एका पुरुषाच्या नजरेतून महिला दिन

Submitted by निमिष_सोनार on 7 March, 2025 - 22:27

जागतिक महिला दिन (दरवर्षी ८ मार्च) महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाची ओळख आणि सन्मान करणारा दिवस आहे. महिला दिनाची सुरुवात १९०० च्या सुरुवातीस झाली होती, जेव्हा महिलांना समानतेसाठी आणि त्यांचे अधिकार मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. जागतिक महिला दिन हा फक्त एक उत्सव नाही, तर हा स्त्री-पुरुष समानतेच्या वाटचालीचा आणि स्त्री चळवळीची गौरवाने आठवण करण्याचा दिवस आहे. १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून हा दिवस संपूर्ण जगभरात महिलांच्या अधिकारांसाठी आणि समानतेसाठी साजरा केला जातो. या दिवशी विविध ठिकाणी कार्यक्रम, रॅलीज, चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात ज्यामध्ये महिलांच्या समस्यांवर चर्चा होते आणि त्यांचा उल्लेख केला जातो. महिला दिनाचा उद्देश म्हणजे महिलांना त्यांच्या हक्कांसाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या कर्तृत्वाला सन्मान देणे.

पारंपारिक सामाजिक जीवनपद्धतीमध्ये स्त्रीची भूमिका मुख्यत्वे घरगुती कामकाज, मुलांचे संगोपन आणि काही सामाजिक नियमांमध्ये बांधलेली अशी होती. परंतु, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय बदलांनी स्त्रीला स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा दिली. स्त्री चळवळीने महिलांना शिक्षण, रोजगार आणि राजकारणातील भागीदारीसाठी सज्ज केले आणि बऱ्याच देशांमध्ये स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने महत्वाची पायाभरणी झाली. पारंपारिक भूमिकांपासून सुटका करून आज अनेक स्त्रिया करिअरमध्येही सक्रिय आहेत. त्यामुळे, दोन्ही जण नोकरी करणारे असतील तर घरातील कामांची आणि अपत्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्त्री पुरुषांनी समनतेने वाटून घेणे आवश्यक आहे.

अनेक क्षेत्रात महिलांची भूमिका वाढत असूनही, नेतृत्व आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचे स्थान काही प्रमाणात अद्यापही कमी आहे. रोजगारातील समान संधी तसेच पुरुषांच्या समान प्रमाणात वेतनवाढ यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याकरता काही धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे. काही देशांमध्ये महिला नेत्यांनी राजकीय क्षेत्रात मोठी छाप पाडली आहे. परंतु, अजूनही जागतिक स्तरावर राजकीय निर्णय प्रक्रियेत महिलांचे प्रतिनिधीत्व तुलनेने कमी आहे. समानतेकडे वाटचाल करत असताना विविध धोरणांमध्ये महिला सहभागाला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यामुळे स्त्रिया आता अधिक आत्मनिर्भर बनत आहेत. मात्र स्त्री-पुरुष समानता म्हणजे एकमेकांची पूर्णता कमी करणे नव्हे, तर दोघांमध्ये परस्पर पूरकता आणि आदराची सुरुवात करणे होय. पुरुषांनी कुटुंबात आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये फक्त स्त्रियांच्या मानल्या जाणाऱ्या कामांमध्ये भाग घेऊन सक्रिय भूमिका स्वीकारली तर समानतेची वाटचाल अधिक समतोल राहू शकते. म्हणजेच, दोघांमध्ये भूमिकांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे ज्यामुळे कोणत्याही एका वर्गावर जास्त ओझे येणार नाही. पारंपारिक व आधुनिक भूमिकांमध्ये संतुलन साधण्यासाठी समाजाला आणि कुटुंबाला नव्या आदर्शांची, संवादाची आणि समजुतीची गरज आहे.

या बदलांच्या संक्रमण काळात काही संघर्ष आणि सामाजिक, कौटुंबिक अराजकता निर्माण होणे स्वाभाविक आहे, परंतु ते दीर्घकालीन प्रगतीचे प्रतिबिंब आहे. ते समाजाला अधिक समतोल, न्यायी आणि समृद्ध बनवेल. पुरुष व स्त्री दोघांनी मिळून कुटुंबातील, व्यवसायातील आणि सामाजिक रचनेत समानतेचे स्वरूप सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. स्त्रीवादी चळवळ म्हणजे स्त्रीयांनी पुरुषांना कमी लेखणे, त्यांच्यावर अधिराज्य गाजवणे, त्यांचा अनादर करणे, त्यांचे म्हणणे मुद्दाम न ऐकणे असे नाही. निसर्गाने स्त्री पुरुष शरीर रचनेत केलेला फरक काही बाबतीत दोघांच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या करतो. त्याचा आदर राखणे महत्त्वाचे आहे. तसे पाहिले तर कोणत्याही विशिष्ट कालखंडात, देशात किंवा ठिकाणी स्त्रियांना पूर्ण सन्मान आहे असे आपण म्हणू शकत नाही. ते बरेचदा सापेक्ष असते. पूर्वी भारतात "स्वयंवर" व्हायचे ज्याद्वारे आपला वर निवडण्याचा पूर्ण अधिकारी स्त्रीयांना होता. आपण स्वतः मात्र कोणत्याही विशिष्ट कालखंडातून किंवा प्रदेशात जात असू, आपली या बाबतीतली समतोल विचारसरणी कुठेही आणि केव्हाही बदल घडवून आणू शकते हे नक्की.

घराबाहेर पडून पुरुष असलेल्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांच्या सतत वाढत्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर स्त्री पुरुषांचा एकमेकांशी कामानिमित्त संपर्क खूप वाढला. आज स्त्रियासुद्धा पुरुषांप्रमाणे शिफ्ट ड्युटी सुद्धा करत आहेत. लष्करात दाखल झाल्या आहेत. विकृत मानसिकता असणाऱ्या काही पुरुषांनी या वाढत्या संपर्काचा गैरफायदा घेतला आणि स्त्रीयांवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले. अर्थात स्त्रीयांवर अत्याचार हे सर्वच ठिकाणी होताना आढळतात.फक्त घराबाहेरच नाही तर घरात सुद्धा. ही समाजातील एक गंभीर आणि व्यापक समस्या बनली आहे. मानसिक, लैंगिक आणि आर्थिक अत्याचाराच्या विविध प्रकारांनी अनेक महिलांच्या आयुष्यात दु:खाचे, भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे महिलांच्या शारीरिक आरोग्यावर आणि मानसिक स्वास्थ्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. या अत्याचाराची अनेक कारणे असू शकतात. जसे, पारंपारिक विचारसरणी आणि लिंगभेदावर आधारित मानसिकता, महिलांना कमी दर्जाचे आणि दुय्यम मानण्याची वृत्ती, अनेक समाजात शिक्षणाची पातळी कमी असल्याने महिला आपले अधिकार, स्वातंत्र्य आणि आत्म-सन्मान याबद्दल जागरूक नसणे, पोलिस व न्यायव्यवस्थेतील काही प्रमाणातील पक्षपाती वृत्ती, स्त्रीयांचा आर्थिक परवलंबीपणा वगैरे. काही वर्षांपासून स्त्री संरक्षणाचे कायदे कठोर केलेले आहेत. त्याचा फायदा स्त्रीयांना होत आहेच पण त्याचा स्त्रीयांकडून मोठ्या प्रमाणावर गैरवापरसुद्धा होतांना दिसत आहे.

पूर्वीच्या काळात आणि आजही, सर्वच पुरुष हे स्त्रीला आर्थिक परावलंबी असल्यामुळे दुय्यम वागणूक देतात असे मुळीच नाही. आयुष्यभर कष्ट उपसून आपल्या पूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करून मुला मुलींना योग्य शिक्षण देऊन त्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणारा, त्यांना पायावर उभे करणारा घरातील कर्ता पुरुषच असतो. त्याच्या हाती संपूर्ण आर्थिक व्यवहार व स्वातंत्र्य असूनही तो काही मनमानी करत नाही. उलट कुटुंबाला आपण सर्वकाही देऊ शकत नाही याचे त्याच्या मनात कुठेतरी दु:खच असते. मात्र आज स्त्रिया भरपूर पैसे कमवू लागल्या आहेत आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत. त्यातील अनेक स्त्रीया लग्नासाठी वर-संशोधन करतांना विविध अशक्यप्राय अटी लादतात. मुलगा आपल्यापेक्षा जास्त पगार असणारा हवा अशी अट मुली लादतात. म्हणजे त्या मुली स्वतःच पुरुषी मानसिकता दर्शवतात. थोडे काही मनाविरुद्ध झाले की संसार मोडण्याची धमकी देतात. कारण काय, तर आता मी आर्थिकदृष्ट्या कुणावर अवलंबून नाही. केवळ आर्थिक स्वातंत्र्य आले म्हणून मनमानी करण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. असे असते तर मग वर्षानुवर्षे आर्थिक सत्ता स्वत:च्या हातामध्ये असणारे पुरुष सहजरित्या पुनः पुन्हा संसार मोडून नवनवीन संसार थाटत बसले असते.

स्त्री असो की पुरुष, आपण या समाजाचे आणि कुटुंब व्यवस्थेचे एक भाग आहोत, हे विसरता कामा नये. ही व्यवस्था टिकून राहण्यासाठी दोघांचे समान योगदान आणि त्याग अपेक्षित आहे. पुरुष कमावता असेल अशा कुटुंबात "केवळ स्त्री कमवत नाही" या एकमेव कारणामुळे स्त्रीवर बंधने असतात असे मानणे पूर्ण चूक आणि हास्यास्पद आहे. अनेक घरांत पुरुष आपला पगार स्वखुशीने स्त्रीच्या स्वाधीन करतो, पण हेच स्त्रीला करायला सांगितले तर? तो स्त्रीवर अन्याय का समजला जातो? फक्त पुरुष कमावता असेल तरी त्या घरच्या आर्थिक बजेटच्या नाड्या आणि त्यासंदर्भातील निर्णय बहुदा स्त्रीयांच्याच हाती असतात. पती संपूर्ण आयुष्यभर घरकाम करेल आणि त्याची पत्नी आयुष्यभर पैसे कमावून संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करेल, अशी कुटुंब पद्धती मात्र अत्यंत आधुनिक विचारसरणीच्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्रियासुद्धा मान्य करू शकत नाहीत. जर समानता राखायची असेल तर अशी कुटुंबे पण समाजाने स्वीकारायला हवीत. मात्र अशा वेळेस बायकोच्या कमाईवर खाणारा पुरुष अशी त्याची अवहेलना पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांकडूनच केली जाते. म्हणजे तथाकथित आधुनिक विचारसरणीच्या स्त्रियासुद्धा या बाबतीत मात्र पारंपरिक विचारसरणीने वागताना दिसतात. मग या आधुनिक स्त्रियांनी तथाकथित पुरुषी वर्चस्ववादी विचारसरणीचा खरंच त्याग केला आहे का, अशी शंका येते. आजकाल काही पाश्चात्य देशांत स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली स्त्रियांना स्वैराचार शिकवला जात आहे. थोडक्यात सांगायचे तर सर्वच महिला आणि सर्वच पुरुष यांना एकाच तराजूत आपण तोलू शकत नाही. असो. लेखाचे निमित्त होते जागतिक महिला दिनाचे.

अशा या महिला दिनी पुरुषांनी काय करायला हवे? तर, आपल्या आई, बहिणी, पत्नी, सहकाऱ्यांना त्यांच्या कार्याचा आणि प्रयत्नांचा सन्मान द्या. सोशल मीडियावर महिलांच्या प्रेरणादायी कथा शेअर करा. महिलांच्या समानतेसाठी घरात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात सकारात्मक भूमिका घ्या. महिला सशक्तीकरण विषयक चर्चांमध्ये सहभागी व्हा. घरगुती जबाबदाऱ्या वाटून घ्या आणि महिलांवरील अतिरिक्त ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. महिला सहकाऱ्यांसोबत समानतेने वागा आणि त्यांना संधी द्या. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवा आणि गैरवर्तणुकीला विरोध करा. लैंगिक समानतेविषयी संवेदनशील बना आणि इतरांनाही जागरूक करा. निराधार महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करा. गरजू महिलांना शिक्षण, आरोग्य किंवा आर्थिक मदतीसाठी योगदान द्या.

शासनाने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत जसे की महिला सक्षमीकरण योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, उज्ज्वला योजना आणि सुकन्या समृद्धी योजना. या सर्व योजनांमुळे महिलांना आर्थिक मदत, आरोग्यसेवा आणि शिक्षण मिळवण्यासाठी मोठी संधी मिळाली आहे. आजही महिलांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो जसे स्त्री भ्रूणहत्या, घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण, शिक्षणाची कमतरता, गरीबी आणि बेरोजगारी! या समस्यांवर मात करण्यासाठी समाजाने महिलांना समानतेचा दर्जा द्यावा आणि त्यांच्या अधिकारांसाठी पुढाकार घ्यायला हवा. याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. पुरुषांनी महिलांसोबत खांद्याला खांदा लावून चालण्याचा हा उत्तम दिवस आहे. तुमच्या भागातील काही विशेष कार्यक्रम असल्यास त्यातही सहभाग घ्या!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महिला दिनाच्या शुभेच्छा !!!
*अशा या महिला दिनी पुरुषांनी काय करायला हवें ?* -

मी महिला मंडळात जावून येतेय. आज मात्र जेवायला खास कांही तरी करा. माहीत आहे ना आज महिला दिन आहे तें !!!20190118_083103.jpg

महिला दिनाच्या शुभेच्छा. Happy

अनेक मुद्द्यांवर असहमत आहे.

<< काही वर्षांपासून स्त्री संरक्षणाचे कायदे कठोर केलेले आहेत. त्याचा फायदा स्त्रीयांना होत आहेच पण त्याचा स्त्रीयांकडून मोठ्या प्रमाणावर गैरवापरसुद्धा होतांना दिसत आहे. >>
-------- स्त्रीयांना " न्याय " मिळण्याची शक्यता निर्माण झाली असे म्हणता येईल पण फायदा म्हणता येत नाही. मोठ्या प्रमाणावर गैरफायदा दिसत आहे याला काही आधार?

महिला अत्याचाराच्या < १० % घटनांच्याही नोंदी पण पोलीस दफ्तरी होत नाही. यापैकी < १० % घटनांत आरोपीला शिक्षा मिळते. इतर घटनांत आरोपी सबळ पुराव्या अभावी मोकाट सुटतात. देशाची लोकसंख्या १४५ कोटी आहे आणि वर्षाला ३०, ००० बलात्कारांच्या नोंदी होतात. दिल्ली निर्भया, कथुआ, हाथरस, उनाव, कोलकता, बदलापूर, स्वारगेट.... अशा तुरळक घटना लोकांच्या चर्चेत रहातात.

बदलापूरला लहान मुलींवर अत्याचार घटनेत शाळाचालकच केस नोंदविण्या बाबत उदासिन होते. पुढे जनक्षोभ शांत करण्यासाठी त्या आरोपीला मारले गेले पण अत्याचाराची केस दाबण्याचा प्रकार करणार्‍या समाजातील "प्रतिष्ठित " गुन्हेगारांवर काय कारवाई?
हैद्राबाद घटनेतही पोलीसांनी FIR नोंदविण्यामधे अक्षम्य विलंब लावला होता.

गैरफायदा घेतला गेल्याची अपवादात्कम उदाहरणे असतील पण "मोठ्या प्रमाणांत " गैरफायदा घेतला गेला आहे हे विधान पटत नाही. महिला अत्याचारांच्या नोंदविलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत हा आकडा किती मोठा आहे ?

<< पूर्वी भारतात "स्वयंवर" व्हायचे ज्याद्वारे आपला वर निवडण्याचा पूर्ण अधिकारी स्त्रीयांना होता. >>

----- वर निवडण्याचा पूर्ण अधिकार स्त्रीयांकडे होता हा काळ कुठला आहे ?