वारी

Submitted by प्रतिक रमेश चां... on 29 April, 2024 - 07:43

ही झोपमोड अटळ होती. कारण टाळ-मृदंगाचा आवाज आणि हरिनाम हे काही रोज-रोज ऐकू येत नाही. डोळे किलकिले करत मोबाईल बघितला - पहाटे ४ च्या आसपास. आमच्या गॅलरी मधून सोलापूर हाय-वे साफ दिसतो. इंद्रायणी काठी स्नान करून दिंड्या-पताका याचा दिशेने येत होत्या. नंतर उजाडले तेव्हाच जाग आली. तोच सौ. चा आवाज “अहो आवरा लवकर, ती लोकं यायची वेळ झालीये.” अर्धा-पाऊण तासांत जिकडं-तिकडं करून खाली पार्किंग मध्ये आलो. कमिटी मेंबर्स वारकरी वेशात घोळका करून उभी. वेष च तो. आपण वाघाची कातडी पांघरली म्हणून काय आपण वाघ होत नाही. चेयरमन साहेबांनी राजगिरा लाडू, उपवासाचा चिवडा, केळी इत्यादी-इत्यादी जिन्नसांचा तोबरा भरून वारकऱ्यांची स्वागताची सोया उत्तम असल्याचा निर्वाळा दिला. स्थानिक भावी पंतप्रधानांनी चहा पिऊन त्यांस फुर्रर अनुमोदन दिले. कैक वर्ष जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज आणि माऊली श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी याच मार्गाने पांडुरंगाच्या दिशेने रवाना होते आणि त्याच साठी स्वागत अट्टाहास.

ठरल्या प्रमाणे १०० वैष्णव आमच्या सोसायटीत आले. काही वेळ माउलींचा विसावा इथेच होता. आम्ही माणसं वाटून घेतली. माझ्या वाटेल ६-७ जण आली. वर घरी घेऊन आलो. हो-नाही करत सगळ्यांनीच नाश्ता केला. ओळख करून घेण्यात कळलं की त्यांच्यातील एका आजी-आजोबांच्या एक-एक डोळ्यात मोती पडला होता. आजोबा सांगत होते “६ एक महिन्यापूर्वी डोळ्यांचं ऑपरेशन करायचं म्हणून मुलगा पुण्यात घेऊन आला. एके दिवशी आळंदी ला घेऊन आला. दर्शन झाल्यावर म्हणाला तुम्ही इथेच बसा मी तुमच्या साठी ज्युस घेऊन येतो. तो जो गेला तो आतापस्तुर आला नाही. तो आम्हाला सोडून गेला का त्यानं आम्हाला सोडलं हे आजवर आम्हा म्हातारा-म्हातारी ला ठावं नाय. पण कोणाचं नशीब त्याला कोणाच्या दारापुढं उभा करत याचा हिशेब वर त्याच्या कड असतुया. पोरांना सोडलं त्याच्या तिसऱ्याच दिसी मंदिराकडची माणसं आली. म्हणाली, माऊलीची पालखी निघणार हाय ६ महिन्यानंतर, देखभाली साठी मदत करणार का?” शेजारी आजीबाई असावं टिपत होती. प्रसंगावधान दाखवत हिने ओटी भरण्याचा कार्यक्रम हाती घेतला. मी पण पुरुषमंडळींना आहेर केला. तेवढ्यात पाऊस आला. मी सर्वाना थोड्या वेळाने निघण्याची विनंती केली. लागोलाग आजोबा म्हणाले, “नगं रे बाबा, ह्यो पाऊस म्हंजी त्याचा सांगावा हाय. आता निघाया पाहिजी”. निर्मात्याने माझ्या दीड वर्षाच्या मुलाच्या मेंदूत काय भरले असेल त्याच त्याला ठाऊक पण इतक्या वेळ चकार शब्द न काढलेलं लेकरू “आबा” म्हणलं. म्हातारीला अचानक भरून आलं. तिने त्याला आपल्या छातीची कवटाळून पापा घेतला अन कुठूनशी २० ची एक नोट काढून पोराच्या हातात कोंबली. नोट मळकी पण ओली होती.

मोजून दीड तासांचा हा विसावा. मग शिलेदाराने परत एकदा मोजदाद केली. बरोबर १००! त्याने “चला माऊली” अशी हाक देताच हरिनामाचा एकच गजर झाला. अचानक हाय-वे वर गर्दी वाढली. अलोट गर्दी. किती असेल? हजार? लाख? शासन सुद्धा मोजण्याच्या भानगडीत पडत नाही. बरं या गर्दीत कोण नाही?. अगदी आईच्या अंगावर असणारे बाळ पासून काठी टेकवत चालणाऱ्या व्यक्ती, बाया-माणसं, शिकलेले-अडाणी. या सर्वांमध्ये एकच बाब कॉमन, ते सगळे एकशिस्थ होते. कुठेही गडबड गोंधळ नाही न बेदरकारपणा नाही. ओठांतून पडणारा एक-एक शब्द कसा एकसूर-एकताल-एकबद्ध. एवढा मोठा जनसमुदाय एकच नामघोषात, एकच दिशेने, एकच आशेने मार्गक्रमण करण्याची नोंद जगाच्या पाठीवर या व्यतिरिक्त कोठेही नाही. या वारकऱ्यांना आता इथून पुढे २०० कि.मी. पुढे पायी चालत जायचे आहे. पावसात!! भीती नाही वाटत? भूक नाही लागत? झोपायचं कुठे? बरं हे जे जातायत त्यांच्या सगळ्यांचे मुख दर्शन होणारे का खरंच? मुळात जातात का? नाही-नाही या प्रश्नांचे उत्तरे पाहिजे असतील तर या जन्मी एकदा तरी वारी करावीच हे म्हणतात ते खरंच. आणि एवढं करून नाहीच भागलं तर तो आहे न...उभा आहे तिथे.
आता रस्त्यावरील सगळ्यांच्या माना एकच दिशेने वळाल्या, स्तब्ध, निशब्द, वातावरण एकदम मंतरलेलं, हात एकटवलेले. “आली-आली” पुटपुटत आम्ही पण पुढे सरसावलो. 'जगद्गुरू' 'माऊली' पादुकास्पर्श झाला!! सुखावलो. ३ तास झाले, पण पादुकास्पर्श झालेल्या हाताला सुगंध तसाच आहे. आज मी हाथ धुणारचं नाही असं ठरवलंय. आमच्या एरियातून पालखींच्या वाटा वेगळ्या होतात. भेट मात्र पंढरपुरताच. आपल्याला पण शेवटी तिथेच जायाचं, वाटा तेवढ्या वेगळ्या.

|| जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल ||

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हृद्य! मी विठुरायाच्या अनेक वाऱ्या जन्मापासून पहिल्या आहेत. अद्वैत मानतो, पण असे सुंदर, मानवी भावनांचे वारी वर्णन प्रथमच वाचले.

चटका लावून जाणारी अनुभूती...! खूप छान शब्दबद्ध केलीत..!! आमच्या घरी माझ्या जन्मापासून पंढरीची वारी सुरु झालेली ती आजतागायत सुरू आहे... त्यामुळे वारीच्या सोहळ्यात सामील झाल्यासारखे वाटले.. Happy

वारक-यांचं आदरातिथ्य करण्यात केवढी कृतकृत्यता, धन्यता... म्हणूनच तुकोबा म्हणतात
अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति |
मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ||1||

पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं |
न मागे न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ||धृ||