रामायण - एक राजकीय प्रवास – भाग 3

Submitted by अविनाश जोशी on 23 August, 2024 - 07:28

रामायण - एक राजकीय प्रवास – भाग 3
रामाच्या राज्यरोहणचा मुहूर्त वसिष्ठ आणि विश्वामित्र यांनी काढला होता. याच्या कितीतरी अगोदर रामाला युवराज म्हणून घोषित करण्यात आले होते. पुराणातील बऱ्याच कथा रुपमय व भासामय असतात. राज्यरोहण प्रसंगाच्या वेळी भरताने कैकय देशाला जाणे आणि शत्रूंघ्नाने राजधानीत नसणे हे वेगळ्याच गोष्टींकडे दिशा दर्शवते. हा मुहूर्त ब्रह्मऋषींनी काढलेला असूनही त्याच मुहूर्ताच्या वेळी वनवासाला प्रस्थान ठेवणे ह्या घटना पूर्वनियोजित होत्या. हा मुहूर्त रावणाच्या बीमोडाला चढाई करण्यास अत्यंत अनुकूल होता. रामाबरोबर सीतेने आणि लक्ष्मणाने जायचे हे ठरले होते. कथेप्रमाणे कैकयीने १४ वर्षाचा वनवास रामाला सांगितला होता. त्यांच्याबरोबर सीता आणि लक्ष्मणालाही १४ वर्षे बाहेर राहणे क्रमप्राप्त होते. साधारणतः त्या काळी १२ वर्षे वनवासाची प्रथा असताना हा वनवास १४ वर्षाचा का झाला याचे उत्तरही १४ वर्षांनी होणारा रावण वध हेच आहे. राम, लक्ष्मण, सीता योग्य मुहूर्तावर अयोध्यानगरीच्या बाहेर पडून जवळच असलेल्या पर्वतावर एका ऋषींच्या आश्रमात राहिले. चारही पुत्र जवळ नसल्यामुळे दशरथाचे पुत्र शोकाने निधन झाले.
रामाच्या निवासाच्या ठिकाणी झालेली भरत भेट प्रसिद्ध आहे. त्याच वेळेस कौसल्या , सुमित्रा , कैकयी व अनेक नागरिकही जमा झाले होते. त्यात वसिष्ठ ऋषी मुदाम आले होते. रामाने तेथेच १४ वर्ष राहून काळ घालवायला कोणतीच अडचण नव्हती. त्यामुळेच वसिष्ठानी रामाला आणि त्याच्या आप्तांना भावनिक गुंत्यातून सोडवून रामाला सत्याची आठवण करून दिली. रामाच्या पादुका घेऊन भरताने त्या सिंहासनावर ठेऊन पुढील १४ वर्ष राज्य केले. भरतही त्यावेळेस राजभोग न घेता अयोध्येच्या सीमेवर एका कुटीरामध्ये राहत होता. काहींनी अशी शंका काढली की भरताने जर पादुका नेल्या तर राम १४ वर्ष अनवाणीच हिंडत होता का ? येथे हे लाक्षत ठेवले पाहिजे की वनवास फक्त रामाला होता. सीता व लक्ष्मणाला नव्हता. रामाने कुठलेही राजभोग घेऊ नयेत असा नियम होता. पण लक्ष्मण आणि सीते करिता वस्त्रालंकार त्याज्य नव्हते. त्याचबरोबर युद्धात लागणारे सर्व आयुधे त्यांच्या सोबत घेतलेल्या सामानात समाविष्ट होती. सर्वांचे मिळून दोन मोठाले पेठारे भरून सामान नेल्याचा उल्लेख आहे. अर्थात हे जड सामान वाहून कोणी आणि कसे नेले हे स्पष्ट नाही. सामानात दोन धनुष्य भाते आणि असंख्य बाण यांचा समावेश होता. रामाचा यापुढील लंकेपर्यंतचा प्रवास सध्याच्या खालील राज्यातून झाला.
उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश , ओडिसा, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आणि तामिळनाडू. प्रवासाचा मार्ग पाहता हा सर्व मार्ग प्रथमपासूनच श्रीलंकेकरिता होता हे उघड आहे. श्रीरामाचा कोणताही प्रवास आजुबाजुला असणाऱ्या आर्यवर्तातील राज्यातून झाला नाही. कारण मुख्य ध्येय म्हणजे श्रीलंकेतील असुर शक्तींचा नाश करणे आणि दक्षिण भारतात मैत्री प्रस्थापित करणे हा होता. या सर्व प्रवासात रामाने अनेक आश्रमाच्या आणि प्रजातींच्या भेटी घेतल्या. वसिष्ठ, विश्वामित्रांनी आणि सर्व ऋषींनी रामाला सतत दक्षिणेकडे जाण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या अफाट ज्ञानामुळे आणि दूरदर्शीपणामुळे रावण वधा करिता त्यांनी प्रयत्न केले होते. रामजन्माच्या अगोदरपासूनच या गोष्टीचे नियोजन सुरु होते.
या प्रवासात रामाने कोणत्याही प्रजातीच्या मुख्य नगरात प्रवेश केला नाही कारण त्यांना हक्क प्रस्थापित करायचा नव्हता तर मित्रत्व प्रस्थापित करायचे होते. ऋषींच्या आश्रमातून त्याला अनेक दिव्य शस्त्रास्त्रांचा लाभ झाला. अगस्त्य ऋषींच्या आश्रमात रामाला इतर अस्त्रांबरोबरच कोदंड नावाचे धनुष्य दिले गेले. रावण युद्धात शत्रूच्या धनुष्याचे तुकडे करून त्याला निष्प्रभ करत असे. अगत्स्य मुनींनी धातुशास्त्रावर अनेक प्रयॊग करून रावणाच्या कुठल्याही शास्त्राला दाद न देणारे असे हे धनुष्य तयार केले होते. या संशोधनात दोन कन्यकांनी प्रामुख्याने भाग घेतला होता. यावेळी सीता रामाबरोबर होती. परंतु वेळोवेळी मिळालेली रावणाविरोधी शस्त्रे आणि अस्त्रे हे रावण वधाचे नियोजन होते. रामायणात अशा अनेक दिव्य शास्त्रांचे उल्लेख आहे. त्यात बाण न संपणारा अक्षय भाता एका मुनींनी दिला असा उल्लेख आहे. याच काळात रामाला पुढील सर्व प्रवासाचे योग्य मार्गदर्श आणि नियोजन करण्यात या आश्रमांनी बहुमोल मदत केली. त्या काळी बहुतेक ऋषी मुनींचे आश्रम विंध्य पर्वत किंवा त्याच्या उत्तरेसच होते. पुढच्या प्रवासात त्यांना ऋषी मुनींचे फारच थोडे सहकार्य लागणार होते. . ..... अपूर्ण .......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users