एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारक: 6. वामन आबाजी मोडक ( 1835? - 1897)

Submitted by अवल on 22 July, 2024 - 00:13

(या सर्व सुधारकांचं कार्य प्रचंड मोठं आहे, खूप कष्ट घेऊन सविस्तर संशोधनपर लेख लिहावा इतकं यांचं कार्य! आजचे आपले जीवन जसे आहे, त्यात या सुधारकांचा मोठा वाटा आहे.
न्या. रानडे, म. फुले, राजा राममोहन रॉय यांसारखी काही नावे, त्यांचे कार्य बहुतांश माहिती असते. किमान नावं नक्की माहिती असतात. परंतु इतर अनेकांना मात्र आज आपण विसरले आहेत की काय असं वाटतं. म्हणून त्यांच्या नावांची, त्यांच्या कार्याची सर्वसामान्यांना पुन्हा आठवण करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. आधी म्हटलं तसं माहितीवजा छोटेखानी लेख. अधिक वाचायचं, माहिती करून घ्यायची तर विकिपिडिया, विश्वकोश वा ग्रंथालयांची जुनी पुस्तकं उपलब्ध आहेतच. इथे फक्त छोटीशी ओळख.)

Waman_Abaji_Modak.jpg

मूळचे रत्नागिरी येथील वामन आबाजी मोडक यांचे, प्राथमिक शिक्षण दापोलीला झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबईतील एका पारशी विद्या फंडातून आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण सुकर झाले. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या चार पदवीधरांपैकी वामन आबाजी एक. न्यायमूर्ती रानडे, डॉ. रा गो भांडारकर, बी. एम वागळे हे बाकीचे तीन. साल होते 1862. पुढे संस्कृत आणि इंग्रजी विषय घेऊन त्यांनी एम. ए. केले. व्याकरण, साहित्य, वेदांत, न्याय यांचा अभ्यासही त्यांनी केला. हिंदु धर्म तसेच ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, पारशी या धर्मांचाही त्यांनी अभ्यास केला.

एल्फिन्स्टन हायस्कूलमधे ते मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय होते. जवळ जवळ अकरा वर्ष त्यांनी हा कार्यभार सांभाळला.
मुंबई विद्यापीठाची फेलोशीपही त्यांना मिळाली.
प्रार्थना समाजाचे ते सदस्य होते. तिथे कीर्तनं करणे, त्या मार्फत समाजप्रबोधनाचा प्रयत्न ते करत. किर्तनाची पद्धत जुनी परंतु कीर्तनाचे विषय नवीन असत. अगदी येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस, व्यापार, विविध कौशल्य, बालविवाहाचे दोष, जुगाराचे तोटे असे विविध विषय ते आपल्या कीर्तनामधे मांडत.
वामन आबाजी यांनी लेखनापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. याचे उत्तम उदाहरण ही कीर्तने होत.

तसेच वामन आबाजी, न्या. म. गो. रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर यांनी मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून हुजूरपागा ही शाळा सुरु केली.
कामगारांना शिक्षण देण्यासाठी रात्रशाळा प्रार्थना समाजाने सुरु केल्या, त्यातही वामन आबाजींचा मोठा सहभाग होता.
मुंबईमधे पहिला विधवा विवाह झाला (साल चुकले असल्याने काढून टाकले आहे), तेव्हा त्या विवाहाला वामन आबाजींनी जाहीर संमती दिली. तेव्हा त्यांच्यावर समाजाने बहिष्कार घातला होता.

वामन आबाजींनी उपनिषदे मराठीमधे आणण्याचा प्रयत्न केला, पण ते काम अपूर्ण राहिले. त्यांची सुधारणे संदर्भातली, प्रार्थना समाजातील अनेक पदे आजही उपलब्ध आहेत. शिवाय "उत्तरनैषधचरित" नावाचे एक गद्य-पद्य असलेले नाटकही त्यांनी लिहिले.

न्या. रानडे, डॉ. भांडारकर, विष्णुशास्त्री पंडीत यांच्याशी त्यांचे अतिशय मैत्रीचे संबंध आयुष्यभर राहिले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत पहिला विधवाविवाह फेब्रुवारी 1860 मध्ये झाला.
1893 सालापर्यंत तिसेक विधवाविवाह महाराष्ट्रात पार पडले होते.

हा पहिला विवाह अजिबात गाजावाजा न होता पार पडला होता. यात मोडकांचा सहभाग असल्याचा पुरावा नाही.

नाना भिडे यांच्या 1865 साली झालेल्या विवाहात मात्र त्यांचा सहभाग होता. यामुळे रत्नागिरीत त्यांच्यावर बहिष्कार पडला होता.

मोडकांनी 1887 साली गंगाबाई आणि वनमाळी मोदी यांचा विवाह लावला होता.

चिनुक्स बरोबर, माझ्याकडून साल चुकीचे पडले आहे, दुरुस्त करता येतय का बघते.
परंतु याच विवाहाच्या वेळेस ते रत्नागिरीस होते. तेथे विधवा विवाह मान्य असल्याचे मत त्यांनी प्रदर्शित करून व्याख्यानेही दिली होती. त्यावरून त्यांच्यावर बहिष्कार घातला गेला. अन पुढे दहा वर्ष तो बहिष्कार चालू राहिला.
इतक्या बारकाईने लेख वाचल्याबद्दल आभार Happy