शो मस्ट गो ऑन

Submitted by प्रतिक रमेश चां... on 19 March, 2024 - 02:44

‘. . . it was really nice working with you guys.’ मेल ची शेवटची लाईन टाईप करून त्याने ‘Draft’ सेव्ह केला. आज ऑफिस ला गेल्या गेल्या मॅनेजर च्या तोंडावर ‘Resign’ फेकून मारायचं असा विचार करून नीरज ने बाईक स्टार्ट केली. इतक्या दिवस ‘मी रिजाईन का करू?’ असा विचार करणारा ‘मी रिजाईन का करू नये?’ या प्रश्नाच्या उत्तरादाखल गाडीचा एक-एक गियर टाकत होता आणि प्रत्येक ब्रेक सोबत एक कचकचून शिवी हासडत होता. कारण काय तर वर्क प्रेशर, मॅनेजर चे बोलणे, वीकेंड ला मिटींग्स व काम, त्यामुळे बिघडलेला ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ आणि या सर्वांमुळे आलेले ‘Frustration’. पण आज एवढं चिडण्याचे कारण निराळंच होत. आज नीरजच्या लग्नाचा वाढदिवस. आपला हा पंचवार्षिक सोहळा बायकोसोबत साजरा करण्याचा बेस्ट प्लॅन त्याने तयार केला होता. बरं बायकोच्याही १५ दिवस आधी त्याने तो मॅनेजरला सांगितलेला. कारण, ऐन वेळेला ‘कॉल’ नको. पण काळ संध्याकाळी माशी शिंकलीच. ‘Client Demo’ च्या नावाखाली उद्या ऑफिस ला बोलावणं आलं. बरं, याने हाफ डे साठी विचारणा केली तर मॅनेजर ने उलट रोजच्या वेळेआधी हजार हो असं फर्मान सोडलं. गाडी आणि विचार ऑफिस पार्किंग मध्ये येऊन थांबले.

‘Punch-in’ करून जागेवर जाताना हळूच मॅनेजर च्या केबिन मध्ये त्याने डोकावले. नव्हता आला अजून. खुर्चीवर बसणार तोच पाठीवर धप्पा! कोण? ‘अरे भाई आज चक्क आमच्या टाईम आलास! क्या बात है?’ मग त्याला काल च गुऱ्हाळ ऐकवलं. ‘चलता है रे इतना टेन्शन नही लेने का’ अशी दर्पोक्ती सोडून राहुल केसरकर त्याच्या डेस्क वर गेला. या राहुल्याच काय जातंय असं म्हणायला. याच सगळं सेट आहे. १० वर्षे बाहेर राहून मस्त छापून आलाय आणि इथं मला शहाणपणा शिकवतोय. २०-२५ मिनिटं अशीच गेली. अचानक काहीतरी आठवून नीरज ने राहुल्याला हाक मारली. ‘अरे तुझ्या टीम मध्ये १ महिन्यापूर्वी एकजण जॉईन झाला होता ना, तो पोरगा कुठाय? बरेच दिवस झालं दिसला नाही कुठे. काय गेला का सोडून?’ राहुल पण हसला. खरं तर असं झालं देखील होत पूर्वी की जॉईन झालेला एम्प्लॉई १-२ आठवड्यानंतर कंपनी परस्पर सोडून गेलेला. एकदा तर असं झालं की एक जण जॉइनिंग फॉर्म भरता-भरता बाहेर एक चक्कर टाकून येतो म्हणाला, तो जो गेला परत आलाच नाही! ‘आनंद’ राहुल म्हणाला. ‘आनंद नाव आहे रे माझ्या नव्या टीम-मेट च आणि तो सोडून वगैरे नाही गेलाय.’ आणि अचानक त्याचा स्वर खोलात गेला. ‘अरे त्याच बाळ गेलं रे’.

‘गेलं? म्हणजे? गेलं म्हणजे गेलं’ राहुल ने वर बोट दाखवत इशारा केला. ‘तो आज लंच नंतर जॉईन पण होणार आहे.’ हातातल्या कपातील गरम कॉफी कानात ओतल्याच नीरज ला भास झाला. पुढे दोघांनाही काही बोलवेना. नीरजचं सहज घड्याळाकडे लक्ष गेलं. बोलण्याच्या नादात १० कधी वाजले कळलंच नाही. नीरज client demo ला गेला. demo मध्ये तो होताच कुठे पण! त्याला तर फक्त ‘आनंद’ दिसत होता. आनंद च पूर्ण नाव ‘आनंदम कृष्णमूर्थी’. अगदी नावाप्रमाणेच आनंदी कृष्णवर्णीय. जॉईन झाल्याच्या अगदी तिसऱ्याच दिवशी निम्मा स्टाफ त्याच्या खिशात होता. जॉइनिंग च्या दिवशी त्याने ऑफिसभर पेढे वाटले. दुसऱ्या दिवशी त्याच्या कडचा खास साऊथ इंडियन पदार्थ ‘पुट्टु’ लंच मध्ये पूर्ण टीम साठी आणला. त्याच्या हिंदी ला साऊथ इंडियन टच असल्यामुळे त्याच बोलणं ऐकायला नेहमीच मजा यायची. ‘. . . and thank you for joining folks.’ demo मध्ये मॅनेजर च समारोप वाक्य झालं तरी नीरज काही थाऱ्यावर नव्हता. लंच आणि त्यानंतर पार्किंग मध्ये अर्धा पाऊण तास फेर-फटका हा रोजचाच नित्यक्रम. पार्किंग मधून परत वर येताना त्याची नजर Nexon वर गेली. म्हणजे हा पठ्ठया खरंच जॉईन झाला तर. पायऱ्या चढतांना नीरजने डोक्याला जरा ताण दिला, बरोबर २२ दिवसांनी आनंद परतला होता. खुर्चीवर बसतांना त्याने पक्क ठरवलं, आनंद ला आज काहीच बोलायचं नाही. आजचा दिवस पार पडला कसातरी. पडला कसला, तब्बल २ तास लेट झाला ऑफिस सोडायला.

दार उघल्याच्या क्षणी ‘बाबा’ म्हणत त्याच्या २ वर्षाच्या गोळ्याने पायाशी लोळण घातली. खाऊ खाल्ल्याने झालेलं खरकटं तोंड, सर्दी मुळे शेवाळलेले नाक, नीरज ने तसाच त्याला उचलला. ‘चला आपल्याला भुर्र्र जायचं आई ला आवरायला सांग’. त्याने बायकोला हाक दिली. ‘तेजू, चल यावर पटकन, फार काही नाही पण जेऊन येऊ बाहेरून.’ बाहेर? ‘एकदा नाही म्हणल्यावर की काही येत नसते कुठे. हवं तर तुझ्या पहिल्या बायकोला, मॅनेजर ला घेऊन जा डिनर डेट वर.’ तेजू फणकाऱ्यात म्हणाली. साम-दाम-दंड-भेद. शेवटी तिला यावंच लागलं. ती आली खरी. पण, तिचा राग मात्र तसू देखील कमी झाला नव्हता. पण बायको म्हणून नवऱ्या मधला बदल तिने बरोबर हेरला. सकाळी हाच तिला ‘आज नोकरीचा शेवटचा दिवस.’ असं सांगून गेला होता आणि आता जेवताना demo बद्दल बोलतोय काय, कंपनी आणि मॅनेजर च कौतुक ते काय. घरी यायला उशीरच झाला तसा त्यांना. पोराला झोपवल्यानंतर न राहून तेजू ने नीरजला विचारलं ‘काय रे सकाळी ज्या तोऱ्याने निघाला होतास ते पाहून वाटलं नव्हतं आज जेवायला बाहेर घेऊन जाशील. दिवसभरात झालं काय असं?’ मग त्याने तिला आजचा पूर्ण ऑफिस क्रम वाचून दाखवला.

‘टी-टाईम पर्यंतचा वेळ कसाबसा ढकलला मी.’ नीरज पुढे सांगत होता. पण तितक्यात नीरज आणि आनंद ची नजरा-नजर झाली. त्या दिवशी नीराजला मानवी स्वभावातील अजून एक खासियत कळाली, आपल्याला नेहमी झाकलेल्या गोष्टींमध्येच रस फार. मन चिंती ते वैरी न चिंती. त्याने शेवटी विषयाला हाथ घातलाच आणि आनंद बोलू लागला. भावनेला भाषा नसते. आज नीरज ला कन्नड पण समजली असती. आनंद च लव्ह मॅरेज. लग्नाच्या ७ वर्षांनंतर गुड न्युज आली. त्याआधी नानाविध उपाय-उपचार केल्याचे तो सांगतो. परमात्म्याने संतती दान दिले पण ते अपुरे. बाळाच्या जन्मानंतर अवघ्या दीड वर्षांनी बाळाचा कॅन्सर थर्ड स्टेज ला असल्याचा रिपोर्ट आला. आनंद आणि त्याच्या बायकोसाठी ही एक अविश्वसनीय बाब होती. त्यानंतर त्यांनी आहे नाही ते सगळं पैसे बाळाच्या उपचारांसाठी लावले. देव संपले पण नवस संपले नाहीत. 'Chemotherapy'. ते प्रकाश किरण त्या एवढुश्या जिवाच्या शरीरावर पडताना डॉक्टरच्या सुद्धा हृदयाला पीळ पडत होता तिथे त्या आईची अवस्था न विचारणं योग्य. आपला पोटचा गोळा हा असा कणा-कणाने आपल्या पासून दूर होतोय हे ती आपल्या तुटलेल्या अंतःकरणाने पाहत होती. ‘अरे मग तू जॉईनच का झालास? या वेळी तुझ्या बायकोला सर्वात जास्त तुझी गरज आहे.’ नीरज ने विचारलं. आनंद म्हणाला ‘अरे बाळ गेलं त्या दिवसापासून तिने अन्नाचा कण घेतला नाही. पाण्याकडे पाहिलं देखील नाही. ५ दिवसानंतर ही पण आपल्याला सोडून जाते की काय असं वाटून गेलं एवढे तिचे हाल. मग १० व्याच दिवशी तिला या सगळ्या वातावरणातून इकडे घेऊन आलो. तिलाही जॉब आहेच. तिलाही बळजबरीने जॉईन करायला लावले आणि मी पण जॉईन झालो. परमेश्वराने एक सुख ओरबाडून नेलं, पण माझ्या आयुष्यातलं प्रेमच जर हिरवल गेलं तर कदाचित मीच जगू शकणार नाही आणि आज मी जर रडत बसलो तिने कोणाच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडायचं?’

नीरज चे थरथरणारे हाथ तेजू ने आपल्या हातात घेतले. त्याचे डबडबलेले डोळे तिने साडीच्या पदराने पुसले. ‘उद्देश, आनंदच्या आयुष्यात आपल्या बायकोसाठी जगण्याचा उद्देश आहे तेजू. त्याच्या प्रत्येक वाक्यानंतर मला एकच कडवं आठवत होतं, दुनिया में कितना ग़म हैं मेरा ग़म कितना कम हैं’ नीरज बोलायचं थांबला नव्हता. ‘आपल्या २ वर्षाचं लेकरू आपल्या समोर जग सोडून गेलं हे मनावरचं ओझं वाहणारा आनंद, त्याच्या सारखा लोहपुरुष माझ्या पाहण्यात नाही. तुला माहिते आहे तेजू आनंद जाताना मला काय म्हणाला, लाईफ इज ए शो अँड शो मस्ट गो ऑन.’ ‘आणि तो ‘Resign चा मेल?’ तेजू ने विचारलं. ‘तो? अगं मी ऑफिस पार्किंग मध्ये गाडी काढत असतांना Nexon वर आनंदच्या बाळाचं नाव वाचलं तेव्हाच डिलीट केला.’

-प्रतिक चांदगावकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय.

पण, २ वेगळ्या situations एकाच नजरेने पाहिल्या अस वाटलं मला... May be मा बु दो

छान.