रामायण - एक राजकीय प्रवास – भाग ५ अंतिम भाग

Submitted by अविनाश जोशी on 24 August, 2024 - 01:22

रामायण - एक राजकीय प्रवास – भाग ५ अंतिम भाग
नेहमी प्रगत शस्त्र-अस्त्रांने समृद्ध असलेली प्रगत संस्कृती मूळ प्रदेशातील अप्रगत लोकांकरिता मारक ठरली आहे. रोमन लोकांनी केलेले ज्यूवरचे हल्ले, अमेरिकेत झालेले रेड इंडियन वरचे हल्ले किंवा दक्षिण अमेरिकेत स्पॅनिश लोकांनी नष्ट केलेल्या, माया आणि इतर संस्कृती. ऑस्ट्रेलियातही तेच घडले आहे आणि भारतातला उत्तर -दक्षिण वाद तर कित्येक सहस्त्रके चालूच आहे. आर्यावर्तात अयोध्या , मैथिली, मगध , महिष्मती अशी बरीच आर्य राष्ट्र होती. हिमालय आणि हिमालयाच्या उत्तरेस देवलोक होते असे मानले जायचे. देवांचा मुख्य इंद्र म्हणून समाजाला जायचा तर त्याच्या तीन लोकपालाना यम , वरुण आणि कुबेर असे संबोधले गेले. इंद्रलोक किंवा स्वर्ग तिबेटच्या आसपास असावा. कुबेराचे जन्मस्थान अलकनंदा हे हिमालयातील मानले गेले आहे तर वरुण हा रशियन पर्वतराजीत असावा असे मानले गेले आहे. यमलोक मात्र फिनलंड च्या उत्तरेस कुठेतरी असावा . ब्रह्मलोक हा हिमालयात असावा तर श्रीशिवशंकराकरिता कैलास व मानस सरोवर प्रसिद्ध आहे. विष्णूचे स्थान मात्र क्षीरसागर मानले गेले आहे आणि तो कदाचित पॅसिफिक महासागर असावा असे काहींचे मत आहे.

रावणाने लंका जिंकून राज्य सुरु केल्यावर पश्चिम किनारपट्टीवरचे बलाढ्य असुर राष्ट्राबरोबरच रावणासारखा कुशल प्रशासक श्रीलंकेत तयार झाला. रावणाने दूरदृष्टीने किष्किंधामध्ये वाली बरोबर मैत्री केली आणि दूरदृष्टी ठेऊन स्वतःचे , भावांची आणि बहिणीची लग्ने राजकीय हेतूने केली. त्यामुळे गंधर्व , किन्नर , मयासूर अशी अनेक कुटुंबे लंकेबरोबर जोडली गेली. पुढे त्याने आपला मुलगा मेघनाद याचे लग्न सुद्धा शेषनागाच्या मुलीशी केले. अशा रीतीने तो आपले बळ वाढवतच होता त्या सुमारास त्याने कुबेरावर स्वारी करून त्याची सर्व संपत्ती आणि पुष्पक विमान हिरावून घेतले, सूडा पोटी त्याने अत्याचारही केले. हा हल्ला करताना समुद्रातून आणि गंगेतून गलबते सैनिकांसह नेऊन त्याने हिमालयातील अलकनंदावर हल्ला केला. कुबेराचा पराभव केल्यावर काही दिवसातच त्याने शनीला पकडून कारागृहात टाकले. त्यानंतर त्याने यमराज्यावर स्वारी करून यमराज्यही जिंकून घेतले. वरुण राज्य ही जिंकून घेतले. यमलोक आणि वरुणावरील हल्ले पुष्पक विमानातून काही ठराविक योध्यासह केले गेले अशा रीतीने इंद्राचे तीन महत्वाचे खांब त्याने पाडून टाकले. त्याचवेळेस त्याने दंडक अरण्यात शूर्पणखेला पाठवून, खर - दूषण सारखे सेनापती आणि चौदा हजार सैन्य दिले. दंडक अरण्यातील राक्षस सेना आणि असुर साम्राज्याचा वाढता प्रभाव यामुळे आर्यावर्तातील छोटे राजेही रावणाचे स्वामित्व मान्य करू लागले. त्यातच लुटले असंख्य सोने, व्यापारातून मिळेलही संपत्ती , पश्चिम किनाऱ्यावरील संपत्ती अशी असंख्य संपत्ती गोळा करून मयासुराने त्रिकोट पर्वताच्या परिसरात रावणाची सुवर्ण नगरी स्थापन केली. त्या नगरीला बांधण्यासाठी सोन्याचा वापर केला गेला. सोने , शिसवी आणि सागवानाचे लाकूड त्याशिवाय दुसरा कुठलाही धातू वापरायला बंदी घातली गेली होती. नगरीस सोने कमी पडत आहे असे दिसल्यावर रावणाने वालीच्या राज्यात नदीच्या खोऱ्यातून भरपूर सोने गोळा केले. वाढत्या बलाचा वापर करून रावणाने लाखो राक्षस सैनिकांसह देवलोकावर स्वारी केली. रावणाचा पुत्र मेघनाद याने इंद्राचा पराभवकरून त्याला लंकेत कारावासात टाकले. त्यातूनच रावणाने वैदिक संहिता कालबाह्य ठरविली . स्वतःची संहिता निर्माण केली. रावणाचा वाढणारा आर्थिक सैनिकी आणि संस्कृतिक प्रभावामुळे सर्व ऋषी मुनींना चिंता वाटू लागली. अथक संशोधनानंतर अतिसंहारक शस्त्राची निर्मिती केली (Mass Destruction Weapons ) हे प्रगत तंत्रज्ञान वापराकरिता राम - लक्ष्मणांना वनवासाच्या बारा वर्षात तरबेज केले गेले. एवढी तयारी झाल्यावर वनवासाच्या तेराव्या वर्षी राम,लक्ष्मण, सीता दंडक अरण्यात आले. त्या सुमारास दंडक अरण्यात रावणाचा सैनिकी तळ असलेल्या भागात बहीण शूर्पणखा आणि सेनापती खर आणि दूषण राहत होते. यात खर आणि दूषण सेनापती होते तर शूर्पणखेच्या नवऱ्याला रावणाने मारल्याने शूर्पणखा दंडक अरण्यात येऊन राहिली होती. राम - लक्ष्मणालाही संहारक शास्त्रांचा प्रयोग करायचाच होता. शूर्पणखेचे राम - लक्ष्मणाकडे येणे तिचे नाक आणि कान कापले जाणे आणि त्यानंतरच्या युद्धात रामाने संहारक शस्त्र अस्त्रांचा उपयोग करून खर-दूषण आणि त्याच्या बरोबरच्या चौदा हजार सैनिकांचा रामाने काही क्षणातच फडशा पाडला. संहारक शक्ती एवढी मोठी होती की खर-दुषणाची प्रेते ओळखणे सुद्धा अवघड झाले होते. रामाने नंतर वाट पाहायची ठरवले कारण श्रीलंकेवरून मोठे सैन्य यायला किमान एक महिनातरी लागला असता. त्यातून पुष्पक विमानातून थोड्या लोकांसहित रावण निश्चितच आला नसता . कारण त्याला तोपर्यंत संहारक शस्त्रांची धास्ती वाटू लागली होती. काहीही करून रामाला लंकेतच लढायला लावायचे निश्चित होते. कारण एक तर लंका नगरी अशा संहारक शस्त्रांना अभ्येद्य होती. काही असुरवीरांकडे काही संहारक शक्ती होत्या. त्यामुळे सीतेला पळवून आणण्याचे नियोजन केले गेले. राम सीते पाठोपाठ लंकेत येईल अशी त्याची खात्री होती आणि जर तो न येताच अयोध्येला परत गेलाच तरी रावणाचे काहीही बिघडले नसते.

नियोजनाप्रमाणे सीतेचे हरण करून रावण लंकेला गेला. रामाला पूर्व कल्पना असल्याने त्याने खऱ्या सीतेला अग्नीच्या स्वाधीन करून सीतेची छायाकृती आश्रमात ठेवली होती. रामायणात काही रामायणातील काही गोष्टींचा उल्लख येथे आवश्यक आहे. पहिली म्हणजे वाल्मिकी रामायणात लक्ष्मण रेषेचा उल्लेख नाही. काही रामायणातून सीता लहानपणी शिव धनुष्याचा घोडा करून खेळत होती. पुढे रावणाने शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न केल्यावर ते त्याच्याच अंगावर पडले होते आणि सीतेने एका हाताने ते सहज बाजूला काढले होते. अशा सीतेला रावणाने उचलून न्यायचा घाट घातला असता तर सीतेच्या एका थापडीने तो लंकेत जाऊन पडला असता.
राम-लक्ष्मण रानावनातून दक्षिण दिशेला निघाले तरी त्यांचा रोख किष्किंधा नगरीकडेच होता. राम आणि लक्ष्मणाला असंख्य सेनेची जरूर होती. राक्षस सेनेच्या असंख्य सेनेमुळे आणि त्यातील असंख्य वीरांमुळे त्या दोघांना लढणे अशक्य होते.

आता रूपक कथेप्रमाणे राम झाडांना मिठ्या मारत होता. खऱ्या अर्थाने राम आणि लक्ष्मण हे असंख्य आदिवासी टोळ्यांना रावणाच्या विरोधात एकत्र करत होती. या काळात त्या लोकांची आर्थिक जबाबदारी आर्यावर्तातून घेतली जात होती. खरा प्रश्न होता वानर सेनेचा. वाली रावणाचा परम मित्र असल्याने वानर सेना राम-लक्ष्मणाच्या विरोधात उभी राहिली असती. काही कारणामुळे वालीचा आपला भाऊ सुग्रीव याच्याशी बेबनाव झाला आणि त्याने सुग्रीव , हनुमान , जांबुवंत, नील आणि इतर चार योध्यांना राज्याबाहेर हाकलून दिले. ही संधी राम -लक्ष्मणाला मिळाली. रामाने झाडाआडून बाण सोडून वालीचा वध केला आणि सुग्रीवाला वाली-पुत्र अंगद याला राज्य देण्यास सांगितले. राम - लक्ष्मणाने किष्किंधा नगरीत पायही ठेवला नाही. ठरलेल्या तहाप्रमाणे संपूर्ण वानर सेना राम- लक्ष्मणाबरोबर युद्धात रावण विरोधात उभी ठाकली. त्यातूनच गरुड आणि काही जमातींशीही तह झाल्यामुळे राम लक्ष्मणाला प्रचंड सेनेचा लाभ घेता आला.
अंगद हा राज्य पदावर असला तरी सर्व अधिकार सुग्रीवाकडे होते. रावणाला ह्या बातम्या कळत होत्या पण तो निर्धास्तच होता पहिले कारण म्हणजे समुद्रावर त्याचे असलेले प्रभुत्व आणि अभेद्य अशी लंका नगरी. रामा पुढे पहिला प्रश्न होता म्हणजे सीतेला कुठे ठेवले आहे याचा शोध घेणे. दुसरे म्हणजे अभेद्य लंका नगरीचा भेद करणे. त्या दृष्टीने त्याने वानर सेनेच्या कित्येक हेरांना आणि वायुपुत्र हनुमानाला हे भेद उलगडण्यास सांगितले. रावण वधाअगोदर मेघनादाचा किंवा इंद्रजिताचा मृत्यू होणे आवश्यक होते. तो जिवंत असेपर्यंत रावण वध अशक्य होता. प्रगत विद्येचा वापर करून शरीराचे स्वरूप बदलणे, शरीराचा आकार बदलणे, दूर श्रवण , टेली कायन्सीस , टेली पायरॅसिस , अशा अनेक विद्या दोन्हीकडच्या काही योद्धयांना माहित होत्या. हनुमान हा त्यातीलच एक भक्त होता. पुत्र कामेष्ठी यज्ञातूनच त्याचा जन्म झाला असल्यामुळे जन्मापासूनच त्याला असंख्य विद्या आणि सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. हनुमान फक्त श्रीलंकाच नव्हे तर आजूबाजूची सर्व द्वीपे शोधल्याचे उल्लेख आहेत. अशोक वनात लागलेला सीतेचा शोध आणि त्यांचे संभाषण सर्वानांच माहित आहे. त्याच वेळी सीतेला घेऊन हनुमान परत येऊ शकला असता आणि रक्ताचा एक थेंबही न सांडता सीतेचा प्रश्न संपला असता. सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे हे आक्रमण रावणाचा नाश करण्यासाठी होते. सीतेला परत आणण्यासाठी नव्हते. त्यानंतर अशोक वनातील विध्वंस आणि लंकेची जाळपोळ हे काल्पनिक आहे. हनुमानाने लंका नगरीची बारकाईने पाहण्याची संधी घेतली. लंका नगरी सोन्याची होती असे मानले तर तेथे जाळपोळ करण्याचा प्रश्नच नव्हता. हनुमान काही रामाचा दूत म्हणून रावणाकडे गेला नव्हता त्यामुळेच तो दंडनीय होता. असे असूनसुद्धा रावणाने त्याला सोडून दिले कारण त्याला आपल्या सामुद्रिक सामर्थ्याचा आणि अभेद्य लंका नगरीचा विश्वास होता.
हनुमानाने त्या काळात केलेले अत्यंत महत्वाचे कार्य म्हणजे विभीषणाचा शोध आणि त्याच मन रामाकडे आकृष्ट करणे. विभीषण हा जात्याच वैदिक धर्माला मान देणारा आणि वैदिक सूत्रे पाळणारा होता. त्यामुळे त्याने रामाची भेट घेतली. रामाला लंका नगरीची सगळीच गुपिते उघडी झाली होती.
इंद्रजिताला असलेल्या वराप्रमाणे १४ वर्षे जो ब्रम्हचारी राहील त्याच्याकडूनच इंद्रजिताचा वध झाला असता. याच कारणामुळे १४ वर्षांचा वनवास सांगितला गेला आणि लक्ष्मणाला पत्नीशिवाय पाठवण्यात आले. समुद्री मार्ग शक्य नसल्यामुळे रामाने सेतू बांधून श्रीलंकेत प्रवेश केला. तेथे पोहचल्यावर त्याने एक उत्कृष्ट राजकारण केले. त्याने विभीषणाचा राज्याभिषेक करून टाकला. या राज्याभिषेकामुळे रावणाच्या बाजूच्या बऱ्याच सैन्यांनी युद्धात भाग घेतलाच नाही. त्यांना असे जाणवले की राम काही श्रीलंका बळकवायला आला नाही. हे फक्त राम आणि रावण यांच्यामधील युद्ध आहे. विभीषणामुळे लंका नगरीचे भेद सर्व उघड झाले होते. त्या अगोदरही रावणाने रामेश्वराच्या प्रतिष्ठापनेचे पौरोहित्य केले होते. त्याच वेळी त्याला या युद्धात आपण मारणार याची खात्री झाली होती. यथावकाश युद्ध झाले आणि रावणाचा आणि राक्षस संस्कृतीचा पूर्ण नाश झाला. विभीषण आणि सुग्रीव याच्यामुळे दक्षिणेकडेही वैदिक संस्कृतीचे प्राबल्य राहिले.
त्या नंतर अग्नी परीक्षेच्या निम्मिताने सीतेच्या छायेला अग्नीला देऊन मूळ सीता परत आली आणि सर्व पुष्पक विमानाने अयोध्येला गेले. नंतरच्या काळात रामाच्या २७ पिढ्यानी अयोध्येवर राज्य केले. त्या सर्वांची नावे विष्णू पुराणात उपलब्ध आहेत. त्यापैकी लक्ष्मणाने लखनऊ ची स्थापना केली तर, शत्रुघ्ननाने मथुरा नगरीची स्थापना केली तर लव ने पश्चिमेकडे लावपूर (लाहोर) ची स्थापना केली तर, कुश ने अजून पश्चिमीकडे हिंदकुश पर्वतराजीत राज्य केले.
एक मात्र खरे, तेव्हा पासून सुरु असलेला भारतातला उत्तर - दक्षिण हा वाद अजूनही संपला नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्ण वाचले नाही पण विषय नक्कीच रोचक आहे. त्यामुळे वेळ काढुन वाचणार आहे.

हा भाग शेवटचा आहे तर कृपया ह्या लिखाणाची प्रेरणा व याचे संदर्भ ही माहिती सुद्धा दिली तर बरे होईल. हा केवळ कल्पनाविलास नसावा. तसे असल्यास वाचण्यात रस राहणार नाही.

एवढं सगळं सुनियोजित होतं, आश्रमांत उच्च संशोधन चालत होतं, तर रामाचा जन्मही असाच नॉन बायॉलॉजिकल - क्लोन करून झाला होता आणि त्याच्यात उच्च दर्जाचे जीन्स मोडिफाय करून घातले होते, असं म्हणायला काय हरकत आहे?

रामायणाचे कोणकोणते versions / अन्य ग्रंथ संदर्भासाठी वापरलेत ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे.