भारत का दिल देखो (पाककृती): लसणीच्या पातीच्या कढी-वड्या

Submitted by मनिम्याऊ on 12 January, 2025 - 09:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हिरव्या चटणीसाठी :
लसणाची पात : १ जुडी (बारीक चिरलेली)
ताजी कोथिंबीर : लसूणपातीच्या समप्रमाणात (बारीक चिरून)
हिरव्या मिरच्या : ४ तुकडे करून
आले : १ इंच
मीठ : चवीनुसार

वड्यांसाठी
नव्या तांदळाची पिठी : २ वाट्या
गव्हाची कणिक, ज्वारीचे पीठ, चण्याचे बेसन : प्रत्येकी अर्धी वाटी
जिरे, हळद, लाल तिखट, भाजलेले तीळ, ओवा, हिंग : प्रत्येकी १ लहान चमचा
मीठ चवीनुसार.

क्रमवार पाककृती: 

हिवाळा सुरु झाला पालेभाज्यांची रेलचेल असते. पूर्व विदर्भात लसणाची बऱ्याच मोठ्या प्रमाणात लागवड केलेली असते. साधारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात लसणाची पात दिसायला लागली कि भंडारा - गोंदिया जिल्ह्यांत आणि त्याला लागून असलेल्या बालाघाटमध्ये घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हणजे लसणाचे आक्षे. नुकताच हाती आलेला नवा तांदूळ आणि लसणाची पात वापरून केलेली हि धिरडी अप्रतिम चवीची असतात पण त्याबरोबरच केली जाणारी, जरा कमी प्रचलित अशी हि साइड डिश आहे.

प्रथम वड्यांसाठी म्हणून घेतलेली सगळी पीठे कोरडीच एका डब्यात मिक्स करून घ्यावीत. त्यात जिरे, हळद, लाल तिखट, भाजलेले तीळ, ओवा, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य कोरडेच एकजीव करून घ्यावे. आता डब्याला घट्ट झाकण लावून तो डबाच प्रेशर कुकरमध्ये ठेवून तीन शिट्या करून घ्याव्या. प्रेशर उतरून कूकर जरा थंड झाला कि डब्याचे झाकण उघडून आतले मिश्रण जरा हलवून मोकळे करून घ्यावे. हे पीठ चांगले २-३ महिने टिकते आणि हवे तेव्हा स्वयंपाकात बऱ्याच पदार्थांसाठी वापरल्या जाते.

हिरव्या चटणीसाठी घेतलेले सर्व साहित्य मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. वेळ आणि आवड असल्यास पाट्यावर वाटता येईल.
हि तयार झालेली हिरवी चटणी तयार केलेल्या पिठामध्ये एकजीव करून थोडे पाणी घालून व तेलाचं हात लावून चपात्यांसाठी पीठ मळतो तसे मळून घ्यावे. याचे ३-४ लांब लांब रोल करून घ्यावे.

एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवून हे रोल्स ३० मिनिटे वाफवून घ्यावे.
थंड झाल्यावर चकत्या कापून कमी तेलावर खरपूस शॅलो फ्राय करून घ्याव्या. (डीपफ्राय पण करता येतील). अप्रतिम चवीच्या लसणाच्या पातीच्या वड्या तयार आहेत.

वाढणी/प्रमाण: 
--
अधिक टिपा: 

आजकाल केचप सोबत खातात पण जुने लोक दह्याच्या आंबट कढीत ५ मिनिटे मुरवून मग खात असत. म्हणून कढी - वड्या असे पदार्थाचे नाव आहे .
kadhi.jpeg

माहितीचा स्रोत: 
झाडीपट्टी भागातली पारंपरिक पाककृती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

भारीच आहे!

पिठांच्या साठवणीची आयडियाही माहिती नव्हती.

Innovative रेसिपी.

लसूण नावडते म्हणून कांदा पातीचे करून बघता येईलसे वाटते.

तयार पीठ उरले तर वड्यांना कव्हर, पीठ पेरलेल्या भाज्या, मुठिया किंवा थालीपीठाला वापरता येईल. ?

आमच्याकडे पातीचा लसूण मिळण्याची बोंब-सहजा सहजी मिळत नाही. भाजीवाल्याला आधी सांगून ठेवले तर 'प्रयत्न करतो' असे सांगतो. भाव ही चढा असतो. विदर्भात हे सहज मिळते. तेथिल भाज्यांची चव (वांगे, गवार, कोथिंबिर - म्हणजेच तेथिल भाषेत सांबार) अप्रतीम असते.

>>>>>पीठ वाफवल्यामुळे भाजणीची चव येईल का>>>>

भाजणीसारखीच खमंग चव येते. सर्व पीठे एकसारख्या प्रमाणात होतात शिवाय आंच जास्त होऊन करपण्याची भीती नाही वर भाजण्याची मेहनत वाचते. फक्त डब्याचे झाकण मात्र घट्ट असावे.

Innovative रेसिपी.>>>>> धन्यवाद अनिंद्य

लसूण नावडते म्हणून कांदा पातीचे करून बघता येईलसे वाटते.>>>>> कांद्याची पात वापरून अजून वेगळा पदार्थ करतात.
त्याला 'कांदापातीचे लवट' असे नाव आहे. त्यात पीठे न वापरता भिजवलेली चणाडाळ वाटून त्यात बारीक चिरलेली कांदापात, मिरच्या, आलं-लसूण पेस्ट व जिरे कालवून लहान लहान गोळे करून वाफवले जाते. आणि मग ते वाफवलेले लवट झणझणीत लाल रश्यात घालून उकळी आणतात. या रश्य्यात भाकरीचा काला मोडून खाण्याची पद्धत आहे.

तयार पीठ उरले तर वड्यांना कव्हर, पीठ पेरलेल्या भाज्या, मुठिया किंवा थालीपीठाला वापरता येईल. ?>>>>>>नक्कीच. हे बेस पीठ आहे. याच्या चकल्या करतातच. शिवाय एक अनोखा 'चौसेला सोहारी' नावाचा छत्तीसगढ स्पेशल पदार्थ करतात. देऊ का रेसिपी??? 😉

… कांदापातीचे लवट… हे तिखट लाल चटणीसोबतही न्याहारी / मिनी मील म्हणून झक्कास लागेल, Zero oil recipe ! Thanks.

'चौसेला सोहारी' रेसिपी ..

नेकी और पूछ पूछ Happy

नेकी और पूछ पूछ >>>>>

१-२ दिवसात करते आणि येथे देते.

आमच्याकडे पातीचा लसूण मिळण्याची बोंब-सहजा सहजी मिळत नाही. भाजीवाल्याला आधी सांगून ठेवले तर 'प्रयत्न करतो' असे सांगतो.>>>> @यक्ष,.आपला हात जगन्नाथ. एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये लावा लसूण. आठवडाभरात छान उगवून येतो..

विदर्भात हे सहज मिळते. तेथिल भाज्यांची चव (वांगे, गवार, कोथिंबिर - म्हणजेच तेथिल भाषेत सांबार) अप्रतीम असते.>>>> धन्यवाद बरंका Happy

त्या वड्या आज लगेच करून पाहिल्या . संध्याकाळी खायला काहीतरी नवीन करायचे होते ते हे करून पाहिले.
लसूण पात नव्हती त्यामुळे लसूण बारीक ठेचून घातला.
शॅलो फ्राय केल्या. फार चविष्ठ आणि खुसखुशीत झाल्या आहेत. पुढच्या वेळेस लसूण पात आणून करून पाहीन.
पीठ कुकर मधून काढल्यावरच खमंग वास आला होता.
बाकी सगळ्या स्टेप सांगितल्या तशा केल्यात.
Thank you मनिम्याऊ

मस्त आहे रेसिपी. वर कुणीतरी म्हणालं आहेव पण तयार झालेलं पीठ हे भाजणी किंवा पीठ पेरुन भाज्यांना लावता येत असेलच.

@सावली, you are welcome.

>>>>कुणीतरी म्हणालं आहेव पण तयार झालेलं पीठ हे भाजणी किंवा पीठ पेरुन भाज्यांना लावता येत असेलच.>>>
@सायो, धन्यवाद. हो, हे पीठ बऱ्याच पदार्थांचे बेस आहे.
माझ्या upcoming रेसिपी 'चौसेला सोहारी' हा याच पिठापासून तयार केलेला पदार्थ असणार आहे. यातील चौसेला म्हणजेच ४ वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांचे मिश्रण.

मस्त आहे रेसिपी .नुसतच खायला पण छान आहे वडीसारखं स्टार्टर म्हणून वाफवून खाल्लं तर नो ऑइल रेसिपी होईल. लसूण पात मिळाली पाहिजे.
(आक्षे) धिरडी पण छान.

नाही गं. चाइव्ह वेगळे. त्याला कांदापातीची चव असते.>>> हो का? असेल तस, मला पण करुन बघाचचिय ही रेसिपी..
शोध घेते आता लसुण पातिचा..