नवे वर्ष, नवे सदर

Submitted by ऋतुराज. on 20 January, 2025 - 12:22

२०२५ सालाचे स्वागत धडाक्यात झाले.
जानेवारी महिना तर आता संपत आलाय. या नवीन वर्षात अनेकांनी नवनवीन संकल्प केले असतील. त्या संकल्पाचा सिद्धीकडे प्रवास चालूदेखील झाला असेल. या संकल्पाइतकीच आणखी एका गोष्टीची उत्सुकता वाचनवेड्या लोकांना असते. वाचन संस्कृतीत पुस्तके जेवढी महत्त्वाची त्याहून अधिक महत्त्वाची म्हणजे वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके.
वर्तमानपत्रे तर आजूबाजूची किंबहुना जगभरातील चालू घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळण्याचे हमखास विश्वासू माध्यम. राजकारण, खेळ, समाजकारण, अर्थकारण हे मुख्य विषय असले तरी इतर अनेक विषयांवर देखील वृत्तपत्रात, मासिकात माहितीपूर्ण लेख, सदरे येत असतात. ही सदरे किंवा लेख आठवड्यात रोज किंवा ठराविक वारी येतात. आपल्याला माहिती असणाऱ्या वृत्तपत्र, साप्ताहिक, पाक्षिक, मासिकातील रोचक माहितीपूर्ण सदरांची ओळख करून देण्यासाठी हा धागा.
यात वृत्तपत्र, साप्ताहिक, पाक्षिक, मासिकाचे नाव, लेखाचे नाव, लेखक, लेखाबद्दल/ विषयाबद्दल थोडक्यात माहिती द्यावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकसत्ता
नवं कॅलेंडर- संदीप देशमुख
दर शनिवारी

दरवर्षी नेमाने आपण घरातल्या भिंतीवर महिना, वार यांची अचूक सांगड घालणारा तक्ता अर्थात नवं कॅलेंडर लावतो, पण तुम्हाला असा प्रश्न कधी पडला आहे का, की नवं वर्ष १ जानेवारीलाच का सुरू होतं ? वर्षाचे महिने १२ च का असतात?आठवड्याचे दिवस सातच का? वर्ष ३६५ दिवसांचंच का असतं ? किंवा १ जानेवारी १ या दिवशी अशी काय घटना घडली होती की ज्यामुळे त्या दिवसापासून ही कालगणना सुरू झाली ? शालिवाहन शक असतं तसं विक्रम संवतही असतं. या दोघांचा परस्परांशी आणि इंग्रजी कॅलेंडरशी काही संबंध आहे का? आणि असलाच, तर नेमका काय ?
याची साधी, सोपी हसत, खेळत माहिती देणारे सदर

लोकसत्ता
बारमाही - मुग्धा गोडबोले

शनिवारी (दर पंधरा दिवसांनी)
'रोजमर्रा की जिंदगी' मध्ये कुठे काही मजा असते ! पण तरीही तोच वाफाळलेला वरणभात तूपलिंबू 'कम्फर्ट फूड' म्हणून खातोच आपण. कारण रोजच्या गोष्टींमध्ये ऊब आहे, सवय आहे, शांतता आहे, ठहराव आहे आणि म्हटलं तर सौंदर्य सगळ्यातच आहे. अशाच बाराही महिने आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या, असणाऱ्या, अधूनमधून डोकं वर काढणाऱ्या गोष्टी, माणसं, परिस्थितीबद्दलचं आणि त्यातही तत्त्वज्ञान शोधणारं हे सदर.

लोकसत्ता
ध्वनिसौंदर्य - तृप्ती चावरे-तिजारे

शनिवारी (दर पंधरा दिवसांनी)
ध्वनी म्हणजे कानांनी ऐकू येणाऱ्या विशिष्ट लहरी किंवा कंपने. कान कर्णकर्कश गोंधळही ऐकतो आणि भान हरपून जावे असे सुस्वरही. मात्र आजकाल आपल्या कानांवर कलकलाटच जास्त ऐकू येतो. त्यातच भर पाडते विचारांच्या गुंत्याने होणाऱ्या मनाच्या कलकलाटाची. अशा वेळी गरज असते मनाला शांतवणाऱ्या ध्वनिसौंदर्याची. मनावर आणि पर्यायाने शरीरावर परिणाम करणाऱ्या या ध्वनींचे विविध पैलू मांडणारे हे सदर.

म टा
दर सोमवारी
सगुण निर्गुण

सकाळ, मैत्रीण पुरवणी

मुलांसोबत चालताना

दोन्ही चे लेखक राजीव तांबे

लोकसत्ताच्या शनिवारच्या चतुरंग पुरवणीत रत्ना पाठक-शाह यांचं संदूक नावाचं नवीन सदर सुरू झालंय या वर्षी.
दर पंधरा दिवसांनी असतं. छान आहे.

ऊब आणि उमेद - डॉ आनंद नाडकर्णी
लोकसत्ता- चतुरंग
शनिवारी (दर पंधरा दिवसांनी)
अडचणीच्या प्रसंगात आपल्याच लोकांकडून मिळालेली ऊब आणि उमेद आयुष्यभर लक्षात राहते. इतरांसोबत सतत वाहत्या राहणाऱ्या या प्रक्रियेच्या अनेक आशावादी पैलूंचे अनुभव सांगणारे सदर.

सकाळ मधे यावर्षी दोन सदरं आवडत आहेत.

डॉ. आशा मुंडे यांचं भाषेबद्द्लचं सदर -
https://www.esakal.com/saptarang/marathwada-dialect-a-language-yet-to-fl...
या सदरात वेगवेगळे खास शब्द उलगडून दाखवत आहेत.

ऋचा थत्ते यांचं सदर. हे पॉझिटिव्हिटी, मेंटल हेल्थ वगैरेशी रिलेटेड आहे -
https://www.esakal.com/saptarang/the-moral-story-of-a-servants-happiness...

अनुभव मासिकातली यंदाची इंटरेस्टिंग सदरं -

१. कानोसा एआय विश्वाचा : कृत्रिम बुद्धीमत्ता ही नक्की काय चीज आहे, हे साध्या सोप्या भाषेत, तांत्रिक माहितीशी परिचित नसणार्‍यांनाही समजेल अशा भाषेत वाचायला मिळेल. कृ.बु.चा इतिहास, आजच्या जगण्यात ही गोष्ट कुठे कुठे वापरली जाते, शिक्षण-संशोधन क्षेत्र, आरोग्य क्षेत्र आणि एआय, - अनेक पैलू विचारात घेऊन दर महिन्याला एक एक लेख असेल. या क्षेत्रातले काही जाणकार, तज्ज्ञ हे लेख लिहिणार आहेत.

२. यंत्रयुगाच्या सुरसकथा : पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून आजपर्यंत ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसंदर्भात कोणकोणती संशोधनं झाली, कसकसे बदल घडत गेले हे सांगणारं सदर.

३. स्क्रीन अधीन मेंदू बधीर : स्क्रीन अ‍ॅडिक्शन या मानसिक विकारावर फोकस असणारं सदर. गेमिंग, ऑनलाइन शॉपिंग, ओटीटी, सोशल मीडिया - असे स्क्रीन अ‍ॅडिक्शनचे विविध प्रकार हाताळले जाणार आहेत.

४. डोक्यावर पडलेल्या कथा : मेंदूत केमिकल लोच्या झालेल्या व्यक्तिरेखा केंद्रस्थानी असणार्‍या कथा.

५. बुकमार्क : अलीकडच्या इंग्रजी पुस्तकांवर आधारित शिफारसपर लेख.

रग आणि रंग - डॉ. नीलिमा गुंडी
सकाळ

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीविषयीचे औत्सुक्य वाढणे स्वाभाविकच. ते शमविणारे आणि या भाषेच्या सामर्थ्याची आणि सौंदर्याची ओळख करून देणारे साप्ताहिक सदर.

या लेखातील आवडलेल वाक्य:
मुळात भाषा ही आपल्या अस्तित्वाचा हुंकार आणि आपल्या समाजाचा अंतर्नाद आहे. म्हणूनच ते ध्वनी आपण कान देऊन ऐकत राहू या...

डोक्यावर पडलेल्या कथा : मेंदूत केमिकल लोच्या झालेल्या व्यक्तिरेखा केंद्रस्थानी असणार्‍या कथा.>>>>> रोचक वाटतंय.

सकाळ सप्तरंग मधे

कीर्तिदा फडके यांचं अन्नाविषयीचं सदर इंटरेस्टिंग वाटलं -
https://www.esakal.com/saptarang/transforming-flowers-into-gourmet-creat...

मिलिंद उमरे यांचं आदिम संस्कृती उलगडणारं सदर चांगलं वाटतंय -
https://www.esakal.com/saptarang/rich-tribal-culture-a-tapestry-of-tradi...

याव्यतिरिक्त हा एक लेख आवडला. या लेखकाचं सदर आहे की नाही माहिती नाही.
https://www.esakal.com/saptarang/harmony-of-lives-dancing-gods-musical-s...

धन्यवाद ललिता प्रिती, rmd
वृत्तपत्र, साप्ताहिक, पाक्षिक, मासिकातील आवडलेल्या लेखांसाठी वापरू शकतो हा धागा.