रोमहर्षक जीवन भाग - ३

Submitted by अविनाश जोशी on 29 August, 2024 - 01:26

रोमहर्षक जीवन भाग - ३
मी लिहीत असलेले सर्व अनुभव माझ्या जीवनात प्रत्यक्ष घडलेले आहेत. अशाच या ना त्या कारणाने माझे अकरा पैकी तीन पासपोर्ट बाहेरच्या देशातच झाले आहेत.
अर्थात बरेसे प्रसंग आपातकालीन असले तरी दोन ऐतिहासिक प्रसंग मी अनुभवले आहेत. पहिला म्हणजे, जुलै १९८१ मध्ये शेवटच्या आठवड्यात झालेले डायना आणि चार्ल्स यांचे लग्न. तो संपूर्ण आठवडा मी लंडन मध्ये होतॊ आणि ब्रिटिशांचा संयमी उत्साह पाहून आश्चर्य वाटत होते. प्रत्यक्ष लग्नाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला नव्हते पण ब्रिटिश माणूस राजघराण्यातील लग्न म्हटल्यावर कसा उत्साहित होतो हे मी अनुभवले आहे.
दुसरा प्रसंग म्हणजे, ४५ वर्षे पोलादी भिंत म्हणून गणली गेलेली बर्लिन वॉल पाडली गेली त्या दिवशी मी जर्मनीत म्युनिक जवळच होतो. जर्मन लोकांच्या बेफाट जल्लोषपूढे आपल्या गणेश उत्सवाची मिरवणूक हि फिकी पडावी . भरपूर गर्दी रस्त्यातच नाचत , गात , बिअर पीत होती आणि कोणाही माणसाची गळा भेट घेत होती. युरोपियन हे ब्रिटिशनसारखे नाहीत. त्याच्या जल्लोषाला कधीही उधाण येते.
इराण मध्ये सत्ता क्रांती झाल्यावर लहान मोठे प्रश्न उद्भवत होते. अशाच एका तेहेरान च्या भेटीत मला तातडीने इराण सोडने भाग पडले. त्यावेळे फक्त ब्रिटिश एअरवेची विमान सेवा तेहेरान वरून चालू होती. उड्डाणाच्या अगोदर ७ तास पोहचावे असा निरोप आला होता. त्याप्रमाणे तेहरान एअरपोर्ट वर गेलो त्यावेळी तेथे इमिग्रेशन मधून बाहेर जाताना एक्सिट व्हिसा स्टॅम्प व्हायचा. एरपोर्टवर सर्वच अंधाधुंद होती. आम्ही उड्डाणाचे २०-२५ प्रवासी लॉन्ज मध्ये जमलो. उड्डाण लंडन - तेहेरान - मुंबई असे होते. वेळेच्या ४-५ तास अगोदर पायलट संपावर गेल्याने विमान येणार नसल्याचे ब्रिटिश ऐअरवे ने जाहीर केले . त्याचप्रमाणे पुढील व्यवस्था होईपर्यंत प्रवाशांची व्यवस्था हॉटेल मध्ये करण्याचे त्यांनी जाहीर केले. आणि मग खरा प्रॉब्लेम सुरु झाला. एक्सिट व्हिसा मिळाल्यावर कोणीही परत आत प्रवेश करू शकणार नाही असे जाहीर केले गेले. एअरवे च्या बऱ्याच विनंत्या करून काहीही झाले नाही उलट लॉन्ज भोवती कोणीही पळून जाऊ नये म्हणून सशस्त्र गार्ड उभे केले होते. त्यानंतर जवळ जवळ ४८ तास लॉन्ज मध्येच आमचे निवास होते. विमान कंपनीने प्रत्येकाला गाड्या-गिरद्या , साबण, टॉवेल्स, टूथपेस्ट- टूथब्रश असे सर्व साहित्य पुरविले. लॉन्ज मध्ये बुफे सतत चालू असायचा. अखेर जवळ जवळ ४८ तासांनी ब्रिटिश एअरवे नी एका खाजगी छोट्या विमानाने आम्हाला सर्वाना लंडन ला नेले आणि तेथून प्रत्येक प्रवाशाला स्वस्थानी पाठवले. या प्रसंगात एक धडा मात्र घेतला कि केबिन बॅगेज मध्ये २-३ दिवस जाऊ शकतील एवढे साहित्य ठेवायचेच.
एकदा मला व्हिएन्ना वरून झुरिक मार्गे मुंबईला पोहचायचे होते. व्हिएन्ना- झुरिक कन्फर्म झाले होते पण काही केल्या झुरिक-मुंबई कन्फर्म होत नव्हते. विमानांना अतिशय गर्दी असल्यामुळे आणि वाईट हवामानामुळे बरीच उड्डाणे रद्द होत असल्यामुळे फ्लाइट ओव्हरबुक होती. फ्लाइट मिळेपर्यंत ५-६ दिवस थांबणे केवळ अशक्य होते. व्हिएन्ना वरून उड्डाण करताना मी माझी अडचण तेथील बाईना सांगितली. तिने मला सांगितले, हे विमान पोहचल्यावर पुढचे विमान ६ तासांनी आहे. तू ४ तास अगोदर विंडोजवळ जा तेथे अमुक नावाची एक स्त्री येईल तिला माझे नाव सांगून काही होत असेल तर बघ. दिवसभर केव्हांही चेक इन होत असल्याने किंवा काही रेल्वे स्टेशन वर चेक इन होत असल्यामुळे उड्डाणाच्या ४ तास अगोदर कोणीच नसायचे. तेथे त्या कर्मचारी आल्या त्यांना मी परिस्थिती समजावून सांगितली त्यांचे पालुपद चालूच होते ' I am sorry Mr. Joshi ,but flights are overbooked. Actually we don’t know how to accommodate confirmed passengers. काही क्षण विचार करून मी म्हणालो Madam, I know there are at least 8 vacant seats on the aircraft तिने चमकून माझ्याकडे बघितले आणि म्हणाली Is that so ? which are those seats? मी अत्यंत निरागस चेहऱ्याने उत्तरलो . टॉयलेट सीट्स. ते उत्तर ऐकून ती जोर जोरात हसायला लागली आणि हसता हसता मला म्हणाली is that so urgent ? तिने माझ्याकडून तिकीट घेतले आणि मला म्हणाली फ्लाइटच्या वेळेला इथे भरपूर गर्दी असेल फ्लाइट सुटायच्या अगोदर तू इथे ये, तोपर्यंत तुझे थोबाड कोणालाही इथे दाखवू नकोस. मी आपला शांतपणे लॉन्ज बार मध्ये जाऊन खात-पीत बसलो. १० मिनिटे अगोदर पोहचलो तेव्हा तेथे बरीच रांग होती पण मी बाजूलाच उभा राहिलो. तिने मला पाहिले पण ओळख नसल्यासारखेच दाखवत तिने तिकीटासकट हात उंचचवला आणि म्हणाली Mr. Joshi ! Mr. Joshi ! your ticket has come, come immediately. मी माझी ओळख दाखवताच तिने मला तिकीट आणि बोर्डिंग पास दिला. आणि मी आनंदाने विमानात बसलो. पण येथूनच एका भीषण नाट्याची सुरवात होणार होती.
स्विस एअर विमाने मिनिटावर चालतात. विमानाच्या बाहेर वादळी वारे , विजांचा लखलखाट असे वातावरण होते. वेळेनंतर १५ मिनिटांनी पायलट ने घोषणा केली कि विमानतळ आल्प्स पर्वतराजी मध्ये असल्यामुळे आणि अत्यंत वाईट हवामानामुळे विमानतळावरील सर्व लँडिंग आणि टेक ऑफ स्थगित झाले आहेत. त्यामुळे आपल्याला वाट पहावी लागेल. अखेर ४५ मिनिटांनी त्याने घोषित केले फक्त स्विस एअर विमानांना उड्डाणाची परवानगी मिळाली आहे. विमानात लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि विमान अखेरचे उडाले. टर्ब्युलन्स प्रचंड होता स्टाफसहित सर्वानी सीट वर बसून पट्टे आवळे होते. बाहेर प्रचंड वादळ चालूच होते. विमान १००० फुटावर आल्यावर एक प्रचंड विजेच्या लोळाने विमाच्या उजव्या पंखावर आघात केला. विमान हेलकांडत गेले. सर्व विजेवर चालणाऱ्या सिस्टिम बंद झाल्या . विमान दिशाहीन असल्यासारखे भरकटत होते. खिडकीतून बाहेर निसर्गाचे रौद्र रूप पाहावयास मिळत होते. विजेचा चमचमाट आणि थयथयाट चालूच होता. सर्व प्रवासी बहुतेक भीतीने गप्प बसले होते. मी मनात म्हणालो ' एवढे खटपटी करून सीट मिळवली आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला'. अर्थात मृत्यूचे भय नव्हतेच कारण एकदा विमानात चढल्यावर कुठल्याही प्रसंगात आपण काहीही करू शकत नाही असे मनात ठसले होते.
१५ मिनिटे विलक्षण शांततेत गेल्यावर विमान स्थिर झाले, दिवे लावले गेले आणि हवाई सुंदऱ्यांनी सर्व प्रवाशांना ड्रिंक देण्यास सुरवात केली. थोड्याच वेळात विमानातील लोकं गप्पा मारू लागली आणि चिअर करत पिऊही लागली. त्या दिवशी विमानांनी दुबईला टेक्निकल हॉल्ट घेतला. उजव्या पंखाचा १२-१४ फूट व्यासाचा भाग काळा ठिक्कर पडला होता. तेथे कसून तपासणी झाली, तेव्हा स्टाफ ने बोलताना सांगितले आपण केवळ देवाच्या कृपेमुळे वाचलो आहे जर कोठेही अजून थोडा आघात झाला असता तर विमानाचा स्फोट व्हायला वेळ लागला नसता. बहुतेक विमान रचनेत विमानाच्या पंखांमध्ये फ्युएल टॅंक असतात. नशिबाने कुठल्याही इंजिनला किंवा इलेक्ट्रिकल सिस्टिम्स मध्ये विजेमुळे बिघाड झाला नाही आणि त्यामुळेच विमान वाचले आहे. शेवटी मारायला सुद्धा योग लागतो हेच खरे. …... अपूर्ण

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< टर्ब्युलन्स प्रचंड होता स्टाफसहित सर्वानी सीट वर बसून पट्टे आवळे होते. बाहेर प्रचंड वादळ चालूच होते. >>
अश्या परिस्थितीत वैमानिकाने प्रवाशांचा जीव धोक्यात घालून विमानाचे उड्डाण करायला नको होते. माझ्या मते आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट इतकी महत्त्वाची नाही की स्वतःचा जीव धोक्यात घालणे महत्त्वाचे ठरावे. विमान अपघात झाला तर जीव वाचण्याची शक्यता जवळजवळ शून्य, म्हणूनच Miracle on the Hudson सारखे प्रसंग खरोखर अद्भुत ठरतात.