हतबल

Submitted by pratidnya on 26 August, 2024 - 09:02

नोकरी लागून कंपनीच्या लीज अकोमोडेशन मध्ये राहायला जाईपर्यंत म्हणजे वयाच्या विशीपर्यंत मी भांडुपच्या चाळीमध्ये राहत होते. डोंगरावर बांधलेल्या ह्या बैठ्या चाळी. बरीचशी वस्ती ही कोकणातून आलेल्या चाकरमानी कामगारांची. आम्ही राहायचो तो भाग मुंबईत बऱ्याच ठिकाणी असणाऱ्या बकाल वस्त्यांपेक्षा त्यातल्या त्यात सुरक्षित असावा. नाही म्हणायला काही गुंड दादा लोक असायचे तिथे. त्यांच्या तलवारीने काठीने मारामाऱ्या व्हायच्या. पण त्या त्यांच्या टोळींमध्ये. त्याचा आम्हाला काही त्रास नव्हता.

मला किंवा माझ्या आईला तिथे काही फारशा मैत्रिणी नव्हत्या. आईची एक आत्येबहीण भांडुपमधल्याच थोड्या लांब एका डोंगरावर असणाऱ्या चाळीमध्ये राहायची. ही माझी बेबी मावशी. आईची बालमैत्रीण. ती महिन्यातून एकदा तिच्या मुलांसोबत आमच्याकडे यायची. तिचा मोठा मुलगा नागेश माझ्याच वयाचा. धाकटा माझ्या बहिणीच्या वयाचा. या सगळ्यांशी आमचे खूप छान जमत असल्याने मावशी आली की आम्ही खुश असायचो. एकदा तिसरीत का चौथीत होते आणि तेव्हा नागेश त्याच्या आईसोबत आला. आम्ही नेहमीप्रमाणे खेळत होतो. खेळता खेळता नागेश म्हणाला की त्यांच्या घराजवळ राहणाऱया एका गुंडाने एका पाच सहा वर्षांच्या लहान मुलीला डांबून ठेवले आहे. हे ऐकूनच एवढा थरकाप झाला आणि मी याबद्दल मावशीला विचारले. त्यावर तिने मान डोलावली पण हा माणूस अतिशय खतरनाक असल्याने चाळीतले लोक त्याबद्दल काहीच करत नाहीत व त्यांना या फंदात पडायचे नाही आहे असे सांगितले.
त्या माणसाने डॉक्टर आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण कार्यक्रमानिमित्त चैत्य भूमीवर गर्दी जमते. त्या गर्दीतून या छकुलीला उचलून आणले होते. त्यावेळी लहान वय असल्याने त्या मुलीसोबत काय अत्याचार होत असतील याची अजिबात कल्पना नव्हती तरीही ही गोष्ट ऐकून मी थरथरायला लागले होते. मावशीला पुन्हा विचारले की तुम्ही पोलीसात जाऊ शकत नाही का. तर ती म्हणाली की त्याला कळले तर तो सुरा घेऊन सगळ्या चाळीतल्या लोकांवर धावून येईल. त्यामुळे कुणी या भानगडीत पडत नाही.
मावशीने पुढे सांगितले की सकाळी ती मुलगी सरपटत सरपटत पत्र्याच्या त्या झोपडीतून बाहेर येत असे. माझ्या मावशीचा धाकटा मुलगा त्याच्या आईकडे डोळ्यातून पाणी आणून बटर चहा मागत असे व त्या मुलीला खायला देत असे.
काही महिन्यांनी मी पुन्हा मावशीला त्या मुलीचे काय झाले असं विचारले. त्यावर तिने सांगितलं की नंतर काही दिवसाने त्या गुंडाने कंटाळा आल्यावर त्या मुलीला मुंबईतच रस्त्यात कुठेतरी सोडून दिले.
आजही बऱ्याच वर्षांनी त्या न पाहिलेल्या छकुलीची आठवण येते. थोडे अजून मोठे असतो तर काहीतरी करून पोलिसांकडे जाऊन त्या मुलीला वाचवू शकलो असतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजाणत्या वयात पाहिलेल्या, तेंव्हा न कळलेल्या गोष्टी पुढे आयुष्यभर डाचत रहातात.
माझ्या न कळत्या वयात एका नराधमानं त्यानं केलेल्या अत्याचाराचं वर्णन मला सांगितलं. ते काही तरी आक्रीत आहे एवढंच तेंव्हा जाणवलं होतं हे नक्की. कारण ते लक्षात राहिलं. तो बलात्कार आहे, हे समजायला मात्र मला आणखी आठ-दहा वर्षं लागली. आजही हा इसम कुठे असतो हे मला माहिती आहे. पण करणार काय?

>>>>>.तेंव्हा जाणवलं होतं हे नक्की.
बर्‍याच कारणांनी लहानपण फार व्हल्नरेबल काळ असतो. या काळात मला स्वतःला पेडोफाईल माणसे ओळखू येत (२ दा -३ दा) पण काय करायचं असतं ते कळत नसे. सुदैवाने मी कधी तावडीत सापडले नाही. दे आर लिटरली प्रिडेटर्स. तशीच देहबोली, नजर असते त्यांची.