पाकिस्तान - १

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 5 February, 2024 - 23:00

दरबार-ए-वतन में जब इक दिन सब जाने वाले जाएँगे
कुछ अपनी सज़ा को पहुँचेंगे, कुछ अपनी जज़ा ले जाएँगे
-फ़ैज अहमद फ़ैज
16 ऑक्टोबर 1951. कंपनी बाग, रावळपिंडी.
त्या दिवशी, लियाकात अली खान एक लाखाच्या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी मंचावर जात असताना आपल्या समोर संपूर्ण देश जमलेला पाहत होते. जे स्वप्न त्यांनी, मोहम्मद अली जिना, सुहरावर्दी, अल्लामा इक्बाल आणि इतर अनेकांनी एकत्र पाहिले होते. ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी एक पाकिस्तान.
पण पाकिस्तान हा शब्द कसा अस्तित्वात आला?
हजारो वर्षांपासून मुस्लिम भारतात राहत होते, पण त्यांच्या जिभेवर हा शब्द कधी आला नव्हता. खिलाफवेळीही मुस्लीम जगाची चर्चा झाली तरी पाकिस्तान हा शब्द आला नाही. लंडनमध्ये बसलेल्या चौधरी रहमत अली या तरुणाच्या मनात 1933 मध्ये पाकिस्तान हा शब्द पहिल्यांदा आला. हा शब्द एक पवित्र स्थान सूचित करतो का? पण मग उर्दू आणि संस्कृत शब्दांची ही सरमिसळ कशी झाली?
रहमत अलीनेही 'पवित्र स्थळा'चा विचार केला नव्हता. त्याच्या मते ते एक संक्षिप्त रूप होते. पंजाबमधून पी, अफगाणमधून ए (खैबर-पख्तून), काश्मीरमधून के, सिंधमधून एस आणि बलुचिस्तानमधून स्टॅन. नंतर लोकांना वाटले की बोलण्यासाठी मध्यभागी 'i’ टाकणे आवश्यक आहे, म्हणून पाकिस्तान शब्दाची निर्मिती झाली. पण बंगालचे काय? त्यांच्यासाठी कोणताही शब्द नव्हता. रहमत अली म्हणाले होते की बंगिस्तान (बंगाल) आणि उस्मानिस्तान (हैदराबाद) आणखी दोन मुस्लिम देश होतील.
मुस्लिम लीगने हे स्वीकारलं पण रहमत अलीला विशेष महत्त्व दिले नाही. नंतर फाळणीनंतर तो लवाजमा घेऊन नव्या पाकिस्तानात आला, तेव्हा त्याचं model स्वीकारलं गेलं नाही याचा त्याला राग आला. रागाच्या भरात त्याने कायदा-ए-आझम यांना ‘क्विसलिंग-ए-आझम’ म्हटले. (क्विसलिंग हा नॉर्वेजियन देशद्रोही होता जो नाझींमध्ये सामील झाला होता. हा शब्द नंतर लियाकत अली खान यांनी शेख अब्दुल्लासाठी वापरला होता.)
जाहीर आहे, रहमत अलीचं संपुर्ण बाडा बिस्तर हिसकावून घेण्यात आले आणि त्याला हद्दपार करण्यात आले. काही वर्षांनी लंडनमध्ये त्याचे निधन झाले. पाकिस्तान हा शब्द देणाऱ्याचे हे हाल झाले. आजारी असूनही कायदे आझम यांनी शक्य तितकी प्रशासनाची जबाबदारी पेलली. पण 1948 मध्येच त्यांचा मृत्यू झाला.लियाकत अली खान हे आता पाकिस्तानचे सर्वोच्च नेते होते. फाळणीनंतर पंजाबचे दोन तुकडे झालेल्या पाकिस्तानात पख्तून आणि बलुच लोकांना आपले स्वातंत्र्य हवे होते. बंगालींचा त्यांच्यावर लादलेल्या उर्दूशी काहीही संबंध नव्हता. आणि काश्मीर? नेहरूंवर जसा काश्मीर भारतात गमावल्याचा आरोप केला गेला, तसाच आरोप पाकिस्तानमध्ये लियाकत अली खान यांच्यावर नेहमीच केला जाईल.
त्यादिवशी कंपनीबागेत त्यांच्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या. पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधानाचा अंतं अशा प्रकारे खुलेआम झाला. देशाच्या संस्थापकाला देशवासियांना का मारावेसे वाटेल? होय! काश्मीर गमावल्याबद्दल लोकांमध्ये नक्कीच नाराजी होती. अगदी काही महिन्यांपूर्वी त्याच रावळपिंडीत एक कट रचला गेला, जिथे सत्तापालटाची योजना आखण्यात आली होती. मेजर जनरल अकबर खान, त्यांचे इतर काही लष्करी सहकारी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तानचे सरचिटणीस सय्यद सज्जाद झहीर आणि प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांच्यासह सर्व कटकारस्थान करनार्यांना अटक करण्यात आली.
क्रमशः
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, बऱ्याच दिवसांनी काही माहितीपूर्ण लेखमाला वाचायला मिळणार दिसते आहे. माझे आजोबा लाहोरचे. शेवटपर्यंत तिथल्या आठवणींवर जगले. मराठी मातीत रमले तरी मनानी पंजाबीच राहिले.

आमच्या कौटुंबिक आठवणीं मध्ये सतत डोकावणाऱ्या (पण आता परक्या झालेल्या) देशाबद्दल वाचायला आवडेल.

@अमरेंद्र बाहुबली>>>
भारत पाकिस्तानचा इतिहास हा आवडीचा विषय आहे. पण ही सिरीज दूर्लक्षित राहिली. आता वाचतेय. तुम्ही शिवधनुष्य पेलत आहात. त्याबद्दल शुभेच्छा. लेखमाला आवडतेय.

माझी खालची माहिती खूपच मोठी झाली आहे.
तुम्ही पुस्तकाच्या आधारे लेख लिहीता आहात. तुम्हाला जे सांगायचे आहे त्या अनुषंगाने माझी माहिती इरिलेवंट वाटली तर जरूर सांगा. ती उडवेन.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
फाळणीसाठा जबाबदार ठरलेले जिन्ना वैयक्तिक आयुष्यात आधुनिक आचार विचारांचे होते. इस्लामला निषिद्ध अश्या पोर्क व दारूचे सेवन करण्यात ते गैर मानत नसत. व सुरूवातीच्या काळात त्यांची कॉंग्रेसमधील कारकीर्द मध्यममार्गी व नेहरूंना समांतर होती. इन फॅक्ट ते मुस्लिमहिताकडे दूर्लक्ष करतात हा सनातनी मुस्लिंमाचा दावा होता.

कॉंग्रेसमधील त्यांच्या भ्रमनिरासामुळे ( ज्याला काही अंशी कारणीभूत त्यांची राजकिय महत्वाकांक्षाही होती) कॉंग्रेस सोडल्यावर ते तुष्टीकरणाच्या आहारी जाऊ लागले. कारण आता त्यांना आता अनुयायांची गरज होती.

भारताच्या फाळणीच्या वेळी जिन्ना असाध्य रोगाने (बहुतेक टीबी) ग्रस्त होते. त्यांचा अंतःकाल जवळ आल्याचे निश्चित होते व तसा रिपोर्ट ब्रिटीश गुप्तचर खात्याने सरकारला दिला होता. गांधीजींनाही या बाबत माहिती होती. आणि स्वातंत्र्यासाठी काही काळ थांबले तर इतिहास काही वेगळा घडेल अशी आशा बाळगण्यासारखी गोष्ट होती. अर्थात हे घडले नाही.

पाकिस्तानात क़ायदेआझम झाले असले तरी त्यांच्या ढासळत्या आरोग्याविषयी राज्यकर्त्यांना कल्पना होती. व त्यातून त्यांच्या राजकिय वारश्याविषयी तीव्र स्पर्धा निर्माण झाली होती. पाकिस्तानचा हा निर्माता अखेरच्या दिवसांत आरामासाठी ज़ियारत (क्वेट्ट्याजवळचे हिल स्टेशन) ला गेला होता. तिथून त्यांना कराचीला धाडण्यात आले तेव्हा त्यांच्या अँब्युलन्सबरोबर कुठलेही पोलिस प्रोटेक्शन नव्हते व पुरेसे पेट्रोलही नव्हते. भर दूपारी नॅशनल हायवेवर पेट्रोल संपून ही अँब्युलन्स बंद पडली तेव्हा दोन अडीच तास पेट्रोल मिळू शकले नाही व हा सर्व वेळ तळपत्या उन्हात बंद पडलेल्या अँब्युलन्समध्ये जिन्ना पडून होते. अखेर संध्याकाळी ते कराचीला पोहोचले तेव्हा तिथे डॉक्टरची सोयही नव्हती. सोबत असलेल्या फातिमा जिन्ना(बहीण) यांनी चक्रे फिरवली तेव्हा कुठे डॉक्टर बंगल्यावर पोहोचले. त्याच रात्री जिन्ना यांनी शेवटचा श्वास घेतला.
जिन्ना यांच्यावर फातिमा जिन्ना यांनी लिहिलेल्या पुस्तकात ही माहिती होती. परंतु त्या पुस्तकावर बंदी घालून ते रातोरात मार्केटमधून गायब करण्यात आले. फातिमा यांनाही राजकीय वजन होते परंतु त्यांना नामोहरम करण्याची यशस्वी मोहिम राबवली गेली. यामागे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली यांचा हात होता.

माझेमन जिन्हांचा अंतं ईतका वाईट झाला होता हे माहीत नव्हते. माहीतीबद्दल धन्यवाद, डायरेक्ट एक्शन डे दिवशी कलकत्त्यात मेलेले सुखावले असतील.

@मनिम्याऊ >>>> फाळणी ठरलेल्या निकषानुसार झाली असती तर तुमचे मनाने पंजाबी आजोबा सुखनैव तिथेच राहिले असते. कारण लाहोर ही शिखांची राजधानी होती. व लोकसंख्या हिंदू शिखांची जास्त होती.
पण लाहोर भारताला दिले असते तर दिल्ली व लाहोरच्या तोडीचे एकही शहर पाकिस्तानात नसते. क्वेट्टा, कराची, मुलतान वगैरे फारच छोटी होती. त्यामुळे फाळणी करतानाही लाहोर पाकिस्तानात ठेवून भारतावर अन्याय केला गेला.

@बाहुबली>>> नीटसं आठवत नाही पण फाळणी किंवा डायरेक्ट ऍक्शन डे विषयी पु. भा. भावे यांनी ऍक्चुअली बंगालमधे जाऊन केलेल्या रिपोर्ताजचे एक पुस्तक आहे. अतिशय हृदयद्रावक वर्णनं आहेत ती.