मभागौदि २०२५- उपक्रम - मराठी शाळा

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 15 February, 2025 - 05:49

मभागौदि २०२५- उपक्रम - मराठी शाळा

प्रत्येकाच्याच मनात आपल्या प्राथमिक - माध्यमिक शाळेला एक अन्योन्य स्थान असते.
शाळेतल्या बाई, मित्रमैत्रिणी, मधली सुट्टी, पोळीभाजीचा डबा, छोटी लुटुपुटीची भांडणं, दप्तर, पुस्तकं, गृहपाठ, प्रार्थना, खेळ, सगळं अगदी मनाच्या कोपर्‍यात लपून बसलेलं असतंच असतं. आठवण असते, अभिमान असतो!

विशेषत: ती मराठी शाळा असेल तर... वाटाणा फुटाणा शेंगदाणा पासून ते वेडात मराठे वीर दौडले सात, राकट देशा कणखर देशा, युगामागुनी चालली रे युगे ही, घाल घाल पिंगा वार्‍या, कोलंबसाचे गर्वगीत अशा अनेक कविता मनात रुंजी घालू लागतात.

आणि इतर विषयांपेक्षाही , आवडत्या मराठी विषयातले वाचलेले धडे, पाठ केलेल्या कविता, त्यांचे संदर्भासहित स्पष्टीकरण, चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा – म्हणी व वाक्प्रचार! सगळे सरसर मन:पटलावर उमटत जाते.

पण हल्ली मराठी शाळांची पार दुरवस्था झाली आहे.
रयाच गेली आहे अगदी! कुणी घालत नाही आपल्या मुलांना मराठी ’मिडीयम’ मधे. फक्त कॉर्पोरेशनच्या अथवा नगरपालिकेच्या प्राथमिक मराठी शाळा पहायला मिळतात.

आपल्याला इतकं शहाणं करुन सोडणार्‍या, आपले काही काळापुरते का होईना आनंदाचे निधान असलेल्या, प्रेम करणार्‍या, स्वप्नं पहायला शिकवणार्‍या या शाळेचे आपण उतराई व्हायला पाहिजे.

आजही महाराष्ट्रातील कानाकोपर्‍ यात अनेक चांगल्या नव्या जुन्या मराठी शाळा अतिशय चांगल्या प्रतीचे शिक्षण देत आहेत. काही प्रसिद्ध आहे, काही नाहीत.

भले आपल्याला आता आपल्या शाळेत जाणं जरी शक्य नसेल, तर जवळपासच्याच एखाद्या मराठी शाळेला तरी भेट देता येईल का? भेट नाही तरी माहिती तर काढता येईल?

या मभागौदि निमित्ताने आपली स्वत:ची नसू द्या, पण आपल्याला माहीत असलेल्या एखाद्या मराठी शाळेची माहिती लिहायची आहे. त्यायोगे ती शाळा जरा मायबोलीकरांच्या प्रतलावर येईल. तिची नव्याने ओळख होईल. मायमराठीचा गंध दरवळण्यास थोडा हातभार लागेल.

यात शाळेची सद्यस्थिती, जमल्यास मुख्याध्यापकांची अथवा एखाद्या शिक्षकांची मुलाखत, विद्यार्थी कोण आहेत, कोठून कुठून येतात, प्रवाहात टिकून राहण्यासाठी शाळेने कोणती पावले उचलली आहेत, मुलांना पुढे कुठे प्रवेश मिळतात, फी किती आहे ..अशा खूप गोष्टी आहेत जाणून घेण्याजोग्या !

मायबोलीकरांनो, तुम्हाला माहिती असलेल्या व अजूनही यशस्वीरीत्या चालू असलेल्या शाळांचा सर्वांना परिचय करून देऊ या.

हा उपक्रम आहे. स्पर्धा नाही

नियम -
१. 'मराठी भाषा गौरव दिन २०२५' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात लेखन करावे.
२. धाग्याचे नाव मभागौदि २०२५ मराठी शाळा - शाळेचे नाव व ठिकाण - मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक ) अशा प्रकारे द्यावे. शब्दखुणांमध्ये उपक्रमाचे नाव "मभागौदि मराठी शाळा" असे लिहावे तसेच शाळेचे ठिकाण, जिल्हा, वगैरे ही लिहावे जेणे करून भविष्यात कोणास गरज पडल्यास विशिष्ठ भागातील शाळांचा शोध घेता येईल.

3. एक सभासद एकापेक्षा अधिक प्रवेशिका देऊ शकतो.

४ . प्रवेशिका देण्याची अंतिम मुदत : अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पना उत्तम आहे..
साकार किती जण करतील याबाबत शंका आहे..
अर्थात तसे व्हावे हीच इच्छा आहे.

अरे वाह.. माझी मुलगी आहे पुण्यात मराठी शाळेत.
थोडा आधी आला असता धागा तर व्यवस्थित मुलाखत वगैरे घेता आली असती.
आता वेळेअभावी शक्य नाही.
जमेल तेवढी माहिती लिहायचा प्रयत्न करेन.