महारोगी सेवा समितीतर्फे मदतीचे आवाहन

Submitted by चिनूक्स on 1 January, 2025 - 11:59

 प्रिय सुहृद,
सप्रेम नमस्कार
 
आपण संस्थेशी सद्भावना आणि कृतीशील सहकार्याच्या माध्यमातून निगडीत आहात.
 
बाबा आणि साधनाताईंनी बचतीचा व योग्य आर्थिक नियोजनाचा संस्कार संस्थेत रुजवला, त्यामुळे संस्थेचे सेवाकार्य गेली ७५ वर्षे सुरळीतपणे पार पडू शकले. परंतू, गत काही वर्षांत जगात ज्या काही नैसर्गिक, अनैसर्गिक आपत्ती ओढवल्या, त्यांचा बाह्य जगतावर जसा विपरीत परिणाम झाला तसाच तो “संस्थात्मक पातळीवर”ही झाला; तो असा: -

* संस्थेच्या ग्रामीण भागांतील प्रकल्पांत पुनर्वसित १५१७ कुष्ठमुक्त-दिव्यांग-निराधार वृद्ध-अनाथ-परित्यक्ता-मानसिकदृष्ट्या अपंग बांधव आणि त्यांची मुले, विशेष शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील निवासी ३०४ दिव्यांग विद्यार्थी-प्रशिक्षणार्थी यांचे रोजचे दोन वेळचे जेवण, चहा, न्याहारी, आरोग्यसेवा, निवाससुविधा, वीजबिल, कपडेलत्ते, शैक्षणिक मदत,  दैनंदिन दुरुस्ती, वाहतूक या ठळक आणि इतर अनेक बारीकसारीक गोष्टींचे नियोजन संस्थेमार्फत करण्यात येते. त्याचबरोबर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू अनिवासी विज्ञान, कला, वाणिज्य आणि कृषी महाविद्यालये, अनिवासी माध्यमिक शाळा, कृषी-तंत्र विद्यालय यांतील ३५६५ विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शैक्षणिक खर्चाचा मोठा भार संस्थेला उचलावा लागतो.
 
* उपरोक्त समाजोपयोगी उपक्रमांचे परिचालन(OPERATIONS) अविरत सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी रुपये २५ कोटी एवढ्या निधीची आवश्यकता असते. (संदर्भ: आर्थिक वर्ष २०२३-२४)
 
* परंतू, करोनोत्तर कालखंडात सतत वाढत चाललेला जीवनावश्यक वस्तूंचा महागाई दर, बँकांतील संस्थेच्या स्थायी ठेवींवर मिळणाऱ्या व्याजरूपी उत्पन्नात घटलेल्या व्याजदरांमुळे झालेली मोठी घट, स्वयंसेवी संस्थांच्या लघुउद्योगांच्या उत्पन्नावर मर्यादा आणणारे जाचक सरकारी नियम, कुष्ठरूग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी मिळणारे अत्यल्प शासकीय अनुदान, तसेच, दिव्यांग बांधवांच्या निवासी शिक्षण-प्रशिक्षणासाठी मिळणारे अत्यल्प वेतनेतर शासकीय अनुदान आणि सदर अनुदाने मिळण्यात होणारी कमालीची दिरंगाई, इत्यादी आवर्ती समस्यांमुळे खर्चाशी हातमिळवणी करणे जवळजवळ अशक्य झाले आहे.

* शिवाय, उपरोक्त शासकीय अनुदान, संस्थेने आधी पदरची रक्कम खर्च केल्यानंतर एकूण खर्चाच्या ८०% असे प्रतिपूर्ती (Reimbursement) स्वरूपात प्राप्त होते.
 
* संस्थेअंतर्गत येणाऱ्या अंध शाळा, मुकबधीर शाळा व संधीनिकेतन अपंगांची कर्मशाळा या तिन्ही निवासी विशेष शाळांना विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व इतर देखभाल खर्चासाठी मिळणारे शासकीय परिपोषण अनुदान-एकूण रक्कम रु. १,२२,४३,३०३ मागील ५ वर्षांपासून प्रलंबित आहे.
 
* कुष्ठरुग्णांच्या उपचार व पुनर्वसन कार्यासाठी मिळणारे शासकीय अनुदान-एकूण रक्कम रुपये २,४६,००,००० वर्षभरापासून थकीत आहे.

* जागतिक हवामान बदलामुळे गेल्या काही वर्षांतील पावसाची अनियमितता आणि नंतरचा अवकाळी पाऊस यांचा मोठा फटका संस्थेच्या शेती व शेतीपूरक उद्योगांमार्फत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाला बसला.
 
* ५०-६० वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या व आता जीर्ण आलेल्या घरांच्या, वसतीगृहांच्या व इतर पायाभूत सुविधांच्या अत्यावश्यक डागडूजी व दुरुस्तीसाठी प्रचंड मोठा निधी संस्थेला “अंतर्गत स्त्रोतांतून” खर्च करावा लागला.
 
* यांमुळे गेल्या ३ आर्थिक वर्षांत संस्थेच्या ग्रामीण भागांतील प्रकल्पांना प्रतिवर्ष सरासरी रुपये ५.५० कोटी प्रमाणे रुपये १६.५० कोटींची प्रचंड आर्थिक तूट सोसावी लागली.
 
* “म्हणजेच, संस्थेने आजवर थेंबे-थेंबे पदरी साठवलेली रुपये १६.५० कोटींची रक्कम संपूर्णतः खर्ची पडली असून आता शिल्लकी जमा काहीही नाही!” (संदर्भ: आर्थिक वर्ष २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४)
 
संस्थेचे मानवाधिकाराचे कार्य अखंडित सुरू ठेवण्यासाठी अपुऱ्या निधीची ही सततची टांगती तलवार कायमस्वरूपी दूर होणे अनिवार्य आहे. यासाठी, समाजातील उपेक्षित घटकांसाठी सहवेदना जपणाऱ्या आणि आपल्यातील कृतीशील आत्मीयतेचा दिवा सतत तेवत ठेवणाऱ्या जागरूक समाजबांधवांचा सक्रीय सहभाग अत्यंत निकडीचा आहे.
 
३३ लक्ष उपेक्षित बांधवांना स्पर्शणारी संस्थेच्या सेवाकार्याची ही ७५ वर्षांची विलक्षण वाटचाल आपण आणि आपणासारख्या लाखो सुजनांच्या कृतीशील पाठिंब्यामुळेच शक्य झाली आहे. तेव्हा, सद्य आर्थिक आपदेवर मात करण्यासाठी आपापल्या स्तरावर समाजातून तातडीची मदत उभी करण्याचे कळकळीचे आवाहन आम्ही करत आहोत.
 
आर्थिक सहकार्य खालील पर्यायांद्वारे उभे करता येऊ शकेल -

* रू. ९००० एवढे योगदान देऊन एका कुष्ठमुक्त/ दिव्यांग/ निराधार वृद्ध/ अनाथ/ परित्यक्ता/ मानसिकदृष्ट्या अपंग बांधवाचा/ भगिनीचा, आरोग्यसेवा, भोजन, निवास, कपडेलत्ते, इतर दैनंदिन गरजा आणि कौशल्य विकासातून आर्थिक पुनर्वसनाचा १ महिन्याचा खर्च उचलला जाऊ शकतो.

* रू. ७५०० एवढे योगदान देऊन संस्थेच्या प्रकल्पांत निवासी दिव्यांग बांधवांच्या एका शिशूचा/ शालेय/ महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका मुलाचा/ मुलीचा, शिक्षण, आरोग्यसेवा, भोजन, निवास, कपडेलत्ते, इतर दैनंदिन गरजांचा १ महिन्याचा खर्च उचलला जाऊ शकतो.
 
* रू. ७२०० एवढे योगदान विशेष शिक्षण/ व्यावसायिक प्रशिक्षणासाठी संस्थेच्या प्रकल्पांत निवासी एका अंध/ कर्णबधीर/ शारीरिकदृष्ट्या विकलांग विद्यार्थी/ विद्यार्थिनी/ प्रशिक्षणार्थीच्या, शिक्षण, आरोग्यसेवा, भोजन, निवास, कपडेलत्ते, इतर दैनंदिन गरजांच्या १ महिन्याच्या खर्चाला हातभार लावू शकते.
 
* रू. ५२५० एवढे योगदान देऊन संस्थेच्या प्रकल्पांत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू विना-अनुदानीत अनिवासी माध्यमिक विद्यालय आणि कृषी-तंत्र विद्यालयातील एका विद्यार्थी/ विद्यार्थिनीच्या शिक्षणाच्या १ महिन्याचा खर्चाला हातभार लागू शकतो.
 
* रू. १८०० एवढे योगदान देऊन संस्थेच्या प्रकल्पांत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू वेतानानुदानीत अनिवासी विज्ञान, कला, वाणिज्य आणि कृषी महाविद्यालयांतील एका विद्यार्थी/ विद्यार्थिनीच्या शिक्षणाच्या १ महिन्याचा खर्चाला हातभार लागू शकतो.
 
हे आवाहन आपण आपले नातेवाईक, सहकारी, मित्रमंडळी, सामाजिक उत्तरदायीत्त्वांतर्गत स्वयंसेवी संस्थांना मदत करणाऱ्या कंपनीज आदींपर्यंत पोहोचवावे, ही नम्र विनंती.

नूतन वर्ष २०२५ च्या हार्दिक शुभेच्छांसह….

सस्नेह,
 
कौस्तुभ विकास आमटे
विश्वस्त
महारोगी सेवा समिती, वरोरा
 
संपर्क: ९९२२५५०००६

ई-मेल: kaustubh.amte@maharogisewasamiti.org

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users