मेथ्यांच लोणचं

Submitted by मनीमोहोर on 2 February, 2025 - 04:58
Fenugreek pickle
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मेथी दाणे अर्धी वाटी
लोणच्याचा मसाला तीन चहाचे चमचे
मीठ एक चहाचा चमचा
थोडा हिंग
दोन लिंबाचा रस
नेहमीची फोडणी तीन चमचे.

क्रमवार पाककृती: 

मेथ्यांचं लोणचं

काही वर्षापूर्वी एका परिचितांकडे हे लोणचं खाल्ल होतं तेव्हापासून थंडीत दरवर्षी फक्त म्हणतच असे "करू या " असं. पण ह्या वर्षी मात्र खरचं केलं. फारच भारी लागतंय म्हणून इथे ही रेसिपी लिहीत आहे.

मेथ्या पाण्यात भिजत घाला. आठ ते दहा तासांनी चाळणीत उपसून ठेवा. पाणी निथळलं की मोड येण्यासाठी मेथ्या मलमलच्या फडक्यात बांधून ठेवा. दीड दिवसात त्यांना छान मोड येतात. हवामानानुसार ह्यात थोडा फरक पडू शकतो म्हणून मोड आलेत का ते चेक ही करत रहा.

मोड आलेल्या मेथ्या

20250202_094039.jpg

छान मोड आले की मेथ्या एका बोल मध्ये काढून घ्या. त्यात लोणच्याचा मसाला, मीठ, थोडा हिंग आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. चव बघून ऍडजस्ट करा . तीन चमचे तेलाची मोहरी हिंग, हळद घालून केलेली फोडणी गार करून लोणच्यावर घाला . नीट मिक्स करा . लोणचं खाण्यासाठी तयार आहे.

तयार लोणचं

20250202_144508.jpg

वाढणी/प्रमाण: 
लोणचं आहे ते...
अधिक टिपा: 

१) मेथ्या भिजून मोड आणले की दुप्पट होतात , त्यामुळे त्या नुसार भिजत घाला.
२) हे लोणचं फार टिकत नाही त्यामुळे एकदम खूप करू नका.
३) मेथीचा कडवट पणा अजिबात जाणवत नाही मोड आणल्यामुळे आणि मसाला लिंबू रस ह्यामुळे. एकदम टेस्टी लागतं. भाकरी बरोबर किंवा दही भातात घालून तर फारच छान लागतं.
४) आधीच मेथ्या त्यात त्या कच्च्या आणि मोड आलेल्या त्यामुळे पोषणमूल्ये तर विचारूच नका. Happy
५) मेथीचे लाडू, डाळ मेथ्या, मेथ्यांची खिचडी वगैरे करून ही आहारात मेथ्यांचा समावेश करू शकतो पण ह्याला लागणारे श्रम फारच कमी आहेत आणि एंड प्रॉडक्ट एकदमच टेस्टी ...

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! सोपी पाकृ.
मध्यंतरी माबोवर वाचून मोड आलेल्या मेथीची भाजी केलीय काहीवेळा हे आठवले.
लोणचे पण छानच लागत असेल.

मस्त दिसतंय लोणचं आणि खूप सोपे असल्याने करणार नक्की.. मला घरी केलेली लोणचीच आवडतात..
किती टिकेल फ्रिजमध्ये ठेवले तर त्यानुसार करायला कारण घरात लोणचं खाणारी मी एकटीच..
लोणचं मसाला ऑनलाइन घ्यावा लागेल कोणता चांगला आहे?

वावे, मानव, मृ.. धन्यवाद.

पाव वाटी घाल मेथ्या भिजत मृ एकटीच खाणार असलीस तर.. केप्र लोणचे मसाला छान आहे. बघ तिकडे मिळाला तर... उरलेला फ्रीज मध्ये ठेवून आंबा लोणचं वगैरे करायला वापरता येईल.
किंवा मसाला आणायचा नसेल तर तीन चमचे मोहरीची मिक्सर मध्ये पावडर कर त्यात हवं असेल तेवढं लाल भडक तिखट आणि थोडासा हिंग घातलास की घरच्या घरी मसाला तयार होईल. तोच वापर...

मानव एकदम टेस्टी लागत आणि कडू ही नाही लागत, नक्की बघा करून.

मेथीचा कडवट पणा अजिबात जाणवत नाही>> असं असेल तर थोडंसं नक्कीच करून बघेन कारण माझ्याशिवाय घरी लोणचं कोणी खात नाही.

छान रेसिपी. नक्की करेन.
लोणचं मसाला मी घरीच करत असते. दरवेळी मागच्या वेळी काय घातलं होतं हे विसरते त्यामुळे प्रत्येक वेळी वेगळ्या चवीच लोणचं मिळतं हा भाग वेगळा.

Happy मस्त रेसिपी ममो, करून बघेन. मी घरी लिंबाचे लोणचे नेहमी करते त्यात आवर्जून मेथ्या आणि मोहरीची पूड घालते. मेथ्यांची चव आवडते.

साधना, छल्ला, सायो, सिमरन, शर्मिला, मंजू, सामो अस्मिता धन्यवाद...
छल्ला, थोडासा गूळ चव बॅलन्स करेल. पुढच्या वेळेस घालीनच थोडा गूळ.
दरवेळी नव्या चवीचा मसाला... Happy ... माझं हे चहाच्या बाबतीत होतं. कायम वेगवेगळ्या चवीचा चहा होतो. Happy

व्वा! मस्तच आहे हे लोणचं.
सोप्पं आणि चटकदार. नक्की करून बघणार.
त्या दोन्ही प्लेट मस्त आहेत!

मस्त आहे रेसिपी . आजच WhatsApp वर ही रेसिपी फोटो आणि नावासकट फॉरवर्ड आली . नाव बघितले आणि माबो चेक केली .

मस्त बनलं लोणचं. मी गूळ घालून आणि गुळाशिवाय अशा दोन व्ह्रर्शन बनवल्या - मला बिनागुळाची जास्त आवडली. गूळ घातल्यावर मेथीचा किंचीत कडसरपणा ठार मेला त्यामुळे लोणच्याचा युएसपी गेल्यासारखा वाटला.

रेसिपीबद्दल धन्यवाद हेमाताई.

ऋतुराज , अश्विनी, प्रज्ञा, अमुपरी, हार्पेन, अनिंद्य, प्राजक्ता, माधव, स्वाती २ , किल्ली धन्यवाद

ऋतुराज, अनिंद्य , किल्ली प्लेट बोल आवडलं... थँक्यु...

गूळ घातल्यावर मेथीचा किंचीत कडसरपणा ठार मेला त्यामुळे लोणच्याचा युएसपी गेल्यासारखा वाटला. >> माधव धन्यवाद...
म्हणजे गुळ घालून बघायला नको आता Happy

स्वाती २, केलं का, आवडला का ?

हार्पेन बघितली ती ही रेसिपी. त्यात लिहिल्या प्रमाणे गरम फोडणी घालून करून बघणार आहे. कदाचित मेथ्या कूक थोड्या कूक होतील गरम तेलामुळे आणि चव बदलेल. असो.

आजच WhatsApp वर ही रेसिपी फोटो आणि नावासकट फॉरवर्ड आली >> नावा सकट आली म्हणून अधिक छान वाटलं. इथे सांगितलंस थँक्यु अश्विनी.

कारल्याच्या पात्तळ काचऱ्या थोडा वेळ मीठ लावून पाणी काढलं आणि sem ह्या पद्धतीने लोणचं केलं. हे पण एकदम मस्त लागत होतं कारल्याच्या काचऱ्या ताज्या कैरीसारख्या करकरीत लागत होत्या खाताना. करून बघा तुम्ही ही कधी तरी कारली आवडत असतील त्यांनी.