अध्याय१ : निर्माण कथा आणि इतिहास
18 जून 1956. उन्हाळ्यातल्या एका आल्हादायक सकाळी अमेरिकेतल्या हॅनोवर शहरातील न्यू हॅम्पशायर कॉलेजमध्ये कसलीशी लगबग चालू होती. कॉलेजच्या प्रांगणात अनेक बुद्धीजीवी औत्सुक्याने आणि दाटीवाटीने बसले होते. घड्याळाचे काटे कधीचे मंदगतीने पुढे सरकत होते. बरेच जण आपापसात शिळोप्याच्या गप्पा मारत मधूनच मंचावर नजर टाकत होते. निमित्त होतं कसल्याशा कॉन्फरन्सचं. अमेरिकेतल्या काही वैज्ञानिक आणि गणितज्ज्ञांनी मिळून एका समर रिसर्च प्रोजेक्ट चा घाट घातला होता. त्यामुळे अनेक आघाडीचे वैज्ञानिक आणि पत्रकार आज झाडून उपस्थित होते. जॉन मकार्थी, मार्विन मिंस्की, नॅथनिअल रोचेस्टर आणि क्लॉड शैनन, या विज्ञान धुरंधरांनी या कॉन्फरन्ससाठी गेले कित्येक दिवस मेहनत घेतली होती. कॉन्फरन्सचे अगदी बारकाईने नियोजन करून त्याची चोखपणे अंमलबजावणी केली होती. त्यांच्यासाठी त्याकाळी भरवल्या जाणाऱ्या अनेक वैज्ञानिक कॉन्फरन्स सारखीच ही पण एक सर्वसाधारण कॉन्फरन्स होती. पण या कॉन्फरन्सद्वारे ते नकळतपणे आगमी येऊ घातलेल्या एका नव्या युगाची बीजं पेरत आहेत याची त्यांना किंवा उपस्थितांपैकी कोणाला पुसटशी कल्पनाही नव्हती.
18 जून ते 21 जून, अशी चार दिवस ही कॉन्फरन्स चालली. कॉन्फरन्सचा विषय होता ‘ यंत्रांना बुद्धिमत्ता आणि विचारक्षमता प्रदान करणे.’ अनेक बुद्धिवंत वैज्ञानिकांनी आपली व्याख्याने दिलीत, अनेकांनी आपल्या संशोधनापैकी काही मुद्दे कॉन्फरन्समध्ये मांडले. चर्चेमध्ये एकमेकांची मते विचारात घेऊन त्यांचे चिकित्सकपणे विश्लेषण करण्यात आले. चर्चेअंती काढलेल्या निष्कर्षांवर पुन्हा आपली मते मांडून, विविध प्रश्न विचारून, नाना तर्क लढवून त्यांचा उहापोह करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध पैलूंवर या कॉन्फरन्समध्ये गंभीर आणि सर्वांगीण चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये अनेक मुद्दे विचारात घेतले गेले, काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या काही संशोधकांनी ‘ही एक क्रांतिकारी संकल्पना असून यामुळे उगवत्या नव्या युगाचे दरवाजे उघडतील.’ अशी सूचक भाकिते ही केलीत. ‘जॉन मकार्थी’ या आयोजांकपैकी एक असलेल्या उमद्या आणि महत्त्वकांक्षी संशोधकाने आपल्या भाषणात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या संज्ञनेचा पहिल्यांदा वापर केला. यासाठी आजही जग त्याला ‘ फादर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणून ओळखते. बुद्धिवंतांच्या उत्सवाप्रमाणे पार पडलेली ही कॉन्फरन्स ए आयच्या वाटचालीसाठी मैलाचा दगड ठरली. आजही ही कॉन्फरन्स ‘डार्ट माऊथ कॉन्फरन्स’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.
या कॉन्फरन्सद्वारे एका आगळ्या कथेची सुरुवात झाली होती, एका नव्या पर्वाची नांदी झाली होती. जग पालटायची आणि उलथवून टाकायचीही ताकद ठेवणारा एक समर्थ शिलेदार नुकतंच बाळसं धरू पाहत होता.
ए आयच्या जन्माची चाहूल जरी डार्ट माऊथ कॉन्फरन्स मुळे लागली असली तरी, त्याआधीच कैक शतकांपूर्वीच ते काळाच्या उदरात गर्भस्थ झाले होते.
ऑटोमॅटा :
ए आय चं सुरुवातीचं रूप म्हणून ऑटोमॅटाकडे पाहिलं जातं. ऑटोमॅटा हा स्वयंचलित मशीन्सचा एक प्रकार आहे जो स्वतःच्या हालचाली स्वतः करतो, आणि त्याही अशा की जणू काही तो जीवंतच आहे.
या ऑटोमॅटाचा इतिहास खूप जुना आहे. प्राचीन ग्रीसमध्ये, हेरॉन ऑफ अलेक्झांड्रिया नावाच्या वैज्ञानिकाने जलविद्युत तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटोमॅटा तयार केला होता. त्याने तयार केलेल्या मशीनमध्ये स्वयंचलित कपाट, स्वयंचलित दारे आणि इतर यंत्रणा समाविष्ट होत्या.मध्ययुगीन युगात, अरब वैज्ञानिकांनी हायड्रॉलिक्स आणि मेकॅनिक्सच्या मदतीने अद्वितीय ऑटोमॅटा तयार केले. इब्न अल-रज्जाज अल-जजारी या प्रसिद्ध वैज्ञानिकाने १३व्या शतकात विविध प्रकारचे ऑटोमॅटा तयार केले. त्याच्या निर्मितींमध्ये संगीत वाजवणारे फव्वारे आणि स्वयंचलित यंत्रे समाविष्ट होती. पुनर्जागरण काळात युरोपात ऑटोमॅटा तयार करणे एक कलाप्रकार मानला जात होता. लिओनार्डो दा विन्सी याने देखील अनेक प्रकारचे ऑटोमॅटा तयार केले होते, ज्यात चालणारे सिंह आणि स्वयंचलित वाद्य वाजवणाऱ्या पुतळ्यांचा समावेश होता. तर अशा या ऑटोमॅटामध्ये असणाऱ्या स्वयंचलिततेमुळे जगभर यांना ए आयचं प्राथमिक रूप म्हणून ओळखलं जातं.
विकास आणि प्रगती :
1950-1960 :
1950 सली ॲलन टरिंग यांनी संगणकाची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी एका चाचणी (टेस्ट)ची रचना केली या चचणीला ‘टरींग टेस्ट’ म्हणून ओळखलं जातं. यामध्ये एक पर्यवेक्षक, एक मनुष्य, आणि ज्या संगणकाची बुद्धिमत्ता मोजायची आहे तो संगणक, या तीन घटकांचा समावेश होता. यामध्ये पर्यवेक्षकाला एका खोलीत बसवून त्याला दुसऱ्या खोलीत असलेल्या संगणक आणि मनुष्याशी टेक्स्ट संदेशांच्या रूपात संवाद साधायचा होता. पर्यवेक्षकाने या दोघांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या उत्तरांचे विविध कसोट्यांवर विश्लेषण करून यापैकी संगणकाने दिलेली उत्तरे कोणती, आणि मनुष्याने दिलेली उत्तरे कोणती याचा निवाडा करून, कोण संगणक आहे आणि कोण मनुष्य आहे हे ओळखायचं अशी अट असायची. जर पर्यवेक्षक हे ओळखण्यात अयशस्वी झाला तर संगणक ही चाचणी उत्तीर्ण झाला असं जाहीर केलं जायचं त्याचबरोबर संगणक बुद्धिमान असल्याचं मानलं जायचं. या टेस्टला ए आयच्या पायाभरणीतील पायथ्याचा दगड मानलं जातं. पुढे याच दशकात डार्क माऊथ कॉन्फरन्स झाली आणि ए आयच्या प्रवासाला जाहीरपणे सुरुवात झाली. या दशकात ए आयमध्ये भाषा प्रक्रिया, निर्णय क्षमता आणि कम्प्युटर व्हिजन, या क्षमतांचा विकास करण्यात आला.
1970 ते 2000
ए आयचा प्रवास 1970 पर्यंत सुरळीत चालू होता, पण 1970 ते 1990 या दोन दशकांमध्ये सरकारचे आणि जनतेचे दुर्लक्ष होऊन पुरेशा निधी अभावी या हे क्षेत्र थंडावलं. या काळाला ‘ ए आय विंटर’ असं म्हटलं जातं. या ए आय विंटर च्या काळातही मंदपणे का असेना, पण ए आयचा विकास होतच होता. रासायनिक विश्लेषण आणि वैद्यकीय क्षेत्रात काही प्रमाणात ए आयचा वापर होऊ लागला होता. या द्विदशकी कठीण काळानंतर मात्र याने अंग झटकायला सुरुवात केली. 1990 ते 2000 या दशकात ए आयला निर्णय क्षमता आणि मानव सदृश विचार क्षमता प्रदान करण्यात आली. न्यूरल नेटवर्क, डिसिजन ट्रीज, आणि सपोर्ट व्हेक्टर मशीन्स सारख्या मशीन लर्निंग टेक्निक्स ए आयमध्ये विकसित करण्यात आल्या.
1997 साली ए आयने आपल्या कर्तृत्वाचा पहिला झेंडा गाडला. आयबीएम कंपनीच्या ब्ल्यू सुपर कम्प्युटरने चक्क बुद्धिबळ जगज्जेत्या गॅरी कॅस्पॅरव्हला एका अटीतटीच्या सामन्यात हरवले. साऱ्या जगाचे लक्ष या विजयाकडे ओढलं गेलं. कुणी सांगावं, भविष्यातल्या बलिष्ठ राज्यकर्त्याचा त्याच्या प्रतिस्पर्ध्यावरचा हा पहिला विजय असेल?
2000 ते 20024
2000 सालानंतर मात्र कधीच मागे वळून पाहिलं नाही या काळात ए आयमध्ये कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क्स (CNN) आणि रीकरंट न्यूरल नेटवर्क्स (RNN) चा वापर झाला जे जटिल गुंतागुंतीच्या पॅटर्न्सना ओळखण्यासाठी आणि समजण्यासाठी उपयोगात आणले गेले. 2010 ते 2024 या काळात ए आयने बेफाम दौड मारण्यास सुरुवात केली. प्रत्येक क्षेत्रात ए आयने आपलं पाऊल ठेवलं. अगदी साधा इमेल लिहिण्यापासून ते मानवी शरीराची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यापर्यंत सर्वत्र ए आयने आपले हातपाय पसरले. ॲमेझॉन अलेक्सा, गुगल होम द्वारे ए आय अगदी घरा घरात पोहोचलं. ओपन ए आय, गुगल डीपमाईंड, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, बायडू, इत्यादी सध्या जगातील आघाडीच्या ए आय कंपन्या आहेत ज्या ए आयचं भविष्य निर्धारित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
ए आय हा मानव जातीच्या अगदी सुरुवातीच्या क्षणापासून ते त्याच्या समाप्तीपर्यंतच्या इतिहासातील एक मोठा आणि अति महत्त्वाचा अध्याय आहे. मला माहितीये की मी खूप मोठं विधान करतोय पण विचार करा, जेव्हा आपण मानवाच्या इतिहासास सुरुवात करतो तेव्हा तो कुठून सुरू होतो? निदान होमो सेपियन मानवाचा सगळ्यात पहिला पूर्वज असणाऱ्या इजिप्तोपिथेकस पासून. आता मानवाचा हा इतिहास म्हणजे तरी नक्की काय? तर आपण थोडा खोलात जाऊन विचार केला तर लक्षात येईल की मानवाचा इतिहास म्हणजे आपलं जीवन सुलभपणे जगण्यासाठी त्यानं वापरलेली साधनं, आणि त्या साधनांमध्ये त्याने काळानुसार केलेले बदल याची माहिती.
मला स्पष्ट करू द्या. अशी कोणती गोष्ट जी मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळी करत असेल तर ती म्हणजे जीवन सुलभपणे जगण्यासाठी त्याने विविध साधनांचा आपल्या बुद्धीच्या जोरावर केलेला प्रचंड वापर. अगदी अश्मयुगातील दगडी हत्यारांपासून ते एकविसाव्या शतकातील अणुबॉम्ब आणि अंतराळ स्थानकापर्यंत. या साधनांचा काळाच्या ओघात मानवाने केलेला वापर आणि त्या साधनांमध्ये झालेले बदल यांची माहिती म्हणजेच तर मानवाचा इतिहास हो ना? जेव्हा मानव त्याच्या उत्क्रांतीच्या अगदी प्राथमिक टप्प्यात होता तेव्हा तो जगण्यासाठी इतर प्राण्यांप्रमाणेच नैसर्गिक साधनांचा वापर करायचा, जसे राहण्यासाठी आधी झाडे मग गुहा, लज्जा रक्षणासाठी झाडांच्या साली, शिकारीसाठी आधी नखे आणि दात तर नंतर दगडी हत्यारे, इत्यादी. पण यानंतरच्या काळात त्याने आपल्या साधनांमध्ये अमुलाग्र बदल केले जसे की राहण्यासाठी गगनचुंबी इमारती, लज्जा रक्षणासाठी आधुनिक पर्याय जसे कॉटन आणि वुलन आऊटफिटस्, शिकरीसाठी अत्याधुनिक शस्त्रे आणि बंदुका इत्यादी. त्याच्या या बदललेल्या साधनांच्या वापरांच्या भूतकाळाची माहिती म्हणजेच तर त्याचा इतिहास. किंवा हडप्पा अथवा मोहेंजोदडो सारख्या संस्कृतींचा इतिहास म्हणजे त्यांनी त्याकाळी वापरलेल्या महास्नानकुंड, बंद गटारी, शृंगारासाठीचे कल्पक दागिने, मनोरंजनासाठीचे खेळ, आर्थिक विनिमयासाठीची नाणी, या साधनांची माहिती. त्यामुळे मानवी इतिहास हा मानवाच्या जीवन जगण्याच्या साधनांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि यामुळे या साधनांमध्ये प्रचंड मोठा बदल घडणार आहे, बदल घडत आहे, तो म्हणजे ही साधने स्वतः विचार करू शकणार आहेत यांना स्वतःची स्वतंत्र बुद्धिमत्ता वापरता येणार आहे आणि या साधनांमधील हा इतका मोठा बदल म्हणजे वरील तत्त्वाप्रमाणे मानवी इतिहासातील एक मोठं आणि अतिमहत्त्वाचं वळण नव्हे काय?
या भागात आपण ए आयच्या इतिहासाबद्दल माहिती घेतली. पुढच्या भागात आपण सध्याच्या काळातील ए आयची रचना आणि त्याच्या क्षमता या मुद्द्यांवर चर्चा करू.
क्रमशः
<< मानवाचा इतिहास म्हणजे आपलं
<< मानवाचा इतिहास म्हणजे आपलं जीवन सुलभपणे जगण्यासाठी त्यानं वापरलेली साधनं, आणि त्या साधनांमध्ये त्याने काळानुसार केलेले बदल याची माहिती. >>
अतिशय मार्मिक विधान.
खूप छान लेख. पुढील भागाची वाट बघत आहे.
इंटरेस्टिंग… वाचतेय.
इंटरेस्टिंग… वाचतेय.
पुढील वर्षभरात ए आयचे फायदे आणि तोटे कळतील.
छान आहे, पुढील भाग लवकर येवू
छान आहे, पुढील भाग लवकर येवू द्या.
छान आहे.
छान आहे.
छान लेख...
छान लेख...
डिपफेक वापर करून झालेल्या आर्थिक लुटीच्या बातम्या धडकी भरवतात...खरं आणि खोटं कोण आणि कसं ठरवणार कळीचा मुद्दा असू शकतो...ख-याला मरण नाही असं खोटे पुरावे सादर करणारा म्हणणार असेल तर कठीण आहे....
उबो धन्यवाद. साधनाजी ए आय
उबो धन्यवाद. साधनाजी ए आय दुधारी शस्त्र आहे चुकीच्या हातात पडलं की विघातक कार्यासाठी त्याचा वापर होईल, नव्हे होतो आहे (डीप फेक याचं उत्तम उदाहरण). तरी ए आय अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे याचा आवाका आणि विकासाचा वेग पाहता याला अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. भविष्यात कदाचित कायद्यातही ए आय साठी विशेष तरतुदी आपल्याला पाहायला मिळतील.
Shardg , कुमार१ धन्यवाद. दसा,
Shardg , कुमार१ धन्यवाद. दसा, डिप फेक मुळे 'हातच्या काकणाला आरसा कशाला?' असं भविष्यात कदाचित म्हणता येणार नाही.