मभागौदि २०२५ शशक- मोह - मानव

Submitted by मानव पृथ्वीकर on 27 February, 2025 - 09:58

“काजिनकाबा!”
“खरं?”
“हाव जी. मले काय मालुम कोनं घेतली?”
“बरं. पन काल तू गेलतां न देवयात माय संग.”
“हाव. पन माय त्याईच्याशी बोलुन राहीली होती. मले म्हने “बाब्या, ते पाय तिकडं म्हैस हागुन राहीली. जाय टोपलं घेउन पटकन अन शेन घरी नेजो. गवऱ्या पन थापुन ठेवजो.”"
“मंग?”
“मंग मी पयालो घरी, टोपलं घेतलं, गेलो म्हशीकडं.”
“पन पहिले तूनं वाकुन काईतरी उचललं नं. उषा सांगुन राहीली.”
“खोटं सांगुन राहीली ते. ते तं म्हशीकडं पाहुन राहीली होती.”
“बरं मंग?”
“म्या शेन आनलं घरी, गवऱ्या थापुन ठेवल्या.”

बानं इचार केला. गवऱ्याईकडं गेला. मायी फाटली.
दुसऱ्या गवरीत राधाकाकूची अंगुठी सापडली.
बानं गुरावानी झोडलं मले.

-------
ही वऱ्हाडी बोली आहे.
शब्दार्थ:
काजीनकाबा = काय कुणास ठाऊक बुवा.
देवयात = देवळात (सगळीकडेच ळ ऐवजी य वापरतात.)
अनेकवचनी विभक्ती प्रत्यय जोडताना अनुस्वारा ऐवजी ई जोडतात - त्याईच्याशी, गवऱ्याईकडं
नेजो, ठेवजो = यात जो एकवचनी आज्ञार्थ/विध्यर्थ प्रत्यय आहे.
म्या = मी ची तृतीया विभक्ती.
मायी = माझी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!
काही शब्दांना अडखळले.पण वाचताना मस्त वाटलं.

मला 'काजिनकाबा' हा शब्द समजला नाही. पण तो समजता तर गुपित आधीच उलगडतं का काय माहित नाही. त्या दृष्टीने समजला नाही ते बरंच असेल.
लगेच नसेल तरी सगळ्यांची वाचुन झाल्यावर त्याचा अर्थ सांगा मानव.

भारी! Happy

>>> मला 'काजिनकाबा' हा शब्द समजला नाही.
मलाही.

हांव जी, मला पन नाही समजला पैला शब्द. पण मजा आली वाचायला. ही कुठली भाषा आहे? पूर्ण वाचून झाल्यावर मी परत पहिला शब्द वाचून बघितला. मला उगीचच का जी अन् का बा ( काय बुवा अशा टाईप) असं वाटलं

स्मजला नाही म्हणतोय तर अर्थ सांगायचा सोडून 'कोण जाणे, काय माहिती' अशी उडवाउडवीची उत्तरं काय देताय छल्ला! Wink Proud

धन्यवाद सगळ्यांना.
छल्ला यांनी बरोबर सांगितलंय. ग्रामीण विदर्भातला शब्द आहे तो. "काजीन का बा!" यात बा हे बुवा सारखे आहे, पण एकादमात एक शब्द असल्यासारखा उच्चारतात आणि शशक शब्द मर्यादेमुळे एक शब्द केला.

अमीतव Proud

भाषेसाठी आवडली. पण मला त्याने सुरुवातीला कबूल का केले नाही (मले काय मालुम कोनं घेतली?) आणि लगेचच शेवटी का कबूल केले ते कळले नाही. की तो असे म्हणतोय की बापाने झोडपले, पण मी चोरली नव्हती?

संपादन

Oh! शेवटचा संवाद नाहीये. मी आत्ता पुन्हा वाचली आणि लक्षात आले. झकास आहे. आवडली.

छान झालीय श श क..ही भाषा ओळखीची आहे त्यामुळे त्या टोन मध्ये वाचायचा प्रयत्न केला..

मस्त कथा. आवडलीच एकदम. खरंतर वाचताना ऐकू आली कथा वऱ्हाडी लहेज्यात.
ते काssssजिन का बा!.. असं उद्गारार्थी बोलतात माझे सासरे.