रोडपलीकडे श्रीनगरचे दर्शन न घेतलेल्या लोकांनी जालना, सांगली, चिपळूण, अमृतसर वगैरे
कोणतेही शहर डोळ्यापुढे आणावे. भारतातल्या विविधतेतील एकता दाखवणारी महत्वाची खूण म्हणजे शहराच्या बाहेर पडणारे खड्डेयुक्त दुहेरी रस्ते. श्रीनगर तरी त्याला अपवाद कसे ठरेल? पेट्रोल पम्प किंवा महत्वाच्या एस्टॅब्लिशमेंटपुढे असणारे शस्त्रसज्ज जवान हेच काय ते वेगळेपण!
परिम्पोरा, सिंगपोरा, पट्टण (प्रतिहासपोरा), पल्हालन पार करेपर्यंत अस्ताव्यस्त पसरलेली कळकट गावं पाहून आपण
काश्मीरमध्येच आहोत का हा प्रश्न पडला होता. पण गार होत जाणारी हवा त्याचं उत्तरही देत होती.
गाडीने सोपोर परिसरात प्रवेश केला आणि डोळेच निवले. दुतर्फ़ा मैलोन मैल पसरलेल्या सफरचंदाच्या बागेतून जाणारा रस्ता,
नुकतेच धुमारे फुटत असलेली सफरचंदांची झाडं, क्वचित एखाद्या बागेत चरणारी मेंढरं, मध्येच फुललेली चेरी नाही तर जर्दाळू. नितांत सुंदर दृष्य होतं. गाडीने सोपोर शहरात प्रवेश करताना हलका पाऊस सुरु झाला. थंड, काळोख्या वातावरणातलं सोपोर शहर मात्र एखाद्या डल इंग्लिश शहरासारखं वाटलं. त्यात सखल जमिनीवर पाणी साचून निर्माण झालेली डबकी, रस्त्याच्या कडेला वाहणारे काळे पाणी - सोपोर शहराने निराशाच केली.
(tripxl.com वरून साभार)
एजाज भाईंनी सांगितलं होतंच की कुपवाड्यात पाऊस आहे. हन्डवाड्याकडे जाताना पावसाने जोर धरला होता. पण तेच पाणी आता शेतात साचत होते. त्यात पडणारे विलोंचे प्रतिबिंब, उतरत्या छताची दूर दूर पसरलेली घरं - जुन्या चित्रपटात दाखवलं जाणारं काश्मीर हेच असावं. कुपवाडा जवळ आल्यावर त्यात खळाळून वाहणाऱ्या ओढ्यांची भर पडली. हंडवाडा, कुपवाडा हे सखल प्रदेश अप्रतिम सौन्दर्याने नटलेले आहेत. इथे पर्यटन, वेलनेस रिट्रीट, पशुपालन वगैरे उद्योग प्रदेशाच्या अर्थकारणात भर घालू शकतात.
हंडवाड्यातले दूध, पनीर उत्तम क्वालिटीसाठी फेमस आहे पण इथून पुढच्या प्रदेशात श्रीनगरवरून पॅक्ड मिल्क येते हे किती दुर्दैव.
(cliffhangersindia.com वरून साभार)
एजाजभाईनी इस्माईल नामक ड्रायव्हरचा नंबर पाठवला होता. शिवाय वेळोवेळी फोन करून ते आम्ही कुठवर पोहोचलो आहोत याची खबरही घेत होते. ड्रायव्हरचाही फोन येऊन गेला. त्याने वडाप ड्रायव्हरशी बोलून आम्हाला अमुक ठिकाणी उतरवण्याविषयी ठरवले आणि शेवटी एकदाचे आम्ही कुपवाड्याला ठरलेल्या ठिकाणी उतरलो. कुपवाडा सुंदरीला आगामी ईदीच्या शुभेच्छा देऊन सामानसुमानासकट आमचा भार इस्माईलवर सोपवला आणि चौकीबलकडे निघालो.
सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा.
भाग १ : प्रस्तावना
भाग २ : नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि
भाग ३: शारदापीठ
भाग ४: ही वाट दूर जाते
भाग ५: साधना पास
भाग ६: तीर्थबल शारदा मंदिर
भाग ७ : इतनी कुर्बत है तो फिर...
भाग ८: जरा याद करो कुर्बानी
भाग ९: समारोप
अगदी चित्रदर्शी भाग. फोटो
अगदी चित्रदर्शी भाग. फोटो असतील तर टाक ना. निराशेचे आणि पिक्चरपरफेक्ट दोन्ही आवडतील बघायला.
सुंदर झालाय हा भाग, वर्णन फार
सुंदर झालाय हा भाग, वर्णन फार आवडलं.
छान झाला आहे हा भाग. मस्त
छान झाला आहे हा भाग. मस्त वर्णन.
फोटो हवे होते
कुपवारा, हन्डवाडा आणि सोपोरचे
कुपवारा, हन्डवाडा आणि सोपोरचे जाताना फोटो काढले नाहीत. येताना तर पाऊस थांबला होता आणि इतकं सोनसळी ऊन पडलं होत की फोटो काढायचं ध्यानातच आलं नाही. तुम्हाला कल्पना यावी म्हणून काही काही फोटो इंटरनेटवरून दिले आहेत. मी जे सोपोर आणि कुपवाडा बघीतलं ते याच्यापेक्षा किंचितही वेगळं नव्हतं.
खूपच सुंदर आहेत फोटो. अजून
खूपच सुंदर आहेत फोटो. अजून टाका.
लिखाण पण आवडले.
मस्त भाग. २००३ साली श्रीनगरला
मस्त भाग. २००३ साली श्रीनगरला भेट दिली होती त्याची आठवण आली. अगदीच रिलेट झालं.
वाह, किती अडचणी आल्या त्यावर
वाह. किती अडचणी आल्या, तरी त्यावर मात केलीत अगदी.
आभार लोकहो...
आभार लोकहो...