निबंध

Submitted by संप्रति१ on 24 May, 2024 - 09:24

महोदय,
तुमच्या निबंधलेखन स्पर्धेची जाहिरात वाचनात आली. त्यामध्ये भाग घेण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून 'रस्ते अपघात' या विषयावरील एक निबंध सोबत पाठवत आहे. तो तुम्ही स्पर्धेसाठी विचारात घ्यावा, ही विनंती.

मध्यरात्र ही लोकांनी रस्त्यांवर फिरण्यासाठी नसते. ती वेळ स्पोर्ट्स कारमध्ये बसून रेसिंग करण्यासाठी असते. दिवसभर लोक त्यांच्या खटारा गाड्या घेऊन धुळीसारखे चिकटलेले असतात रस्त्यांवर. किमान रात्री तरी रेसिंगसाठी रस्ता मोकळा नको का ठेवायला?
आणि काय सगळ्यांनी दारू दारू लावलं आहे? अहो, आयुष्य ही सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे. आणि सेलिब्रेशनच्या संधी वारंवार प्रकटतच असतात. एंजॉयमेंट म्हटली की पेय आलंच. त्यामुळे मझा येते. चित्तवृत्ती अतितरल होतात. सगळं पायाखाली तुडवावंसं वाटतं. इंद्रियं सिकंदराच्या घोड्यासारखी फुरफुरू लागतात. स्पोर्ट्स कार्स तुफान उधळतात. समोरचा खुला रस्ता आवाहन करत असतो की ये सुसाट आणि कर माझ्यावर बलात्कार.! मझा येते, महोदय..!

भरधाव शरीरांवरून गाड्या जातात. शरीरं कधी रस्त्याला चिकटतात. किंवा कधी फुटबॉलसारखी उडून अंतरिक्षापलीकडे झेपावतात. त्यात कोंडलेले आत्मे मुक्त होतात. दुःख होतं. काय करणार. कोलॅटरल डॅमेज..! जीवन-मरणाचं चक्र आहे. इथे कुणी मरणारा नाही आणि कुणी मारणारा नाही. सगळं मायाजाल आहे हे.

या मायाजालात ज्याची त्याची भूमिका ठरलेली असते. लोकप्रतिनिधींचीही एक भूमिका असते. ते ती निभावतात. चोवीस तास जनसेवेत मग्न असतात. त्यासाठी ते जागेच असतात रात्र रात्रभर. कुठं, कधी, कुठल्या क्षणी जनहित धोक्यात येईल सांगता येत नाही. अखंड सावधचित्त असावं लागतं. डोळ्यांत तेल घालून लोकांच्या योगक्षेमाची काळजी वहावी लागते. जीव तळमळतो, पोखरतो काळजीनं. काय करणार, कुणाला सांगणार!
'हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले' असं व्रत घेतलेलं असतं. फोन येतात रात्री बेरात्री. जावं लागतं कोतवालीत.

कुणी विचारेल की कशासाठी ? काय प्रयोजन असतं एवढ्या धावत पळत जाण्याचं?
अहो, असं कसं म्हणता तुम्ही? सगळं कायद्याप्रमाणे नीट होतंय की नाही ते बघायला लागतं तिथं जाऊन.
अधिकाऱ्यांना सांगावं लागतं की कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई करा. अधिकाऱ्यांना तसं सांगितलं नाही तर ते कदाचित कायद्याप्रमाणे योग्य कारवाई करणार नाहीत. आणि कायद्याप्रमाणे योग्य कारवाई केली नाही तर त्यातून मग अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांना सांगावं लागतं की बाबांनो कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई करा. लोकप्रतिनिधींकडून वरिष्ठांकडून सांकेतिक खाणाखुणा झाल्यावर अधिकाऱ्यांनाही कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्याचा हुरूप मिळतो. संवेदनशील कर्तव्यदक्ष मनास आधार मिळतो.

आता कायद्याप्रमाणे योग्य कारवाई म्हणजे नेमकं काय, याची व्याख्या लाखो लोक लाखो पद्धतीने करू शकतात. कुणी विचारतं की कुणी किती माल हबकला? कुणी किती माल घशाखाली सोडला, की ज्यामुळे हा सिकंदर पंधरा तासांत पाकसुरत निसटला. सगळ्या व्यवस्थेच्या हाती कंदील देऊन राजरोस पसार झाला?
परंतु या अशा चिल्लर गावगप्पांना काही अर्थ नसतो. त्याच्यावर काही आपलं नियंत्रण नसतं. लोकशाही आहे. लोक बोलत राहतात. हजार जण हजार तोंडांनी बोलतात. कुणाकुणाचं तोंड धरणार? आपण आपलं कर्तव्य सचोटीनं करत रहायचं. आपली नियत साफ असली की झालं.

आरोपीला पिझ्झा बर्गर कुणी दिला का दिला असंही विचारतात. असंय की कितीही महागडी पेयं असली तरी धुंदी काही अनंत काळ टिकत नाही. ती उतरतेच. तशी ती उतरली की भूक लागते माणसाला. मुरडा पडतो पोटात. परंतु भूक लागली म्हणून काय मेथीची भाजी किंवा वडापाव खावा की काय? ड्रॅगन राईडर्स असलं घासफूस खात नसतात. सुपरमानवी शरीरांना असल्या दलिंदर पदार्थांची सवय नसते. ज्यावर त्यांच्या देहांचा पिंड पोसलेला असतो, तेच पदार्थ त्यांस उपलब्ध करून देणे उचित. ते नीतीला धरून आहे.
म्हणून कुणीतरी दिला असेल पिझ्झा वगैरे. त्यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे? काही दया करूणा माणुसकी वगैरे आहे की नाही तुम्हा लोकांना?

बाकी मग, एवढं हिणकस कांड झालं तरी कुठंच काही चर्चा नाही म्हटल्यावर लोक सोशल मीडियावर घटना व्हायरल करायला लागले. त्यातून साहजिकच जनमाणसांत एक उत्तेजना निर्माण झाली. जनभावनेस एक उकळी फुटली. पब्लिक आऊटरेज की काय म्हणतात तो उत्पन्न झाला.
त्याची चाहूल लागताच महान मेनस्ट्रीम मिडीया खडबडून जागा झाला आणि टुणकन उडी मारून या प्रकरणात पडला. टीआरपी साठी ही एक अत्यंत फिट केस असल्याचा त्यांना वास लागला. असंही इलेक्शनचा निकाल लागेपर्यंत वेळच वेळ आहे हाताशी. त्यातच नशीबाने हे प्रकरण चांगलं सापडलं. देवच पावला म्हणायचं.

आणि मग आता हे पब्लिकच्या डोळ्यावर आलंय, लगेच काही रफादफा होण्यासारखं नाही हे लक्षात आलं असावं संबंधितांच्या. मग आता काय करावं? डॅमेज कंट्रोल कसं करावं? लाईन ऑफ ॲक्शन काय ठेवावं? नंतरच्या गोष्टी नंतर बघता येतील. पण
जनमानसात निर्माण झालेल्या रोषाला, बदल्याच्या भावनेला ताबडतोब एक वाट करून द्यावी लागणार. कशी द्यायची?

ओळीनं पत्रकार परिषदा, बाईट्स यायला लागतात. एक वॉटर-टाईट केस उभी करण्याचे दावे सुरू होतात. प्रारंभीच्या निष्काळजीपणाची 'चोकसी' करण्याच्या घोषणा होतात. इकडे तिकडे बुलडोझर फिरायला लागलेले दिसतात. पब्जच्या दारांवर चिकटपट्ट्या दिसू लागतात. बदल्या, निलंबनं, राजीनामे वगैरे नेहमीची रूटीन प्रोसिजर आहेच. ते प्रोटोकॉलप्रमाणे होईलच. परंतु हे अजून किती एस्कलेट होईल याचा अदमास घेऊन, अंगलट येण्याच्या शंकेच्या तीव्रतेनुसार आणखीही यंत्रणा सक्रिय कराव्या लागू शकतात येत्या काळात. आणि हितसंबंधांच्या या विलक्षण साखळीची साधी झलकही मिळवणं, माझ्या छोट्याशा मेंदूच्या आवाक्याबाहेरचं आहे.
म्हणून मी इथेच थांबतोय महोदय. तीनशे शब्दांची मर्यादा मजकडून ओलांडली गेली आहे, याची मला जाणीव आहे. त्यामागे माजुर्डेपणा नसून, भावनेच्या भरात ते तसं झालेलं असावं. मऊ काळजाचे परीक्षक हा मर्यादाभंग समजून घेतील, अशी मला आशा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान उपहासात्मक निबंध !
यामुळे रात्र-वाहतुकीवर चांगले निर्बंध येतील अशी अपेक्षा

उपहासातून चीड दिसली.
निबंधाच्या ओळी या अपघातग्रस्त मृतांची संख्या गुणिले शंभर या प्रमाणात असाव्यात.

उद्या शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांनी मुलांना निबंध लिहून आणा म्हणून सांगितले तर मुलं काय लिहीतील ?
मी अपघात केला नाही, मी निबंध लिहीणार नाही.

डोकं सुन्न होईल असे एक एक खुलासे रोज होत आहेत.

उपरोध पोहोचला... तूम्ही आम्ही फक्त व्यक्त होऊ शकतो.
योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे पण ती कितपत पुर्ण होईल ही पण शंका आहे.

आणि काय सगळ्यांनी दारू दारू लावलं आहे?
>>>>>

प्रॉब्लेम हाच आहे. असा अपघात झाल्यावर आपण दारू दारू करतो. इतरवेळी नाही.

>>
सगळ्या व्यवस्थेच्या हाती कंदील देऊन राजरोस पसार झाला?>>>
सगळंच विषन्न करणारं...
व्यवस्थेचे कर्तेधर्ते आपणच आहोत...माणसात अमुलाग्र बदल हे एक दिवास्वप्न आहे.

रोज नवनवीन गोष्टी बाहेर येत आहेत... यात अजून किती सर्वसामान्य भरडले जाणार आहेत देवजाणे! आणि दारुचं म्हणाल तर आम्ही घरीच मुलांबरोबर घेतो हे सांगणं भूषण आणि कॉमन झालेलं आहे.
पुण्यात वहातूक हा विषय दहशतवाद या शब्दाचा समानार्थी शब्द बनलेला आहे. फार वाईट वाटतं!

सर्व भीतीदायक चालू आहे.'दारू पिणे' या विषया पेक्षा दारू पिऊन कॅब करण्यात लाज वाटणे/दारू पिऊन ड्रायव्हर ला गाडी चालवू देण्यात पुरुषार्थ अपमान वाटणे/दारू पिऊन ड्राईव्ह करणाऱ्या लोकांना हॉटेल बाऊन्सर्स ने न थांबवणे(थांबवून तसेही ऐकणार नाहीत/स्वतःला शरम आणि नैतिक चाड नसणे असे बरेच मुद्दे आहेत.नुसती दारू बंद करून, पब ला तात्पुरती कुलपं लावून नंतर डबल हफ्ता वसूल करून परत कुलपं उघडू देऊन होणार नाहीये.
लोकांनी स्वतःच्या खर्चाने वाटेल तितकी दारू प्यावी.घरी कोणाबरोबर वाटेल तितकी दारू प्यावी.पण दारू पिऊन स्टीअरिंग/बाईक चे हँडल/कोणतीही मशिनरी न चालवण्याचे उपकार समाजावर करावेत.