एक तरी वारी अनुभवावी...
वारी...पंढरीची आणि वारी...विम्बल्डनची!
दोन्ही वाऱ्यांचा हंगाम एकच जून-जुलै... पुणेकर असल्यामुळे जन्मापासून एक वारी दरवर्षी प्रत्यक्ष अनुभवलेली, दुसरी मात्र आभासी... फक्त दूरदर्शनवर. याही वारीचा अनुभव प्रत्यक्ष घ्यायचं स्वप्न लहानपणापासून बघितलं होतं, ते सत्यात कधी उतरेल हे काही माहित नव्हतं
यंदा मात्र पहिली वारी हुकणार होती कारण, पालख्या पुण्यात असताना मी परदेशी असणार होतो. परदेश दौऱ्याची तयारी करत असताना डोक्यात आले कि आपण विम्बल्डन स्पर्धेच्या दरम्यान लंडन मधेच असणार आहोत, मग हि दुसरी वारी तरी होईल का? मन साशंक होते कारण एवढी प्रसिद्ध स्पर्धा म्हणल्यावर तिकिटे मिळायची शक्यता धूसरच होती. तरीही प्रयत्न करूया असे ठरले, मग बायकोच्या आणि गूगलच्या मदतीने सगळी माहिती काढून ठेवली. एका मित्रानेही त्याच्या लंडनच्या मित्राकडून थोडी माहिती मिळवली होती ८ जुलै, सोमवारी, म्हणजे स्पर्धेच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी जाण्याचे नक्की केले. (एक नंतर लक्षात आलं - ८ जुलै जरा lucky दिवस माझ्यासाठी कारण याच दिवशी २०१८ साली अमितभाई शहांच्या सभेचे पूर्ण नियोजन आणि सूत्रसंचालन केले होते,)
लंडनच्या हॉटेलमधून सकाळीच ७ वाजता निघालो, blackfriars स्टेशन वरून डिस्ट्रिक्ट लाईन पकडून विम्बल्डनच्या अलीकडे southfields स्टेशनवर उतरलो आणि १० मिनिटात चालत दुसऱ्या पंढरीला म्हणजेच "Wimbledon - The Queue, SW १९" या पत्त्यावर ८.१५ ला पोचलो. लंडन टयूब आणि इतर युरोपिअन देशातल्या सार्वजनिक वाहतुकीसारखा सोपा आणि आरामदायी प्रवास दुसरा नाही. अखेर Queue मध्ये इतर विम्बल्डन वारकऱ्यांसोबत सामील झालो. तिथे प्रत्येकाला queue card वाटले जात होते ज्यावर रांगेतला क्रमांक लिहिलेला होता, माझा क्रमांक होता ५६७२. म्हणजे माझ्या आधीच जगाच्या कानाकोपऱ्यातुन आलेले ५६७१ वारकरी त्या दिवशीच्या रांगेत सामील झाले होते. साडेतीन तास त्या रांगेत माझी एका अमेरिकन कुटुंबाशी(नवरा बायको आणि त्यांच्या सोबत २ आणि ३ वर्षाची २ लहान मुले, यांचा उत्साह माझ्या कैक पट अधिक होता) तसेच फ्रेंच जोडीशी ओळख झाली. अर्थात आम्हा सगळ्यांना हे साडेतीन तास नंतर तिकीट मिळाल्यावर साडेतीन मिनटांपेक्षाही कमीच वाटले, जेव्हा आम्हाला ११. ४५ वाजता अखेर हातात ग्राउंड पास मिळाला. सेंटर कोर्ट किंवा कोर्ट # १ चे तिकीट मिळवायचे असेल तर आदल्या दिवशी रात्रीच रांगेत जावे लागते(मी पुढे केव्हातरी नक्की हा प्रयत्न करायचे ठरवले आहे.) Queue मध्ये आम्हाला सगळ्यांना flaunt करायला आयोजकांनी "#IQueuedInTheSun" असे स्टिकर्सही वाटले होते. Typical English Weather मध्ये सूर्यप्रकाशाचे जरा जास्तच अप्रूप आहे
अखेर ग्राउंड पास घेऊन एकमेकांचे फोटो काढून आम्ही पुढे ग्राऊंडवर निघालो. विम्बल्डनला ticket resale असा एक प्रकार असतो ज्यात तुम्हाला दिवसाच्या शेवटी नशीब असेल तर "show court" वर कमी दरात प्रवेश मिळू शकतो. मला सेंटर कोर्ट नाही तरी कोर्ट # १ वर प्रवेश मिळायची अंधुक शक्यता निर्माण झाली. अंधुक यासाठी कि माझा त्या रांगेतला क्रमांक १७४६ होता...
असो, यानंतर मी "नामदेव पायरी"वर, अर्थात सेंटर कोर्टच्या दारात फोटो काढून घेतला, कळसाचे दर्शन घेतले आणि अन्य कोर्टवरचे (म्हणजेच कोर्ट #३ ते #१७) सामने पाहायला निघालो. इथे girls’/boys’ singles आणि mixed doubles चे सामने पाहायला मिळाले. विम्बल्डनची अनिवार्य अशी परंपरा म्हणजे "strawberry with cream " चा आस्वाद घेत हे सामने पहिले. ज्यांना "show court " वर सामने पाहायला मिळत नाहीत त्यांच्यासाठी कोर्ट #१ च्या मागे सुप्रसिद्ध "hill" वर बसून समोर अवाढव्य screen वर हे सामने पाहण्याची सोय आहे. तिथे बसून जेवण करत काही सामने पाहिले. नंतर विम्बल्डन museum आणि लायब्ररी पाहिली. museum मध्ये अनेक प्रसिद्ध खेळाडूंचे sportsgear ठेवले आहेत. विम्बल्डनचा इतिहास उलगडणाऱ्या अनेक गोष्टी इथे पाहायला मिळाल्या तसेच अनेक किस्से इथल्या लायब्ररीमध्ये वाचायला मिळाले. माझ्यासाठी इथलं सगळ्यात प्रेक्षणीय म्हणजे टेनिससाम्राज्ञी स्टेफी ग्राफने १९८८ साली वापरलेले shoes, t-shirt आणि skirt. याच वर्षी तिने "Golden Slam" (Australian Open, French Open, Wimbledon, US Open यांची विजेतेपदं तसेच Olympic गोल्ड Medal) मिळवले होते. हे सर्व एकाच वर्षात कमावणारी स्टेफी हि जगातली एकमेव व्यक्ती! स्टेफीला प्रत्यक्ष पाहायला मिळाले नाही तरी हेही नसे थोडके...
स्टेफीला निवृत्त होऊन अनेक वर्ष झाल्यामुळे गाभाऱ्यात देवी नसणारच होती पण तरीही त्या गाभाऱ्यात (अर्थात The Centre Court) प्रवेश मिळावा हि इच्छा तीव्र होती. अचानक तीही पूर्ण झाली. एक "देसी" मुलगा hill वर भेटला, सहज बोलता बोलता तो म्हणाला आता Centre Court वर जोकोविचचा सामना सुरु व्हायला वेळ आहे तर आपण निदान तिथे जाऊन फोटो काढायचा एक प्रयत्न तरी करूयात. मग आम्ही तिथे गेलो, तिथल्या security guard महिलेने आमची विनंती मान्य करून ५ मिनिटासाठी आत प्रवेश दिला. अखेरीस स्वप्नपूर्ती झाली, गाभाऱ्यात प्रवेश मिळाला.. जोकोविचच्या सामन्याच्या २ मिनिटे आधी तिथे फोटो काढून बाहेर पडलो. थोडी souvenir खरेदी करून कोर्ट #१ वर प्रवेश मिळतो का ते पाहिले. आणि मेरा नंबर आगया.
कोर्ट #१ वर दिवसातला शेवटचा सामना सुरु होता महिला एकेरी चौथी फेरी Barbora Krejcikova वि Danielle Collins. पहिला सेट संपला होता पण किमान एक सेट पाहायला मिळेल म्हणून ते तिकीट काढले आणि मला सीट मिळालं तेही पहिल्या रांगेत.. अजून काय पाहिजे..Barbora Krejcikova ने हा सामना दुसऱ्या सेटमधेच जिंकला, पण कोर्ट #१ वर एक सेट पहिल्या रांगेतून पाहायला मिळाला! आणि आज हीच Barbora Krejcikova विंबल्डन २०२४ लेडीज चॅंपियन झालीये…विंबल्डन चॅंपियनचा खेळ त्याच स्पर्धेत पाहणे ही माझ्यासाठी अधिकच विशेष गोष्ट ठरली!
वरती वारीचा उल्लेख केलाय त्याचं अजून एक कारण म्हणजे दोन्ही वाऱ्यांमध्ये असलेली शिस्त! अर्थात विंबल्डनमधे खेळाडू आणि प्रेक्षक दोघांनाही कडक शिस्तीचा अनुभव पदोपदी येतो…पण हीच शिस्त, नेटकेपणा, टापटीप यामुळे विंबल्डन आपल्याला कायमच एकदम “रॅायल” फील देते. विंबल्डनला “The Championships” असे म्हणतात ते याचमुळे!
अशा रीतीने संपूर्ण दिवस विम्बल्डनवर मनसोक्त फिरून, हि वारी देखील याची देही अनुभवून रात्री ८.३० ला परत निघालो(मनानी अजूनही मी तिथेच आहे). हे १२ तास आयुष्यातल्या सगळ्यात अमूल्य क्षणांपैकी आहेत हे नक्की. Bucket list मधली सर्वात top ची tick mark! परत योग आला तर इथे पुन्हा नक्की येणार रांगेत कितीही वेळ थांबावे लागले तरी... कारण इथला प्रत्येक क्षण क्रीडाप्रेमींसाठी अविस्मरणीय असाच असतो! See you soon SW-१९!
एक तरी वारी अनुभवावी...
Submitted by pareshjoshi14 on 14 July, 2024 - 01:08
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
परेश , भारी रोमांचक .
परेश , भारी रोमांचक .
दोन्ही वार्या माझ्या bucket list मध्ये आहेत.
(No subject)
छान!!
छान!!
भारी !
भारी !
असल्या फालतू दीड दमदीच्या
असल्या फालतू दीड दमदीच्या कुठल्याश्या इंग्लिश खेळाला, पंढरीच्या बारीशी compare केलेले पाहून डोळे पाणावले.
पांडुरंग हरी, वासुदेव हरी
मस्त ! मी हिवाळ्यात
मस्त ! मी हिवाळ्यात विंबल्डनला गेलो होतो. तेव्हा सेंटर कोर्टवर गवत उगवण्यासाठी ग्रीनहाऊस उभारलं होतं. पण तरीही आम्हांला स्टेडीयम टूर मिळाली होती. आपल्याला स्पर्धेच्या वेळी जसं कोर्ट दिसतं, तसं अजिबात दिसत नसूनही अत्यंत भारी वाटलं होतं. स्पर्धेच्या वेळी तर अजून भारी वाटत असेल.
मस्त! मी मागच्या मे महिन्यात
मस्त! मी मागच्या मे महिन्यात गेले होते. म्युझिअम आणि सेंटर कोर्ट टूर घेतली होती. भारी वाटलं.
टेनिस अत्यंत आवडीचा खेळ आहे.
टेनिस अत्यंत आवडीचा खेळ आहे. तुमची इच्छा पुर्ण झालेली वाचून मलाच आनंद झाला.
परेश , वारी भारीच! छान
परेश , वारी भारीच! छान लिहिलं आहेस. आवडलं
मलाही आवडेल ही वारी करायला! स्टेफी माझीही लाडकी