ओलेती

Submitted by विक्रम मोहिते on 13 December, 2023 - 12:08

ओलेती...

पावसाळा... आधीच अतिशय गचाळ ऋतू, आणि त्यात जर सकाळी सकाळी उठून कॉलेजला जायचं असेल, ते पण मुंबई हार्बर लोकलमध्ये प्रवास करत तर मग दुष्काळात तेरावा म्हणायचं, आता पावसाळा म्हणून ओला दुष्काळ म्हणू हवं तर... तर अशाच एका दिवशी घडलेली हि सत्यकथा, जागा आपली नेहमीची - कुर्ला स्टेशन, प्लॅटफॉर्म नंबर सात, वेळ मघाशी सांगितल्याप्रमाणे सकाळची, आणि त्यात मुसळधार धो धो पाऊस सतत सुरु. माझ्यासारखे अनेक पांढरे बगळे ८.४५ च्या पनवेल लोकलची वाट पाहत उभे. त्यातला एक मी. पावसाने पिडलेला, आणि गर्दीने चिडलेला. कधी एकदा ट्रेन येईल आणि इथून निघून जाईन असं झालेलं. आणि... पावसाचे काळेकुट्ट ढग बाजूला सरून त्यातून सूर्यकिरणे यावीत तशी समोरच्या प्लॅटफॉर्मवर ती अवतरली. गुलाबी छत्रीच्या आडून अलगद तिचा चेहरा दिसला. भर पावसात वीज चमकून जावी तसा भास झाला. ट्रेनच्या शोधात भिरभिरणारी माझी नजर अलगद तिच्या छत्रीवर स्थिरावली आणि जणू तिथेच नजरबंद झाली. चातकाला पावसाची ओढ असावी तितकीच मला तो चेहरा परत दिसण्याची ओढ लागली. आणि पुढच्याच, पुढच्या क्षणी जणू काहि माझं मन ओळखल्यासारखी ती वळली आणि टाचा उंचावून मान तिरकी करून तिच्या ट्रेनचा अंदाज घेतला. अजूनही ट्रेनचा पत्ता दिसत नाही म्हणून निराशा तिच्या चेहऱ्यावरच्या बटीमधून पाण्यासारखी ओघळली. तिच्या त्या गुलाबी आभाळातून घुसखोरी केलेल्या एका चुकार सरीने त्या बटीला ओलेचिंब केले होते. खिशातून रुमाल काढला तिने पण तो सुद्धा पावसाळा फितूर होऊन ओलाचिंब झाला होता. स्वतःशीच खुद्कन हसली त्याला पाहून. तेवढ्यात तिच्या ट्रेनची घोषणा झाली. चेहऱ्यावरची हसरी रेषा अजून रुंदावली. गुलाबी आभाळाची घडी करून तिने अलगद बॅग मध्ये ठेवली आणि आलेल्या ट्रेन मधून निघून पण गेली. तिच्या चेहऱ्यावरचा तो क्षणिक ऊन पावसाचा खेळ इतका लोभसवाणा होता कि पहिल्यांदा मला वाटलं... कोणत्या त्या कवीची ओलेती कविता मला आज परत नव्याने कळली!!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults