रामायण - एक राजकीय प्रवास भाग - २
त्याकाळात बहुतेक असुर हे दक्षिण रहिवासी होते. केरळमधले हिरण्याक्ष , हिरण्यकश्यपू, महाबली इतर अनेक असुर दक्षिण भागात होते. खुद्द श्रीलंकेत रावणाच्या आजोबांचे राज्य होते. त्यांचे राज्य विष्णूने जिंकून घेतले व कुबेराला श्रीलंकेचे राज्य दिले. त्यामुळे प्रथमच परागंदा झालेल्या या असुर राजाने विंध्य पर्वताच्या दक्षिणेपर्यंत आश्रय घेतला. यात असुर याचा अर्थ राक्षस नव्हे तर आर्य रीतिरिवाज न पाळणारे ते असुर. कश्यप ऋषींच्या अनेक भार्यांपासून अनेक प्रजातींची निर्मिती झाली असे मानले जाते. त्यात अदिती पासून देव तर दिती पासून दैत्य अशी प्रजाती झाली. त्याशिवाय या भागात अनेक प्रजाती होत्या त्यात यक्ष , किन्नर, गंधर्व, वानर, सर्प , नाग , गरुड , जांबुवंत इत्यादी प्रमुख जाती असून त्यांची अनेक राज्ये विंध्याच्या दक्षिणेला होती.
कुबेराचा पराभव करून रावणाने श्रीलंकेचे राज्य ताब्यात घेतले. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ होता व दोघेही पुलस्य ऋषींचे नातू किंवा ब्रम्हदेवाचे पणतू होते. रावण हा अत्यंत कुशल प्रशासक होता. तो वेदसंपन्न व अतिशय विद्वान होता परंतु दुराचारी होता. त्याने श्रीलंका अभेद्य करून ठेवली होती आणि हळूहळू आपले राज्य उत्तरेकडे वाढवत होता. श्रीलंकेला लागूनच असलेले वानरांचे बलाढ्य राज्य किष्किंधा याचा स्वामी वाली हा रावणाचा परम मित्र होता. कित्येक प्रजातीशी मैत्री करून त्याने हळूहळू आपले सैन्य आणि प्रतिनिधी उत्तरेकडे पाठवायला सुरवात केली होते. दंडकारण्यात (नाशिक जवळ) रावणाची बहीण शूर्पणखा कारभार सांभाळत होती आणि तिच्या दिमतीला खर, दूषण असे महासेनापती हजारो सैनिकांसह होते. रावणाचे प्रभुत्व दाक्षिणात्य विभागात प्रस्थपित होत होते आणि त्याच वेळेस तो उत्तरेकडे पाय पसरू लागला होता. असुरांचा उपद्रव विंध्य आणि उत्तरेला आर्यावर्तात सुरु झाला होता. विंध्य परिसरातील असंख्य ऋषी मुनींना त्यांचा आश्रमांना, आणी कार्याला हा असुरप्रवेश फारच धोकादायक वाटत होता. येथे एक सांगणे आवश्यक आहे की या सर्व प्रजातींचा अथवा असुरांचा मूळ धर्म वैदिक होता. पुराणातून आपण बघितले तर बहुतेक असुरांनी उग्र तपश्चर्या करून देवांकडून वर प्राप्ती करून घेतली आहे. ऋषीमुनीही तपश्चर्या करत पण त्यांची तपश्चर्या हि ज्ञान प्राप्तीसाठी असे. कित्येक आश्रमातून जीवशास्त्र , यंत्रशास्त्र, आयुधशास्त्र , अस्त्रशास्त्र , धातूशास्त्र आणि इतर अनेक विषयांवर संशोधन कार्य चालू असे. आश्रमातील कित्येक स्त्रिया अशाप्रकारच्या ज्ञान साधनेत सहभागी असे. श्रीरामांच्या प्रचंड प्रवासात सुद्धा त्यांना अनेक आश्रमातून अनेक तर्हेचे ज्ञान आणि उपकरणे याचा लाभ झालेला आहे. थोडक्यात ऋषीमुनींनी तपश्चर्या ज्ञानप्राप्तीसाठी आणि जनकल्याणासाठी असे तर असुरांची तपश्चर्या ही त्यांच्या स्वतःच्या शक्ती प्राप्तीसाठी असे.
सर्व ऋषींचे आश्रम हे तत्कालीन आर्यावरतीसाठी असणाऱ्या राज्यकर्त्यांसाठी ज्ञानाचे भांडार होते.
राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न असे चार पुत्र दशरथाला यज्ञानंतर प्राप्त झाले. अशा राजपुत्रांचे सर्व प्रकारचे शिक्षण ऋषींच्या आश्रमातून व्हायचे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आर्यावर्तातील सर्व राजपुत्रांचे शिक्षण हे ऋषींच्या आश्रमातच व्हायचे. कोणीही पारंपरिक सैन्याधिकारी असे शिक्षण द्यायचा नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, प्रचलित असलेल्या शास्त्रास्त्रांपेक्षा अतिशय पुढारलेल्या शस्त्रास्त्रांची उत्पत्ती ही आश्रमातूनच होत असे.
विंध्य पर्वताच्या उत्तर भागातून असुरांचा उपद्रव वाढीस लागला होता. ऋषी मुनींच्या ज्ञान साधनेत असुरांनी अनेकप्रकारचा उपद्रव सुरु केला होता. आर्यावर्त भक्कम करण्याच्या दृष्टीने आर्यावर्तीय राज्यांच्या हालचाली सुरु होत्या. ऋषीमुनी शिष्याची योग्यता पाहूनच त्याला शस्त्रास्त्रांच्या विद्या देत असे. राम लक्ष्मणाला विश्वामित्रांनी त्राटिका आणि इतर असुरांच्या संहारासाठी किशोरवयातच आपल्या आश्रमाकडे नेले. प्रवासातच त्यांना अत्याधुनीक शस्त्रास्त्रांची माहिती आणि शिक्षण देण्यात आले. त्याचा उपयोग त्राटिका वधात आणि असंख्य सैन्याचा नाश करण्यासाठी झाला.
त्यानंतर राम-सीतेच्या स्वयंवराची कथा आहे. रामायणतील काही प्रकारच्या रामायणामध्ये या स्वयंवराविषयी अनेक विकल्प आहेत. काही रामायणातील जनकाने सीता स्वयंवर ठेवलेच नाही असा उल्लेख आहे. तर काही रामायणामध्ये शिवधनुष्य रामाने तोडल्याचा उल्लेख आहे. एक मात्र निश्चित की यावेळी रघुकुळतील सर्व लोकांना बोलावून रामाचं -सीता सोबत, लक्ष्मणाचे - उर्मिला सोबत आणि भरत आणि शत्रुघ्न यांचे सीता आणि उर्मिलेच्या चुलत बहिणींशी लग्न झाली. चारही लग्न एकाचवेळी झाली. असुरांचा उपद्रव रावणाच्या नेतृत्वाखाली वाढतच होता. त्याला तोंड देण्यासाठी आणि दक्षिणेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि रावणाचा वध करण्यासाठी काहीतरी हालचाल करणे भाग होते.
अयोध्या आणि इतर मित्र राज्यांचे सैन्य अति प्रचंड होते. एक उपाय म्हणजे ह्या सैन्याने दक्षिणेत लंकेपर्यंत चालून जायचे. पण अशा प्रकारच्या मोहिमेत बराच काळ गेला असता त्याशिवाय मधील सर्व राज्यात एक तर छोट्या छोट्या राज्यांशी युद्ध करावे लागले असते अथवा त्यांची समजूत घालून त्यांना गप्प बसवावे लागले असते. त्यामुळे सैन्याशिवाय रावणावर चढाई कशी करावी याचे मनसुबे आखले गेले. ही चढाई असुरकुळाचा नाश करण्यासाठी नसून मुख्यतः रावण विरोधी आहे हे निश्चित झाले. श्रीलंकेपासून जवळ असलेल्या किष्किंधा नगरातील वानर सैन्याची मदत घेण्याचा त्यांचा इरादा होता. ..... अपूर्ण .......
रामायण - एक राजकीय प्रवास भाग - २
Submitted by अविनाश जोशी on 23 August, 2024 - 03:02
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
का ही ही
का ही ही