मभागौदि २०२५- विशेष लेख- शब्द - अस्मिता

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 26 February, 2025 - 05:12

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्या खोऱ्यातील शिळा

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा ! Happy /\

माझे आजोबा मला म्हणायचे "वाणी प्रसन्न आहे तुझ्यावर, सुपारी खात जाऊ नकोस. शारदेला रुष्ट करू नकोस." वाणी म्हणजे नेमकं काय हे आताही कळालेलं आहे की नाही माहीत नाही. वाणी म्हणजे आपल्या मुखातून (किंवा लेखनातून) बाहेर येणाऱ्या शब्दांतील ऊर्जा असावी... कदाचित.

आणि शब्द.... सगळीकडे विखुरलेले, आपल्या अवतीभवती भिरभिरणारे, कधी सुई तर कधी काट्यासारखे बोचणारे, कधी मऊसुत वाटणारे, कधी दिलासा देणारे, कधी आपले वाटले नाही तरी रूंजी घालणारे, बोलायलाच हवेत असेही नाही -लिहिले तरी पोचणारे. कधी परस्पर वाहणाऱ्या ढगासारखे पाऊस न पाडताच निघून जाणारे, कधी स्वतःचा अर्थ आपल्याला शोधायला भाग पाडणारे, मनातल्या काहुराला वाट करून देणारे..!

शब्द बापडे केवळ वारा
अर्थ वागतो मनांत सारा
नीटनेटका शब्द पसारा
अर्थाविण पंगू

भाषा कुठलीही असो, आपली भाषा आपल्याला शब्द देते. ते शब्द आपल्याला विचारांची चित्रं काढणारी रंग देऊन जातात. ज्याचा शब्दसंग्रह जास्त त्याला अगणित इंद्रधनु काढण्याची कल्पनाशक्तीही मिळू शकते. लिहून-बोलून नाही आलं तरी मनात एक अदृश्य कुंचला तयार होतोच. प्रत्येकाचा कुंचला वेगळा, प्रत्येकाचे रंग वेगळे व त्या रंगांचे शिंतोडेही निराळेनिराळे. सडा शिंपत जाणारे असंख्य विचार..!

शुद्धाशुद्धाकडे बघावे | वैय्याकरणी शब्द छळावे
शुष्कबंधणी का गुंतावे प्रेमळ हृदयांनी
व्याकरणाचे नियम कशाला कोण मानतो साहित्याला
उठला जो हृदयास उमाळा हृदयी विरमावा

पण स्वतःची अशी ताकद नसते शब्दांना. ते आपल्या भावनांशिवाय निष्प्रभ असतात. स्वतःचा अर्थही नसतो त्यांना, आपले अनुभव त्यांना अर्थ देतात. नाहीतर प्रत्येकाचेच लेखन तितकेच भावले असते व शब्दकोश रुक्ष वाटला नसता. काय असतं ह्या शब्दांत, कुठेकुठे प्रवास करत येऊन ते आपले होतात. ह्यात एखाद्यालाच का प्राण फुंकता येतो, एखाद्यावरच ते प्रसन्न होऊन त्याच्या तालावर नाचायला दास्यत्व पत्करून बसतात. हृदयांच्या तारा आपोआपच छेडल्या जात असताना शब्दांपेक्षा भावनांना प्राधान्य द्यावे म्हणतात. त्या नादाचे अनुसंधान करत जावे, शुष्क- कृत्रिम बंधनांच्या शृंखला प्रतिभेला नकोतच..!

हें शब्दब्रह्म अशेष | तेचि मूर्ति सुवेष |
तेथ वर्णवपु निर्दोष | मिरवत असे ||३||

ह्या ओवीत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात - हे वेद जडजंबाळ शब्दांनी भरलेले नसून स्वतः शब्दब्रह्म गणेशाचे रूप घेऊन आले आहे. हा निर्गुणी परब्रह्मच शब्दरूप घेऊन आला आहे. ह्यातले 'वर्णवपु- म्हणजे सगळे स्वर आणि व्यंजन दोषरहित आहेत. त्यामुळे हे अलंकार लेवून सुशोभित झालेल्या प्रत्यक्ष गणेशाचे रूप आहे.

माऊलींच्या शब्दात साक्षात श्रीगणेश असणारच. इतका अन्याय, इतकं दुःख आणि पराकोटीची अवहेलना पदरी पडूनही मन निरभ्रच राहिले त्यांचे. ईश्वरत्व न बहाल करता पाहिले तर लहानपणापासून मातृपितृशोक, हेटाळणी, जबाबदारी व बहिष्कृत आयुष्य जगूनही प्रतिभेच्या झऱ्याचे पाणी आटले नाही. किंबहुना योग्य वेळी एखाद्या मुग्धप्रपातासारखे कोसळून अवघा महाराष्ट्र निर्मळ-निर्पुट करण्याची ऊर्जा त्या शब्दांना मिळाली.

प्रत्येकालाच ते कसे वेगवेगळे भेटतात. कोण ठरवतं कुणाला कधी ते कसे भेटणार. निसर्गाचा आवेग का अजून काही..!

कमोदिनी काय जाणे तो परिमळ ।
भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥
तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम ।
आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥

इथे आपण तुकाराम महाराजांच्या गाथा वाचूनही कुणीतरी वर्णन केलेल्या परिमळाचा अनुभवाची कल्पना करत बसतो. परिमळ वर्णून उमजत नाही.
तिकडे नामाची गोडी ठाऊक असलेली, त्या शब्दामागच्या जाणिवेची अनुभूती असलेल्या शुद्धचित्त संतांना इतर कुठलेही शब्द उच्छिष्ट वाटले तर त्यांत नवल ते काय..! ते भ्रमरासम जे त्या शब्दांत आपल्याला जाणवतही नाही, ते अमृतही पिऊन जीवन्मुक्त होतात. तोही आपल्यासाठी केवळ शब्दच असतो पण त्यात त्यांना असं काय मिळतं ज्यापासून आपण वंचित राहतो. ते प्रेमसुख त्यांचेच, कारण शब्दाला नाद व नादाला नादब्रह्म करून तो अधिकार उरतो केवळ त्यांचाच..!

बहिणाबाईंसारख्या निरक्षर स्त्री वर हे इतके प्रसन्न कसे होतात. अडाणी तरी कशी म्हणू त्यांना ?? सगळ्या आयुष्याचे सार चार ओळीत मांडणाऱ्या, ह्या माझ्या आजीसारख्या मला अंधारातही दिशा दाखवणाऱ्या, माझी तगमग ओळखणाऱ्या, वरवर चारचौघासारखं बोलतेय असं वाटणाऱ्या तरीही त्याचवेळी ग्रामीण संस्कृतीतले अस्सल साहित्य घडविणाऱ्या स्त्रीवर जगातील सगळं तत्त्वज्ञान मुठीतून जात्यावर सांडताना सरस्वती प्रसन्न झाली होतीच.

माझी माय सरसोती
मला शिकविते बोली
लेक बहिणाच्या मनी
किती गुपिते पेरली

तिला कसं कळालं काय-काय गुपिते आहेत आम्हा मुलींच्या मनात, शिकून सवरूनही ती आहेतच. हे स्त्रीवादाचं इतकं मधाळ, मुग्ध आणि तरीही खणखणीत सत्य मांडणारं रूप तिलाच बरं भेटलं. कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता. मग आम्ही काय शिकलो, निर्जीव शब्द..!

रस्त्यानं चालली
मायबहीन आपली
मांघे फीरी पाह्यं
पाप्या, धरत्री कापली

अजूनही तसेच आहे बहिणाबाई, अजूनही तुमच्या ओव्यांतले शब्द जिवंतच आहेत. परिस्थिती वरवर बदलली आहे पण तुमचं तत्त्वज्ञान चिरंतन सत्यच होऊन बसले आहे. जोवर परिस्थिती बदलत नाही, तोपर्यंत तुमच्या या शब्दांना मरण नाही.

दैनंदिन आयुष्य असो वा भवताल प्रतिभावंतांना निसर्गाच्या कुठल्याही आविष्कारातून प्रेरणा मिळते. ती त्या-त्या वेळी शब्दबद्ध करणं व वाचकाला आपापल्या भिंगातून ते बघण्याचे स्वातंत्र्य घेऊन आपण कुठल्या तरी नव्या आविष्काराच्या शोधात निघून जाणं त्यांना मनस्वी ठरवतं. कधीकधी वाटतं शब्दांच्या मुळाशी मनस्विता तर नसावी. कधी निसर्ग, कधी प्रेयसी, कधी उत्कट प्रेम तर कधी तीव्र विरह. क्वचित तिच्या मनधरणीतला गोडवा, तिच्या सौंदर्याचे वर्णन करत घालवलेला रूसवा. तुझ्या पापण्या हलल्या आणि ऋतुचक्राचाही नेम बिघडला, आस नसलेल्या चक्रासारखे ऋतूत ऋतू मिसळून गेले, आसमंतातले शब्दही विरून गेले, तुझ्या डोळ्यांतील लखलखीत धारदार तेज म्हणजे सुरकन जळात पोहणारी मासोळीच. त्या मासोळी इतकाच माझाही जीव तळमळतोय.

ऋतुचक्राचे आंस उडाले
आभाळातून शब्द निघाले
आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले गं

कदाचित झालीच कृपा प्रतिभेची तर सगळा निसर्गक्रम मोडून ते रंग स्वतः हून माझ्या कुंचल्याला आपलेसे करून घेतील. सर्व सृष्टीत ते वेचता येतील तेही ह्या मासळीसारखे तितकेच तळमळत असतील, कोण सांगावे. त्यांनाही संवेदनशील हृदयाचीच आस असेल. त्यांचाही तितकाच कोंडमारा होत असेल. कोसळेच ते कधी सौदामिनीसारखे माझ्याही मनावर आणि मग माझंही मौन सुटून स्फुल्लिंग पेटेलच..!

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत घेऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातून होकाराचं
तुफान उठलं !

जे कवींना संतांना मिळाले त्या ज्ञानाचे -जीवननिष्ठेचे- तशाच चैतन्याचे रसपान करता यावे व आपल्याही शब्दांत अचानक प्राण फुंकले जावेत. देव म्हणा, निसर्ग म्हणा. प्रतिभेचा आविष्कार व्हावा, किमान आपल्यापुरता. मग वाणी सत्कारणी लागल्याचे समाधान होऊन ते क्षण या अमृताक्षरांत कोंदवता यावेत.

आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंजर्‍याचे दार उघडावे

आपल्या मनाचा आरसा इतरांच्याही मनात प्रतिबिंबित व्हावा. मनाच्या पिंजऱ्याचे दार उघडून पाखरू मुक्तपणे आकाशात भरारी मारायला निघून जावे. आपल्याही सतारीच्या तारा अवचित छेडल्या जाव्यात आणि सगळं निखळ-निरभ्र- आरस्पानी होऊन जावं.

*संदर्भसूची
१. माझ्या मराठी मातीचा- कुसुमाग्रज यांची 'मराठी माती' ही कविता
२. शब्द बापडे केवळ वारा- कवी वसंत किंवा कवी वासुदेव बळवंत पटवर्धन यांची 'शब्द' ही कविता
३. शुद्धाशुद्धाकडे बघावे - कवी वसंत किंवा कवी वासुदेव बळवंत पटवर्धन यांची 'शब्द' हीच कविता
https://www.esakal.com/saptarang/saptarang-latest-marathi-article-by-dr-...
४. हें शब्दब्रह्म अशेष | - ज्ञानेश्वरी अध्याय १ ओवी ३
५. कमोदिनी काय जाणे तो परिमळ । - संत तुकाराम २४९

https://www.aathavanitli-gani.com/Song/Kamodini_Kaay_Jane
६. माझी माय सरसोती आणि रस्त्यानं चालली - बहिणाबाई चौधरी
https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80_%E...

७. ऋतुचक्राचे आंस उडाले -
https://www.aathavanitli-gani.com/Song/Tav_Nayananche_Dal_Halale
८. शिणलेल्या झाडापाशी - कवी कुसुमाग्रज यांची 'मौन' ही कविता
https://ek-kavita.blogspot.com/2007/04/blog-post_04.html

९. आयुष्याची आता झाली उजवण - संधीप्रकाशात अजून जो सोने- बा. भ. बोरकर
https://www.aathavanitli-gani.com/Song/Sandhiprakashat_Ajun_Jo

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मिता,
आपण सुचवलेले तीन बदल मूळ लेखात बदलले आहेत.

आणि शब्द.... सगळीकडे विखुरलेले, आपल्या अवतीभवती भिरभिरणारे >>> हा भाग, बहिणाबाईंचा संदर्भ आणि ऋतुचक्राचे आंस उडाले - हा भाग हे सर्वात आवडले.

ह्यात एखाद्यालाच का प्राण फुंकता येतो, एखाद्यावरच ते प्रसन्न होऊन त्याच्या तालावर नाचायला दास्यत्व पत्करून बसतात >>> खरे आहे. तीच अक्षरे, तेच शब्द, पण एखाद्या लेखणीतून काय रसरशीत जिवंत होऊन येतात!

सुंदर झाला आहे लेख!

काय लखलखतं लिहीलंयस अस्मिता.

किचकट, गुंतागुंतीचे, समजण्यास अवघड
त्यासाठी ‘जडजंबाळ’ शब्द वाचला आहे. >>> जांगडगुत्ता पण आहे.

सुंदर, मनस्वी लिहिले आहे.
आणि शब्द.... सगळीकडे विखुरलेले, आपल्या अवतीभवती भिरभिरणारे >>> हा भाग, बहिणाबाईंचा संदर्भ आणि ऋतुचक्राचे आंस उडाले - हा भाग हे सर्वात आवडले. +१

मनापासून आभार संयोजक. Happy

सर्वांचे आभार. Happy

हर्पेन, Proud सुपारी खाल्ल्याने घात झाला.

देवकी तै, 'बापुडे' शब्दाची नोंद घेतली. Happy
मामी, हो. तो ही शब्द 'शब्दवेध' धाग्यावर वाचलेला आहे. Happy

अस्मिता यांनी अतिशय मेहनत घेऊन हा लेख लिहिल्याचे लक्षात येते. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
---

अजून एक व्याख्या,
शब्द म्हणजे ज्ञान, विचार, भावना आणि कल्पना, सुस्पष्ट आणि सुबोध स्वरूपात पोचविण्याचे एक माध्यम.

----

आंतरजालावर शोधलं तर बहिणाबाईंचा उल्लेख
‘अशिक्षित/ निरक्षर होत्या तरी… ‘याशिवाय पूर्ण होत नाही.

***
‘निरक्षर’ चे शब्दकोषात दिलेले समानार्थी शब्द:
अक्षरशत्रू, अक्षरशून्य, अंगठेबहाद्दर, अडाणी, अविद्य, अशिक्षित.

***
शब्द बनतो अक्षराने,
त्या शब्दांच्या भांडारावर मोजक्याच शब्दांत आयुष्याचं मर्म, सृष्टीतील गुपितं रसाळ शब्दात सांगणारी माऊली
निरक्षर कशी ..?

***
आपण ज्याला अक्षर म्हणतो ते नक्की काय असते?
माझ्या मते अक्षर चार स्वरूपात असते.
लिखित आणि दृश्य स्वरूपात - ते चिन्ह असते
वाणी आणि श्राव्य स्वरूपात - विशिष्ट ध्वनी कंपने तो विशिष्ट आवाज तयार करतात जो आपण उच्चारल्यावर तयार होतो/ आपल्याला ऐकू येतो.

अक्षराची वाणी आणि श्राव्य स्वरूपे जिला फक्त माहितचं आहेत असे नाही
तर ती गुंफुन तयार होणारे शब्द वापरून उत्तमोत्तम आशयघन रचना तयार करण्याची प्रतिभा जिच्यात आहे ती निश्चितच निरक्षर नाही..

ती निरक्षर नाही तर तिला फक्त लिहिता - वाचता येत नव्हते हे थोड जास्त बरोबर वाटतं का?

लेक बहिनाच्या मनी >> असंच ऐकलं आणि म्हटलं आहे लहानपणी. बालभारतीत आणखी एक "कशाले काय म्हनू नही" कविता होती. न बरोबर असावा. पण ठीके, तेवढा ण समजून घेऊ.

चांगला लेख
बहिणाबाई निरक्षर होत्या पण अडाणी नाही. इतकं सगळं जीवनाचं ज्ञान इतक्या सहजपणे मांडलय त्यांनी...

लेख चांगला लिवलाय.

बहीनाबाईच्या आठवनीनं मन कासावलं बगा. बाईंनी काय काय भोगलं, पन दुःख लपवुन ठिवलं.
माझं दुखं माझं दुखं
तयघरात कोंडलं
माझं सुख माझं सुख
हांड्या झुंबरा टांगलं.

आनी त्यांचं निसर्ग प्रेम काय म्हनावं! एखाद्या संतावानी नजर व्हती त्यांची.
धरित्रीच्या कुशीमधी बीयबीयानं निजली
वऱ्हे पसरली माटी जशी शाल पांघरली
बीय टरारे भुईत सर्व कोंब आले बऱ्हे
गह्यरलं शेत जसं आंगावरती शहारे.

बाईंच्या चरनी नतमस्तक व्हायला व्हतं बगा कवापन आठवन आली की.

अब्द अब्द- शब्द शब्द सुरेख ओवुन ह हार माय मराठीस अर्पिला अहेस. मेहनत व उस्फूर्तता दोन्ही कळुन येतात.
आजोबांचा आशीर्वाद कळो येतो आहे.

मलाही तो शब्द जडव्यागळ असाच वाटे. आज पहील्यांदा खरा शब्द कळला.

आजोबांचा आशीर्वाद कळो येतो आहे. >>>> Happy सामो /\.

निळूभाऊ, पोस्ट आवडली. बहिणाबाईंच्या निसर्ग प्रेमावर एक 'निसर्गायण' येऊ शकते. Happy

सर्व अभिप्रायांची नोंद घेतली आहे. धन्यवाद सर्वांना. Happy

Pages