चंद्राद्वारे ज्येष्ठा चांदणीचे पिधान

Submitted by मार्गी on 3 February, 2024 - 07:22

५ फेब्रुवारीच्या पहाटे ज्येष्ठा चंद्राआड लपणार व परत दिसणार

✪ पिधान ह्या खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी
✪ नुसत्या डोळ्यांनी पहाटे हे दृश्य बघता येईल
✪ पहाटेच्या आकाशात शुक्र व मंगळ बघता येतील
✪ त्याबरोबर सप्तर्षी, वृश्चिक, स्वाती- चित्रा, अभिजीत, मित्र, अनुराधा आदि तारे, तारकासमूह बघण्याची‌ संधी
✪ M 7 आणि ओमेगा सेंटारी तारकागुच्छ बघण्याची संधी

सर्वांना नमस्कार. येत्या सोमवारी पहाटे म्हणजे ५ फेब्रुवारी २०२४ च्या पहाटे आकाशामध्ये एक खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी आहे. चंद्र जेव्हा एखाद्या ग्रहाला, लघुग्रहाला किंवा ता-याला झाकतो तेव्हा त्या अविष्काराला पिधान म्हणतात. ५ फेब्रुवारीच्या पहाटे साधारण ४:४६ वाजता ज्येष्ठा हा तारा चंद्रामुळे झाकला जाईल. झाकला जाताना तो चंद्राच्या प्रकाशित भागामागे गेलेला दिसेल आणि ५:५९ वाजता तो चंद्राच्या अप्रकाशित भागामागून परतही येताना दिसेल. त्यावेळीही पुरेसा अंधार असल्यामुळे त्याचे हे झाकले जाणे व परत बाहेर येणे दोन्ही नुसत्या डोळ्यांनी बघता येईल.

हे दृश्य पहाटेच्या आकाशात दक्षिण- पूर्व दिशेला बघता येईल. ह्यावेळी चंद्राची सुमारे २९% प्रकाशित कोर दिसेल. ज्येष्ठा तारा वृश्चिक तारकासमूहातला तेजस्वी असा लाल राक्षसी तारा आहे आणि नुसत्या डोळ्यांनी तो लालसर दिसतो. चंद्रामागे झाकला जाईपर्यंत चंद्राच्या तेजामध्येही तो दिसू शकेल. आणि बाहेर आल्यावर परत दिसू लागेल. बायनॅक्युलरसोबत हे दृश्य आणखी सुंदर बघता येईल. दिसत असलेला तारा अक्षरश: एका क्षणात नजरेआड होतो आणि काही वेळाने परत शून्यातून एकदम प्रकट होताना दिसतो असं हे सुंदर दृश्य असतं.


पिधान होण्याच्या आधी चंद्र व ज्येष्ठा साधारण असे दिसतील.

(माझ्या टेलिस्कोपमधून चंद्र- मंगळ पिधान बघण्याचा अनुभव इथे वाचता येईल व व्हिडिओ बघता येईल: http://niranjan-vichar.blogspot.com/2021/04/blog-post_18.html ब्लॉगवर माझे आकाश दर्शनाशी संबंधित लेखही वाचता येऊ शकतील. अशाच चंद्र व शुक्र पिधानाचा लेख इथे वाचता येईल: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/10/thrilling-experience-of-watc...)

चंद्र आकाशामध्ये आयनिक वृत्तानजीक दर तासाला साधारण अर्धा अंश पूर्वेकडे सरकत असतो. आयनिक वृत्तालगत असलेल्या ज्येष्ठा (Antares), चित्रा (Spica), विशाखा (Libra) अशा ता-यांना तो अनेकदा झाकत असतो. चंद्रामुळे अशा प्रकारे अनेक अंधुक तारे रोजच झाकले जात असतात. ज्येष्ठा तारा तेजस्वी असल्यामुळे चंद्रामुळे झाकला जाईपर्यंत तो स्पष्ट दिसेल. विशेष म्हणजे सूर्यापेक्षा हजारो पट आकाराने मोठा असलेला हा तारा आपल्यापासून ७०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे आणि तरीही तो इतका तेजस्वी दिसतो. आणि इतक्या अंतरामुळे आपण त्याला आज बघत असलो तरी हा प्रकाश ७०० वर्षांपूर्वी त्या ता-याकडून निघालेला असतो.

ह्यावेळी आकाशामध्ये इतरही खगोलीय ऑब्जेक्टस बघायची संधी आहे. पश्चिमेला मघा तारा (Regulus), पूर्वा व उत्तरा फाल्गुनी (Denebola) नक्षत्रातले तारे दिसतील. उत्तर पश्चिमेला मावळतीला आलेले सप्तर्षी (Ursa Major) दिसतील. साधारण डोक्यावर तेजस्वी स्वाती तारा (Arcturus) व किंचित दक्षिणेकडे तेजस्वी चित्रा तारा (Spica) दिसेल. ज्येष्ठाच्या पूर्वेला अनुराधा नक्षत्रातले (Beta Scorpii) तारे दिसतील. आकाश स्वच्छ असेल व प्रकाश प्रदूषण नसेल तर ज्येष्ठाच्या पूर्वेला मूळ नक्षत्रालगतचा तेजस्वी तारकागुच्छही (M 7) दिसेल. त्याबरोबर दक्षिणेकडे ओमेगा सेंटारी (Omega Centauri) हा बंदिस्त तारकागुच्छही बायनॅक्युलरच्या मदतीने बघता येऊ शकेल. त्याशिवाय दक्षिण क्षितिजालगत मित्र व मित्रक तारे (Alpha and Beta Centauri) आणि त्रिशंकू तारकासमूहही (Crux) नुसत्या डोळ्यांनी बघता येऊ शकेल. मित्र म्हणजे अल्फा सेंटारी हा पृथ्वीला सूर्यानंतरचा सर्वांत जवळ असलेला 4.3 प्रकाशवर्ष अंतरावरचा तारा आहे. त्याशिवाय पूर्वेला अभिजीत (Vega) हा तेजस्वी तारा क्षितिजालगत दिसेल. चंद्राच्या थोडं पूर्वेला तेजस्वी शुक्र आणि उजाडण्याच्या थोडं आधी पूर्व क्षितिजावर उगवलेला मंगळ ग्रहही बघता येईल.

तेव्हा आकाशातील ही आवर्जून अनुभवण्यासारख्या घटनेचा आनंद नक्की घ्या. त्यासह इतरही तारे- नक्षत्र बघता येतील. ही पोस्ट आपल्या जवळच्यांसोबत शेअर करू शकता. धन्यवाद.

(वाचल्याबद्दल धन्यवाद! निरंजन वेलणकर 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्सचं आयोजन.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर दिसलं पिधान! आकाश स्वच्छ होतं.
हे मी काढलेले काही फोटो.
IMG-20240205-WA0014.jpg
चंद्राच्या खाली उजवीकडे ठिपका आहे तो ज्येष्ठा तारा.

IMG-20240205-WA0016.jpg
थोडा जवळ सरकला.
IMG-20240205-WA0009.jpg
आणखी जवळ.
IMG-20240205-WA0007.jpg
आता वरच्या बाजूने बाहेर आला.
IMG-20240205-WA0015.jpg
अजून थोडा लांब
IMG-20240205-WA0005.jpg
अजून थोडा
IMG-20240205-WA0010.jpg

मस्त आलेत फोटो. मला फोटोत सुद्धा तो ठिपका तारा आहे, हे सांगितल्याशिवाय कळलं नसतं. तुम्ही लोक प्रत्यक्षात बघता!

मस्त आलेत फोटो. मला फोटोत सुद्धा तो ठिपका तारा आहे, हे सांगितल्याशिवाय कळलं नसतं. तुम्ही लोक प्रत्यक्षात बघता!+११११११
पिधान आहे हे माबोवरच समजलं आणि मी विशाखा photo देईल ह्याची वाट पाहत होते

छान माहिती.. मस्त फोटो
मी चुकून हे निधन वाचत होतो... त्यामुळे कोणत्या ज्येष्ठ व्यक्तीचे निधन झाले हे बघायला धागा उघडला.

आज उठायचा आळस केला.
फोटो एकदम मस्त आलेत विशाखा.

मी चुकून हे निधन वाचत होतो... त्यामुळे कोणत्या ज्येष्ठ व्यक्तीचे निधन झाले हे बघायला धागा उघडला. >>>
आला लगेच बघायला चांदणी कोण आहे म्हणून Proud

हे तर अनाहूत क्लिकबेट झाले.

फोटो छान आलेत.
मला काल झोपायलाच दोन वाजले, सव्वाचारचा गजर बंद करून झोपलो मग.

विशाखाताई तुम्ही घेतलेले फोटो नेहमीप्रमाणेच भारी!!! खूपच छान.

मस्त दिसलं एकूण. मी नेमका रेल्वे प्रवासात असल्याने मला बघता आलं नाही. नंतर अगदी सहा चाळीसलाही ज्येष्ठा बाजूला दिसत होती.