भारत का दिल देखो (पाककृती) - होळी स्पेशल - चौसेला सोहारी, मीठी-सोहारी

Submitted by मनिम्याऊ on 13 March, 2025 - 02:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चौसेला आटा २ वाट्या
शिजवलेला मऊ भात
तळण्यासाठी तेल

चौसेला आटा म्हणणे मुख्य तांदुळाचे पीठ व इतर कोणतीही ३-४ पीठे एकत्र कोरडीच वाफवून तयार करून घेतलेली भाजणी .
माझ्या प्रमाणानुसार :
नव्या तांदळाची पिठी (२ वाट्या)
गव्हाची कणिक (१ वाटी),
उडदाचे पीठ (अर्धी वाटी)
ज्वारीचे पीठ, चण्याचे बेसन : (प्रत्येकी पाव वाटी)
जिरे, हळद, लाल तिखट, भाजलेले तीळ, ओवा, हिंग : प्रत्येकी १ लहान चमचा
मीठ चवीनुसार.

मुख्य घटक तांदळाचे पीठ. बाकी नेमकी ४च प्रकारची पीठे वापरावी असेही नाही पण जसे सातू (७ धान्ये) नाव पडले आहे तसे हे चौसेला. आणि सोहारी / सुहारी म्हणजे पुरी.

क्रमवार पाककृती: 

मागे या https://www.maayboli.com/node/86186 धाग्यावर चर्चा झाली त्यावेळी 'चौसेला सोहारी' या छत्तीसगडी पदार्थाचा उल्लेख झाला होता. तर त्याची कृती अशी :

हि सगळी पीठे कोरडीच एका डब्यात एकत्र करून घ्यावीत. त्यात जिरे, हळद, लाल तिखट, भाजलेले तीळ, ओवा, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य कोरडेच एकजीव करून घ्यावे. आता डब्याला घट्ट झाकण लावून तो डबाच प्रेशर कुकरमध्ये ठेवून तीन शिट्या करून घ्याव्या. प्रेशर उतरून कूकर जरा थंड झाला कि डब्याचे झाकण उघडून आतले मिश्रण जरा हलवून मोकळे करून घ्यावे.

हे पीठ थंड झाले कि कोमट पाण्याने शिजवलेल्या भाताबरोबर मळून घ्यावे. मळताना तेलाचा हात लावावा. पीठ जरा घट्टच मळावे. मळलेल्या पिठाचा गोळा सुती कपड्याने झाकून एखाद्या उबदार जागी कमीत कमी ४-५ तास ठेवावा.
५ तासांनंतर पीठ बऱ्यापैकी सैल होऊन फुगलेले असेल. त्याचे पुर्यांच्या आकाराचे जाडसर वडे थापावे.
कढईत तेल गरम करून हे वडे लालसर तळून घ्यावे. वडे आतून असे दिसतात Picture1_0.jpg
कोणत्याही भाजी सोबत/ चटणीसोबत खाता येईल .
Picture3_0.jpg

.
हेच पीठ वापरून आणखी एक पदार्थ असतो मीठी-सोहारी :
यात वरीलप्रमाणेच भातात पीठ मळून (यावेळी तिखट-मीठ वगैरे मसाले न घालता) त्याच्या छोट्या छोट्या लाट्या लाटून त्यात गूळ-खोबरे, मोहाच्या फुलांचे पीठ आणि भरडलेली चारोळी असे सारण भरून गुलाबजामच्या आकाराचे गोळे करून तळतात आणि साखरेच्या पाकात मुरवतात. मात्र मोहाची फुले असल्याने मीठी सोहारी खाऊन नशा येते. हल्का हल्का सुरूर Proud

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात १० सोहाऱ्या होतात.
अधिक टिपा: 

१. काळ्या चण्याचे सुक्के, मटण रस्सा, चौसेला सोहारी आणि मीठी-सोहारी + भांग/थंडाई हा खास होळी स्पेशल बेत असतो.
आधीच मोहाची फुले, त्यात साखरेचा पाक आणि वर भांग ... २ दिवस माणूस काही कामाचा राहात नाही. Lol

२. छत्तीसगड मधील काही आदिवासी जमातीत हा पदार्थ खास लग्न कार्यानिमित्त करतात. लग्नानंतर मुलगी पहिल्यांदा माहेरी येते तेव्हा खास मटणाचा पाहुणचार करतात त्यावेळी मटणाबरोबर चौसेला सोहारी करण्याची पद्धत आहे. त्यातही खास प्रथा म्हणजे या दिवशी नवरा मुलगा आपल्या सासरच्या बायकांच्या पंक्तीत वाढायचे काम करतो. व आपल्या नवरीची उष्टी पत्रावळ / उष्टे ताट उचलण्याचे काम पण त्यालाच करावे लागते.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाविन्यपूर्ण रेसिपीज. मोहाच्या फुलांच्या पीठाचे stuffing वाले गुलाबजाम वगैरे तर खूपच exotic.

मला रेसिपी सोबत आलेले सांस्कृतिक संदर्भ फार आवडले. This is the beauty of our country. such versatility in ingredients, cooking methods, well defined occasions for making that food, cultural ethos so deeply tied to food and everyday life. Wonderful ❤️

… नवरा मुलगा आपल्या सासरच्या बायकांच्या पंक्तीत वाढायचे काम करतो. व आपल्या नवरीची उष्टी पत्रावळ / उष्टे ताट उचलण्याचे काम पण त्यालाच करावे लागते…..

हे धमाल आहे Lol

मस्त .तिखट वडे छान लागत असणार आपल्या कोकणी वड्याचं वेगळं वर्जन . मिठी सोहारी पण भारीच प्रकरण दिसतंय गुलाबजाम सारखं , भांग आणि वर मोहाची फुलं म्हणजे जबरदस्त होळी होत असेल. Lol
… नवरा मुलगा आपल्या सासरच्या बायकांच्या पंक्तीत वाढायचे काम करतो. व आपल्या नवरीची उष्टी पत्रावळ / उष्टे ताट उचलण्याचे काम पण त्यालाच करावे लागते…..

हे धमाल आहे Happy आदिवासी समाज त्याबाबतीत पहिल्यापासून समानता जपणारा आहे असं या पद्धतीवरून दिसून येत.

धन्यवाद अनिंद्य आणि सिमरन.

रेसिपी सोबत आलेले सांस्कृतिक संदर्भ फार आवडले. >>>>
हेच तर जपायला हवं आहे पुढच्या पिढीसाठी.

This is the beauty of our country. ........
१००% खरं आहे.

<धमाल आहे Happy आदिवासी समाज त्याबाबतीत पहिल्यापासून समानता जपणारा आहे असं या पद्धतीवरून दिसून येत.
Submitted by सिमरन. on 13 March, 2025 ->>>

हो स्त्री पुरुष समानता खोलवर रुजलेली आहे आदिवासी समाजात. शिवाय होळी/ दिवाळी सारख्या सणांना सगळी वस्ती एकत्र जेवण करते. त्यामुळे एकाच व्यक्तीवर किंवा कुटुंबावर स्वयंपाकाची जबाबदारी पडत नाही. शिवाय उन्हाळ्यात वस्तीवरील कुटुंबे सायंकाळचे जेवण एकत्र घेतात. ( रात्रीचे नाही. सायंकाळचेच.) जेवणतारा (शुक्राची चांदणी) उगवून मावळेपर्यंतच्या वेळात जेवणं आटोपली असतात. त्यावेळेला देखील प्रत्येक घरातून एकच कोणतातरी पदार्थ आलटून पालटून करून आणतात. श्रमाची समसमान विभागणी, स्त्री पुरुष समानता, जोडीदार निवडण्याचा हक्क, घटस्फोट, या अशा अनेक बाबींमध्ये आदिवासी समाज नागरी समाजाच्या बराच पुढे आहे.

मस्त रेसिपी आहे मनिम्याऊ.
त्या ताटात कसली वडी आहे.कोथिंबिरीची?
मला रेसिपी सोबत आलेले सांस्कृतिक संदर्भ फार आवडले. >>>>+११

धन्यवाद ऋतुराज. >>>त्या ताटात कसली वडी आहे.कोथिंबिरीची? >>>>
लसणाच्या पातीची वडी आहे.

यानिमित्ताने वेगळ्या प्रथा सुद्धा समजल्या. धन्यवाद मनिम्याऊ.

रेसिपी मस्तच आहे. वडे इतके सुसखुशीत दिसतायत की लगेच उचलून तोंडात टाकावेसे वाटत आहेत.

मिठी सोहारी प्रकरण पण जाम इंटरेस्टिंग वाटत आहे. मोहाची फुलं वगैरे. कधीतरी खाउन बघायला हवा हा प्रकार.

श्रमाची समसमान विभागणी, स्त्री पुरुष समानता, जोडीदार निवडण्याचा हक्क, घटस्फोट, या अशा अनेक बाबींमध्ये आदिवासी समाज नागरी समाजाच्या बराच पुढे आहे.>>>>>> +१
पाककृती व सांस्कृतिक संदर्भ आवडले.

मस्त आहे रेसिपी.
तांदळाच्या पीठात कडधान्ये घालून ज्या वड्या किंवा लाटून तिखट पुर्‍या करतात त्याच्याशी मिळतीजुळती आहे का चव ?
चटण्या नवीन आहेत एकदम. मोहाचे फूल न घालता करायची असेल तर ?

मस्तच.

सिमरन, कोकणी वडे पीठ मलाही आठवलं.

मनिम्याऊ,
रेसिपी छान आहेच पण त्याबरोबर दिलेली माहिती खूप आवडली.
जेवणतारा आणि आदिवासी परंपरा याबद्दल पण छान लिहिलं आहे.
तुम्ही अशा गोष्टींबद्दल अधिक लिहा प्लीज.

धन्यवाद rmd , मंजूताई, प्राजक्ता , रानभुली , अन्जू , सावली
<< तांदळाच्या पीठात कडधान्ये घालून ज्या वड्या किंवा लाटून तिखट पुर्‍या करतात त्याच्याशी मिळतीजुळती आहे का चव?

हो. तशी कोंकणी वड्यांच्या जवळपास जाणारी आहे चव. पण यात शिजवलेला भात हा गेम चेंजर असून त्यामुळे पुरीला वेगळे टेक्चर येते.

मोहाचे फूल न घालता करायची असेल तर?>>>

माझी एक जवळची मैत्रीण या समाजाची आहे व २ पिढ्यांपासून शहरात स्थायिक झालेले सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंब आहे. तिच्यामुळेच मला बऱ्याच पद्धती माहिती झाल्या. तिची आई मिठी सोहारी अशी करायची.
गुलाबजाम रेडीमिक्स मध्ये थोडे तांदळाचे पीठ घालून मळून, त्यात थोडे डेसिकेटेड कोकोनट, चारोळ्यांची भरड व देशी गुलाबाच्या पाकळ्यांचा चुरा घालून त्याचे गुलाबजाम करायची.

जेवणतारा आणि आदिवासी परंपरा याबद्दल पण छान लिहिलं आहे.
तुम्ही अशा गोष्टींबद्दल अधिक लिहा प्लीज.

Submitted by सावली on 14 March, 2025>>>>

थँक्स . प्रयत्न करते. गोष्टी तर खूप आहेत पण काय होतं कि पाककृती धाग्यात हि बाकी माहिती फार अवांतर होते. अर्थात पाककृतीचे documentation होणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. हे सगळे पदार्थ काळाच्या ओघात हरवत चालले आहेत

पाककृती धाग्यात बाकी माहिती अवांतर होते…..

हे अवांतर हवेहवेसे आहे. नाहीतर दोन चमचे साखर अन् अर्धा चमचा मीठ वाल्या पाककृती जालावर हजारोंनी आहेतच.

तुमची सिरीज चालू द्या. थोडे अवांतर करा, मजेमजेत डॉक्यूमेंट करा हो बिनधास्त. आम्ही वाचू, करून बघू , सगळे मिळून आनंद घेऊ.

काय म्हणता ?

Thanks शर्मिला R, वावे..
थोडे अवांतर करा, मजेमजेत डॉक्यूमेंट करा हो बिनधास्त. आम्ही वाचू, करून बघू , सगळे मिळून आनंद घेऊ.
काय म्हणता ?>>>>>

OK BOSS...

छान आहे पाक कृती
तुमच्या पाककृती नेहमी नाविण्यपूर्ण असतात.
अनिंद्य +१

मस्त लिहिले आहे. अनिंद्य +१ मी तर या माहितीमुळे आवर्जून वाचते तुझी ही मालिका>> मीपण. लिहीत रहा. अवांतर जास्त रंजक असलं तरी चालेल, हातासरशी त्याचंही डॉक्युमेंटेशन होईल.

नवीन प्रतिसादकांचे आभार.
मंजूताई दहेरवडी नाही माहीत मला. तुम्हाला देहरोरी (पाकातले तांदळाच्या पिठाचे दहीवडे) म्हणायचं आहे का?