बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०२४ सालच्या सॅन होजे येथे भरणाऱ्या अधिवेशनाचे वारे आता सर्व उत्तर अमेरिकेत वाहू लागले आहेत. या अधिवेशनातील ‘ड्रीम्स UNLIMITED’ हा शुभारंभाचा कार्यक्रम कसा असणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना आहेच. त्या संदर्भात कार्यक्रमाच्या रचनाकार निर्मल गोसावी यांच्याशी केलेली बातचीत:
अनिता: निर्मलताई, मनःपूर्वक अभिनंदन! ‘ड्रीम्स UNLIMITED’ या शुभारंभाच्या कार्यक्रम मागील भूमिका जाणून घ्यायला आमच्या वाचकांना आवडेल.
निर्मलताई: खूप खूप धन्यवाद! स्वप्न हा मनुष्याचा धर्म आहे, प्रत्येकाला स्वप्न पडतात, ज्यांत केवढ्या मानवी भावनांचा आविष्कार होतो! आनंद, प्रेरणा, दु:खातून बाहेर पडण्याची ताकद… एका कलाकाराला ह्या विषयावर सादर करण्यासारखं खूप काही आहे. त्यामुळे स्वप्न या सूत्रावर कार्यक्रम करायचं असं एक स्वप्न माझ्या मनात होतंच. ते अधिवेशनाच्या निमित्ताने साकार होत आहे. आपलच बघ ना, अमेरिकेत आलेला प्रत्येक माणूस काहीतरी स्वप्न उराशी बाळगून आलेला असतो. वेगळ्या पिढीची वेगळी स्वप्ने! त्यामुळे सगळ्यांनाच या सूत्राविषयी आपलेपणा वाटणार आहे. आणि स्वप्नात काहीही होऊ शकते, नाही का? कल्पनाशक्तीचा एक मोठा कॅनव्हास आपल्यासमोर या कार्यक्रमातून उलगडणार आहे. यात नाट्य आहे, रंग आहेत, भावना आहेत. एक भारावून टाकणारा, आयुष्यव्यापी, अविस्मरणीय
आणि नेत्रदीपक कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत. Eleanor Roosevelt यांचं एक वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलं आहे: “Future belongs to those who believe in their dreams.” कोविड मधून बाहेर पडल्यानंतर, एक नवी अस्मिता घेऊन आपण भविष्यात जी नवी भरारी घेणार आहोत त्याचेच हे प्रतीक असेल.
शीतल: ह्या कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल?
निर्मलताई: Broadway च्या धर्ती वर आधारलेली ही एक संगीतिका असेल. नाट्य, संगीत आणि नृत्याद्वारे आम्ही आपल्या सगळ्यांच्या स्वप्नांची गोष्ट सांगणार आहोत. माझ्या कल्पनांवर आधारलेली, नचिकेत जोग यांची संहिता, तुम्हाला अगदी पहिल्याच प्रवेशापासून एका अनोख्या जगात घेऊन जाईल. कार्यक्रमाचे नाट्य दिग्दर्शन केले आहे हेमांगी वाडेकरने तर यातील युवा विभागाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन केले आहे नव्या पि ढीचे कलाकार, चैतन्य कर्वे, राधिका गोसावी, अभिराम वाडेकर आणि ऋचा वाडेकर यांनी. तसेच मुकंुद मराठे, विजय केंकरे, सुकन्या कुलकर्णी मोने, आणि निपुण धर्माधिकारी यांनीही वेळोवेळी मोलाचा सल्ला दिला आहे.
अनिता: कार्यक्रमाचे संगीत वैशिष्ट्यपूर्ण असणारच…
निर्मलताई: निश्चितच! कार्यक्रमातील बहुतांश गाणी नवीन आहेत. ती लिहिली आहेत नचिकेत जोग यांनी तर संगीतबद्ध केली आहेत आमोद कुलकर्णी यांनी विवेक दातार आणि आनंद कर्वे ही गाणी बेएरियातील गुणी कलाकारांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करीत आहेत आणि त्यांच्यावर संगीताचे संस्कार पुण्यात होत आहेत. भारतीय संगीताला पश्मी बाज चढलेल्या या गाण्यांतून तुम्हाला शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, चित्रपट-संगीत, ताल वाद्य, नृत्याचे बोल या सगळ्यांचा आस्वाद घेता येईल.
शीतल: कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे यातील नृत्ये! त्याबद्दल काही सांगाल?
निर्मलताई: रंगमंचावरील माझी सुरुवात गुरु पार्वती कुमार आणि गुरु रमेश पुरव यांच्या दिग्दर्शनाखाली गाजलेल्या “दुर्गा झाली गौरी” या नृत्य नाट्याने झाली. सुलभाताई आणि अरविद देशपांडे, विजया मेहता, दामू केंकरे यांच्याकडून मी रंगमंचीय सादरीकरणाचे विविध पैलू आत्मसात केले. या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी स्वत:ची अभिव्यक्ती विकसित केली आहे. माझे नृत्य दिग्दर्शन हे कथेशी निगडित असते. लोकनृत्य, चित्रपट नृत्य, semi classical and contemporary यांच्यावर आधारित असलेल्या रचनांद्वारे मी ही कथा वैविध्यपूर्ण रंगांत सादर करणार आहे. कलाकारांच्या वेशभूषेवरही आम्ही विशेष मेहनत घेत आहोत.
अनिता: नेपथ्य आणि प्रकाशयोजना हे अशा संगीतिकांना एका वेगळ्याच स्तरावर नेतात…
निर्मलताई: कलाकृतीला पोषक असे नेपथ्य कसे असावे, याचे शिक्षण मला प्रदीप मुळे यांच्याकडून मिळाले. याही कार्यक्रमात ते सल्लागार म्हणून सामील आहेत. पंचम स्टुडिओच्या मुक्तक मावळ Interactive LED च्या साहाय्याने अचंबित करणारी खास प्रकाश योजना आखीत आहेत. बेएरियाला साजेल असे आधुनिक तंत्रज्ञान वापरून आयोजित केलेले लक्षवेधक नेपथ्य आणि आकर्षक प्रकाश योजना प्रेक्षकांच्या पसंतीला नक्कीच उतरतील.
शीतल: बृ. म. मं वृत्त विभागाकडून तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या चमूला अनेकोत्तम शुभेच्छा!
निर्मलताई: खूप खूप आभार! या आधी १९९९ साली झालेल्या अधिवेशनात ‘खेळ मांडियेला’ या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन करण्याची तर २०१७ साली झालेल्या अधिवेशनात ‘शक्ति रूपेण’ ही कलाकृती सादर करण्याची संधी आम्हाला मिळाली होती. या वेळी वय-वर्षे १०-६० मधील शंभराहून अधिक कलाकार ‘ड्रीम्स UNLIMITED’ हा शुभारंभाचा कार्यक्रम रंगतदार आणि स्मरणीय करण्यासाठी झटत आहेत. विजया मेहता, गुरु पार्वतीकुमार, अरवि द आणि सुलभा देशपांडे यांच्याकडून मला मिळालेली तालमीतील शिस्त, तेही अंगी बाणवित आहेत. तुमच्यासाठी स्वप्नांची “बेफाम भरारी घेऊन आम्ही येत आहोत, तेव्हा तुम्हीही आमच्याबरोबर स्वप्नांच्या दुनियेत सफर करायला जरूर या.
अनिता कांत, सॅन रमोन
Anita.kant@bmmonline.org
शीतल रांगणेकर, लॉस अजँेलिस
Sheetal.Rangnekar@bmmonline.org
“हि मुलाखत बृहन महाराष्ट्र वृत्तात प्रदर्शित झालेली असून वृत्त संपादक समितीच्या सौजन्याने येथे पुन्हा प्रदर्शित करत आहोत."