मराठी भाषा गौरव दिन २०२५ घोषणा

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 15 February, 2025 - 23:59

नमस्कार मायबोलीकर !

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी.

नेहमीप्रमाणे यावर्षीही आपण कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने , दि २७ फेब्रुवारीला, मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहोत.
मायबोलीवर तो आपण दि २४ ते २८ फेब्रुवारी असा साजरा करणार आहोत.
या दरम्यान, नवनवीन उपक्रम दर दिवशी जाहीर करण्याचा मानस आहे. काही उपक्रम, मायबोलीकरांना लिहायला वेळ मिळावा म्हणून थोडे आधी जाहीर केले आहेत.

आपल्या ज्या साहित्यिकांनी, संतकवींनी हे भाषेचे वैभव जोपासून आपल्यापर्यंत पोहोचविले त्यांचेही स्मरण करण्याचा हा दिवस आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मराठी भाषेचे योगदान फार महत्त्वाचे आहे. भाषा हे काही फक्त एकमेकांशी बोलण्याचे माध्यम नाही तर सतत युगानुयुगे प्रवाहित होणारा असा शब्द - अलंकारांचा वारसा आहे. आपल्या मनातील भावभावना, आपले विचार आपण जितक्या चांगल्या पद्धतीने मातृभाषेतून व्यक्त करू शकतो तितक्‍या अन्य कोणत्याही भाषेतून नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी तर मराठी भाषेची तुलना अमृताशी करत

माझा मर्‍हाटा चि बोलु कवतिके । परि अमृतातें ही पैजेसीं जीके।
ऐसी अक्षरे चि रसिकें । मेलवीन॥
असे लिहून ठेवले आहे. मराठी भाषा गौरव दिन हा मराठी भाषा आणि तिच्या योगदानाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे.

माहाराष्ट्री, प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून आजच्या मराठी भाषेची निर्मिती झाली आहे असे मानले जाते. देवगिरीच्या यादव काळापासून मराठी भाषेच्या उत्कर्षास सुरुवात झाली. तेराव्या शतकातील पंडित म्हाइंभट सराळेकर यांनी लिहिलेले लीळाचरित्र आणि संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ही याची ठळक उदाहरणे होत.

मराठी भाषेला प्राचीन साहित्य परंपरेचा थोर वारसा लाभला आहे. ह्यावर्षी साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन एका वेगळ्या अर्थाने महत्वाचा आहे; कारण ऑक्टोबर २४ मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ही सर्व मराठी भाषकांसाठी व मराठी भाषेबद्दल आस्था असणाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. भाषा ही नदीप्रमाणे प्रवाही असते. विवेकसिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी इत्यादिंपासून सुरू झालेला मराठी भाषेचा हा प्रवास आजच्या काळातील साहित्यिक आणि अगदी कन्टेन्ट रायटर्स पर्यंत पोहोचला आहे .

ज्या प्रमाणे नदीला असंख्य झरे येऊन मिळतात त्याप्रमाणे मराठी भाषेत दर बारा कोसांवर बदलणाऱ्या बोली भाषा मिळून त्या अनुषंगाने आजचे हे स्वरूप प्राप्त झाले आहे. काळाप्रमाणे मराठी भाषाही बदलत गेली, समृद्ध होत गेली आणि मराठी संस्कृतीचा प्रवाह भाषेप्रमाणेच अखंडित पुढे जात चालला असून नऊ कोटी इतकी लोकसंख्या मराठी भाषा बोलते. जर इतक्या प्रचंड प्रमाणात जर मराठी भाषा लोक बोलत असतील तर तिच्या ऱ्हासाची भीती अनाठायी आहे. विविध ज्ञानशाखांमधील ज्ञान आज मराठीत भाषेत येत आहे. गरज आहे ती मराठी नुसती लोकभाषा न राहता ज्ञानभाषा सुद्धा बनावी याची.

तर मंडळी या वर्षीच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आम्ही आपल्यासाठी वैविध्यपूर्ण असे उपक्रम घेऊन आलो आहोत. ज्यायोगे आपल्या प्रतिभेला चालना मिळेल आणि मराठीचे वैभव वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल. याच बरोबर छोट्या दोस्तांसाठीही त्यांना आवडतील असे खेळ आहेत. या निमित्ताने त्यांचाही आपल्या मराठी भाषेशी आणि मायबोलीशी परिचय होईल.

मायबोलीकर प्रत्येक उपक्रमाला प्रतिसाद देतात, उत्साहाने सहभागी होतात. आम्ही आपल्या सक्रिय सहभागाच्या प्रतीक्षेत आहोत.

या, सर्वजण मिळून आपल्या मायबोलीची पताका फडकत ठेवूया !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभेच्छा!
हा धागा वर दिसेल असं करता येईल का? आणि यातच सगळ्या लिंक टाकता येतील का?

सुरेख उपक्रम आहेत.

संयोजक, जरा कार्यक्रमाच्या तारखा वगैरे लिहा ना. मभागौदि कधी आहे, उपक्रम केव्हापासून ते केव्हा पर्यंत आहेत.... वगैरे. तारखांची अजिबातच नोंद नसणे खटकले.

उपक्रम छानच आहेत
मुळात संयोजक पुढे आले म्हणून उपक्रम सुरु आहे. याबद्दल आधी संयोजकांचे आभार

एरव्ही सुट्टी नाही म्हणून चाकरमानी मूळ गावी फारसा येऊ शकत नाही पण गणपती, होळी वगैरे खास दिवसांत मात्र काहीही करुन हजेरी लावतोच तसय आम्हा एरव्ही रोमात रहाणाऱ्या माबोकरांचं

असे उपक्रम आपसूक इथे ठाण मांडायला लावतातच

सूचनेनुसार लगेच बदल केल्याबद्दल धन्यवाद संयोजक. आता कसं गार गार वाटतंय.

>> "मराठी भाषा गौरव दिन २०२५" >> हे छान आहे परंतु शिर्षकात
मराठी भाषेची आवड, काळजी असली आणि बाकी थिल्लर गोष्टींचे लघुरूप करणेही खरेतर स्वीकारार्ह नक्कीच नसले तरी कमीतकमी उपक्रमांत तरी भाषेची अशी विटंबना होऊ नये एवढी अपेक्षा बाळगतो!
उदा: मभागौदि २०२५ शशक _XYZ