मभागौदि २०२५ - मराठी साहित्य संमेलन: आठवणी, किस्से, वादविवाद

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 18 February, 2025 - 02:13

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे

नसो आज ऐश्वर्य या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे

"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" ही आपल्या तमाम मराठी बांधवांसाठी एक खूप महत्त्वाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. किंबहुना ते मराठी अस्मितेचे एक व्यवच्छेदक लक्षणच म्हणावयास हवे.

जवळपास १४७ वर्षाची परंपरा या मराठी साहित्य संमेलन संस्कृतीला लाभली आहे. भारतातील भाषिक पातळीवर एवढ्या मोठ्या उत्सवी स्वरूपात साजरे केले जाणारे हे एकमेव भाषिक संमेलन आहे.

१८७८ साली न्या. म. गो. रानडे यांनी या संमेलनाची मुहूतमेढ रोवली. त्यावेळी हे संमेलन ‘ग्रंथकार संमेलन’ या नावाने ओळखले जात होते. या वर्षी ९८ वे मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्ली येथे नुकतेच पार पडले.

जेवढी उत्सुकता संमेलनाबाबत असते तेवढीच उत्सुकता संमेलनादरम्यान होणाऱ्या वादविवादांबद्दल असते. हे वाद संमेलनाचे मंडळ, त्यातील मतदान पद्धत, अध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार, आयोजक, संमेलनाचे स्थळ, राजकीय हस्तक्षेप या आणि अशा अनेक गोष्टींबाबत असतात.

किंबहुना संमेलन आणि वाद असे समीकरणच आता तयार झाले आहे. संमेलनापूर्वी, संमेलनात किंवा संमेलनानंतर वाद झाला नाही तर सगळ्यांना उगीच चुकल्यासारखे वाटते. संमेलनाइतकीच वादपरंपरा सुद्धा प्रत्येक साहित्य संमेलनात सांभाळली जाते.

इथल्या तमाम मायबोलीकरांनी नक्कीच मागील मराठी साहित्य संमेलनांना हजेरी लावली असेलच.

तर त्या संमेलनादरम्यानच्या तुमच्या अनुभवाबद्दल किंवा त्यावेळी गाजलेल्या महत्त्वाच्या वादविवादांबद्दल, संमेलनांमधील वेगवेगळ्या किश्श्यांबद्दल या धाग्यावर अवश्य लिहावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यंदाचं मराठी साहित्य संमेलन दिल्लीत. त्यात पंतप्रधान उद्घाटक. यामुळे ते आधीपासूनच चर्चेत होतं. डॉ तारा भवाळकरांच्या अध्यक्षीय भाषणातले उतारे वृत्तपत्रात वाचले. त्यावरून उत्सुकता वाटून अनेक वर्षांनी एखाद्या अध्यक्षाचे भाषण पूर्ण वाचावेसे वाटले. आता तंत्रज्ञानाच्या सोयीमुळे ते बघता आले. त्यावरचे वाद चर्चा झडत आहेत. त्याबद्दल लिहीत नाही.

आता मी प्रत्यक्ष अनुभवलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांबद्दल.

२००१ चं साहित्य संमेलन इंदूरला झालं. अध्यक्ष विजया राजाध्यक्ष. तेव्हा मी इंदूरलाच असल्याने जाता आलं. उद्घाटन शुक्रवारी झालं होतं. ऑफिस सुटल्यावर मी व माझे काही मुंबईकर सहकारी गेलो, तोवर उद्घाटनाचा सोहळा संपला होता. पण सभागृहा तून बाहेर पडणार्‍या विजया राजाध्यक्ष जवळून , म्हणजे अगदी एक हाताच्या अंतरावरून दिसल्या. कार्यक्रम पत्रिकेत दिवाळी अंकांवर परिसंवादात माझ्या गोवानिवासी काकांचं नाव वक्ता म्हणून दिसलं. म्हणून दुसर्‍या दिवशी मुद्दाम त्या परिसंवादाला गेलो, तर ते आलेच नव्हते. परिसंवाद हा काय प्रकार असतो, ते अनुभवता आलं. प्रेक्षकांत बहुतेक ज्येष्ठ नागरिकच होते. मग आणि दुसर्‍या दिवशीही पुस्तक प्रदर्शनाला गेलो बरीच पुस्तके विकत घेतली. एका दालनात सगळ्या माजी अध्यक्षांची छायाचित्रेही लावली होती हे आठवतं
त्या रात्री मराठी सुगम संगीताचा - भावगीतांचा कार्यक्रम होता - त्याला तुडुंब गर्दी होती असा वृत्तान्त एका सहकार्‍याकडून दुसर्‍या दिवशी मिळाला.
आता आठवतंय त्यानुसार संमेलन बद्दल औत्सुक्य व तत्सम भावना माझ्या मुंबईकर सहकार्‍यांमध्येच होत्या. कार्यालयातल्या इंदूरी मराठी सहकार्‍यांना संमेलनाचा गंधही नव्हता. त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण हिंदी माध्यमातून , पण घरी बोलायची भाषा मराठी. मी एका सहकार्‍याशी मराठीत बोलत असताना एका अमराठी इंदुरी सहकार्‍याने आक्षेप घेतल्याचंही आठवतंय.

पुढे २०११ साली ठाणे - दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी पुस्तक प्रदर्शनात फिरलो. मेहता पब्लिशिंग हाउस आणि सुरेश एजन्सीच्या मंडपांतून शान्ता शेळक्यांची होती ती सगळी पुस्तकं (म्हणजे एकेक प्रतच) विकत घेतली. इतरही अनेक पुस्तकं घेतली आणि ते ओझं घेऊन ठाणे एस टी स्थानकात आल्यावर गर्दी बघून जिव टांगणीला लागला होता. पण रांगेचा फायदा तुम्हांला, आम्हांला सर्वांना होतो तसा मला होऊन कितव्यातरी बसमध्ये व्यवस्थित बसून येता आलं.
संमेलनानिमित्त त्या आधी संमेलनानिमित्त महिनाभर प्रत्येक संध्याकाळी ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या इमारतीच्या गच्चीवर अक्षर अंगण नामक कार्यक्रम होत असे. त्यातल्या शान्ताबाईंवरच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्याचा वृत्तान्त मायबोलीवर लिहिला आहे. तेव्हा मी फार कठोर लिहिलं आहे, असं आता वाटतंय.

शंभराला दोन कमी अशा दिल्लीतल्या संमेलनाचं संकेतस्थळ.

भरत
आधी डिस्क्लेमर माझा मराठी भाषेशी संबंध केवळ बाबुराव अर्नाळकर यांच्या पुरताच आहे. तेव्हा हा प्रतिसाद गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
तुम्ही प्रतिसादाच्या अखेरीस दिलेला दुवा उघडून बघितला. हे म्हणजे BJPचे संमेलन दिसतंय. एव्हढे पण विकले जाऊ नये. अस वाटले की मराठी विकायला काढली आहे. आपण गरीब लोक आहोत. पण गरीब असलो तरी लाचार का व्हावे लागते. नसती सोंग कशाला?
माझ्या मते राजकारणी लोकांचा सहभाग हा नेहमीच वादाचा मुद्दा झाला आहे. स्थानिक आयोजकांना काहीतरी भव्य दिव्य करून दाखवायचे असते. आणि राजकारणी लोकांना मानाचे स्थान दिले नाही तर रोकडा कुठून येणार?
दुसरा मुद्दा . दलित साहित्याला सापत्न्य भाव दाखवला जातो. ह्यावरूनही वादंग झाले आहेत असे आठवते.

शरद पवार स्वागताध्यक्ष आहेत की. आणि तुम्ही अध्यक्षीय भाषण आवर्जून ऐका असं सांगेन.

दुसर्‍या मुद्द्याबद्दल - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्याच काळात विद्रोही साहित्य संमेलनही भरतं.

विद्रोही साहित्य संमेलनही>>> केव्हा सुरु झाले? वादावादी झाल्यानंतर ना. रडू नको हे घे चोकोलेट.
वरच्या चित्रात माउलींचे चित्र मिसिंग आहे. हे नोट केले आहे.
भाषण काय कोणीही लिहून देईल. मुद्दा हा आहे की या मंडळींचा साहित्याशी काय संबंध आहे.