मभागौदि २०२५ - निसर्गायण - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 February, 2025 - 23:20

सूर्य अस्ताचलाकडे कलायला लागतो, सावल्या लांब होऊ लागतात. पाखरं घरट्यांकडे, खिलारं गोठ्यांकडे परतायला लागतात.
ज्यांना घर असतं, ती माणसं झपाझप घरांकडे निघतात.
ज्यांना घर नसतं, ती जड पावलांनी घराच्या कल्पनेकडे, किंवा घराच्या आठवणींकडे…

कल्पनेतली घरं सुंदर असतात नेहमीच! संधिप्रकाशातल्या सोन्याने त्यांच्या भिंती आणि कौलं झळाळत असतात. या घरांच्या सोबतीला दोन्ही तटांवर हिरवाई घेऊन वाहणारा निळासावळा झरा असतो. त्याच्या पलभर स्थिर - पल सलील जळात पाय बुडवून बसलेला, लाटांवर सावलीचा गोड काळिमा पसरवणारा औदुंबर पाठीशी असतो. घरच का, त्याकडे वळणं घेत जाणाऱ्या पायवाटाही आर्जवी भासतात. उंच दाट दाट गवतातून डेरेदार आंब्याला वळसा घालून मुरकत जाणाऱ्या. चालणार्‍याच्या सुखदु:खाशी हसत-रडत समरस होणारी, लळा लावणारी शेतं त्यांच्या कडेला असतात. गर्द डोहावर अल्लाद रात्र पसरावी तसे हलकेच काजळ भरलेले गहिरे डोळे दाराशी येणार्‍याची वाट पाहात असतात. पाऊस नुकताच दारातल्या फुललेल्या मोगर्‍याशी आणि नाजुक सायलीशी रीतभात सोडून धसमुसळेपणा करून गेलेला असतो. तुळशीचा देह अजून हुळहुळत असतो. अंगणात साचलेल्या तळ्याचे लखलख पार्‍याचे आरसे होतात आणि त्यात हसरी बिंबं दिसतात.

आठवणींतली घरं मात्र का कोण जाणे, उदास भासतात. नुसती... नुसती असतात. त्यांच्या छपराशी आताशा कांपरा धूर दिसत नाही. असलाच, तर काळवंडलेल्या भिंतीवर एखादा धुरकट कंदिल तेवढा क्षीण तेवत असतो. त्यांच्याही आसपास नदी असते, पण नुसतीच असते. आता तिच्यात कसल्याच आवेगाचे पूर येत नाहीत. या घरांकडे जाणार्‍या वाटांवर कसल्या कसल्या शल्यांचे काटे असतात. इथे व्याकूळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो. नदीकाठच्या वेळूंच्या रंध्रांतूनही जीवघेणी शांतताच तेवढी नांदत असते. शेतातलं पीक करपलेलं, पक्षी दूर देशी गेलेले, गवताच्या तुर्‍यांवरचे त्यांनी दिलेले हेलकावेही विरून गेलेले.
अंगणात पावसाची संततधार दु:खाच्या मंद स्वरात झरत असते. इथल्या कळ्यांनाही वास येतो तो आसवांचा. अंगणात साचलेल्या तळ्यात पडणार्‍या थेंबांमुळे चांदण्याचं प्रतिबिंब लक्कन हलावं तसं आत काहीतरी हळुवार हलतं. फक्त आपलं आपल्यालाच तेवढं जाणवेलसं. पाहायला असतंच कोण?

घर नसलेल्यांचं एक मात्र असतं. अनेकदा त्यांना कवितेत घर सापडतं!

***

एक गंमत म्हणून हा प्रयोग करून पाहिला आहे.
सदर लेखात हळूच डोकावून गेलेल्या निसर्गाची वर्णनं असलेल्या कवितांची सूची आणि शक्य तितक्यांचे दुवे देत आहे. या निमित्ताने तुम्ही त्या वाचल्यात तर मला आनंद होईल.

१. संधिप्रकाशात अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी - बा. भ. बोरकर
२. औदुंबर - बालकवी
३. गडद निळे गडद निळे - बोरकर
४. त्या तिथे पलीकडे तिकडे - ग. दि. माडगूळकर
५. या शेताने लळा लाविला - ना. धों. महानोर
६. नको करू सखी असा साजिरा श्रुंगार - संदीप खरे
७. मोगरा फुलला - संत ज्ञानेश्वर
८. नको नको रे पावसा - इंदिरा संत
९. मेंदीच्या पानावर - सुरेश भट
१०. नभ उतरू आलं - महानोर
११. नुस्ती - आरती प्रभू
१२. चालसी किती जगे, किती युगे मुशाफिरा - बोरकर
१३. ती गेली तेव्हा - ग्रेस
१४. वाटेवर काटे वेचीत चाललो - अनिल
१५. या व्याकुळ संध्यासमयी - ग्रेस
१६. जाहला सूर्यास्त राणी - आरती प्रभू
१७. पीक करपलं - महानोर
१८. नि:स्तब्ध - आरती प्रभू
१९. पाऊस कधींचा पडतो - ग्रेस
२०. कसे कसे हसायाचे - आरती प्रभू
२१. अताशा असे हे मला काय होते - संदीप खरे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजा आली वाचताना!
मला संधिप्रकाशातच्या आधी, सुरुवातीला सांज ये गोकुळी असेल वाटलेलं. Happy

वा छान लेख.
मावळत्या दिनकरा.
श्रावणमासी
केळीचे सुकले बाग https://www.youtube.com/watch?v=urkKbm2ePtQ
तो एक वृद्ध माळी सप्रेम द्या निरोप https://www.youtube.com/watch?v=vr3yCf1xCOc Must listen
हा मुंबई आकाशवाणीने आरती प्रभूंच्या वर सादर केलेला पूर्ण कार्यक्रम आहे.
ही मिसिंग.
आठवली की अजून लिहितो.
शांतपणे वाचण्यासाठी पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी निवडक दहात टाकतो.

सुरेख लिहिलंय! मला स्वप्नातल्या घराचा परिच्छेद वाचताना सुनीताबाईंनी आहे मनोहर तरी मध्ये रेखाटलेलं त्यांचं स्वप्नातलं घर आठवलं.

किती सुंदर, अलवार लिहिलं आहेस स्वाती!
अशी एकातून दुसरी कविता गद्यात गुंफत जाणं ..हेच किती मनोहर आहे.
मला वाटतं...सूर्य चंद्र तारे, झाडं फुलं, पक्षी..या बरोबरच माणसाचे मन हेही निसर्गाच्या अविष्कारातच धरायला हवे...

खूप छान, मनावर मोरपिस फिरवल्यासारखं लिहिलं आहेस

वा ! अप्रतिम. 'आठवणीतले घर' फार चपखल! त्यातल्या काही ओळी ओळखीच्या होत्या, काही आता तुझ्या लिन्का वाचून लक्षात आल्या, ही कल्पना फार मस्त आहे!

सुंदरच जमलाय प्रयोग!
थोडेच संदर्भ कळले होते लिन्क सहित यादी दिली हे छान केले.

सुंदर आणि चित्रमय लिहीले आहे. खालचे संदर्भ वाचायच्या आधीही "ओळखीचे" काहीकाही शब्द व वाक्ये लक्षात आली होती.

हे सगळे उल्लेख/संदर्भ विणून "मेटा" लेव्हलला कोकणातील जुनी घरे, पूर्वीची गजबज, परिसराच्या आठवणी - आता तेथे फारसे कोणी नसणे असाही एक टोन जाणवला.

सुंदर. हा प्रयोग आवडला. वाचताना बालकवी, बोरकर, क्वचित ग्रेस, काही माहितीतली गाणी इत्यादी काही संदर्भ लागत होते, पण खाली चक्क २१ अनपेक्षित यादी पाहून अचंबा वाटला. बराच व्यासंग बाकी आहे याची जाणीव झाली.

सुंदर आणि चित्रमय लिहीले आहे. खालचे संदर्भ वाचायच्या आधीही "ओळखीचे" काहीकाही शब्द व वाक्ये लक्षात आली होती. >> ++१
आठवणींतली घरं जास्ती आवडली. वसंत आबाजी डहाकेंची 'आई आणि तात्याजी' डोळ्यासमोरून तरळून गेली.

उत्तम जमला आहे प्रयोग. निवडलेल्या विषयाला साजेसा तरलपणा उतरला आहे. ही एक medley च झाली. त्यातल्या थोड्याबहुत कविता ओळखता आल्याचा आनंद हा बोनस.

केकू बाभं वरील पुलंचा कार्यक्रम आवडला पण सुनीताबाईंनी केलेला पार्ट२ (कवितांजली२) - https://www.youtube.com/watch?v=x2eVgD72Pbk - जास्त आवडला तो जरुर बघा.

बोरकरांच्या कवितेत बरेचदा 'गं' शब्द येतो उदा-
सरीवर सरी आल्या ग,
सचैल गोपी न्हाल्या ग.
यावर पुलं म्हणत बोरकरांना 'ग' ची बाधा झाली आहे Happy

सर्व अभिप्रायदात्यांचे आणि संयोजकांचे अनेक आभार! Happy

केकू, दुव्यांसाठी पेशल आभार - अजूनही कविता/गाणी नक्की आठवतील सगळ्यांना - लेखात सगळी घेणं अशक्य आहे. Happy

धन्यवाद, ममो.

>>> मला संधिप्रकाशातच्या आधी, सुरुवातीला सांज ये गोकुळी असेल वाटलेलं.
अमित, खरंच की! लक्षात आलं नाही ते! Happy