यावर तुमच काय मत आहे?

Submitted by छन्दिफन्दि on 29 January, 2024 - 20:48

तांत्रिक माहिती असलेला लेख मराठीत लिहिण्याचा हा माझा पहिलाच एक प्रयत्न होता.

वाचताना भाषांतरीत वाटतोय का की सहज सोप्या मराठीतील वाटतोय? crypto, AI किंवा रोबोटिक्स अशा विषयांवरचे लेख मराठीत लिहावेत का? त्याची उपयुक्तता आहे का ?

या विषयी तुमची मते , विचार आणि अर्थात लेखाविषयीची तुमची मते किंवा सुचना कळवल्यात तर आवडेल.

*********************************
M-Pesa - आफ्रिकन खंडातील Fintech

आफ्रिका खंड म्हटलं की आधी आठवतात आफ्रिकन सफारी, ब्युटिफूल पीपल सारखा एखादा चित्रपट, वर्णद्वेष, गुलामगिरी, नेल्सन मंडेला, सोन्याच्या, हिऱ्याच्या खाणी, आणि गांधीजी. त्याच बरोबर एक मोठं प्रश्नचिन्ह, सोन्याच्या खाणी असूनही तिथे असणारी गरिबी.

पण दोन वर्षांपूर्वी जेव्हा क्रिप्टो करन्सीचा अभ्यास करत होते, तेव्हा मी आफ्रिकेचं नाव अगदी वेगळ्या कारणांसाठी ऐकलं, ते म्हणजे M-Pesa, तिकडची लोकप्रिय मोबाईल पेमेंट सेवा.

२००७मध्ये सफारीकॉम (safaricom) ह्या मोबाईल नेटवर्क कंपनीनं M-Pesa ही मोबाईल पेमेंट सेवा केनियामध्ये सुरू केली. त्यानंतर ती अन्य आफ्रिकन राष्ट्रांमध्ये ही प्रचलित झाली. आता टांझानिया, युगांडा, इथिओपिया, घाना, दक्षिण आफ्रिका यांसारख्या अनेक देशांमध्ये ती वापरात येऊ लागली आहे.

गेल्या चौदा वर्षांमध्ये ५ कोटींहून जास्त लोक M-Pesaचा उपयोग त्यांच्या दैनंदिन आयुष्यात करतात. त्यांपैकी सर्वाधिक म्हणजे २ कोटी लोक एकट्या केनियात आहेत आणि त्या खालोखाल दुसरा नंबर लागतो तो टांझानियाचा.

काय आहे M-Pesa?

M-Pesa : M, मोबाईल मधला, तर Pesa म्हणजे स्वाहिली भाषेत पैसा.

M-Pesa या मोबाईल पेमेंट सेवेत, मोबाईल नंबरला संलग्न असं wallet किंवा खातं उघडता येतं. त्या खात्यात सेवाधारकाला डिजिटल स्वरूपात पैसे ठेवता येतात. एका नंबरवरून दुसऱ्या नंबरवर, म्हणजे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात एका SMSद्वारे पैसे पाठवता येतात. हा SMS पिन नंबर किंवा गुप्त कोड वापरून सुरक्षित केला जातो. तसंच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे जमा झाले की पैसे पाठवणाऱ्या आणि जमा झालेल्या दोन्ही व्यक्तींना किंवा त्यांच्या फोन क्रमांकाना रक्कम वजा किंवा जमा झाल्याचा SMS पाठवला जातो.

ह्या सेवेच्या बदल्यात प्रत्येक व्यवहारामागे अगदी छोटी रक्कम फी म्हणून आकारली जाते. छोटे छोटे किरकोळ विक्रेते किंवा एजन्टांचं जाळं पसरलं आहे. सुरुवातीला यांच्याकरवी खातेदार आपापल्या मोबाईल खात्यात पैसे भरू किंवा काढू शकतात. व्होडाफोनच्या (Vodafone) केनियातील सफारीकॉम ह्या भागीदारानं पहिल्यांदा M-Pesa सेवा २००७मध्ये सुरू केली. मोबाईलचा टॉक-टाइम खरेदी करण्यातून तिची सुरुवात झाली. त्यानंतर मग हळूहळू इतर सेवांसाठी बिलं भरणं, नातेवाईकांना, कटुंबातल्या व्यक्तींना पैसे पाठवणं, वस्तू किंवा सेवा खरेदी करणं ह्यांसाठी सुद्धा ह्या सेवेचा वापर व्हायला लागला.

त्याच बरोबर लघुउद्योगांना भांडवल किंवा कर्जपुरवठा, क्रेडिट लाईन उपलब्ध करून देणे यांसारख्या इतरही अनेक सेवा देण्यातही विस्तार करण्यात येऊ लागल्या. थोडक्यात M-Pesaकरवी केनियातील लोकांना बँकेशिवायची बँक मिळाली.

वाढत्या लोकप्रियतेबरोबर हळूहळू M-Pesa इतरही आफ्रिकी देशांमध्ये रुजू लागली आणि फोफावली. आता इतर प्रदेशां-देशांमध्ये नोकरी धंद्यासाठी गेलेल्या लोकांना आपल्या मायदेशातील नातेवाईकांना पैसे पाठविणेही अतिशय सोपं झालं.

अफ़्रिकेतल्या देशांमध्ये बँकांचं कार्यक्षेत्र अतिशय मर्यादित होतं त्यामुळे बरीचशी जनता बँकांच्या सेवाक्षेत्राबाहेर होती. त्यामागे अनेक कारणं होती; उदाहरणार्थ, बरीच जनता गरीब होती त्यामुळे त्यांची बँकेत खाती नव्हती; बँक व्यवहार खर्चिक होते; गावागावांमध्ये बँकेचे जाळे पसरले नव्हते; इत्यादी.

अशा वेळी M-Pesaनं लोकांना बँकेत खातं न उघडताही, बँकेसदृश्य सेवा पुरविली. लॊकांना पैशांची बचत करणे; तो गुंतवणे, आणि वाढवणे ह्या आर्थिक सेवांचा लाभ घेता येऊ लागला. रोख रकमेच्या व्यवहारातील संभाव्य घोटाळे, जोखमी नियंत्रित झाल्या. त्याचा फायदा बऱ्याच प्रमाणात छोट्या उद्योगांना, सेवा पुरवणाऱ्यांना झाला.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये गरजूंना मदत पोहोचवणे M-Pesaमुळे अतिशय सोपं आणि पारदर्शक झालं. ह्या सगळ्यांचा उपयोग त्या प्रदेशातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी झाला.

पूर्वी ज्या स्त्रिया आर्थिक व्यवहारांपासून दूर होत्या त्यांना घरबसल्या मोबाईल फोन वरून या सेवा वापरात येऊ लागल्यामुळे त्यांचाही आर्थिक व्यवहारांतील सहभाग वाढला जो स्त्री-सबलीकरणासाठी पोषक ठरू लागला. आधी रोख रकमेत जे व्यवहार व्हायचे ते मोबाईलवरून डिजिटली झाल्यामुळे एकूणच व्यवहारात पारदर्शकता आली, त्यामुळे अर्थातच करवसुलीचं प्रमाण वाढून त्या-त्या देशांतल्या सरकारांनाही त्याच फायदा झाला.

इतके सगळे लाभ असूनही ती परिपूर्ण नाही; त्यात काही त्रुटी आहेत; उदाहरणार्थ, M-Pesa त्या विशिष्ट मोबाईल नेटवर्क सेवेअंतर्गतच वापरता येते. दोन भिन्न नेटवर्कांवर असणाऱ्यांना M-Pesaद्वारे व्यवहार करणं सहज शक्य नाही. मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांचा वरचष्मा वाढतो. ह्यात नेटवर्क सुरक्षिततेचा मुद्दाही अतिशय महत्त्वाचा आहे. तसंच अजूनही सर्वच जनतेकडे मोबाईल फोन आणि सेवा उपलब्ध नाहीत.

२०१६मध्ये भारत सरकारने UPI (Universal Payment Interface) अस्तित्वात आणले. त्यानंतर Gpay, Phonepe यासारख्या मोबाईल पेमेंट सेवा आणि ॲप्स भारतात लोकप्रिय झाली आणि सर्रास वापरण्यात येऊ लागली. परंतु ह्यात आणि M-Pesaमधला प्रमुख फरक म्हणजे M-Pesaमध्ये कुणाला बँक खातं असावं लागत नाही. किंबहुना, बँक खातं नसणाऱ्या बहुसंख्य जनतेला बँकिंग सेवा बँक खात्याशिवाय उपलब्ध करून देणं हाच M-Pesaचा उद्देश गेल्या चौदा वर्षांत यशस्वी होताना दिसतो.

M-Pesaच्या प्रसारानंतर २००६ ते २०१९ ह्या कालावधीत केनियामध्ये अर्थसेवांचा वापर ५६% वाढलेला दिसतो. तसंच केनियातली दोन टक्के कुटुंबं दारिद्र्यरेषेच्या वर खेचण्याचं श्रेयही M-Pesa या सेवेलाच दिलं गेलंय.

गेल्या दशकापासून क्रिप्टो करन्सी, डिजिटल चलन, स्टेबल कॉईन्स ह्यांची लोकप्रियता, व्याप्ती वाढताना दिसते; तरी अजूनही त्या मुख्य प्रवाहापासून बऱ्याच लांब आहेत.

अशावेळी, एखादं अर्थतंत्र लोकांनी आपलंसं केल्यावर त्याचा मुख्य प्रवाहात समावेश होणं, त्यानंतर त्याचं अजून सबलीकरण होणं, प्रसार होणं ह्यासाठी M-Pesa हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणूनच त्याचा अभ्यास पुढच्या digitalized अर्थविश्वासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आशादायी आहे असं म्हणावं लागेल.

- प्रेरणा कुलकर्णी

पूर्वप्रकाशित : विषय होता "आफ्रिका खंड"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान व माहितीपूर्ण लेख.
वाचताना भाषांतरीत वाटतोय का की सहज सोप्या मराठीतील वाटतोय? >> भाषा सहज, सोपी व नैसर्गिक आहे. भाषांतरित वाटत नाही.
crypto, AI किंवा रोबोटिक्स अशा विषयांवरचे लेख मराठीत लिहावेत का? >> हो
त्याची उपयुक्तता आहे का ? >> हो, हे थोडेसे किचकट विषय समजण्यास मदत होईल.

माबो वाचक यांच्या वरील प्रतिसादाला मम.
प्रत्येक शब्दाला मराठी प्रतिशब्द हवाच असा अट्टाहास न केल्याने (आणि उगाच इंग्रजी शब्दांचा मुक्तपणे वापर न केल्याने) लेख सुटसुटीत वाटला.

माबो वाचक, एवढा विस्तृत प्रतिसाद दिल्याबद्दल मनासून धन्यवाद.

मानव पृथ्वीकर, शर्मिला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

नोंद केली.:
भाषा सहज, सोपी व नैसर्गिक आहे. भाषांतरित वाटत नाही.
थोडेसे किचकट विषय समजण्यास मदत होईल.
लेख सुटसुटीत वाटला
जेथे आवश्यक तेथे प्रचलित इंग्रजी शब्दांचा वापर हवाच.

Thank you माबो वाचक, मानव पृथ्वीवर, आणि शर्मीला. मराठीत
अजून एक तांत्रिक लेख लिहिला आणि जमल्यास एक उपक्रम म्हणू.न अशी मालिका करायचे मनात आहे. Happy

https://www.maayboli.com/node/86212

नवीन प्रतिसाद लिहा