कुळ कायदा : भाग -२ (३२ ग ची प्रक्रीया व ३२ म चे प्रमाणपत्र)

Submitted by कायदेभान on 22 June, 2024 - 09:18

३२-म चे प्रमाणपत्र.

कुळाला दिले जाणारे ३२-म चे प्रमाणपत्र म्हणजे एका अर्थाने ते खरेदीखतच आहे. आपण कुठलिही मिळकत विकत घेतल्यास त्याचा दस्त नोंद होतो व सोबत इंडेक्स-२ मिळतो. या दोन कागदांना एकत्रीतपणे आपण खरेदीखत म्हणतो. या दस्तान्वये आपल्याला मिळकतीची मालकी प्राप्त होत असते. कुळाच्या केस मध्ये मात्र असल्या प्रकारच्या खरेदीद्स्ताने मालकी हक्क हस्तांतरीत होत नाही. त्याची प्रक्रिया खलील प्रमाणे आहे.

३२-ग चा अर्ज व प्रक्रीया
मुळात जो कुळ कृषक दिनी एखाद्या जमिनीत ताबेदार होता व कुळ म्हणून कसत होता तो ०१.०४१९५७ रोजी मानीव खरेदीदार झाला असे कायदा मानतो. थोडक्यात त्या दिवशी मुळ मालकाचा मलकी हक्क संपुष्टात आलेला असतो. परंतू गडबड ही आहे की, कुळ जरी मानीव मालक बनला तरी ७/१२ सदरी स्वत:चे नव घालण्याचे काम राहुन गेलेले असते किंवा ते कसे घालावे हे माहित नाही. त्यामुळे आजही अनेक लोकांचे ७/१२ काढुन पाहिल्यास असे दिसते की कुळाचे नाव इतर हक्कात आहे आणि भोगवटादार (म्हणजेच मालक) सदरी मूळ मालकाचे नाव दिसते. मग याला काढून कुळाचे नावे भोगवटादार सदरी लावायची प्रक्रीया काय? ती प्रक्रिया म्हणजेच ३२-ग चा अर्ज व त्या अतंर्गत योग्य तो तपास करुन मुळ मालकाला शासकीय नियमा प्रमाणे मोबदला देऊन त्याचे हक्क संपुष्टात आणणे होय.

याची एकुण प्रक्रिया कशी असते?
कुळ किंवा कुळाच्या वारसानी आज रोजी म्हणजेच चक्क २०२४ मध्ये सुध्दा तहसिलदार यांचे कडे ३२-ग चा अर्ज दाखल करुन अशी मागणी करु शकतात की माझे अजोबा/पणजोबा हे अमूक एका जमिनीत कुळ होते. कृषक दिनी त्यांचा ताबा असल्याचे कागदो पत्री दिसते आहे. पण त्यांनी आपले नाव ७/१२ सदरी भोगवटादार म्हणून लावले नाही. ते मानीव खरेदीदार असल्या कारणे तो हक्क वारस म्हणून आम्हास प्राप्त झाला. सबब, आमची वारस नोंद करावे आणि मूळ मालकास ७/१२ वरुन कमी करण्य़ात यावे असा अर्ज द्यावा. त्यावर योग्य ती चौकशी करुन तहसिलदार साहेब नोटीस बजावतात. योग्य मोबदला ठरवतात. तो मोबदला मुळ मालकाच्या वारसाना देऊन पावती घ्यावी. एवढं केलं की ३२-ग ची प्रक्रीया संपते.

३२-म चे प्रमाण पत्र
कुळ किंवा कुळाच्या वारसाने वरील अर्ज देऊन, नोटीसी बजावून मुळ मालक किंवा त्याच्या वारसाना मोबदला दिल्याची पावती घेतली किंवा ते मोबदला घेत नसल्यास (कारण हा मोबदला अगदीच नाममात्र असतो) ती रक्कम तहसिलदार यांचेकडे जमा करणे अथवा चलान घेऊन ट्रेजरीत भरणे. एवढे केले की कुळ किंवा त्यांचे आजचे जे वारस आहेत त्यांना ३२-म चे प्रमाण पत्र तहसिलदार साहेब देतात. हे प्रमाण पत्र म्हणजेच कुळ किंवा त्याच्या वारसानी योग्य ती कायदेशीर प्रक्रीया पार पाडून कुळाची जमीन स्वत:च्या नावे करुन घेतल्याचा पुरावा आहे. थोडक्यात ३२-म चे प्रमाण पत्र हे एका अर्थाने खरेदीखतच आहे.

७/१२ सदरी नोंद
एकदा का तुम्हाला म्हणजेच कुळ किंवा कुळाच्या वारसाना ३२-म चे प्रमाण पत्र मिळाले की ते तलाठ्याला देणे. तलाठी त्या प्रमाणे पत्राद्वारे जमिनीच्या ७/१२ मधील मुळ मालकाचे नाव कमी करुन कुळ किंवा त्यांच्या वारसांची नोंद घालतो. आणि कुळाचे वारस सदर जमिनीचे मानीव मालक तर होतेच पण या क्षणा पासून ते ७/१२ सदरी सुध्दा मालक या रकान्यात भोगवटादार म्हणून नोंदविले जातात.

पुढच्या भागात: कुळाला बेदखल करण्याची तरतुद व प्रक्रीया

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खटले किंवा दावे कोणत्या प्रकारचे असतात आणि निकाल लवकर न लागण्यात काय अडचणी येतात?>> कुळ कायद्याचे निकाल लवकर लागतात. तहसिलदार व प्रांत यांचे कडे प्राथमिक दावे चालतात. तिथे ६ महिन्यात निकाल लागतात. पण पुढे रिव्हिजन मात्र एम.आर.टी. मध्ये करावी लागते. तिथे मात्र उशीर लागतो.

पण वकिल जर हुशार असेल तर मात्र लवकर तारखा लावून निकाल घेता येतो.