
बंगळूरला रहायला येऊन इतकी वर्षं झाली पण अजून कूर्गला गेलो नव्हतो. यावेळी नवरात्रीच्या सुट्टीत जायचं ठरवलं. कूर्गबद्दल खूप ऐकून होतो, इतक्या वर्षांमध्ये अनेक कूर्गी लोक ओळखीचे झाले आहेत. ही माणसं कणखर, लढवय्यी असतात, अशी त्यांची ख्याती आहे. सैन्यात भरती होण्याचं प्रमाणही इथे खूप आहे. हा प्रदेशही तसाच रांगडा आहे, कोकणासारखा. ’सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी’ कूर्गमध्ये फिरताना कावेरी नदीचं प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अस्तित्वही सतत जाणवत राहतं.
वीस तारखेच्या शुक्रवारी सकाळी घरून साडेसात-पावणेआठला जे निघालो ते थेट दहाच्या सुमारास म्हैसूरला नाश्ता करायला जाऊन पोचलो. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या बंगळूर-म्हैसूर द्रुतगती महामार्गामुळे म्हैसूरला पोचायला आता अगदी कमी वेळ लागतो. अंतर तसं फारसं नसूनही पूर्वी ’ठेचेवर ठेच’ करत म्हैसूरला पोचायला बराच जास्त वेळ लागायचा. वाटेत लागणार्या मंड्यासारख्या शहरालाही इतक्या वर्षांत बायपास काढलेला नव्हता. आता मात्र सहापदरी एक्स्प्रेस वे झाल्यामुळे हा प्रवास एकदम सहज होतो.
’विनायक मैलारी डोसा’ हे एक जुनं, लहानसं, जरा कळकटच, तरीही सुप्रसिद्ध, ’आमची कुठेही शाखा नाही’ प्रकारातलं ठिकाण.(मैलारी हे ’मल्हारी’चं कन्नड रूप आहे.) बर्याच वर्षांपूर्वी तिथला डोसा खाल्ला होता आणि अतिशय आवडला होता. त्यानंतर आत्ताच परत तिथे जायचा योग आला. गिर्हाईकांची रांग लागलेली होती. नवरात्र असल्यामुळे म्हैसूरमध्ये पर्यटकांची गर्दी होती. त्यात चार दिवस सुट्टी आलेली. थोड्या वेळाने जागा मिळाली. इथले डोसे मऊ असतात, इतरत्र जसे कुरकुरीत मिळतात, तसे नसतात. अत्यंत स्वादिष्ट. ताटं भरभरून वेटर डोसे आणत असतो आणि वाढत असतो. ’इतका धंदा करतात तर जरा मोठी जागा का घेत नाहीत?’ असं आम्ही तक्रारीच्या सुरात एकमेकांशी बोलत होतो. पुण्यातल्या तत्सम ( वर्षानुवर्षे लहान जागेतच असलेल्या, काहीशा कळकट, सुप्रसिद्ध, कुठेही शाखा नसलेल्या) काही नावांची उजळणी झाली. डोसे संपवून बिल देऊन निघालो. स्वच्छतागृहाची चौकशी केल्यावर दोन-तीन जणांकडून जी विविध उत्तरं मिळाली, त्यांचा एक म.सा.वि. काढला आणि शोधत शोधत शेजारच्या गल्लीतून बाहेर निघालो. बघतो तर समोर परत ’विनायक मैलारी डोसा’! ओल्ड, ओरिजिनल अशा विशेषणांसहित. पण एकदम प्रशस्त, चकाचक, नवीन रेस्टॉरंट.( मग त्या विविध उत्तरांचा अर्थ लागला!) गंमत म्हणजे पाच मिनिटांपूर्वी ज्याने डोसे आणून दिले तोच वेटर इथेही आणि जिला बिल दिलं ती गल्ल्यावरची मुलगीही तीच. हा काय चमत्कार, असा विचार करत आत शिरलो आणि कॉफी मागवली. लक्षात आलं की मूळ मालकांनीच हे नवीन, मोठं रेस्टॉरंट अगदी काही दिवसांपूर्वीच उघडलेलं होतं. काम करणारे लोक दोन्ही ठिकाणी अधूनमधून जा-ये करत होते. आमची आधीची तक्रार अशा प्रकारे निकालात निघाली.
म्हैसूरच्या नंतरचा रस्ता हळूहळू घाटात शिरणारा, वळणावळणांचा. परत वाटेत कुठेही न थांबता मडिकेरीला पोचलो. हे कूर्ग (कोडगू) जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे. डोंगरावरच वसलेलं आहे, त्यामुळे शहरातले रस्ते चढ-उतारांचे, मुख्य रस्ता सोडल्यास अरुंदच आणि वळणदार आहेत. त्या मानाने रहदारी मात्र खूपच जास्त होती. ती नंतरच्या दोन दिवसात आणखी वाढली. आम्ही जिथे राहणार होतो, त्या होम स्टेमध्ये दुपारच्या जेवणाची सोय होणार नव्हती. जेवून मग होम स्टेला जाऊन पोचलो.
मायबोलीवर काही वर्षांपूर्वी दिनेशदांनी कूर्ग प्रवासवर्णन लिहिलं होतं, त्यात त्यांनी ते जिथे राहिले होते त्या होम स्टेचं खूप कौतुक केलं होतं. त्याच ’परिवार’ होम स्टेमधे आम्हीही राहिलो. खरोखरच, अगदी घरगुती म्हणावा असा हा ’होम स्टे’ आहे. साधा आणि अनौपचारिक. अगत्यशील पतीपत्नी. जेवण उत्तम. घराच्या आवारात असंख्य फुलझाडं आहेत. शेजारीच कॉफीचा मळा. घरात तीन मांजरं आणि दोन कुत्रे.
कॉफी पिऊन मग संध्याकाळ निवांत घालवली. काकांबरोबर समोरच्या रस्त्यावर एक फेरफटका मारला. रात्री जेवून लवकरच झोपलो. दुसर्या दिवशी ’तलकावेरी’ म्हणजे कावेरी नदीचा उगम जिथे होतो, तिथे जाणार होतो. ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावर हे ठिकाण आहे.
कावेरी नदी तलकावेरीला उगम पावत असली, तरी तिथे तिचा प्रवाह परत जमिनीत शिरतो आणि खाली काही किलोमीटरवर ’भागमंडला’ नावाच्या ठिकाणी बाहेर पडतो. तिथे लगेचच तिला दोन उपनद्या येऊन मिळतात (बहुतेक त्यातली एक सरस्वतीसारखी गुप्त आहे. त्रिवेणी संगमावर प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही.) आणि मग कावेरी पुढे वाहू लागते. कर्नाटक आणि तमिळनाडूची ही जीवनदायिनी नदी.
तलकावेरीहून दिसणारा प्रदेश
नदीचा उगम ही पवित्र जागा मानली जात असल्यामुळे त्या ठिकाणाला धार्मिक महत्त्व खूपच असतं. तलकावेरीलाही पवित्र स्नानासाठी कुंड आहे. खूपजण तिथे सचैल स्नान करत होते. पुढे खूप विस्तार पावलेली, म्हैसूर, बंगळूरसारख्या शहरांना पिण्याचं पाणी पुरवणारी, कर्नाटक-तमिळनाडूत राजकारण आणि भांडणांनाही निमित्त पुरवणारी ही नदी इथे ज्या बालरूपात दिसते, त्या रूपासमोर नतमस्तक व्हावंसं वाटणं स्वाभाविकच आहे. या कुंडात स्नान केल्यावर पुण्य मिळतं यावर माझी श्रद्धा नसूनसुद्धा मलाही क्षणभर त्या कुंडात डुबकी मारून येण्याचा मोह झाला, पण कपडे वगैरे काही तयारी आणली नसल्यामुळे ते शक्य झालं नाही.
स्नानाच्या कुंडाशेजारी हे गोमुख आहे.
कुंडाच्या वरच्या बाजूला शंकराचं मंदिर आहे. हे शिवलिंग अगस्ती ऋषींनी स्थापन केलं असं मानलं जातं. तिथे जे पिंपळाचं झाड आहे, ते, अगस्तींनी ज्या अश्वत्थ वृक्षाखाली तपश्चर्या केली, त्याचं वंशज आहे असं मानलं जातं.
तलकावेरीहून आजूबाजूच्या प्रदेशाचं खूप सुंदर दर्शन होतं. आपल्याकडे एकंदरीतच अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी धार्मिक बाबींची माहिती खूप दिली जाते, पण त्याच्याबरोबरीने तिथल्या निसर्गाची, भूप्रदेशाची माहिती, उदाहरणार्थ तिथला खडक कुठल्या प्रकारचा आहे, जंगल कुठल्या प्रकारचं आहे, कुठली झाडं जास्त करून दिसतात, कुठली दुर्मिळ झाडं, प्राणी, पक्षी असल्यास त्यांची माहिती, असं काहीच कुठे दिसत नाही. खरं तर अशी माहिती मिळाली असती तर आवडलं असतं, कारण निसर्गसौंदर्याने नटलेला हा प्रदेश आहे. असो.
तलकावेरीहून निघून मडिकेरीला आलो. हा सगळा घाटातला रस्ता, शिवाय सुट्ट्या असल्यामुळे रस्त्यावर गाड्या, बसेस भरभरून गर्दी. त्यामुळे प्रवासाचा वेग तसा कमीच राहिला. मडिकेरीला पोचून जेवायला उशीर झाला. जेवण झाल्यावर मात्र मग कसली घाई नसल्यामुळे मडिकेरीमधल्याच ’राजा’ज सीट’ नावाच्या बागेत गेलो. कूर्गचे राजे म्हणे इथे बसून सूर्यास्त बघत असत. जागा छानच आहे. पश्चिमेला समोर खूप विस्तीर्ण प्रदेश दिसतो.
बागेतून पश्चिमेला दिसणारं दृश्य
बागही सुंदर आहे. तिथे एका बाजूला काही साहसी खेळ खेळण्याची सोय आहे. त्यापैकी एक, ’झिप लाईन’ नावाची राईड आम्ही घेतली. एकमेकांपासून बर्यापैकी लांबवर असलेल्या दोन उंच मनोर्यांना तारा (केबल्स) जोडलेल्या. मजबूत पट्ट्यांनी आणि हुकांनी एकेका व्यक्तीला त्या केबलला अडकवतात आणि ’रोप वे’ सारखे आपण केबलवरून खालच्या टॉवरकडे सरकत जातो. खाली सगळा खोल प्रदेश. सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण मजा आली. थोडे सावकाश गेलो असतो, तर खालच्या प्रदेशाकडे नीट पाहता आलं असतं, असं वाटलं, पण वेगावर आपलं नियंत्रण नसतं.
भरपूर गर्दीमुळे मडिकेरीतून बाहेर पडायला वेळ लागला आणि काळोख पडता पडता आम्ही होम स्टेला पोचलो.
आमच्या खोलीच्या बाहेरून सकाळच्या वेळात दिसलेले काही पक्षी
Yellow-browed bulbul
Orange minivet (male)
Orange minivet (female)
Oriental white-eye (चष्मेवाला)
भाग दुसरा
कूर्ग २/२
https://www.maayboli.com/node/84313
पक्षी बघूनच निसर्गाच्या
पक्षी बघूनच निसर्गाच्या श्रीमंतीची कल्पना आली. सुंदर फोटो. नद्यांचे उगम मलाही फार intriguing वाटतात
वर्णन वाचून मैलारी डोसे खाण्याची इच्छा उफाळून आली
कुर्गचे लोणावळा-महाबळेश्वर होण्याची सुरुवात झाली आहे असे ऐकतो, कितपत खरे आहे ?
पु भा प्र
आवडलं. कूर्गला जायचं कधीपासून
आवडलं. कूर्गला जायचं कधीपासून मनात आहे.
ज्येष्ठ लेखक मारुती चितमपल्लींच्या साहित्यात कूर्ग च्या कथा नेहमीच येतात. त्यांच्याशी गप्पा मारताना देखील कूर्ग चा उल्लेख मोठ्या जिव्हाळ्याने करायचे.
लोणावळा-महाबळेश्वरला मी
लोणावळा-महाबळेश्वरला मी इतक्यात गेले नाहीये अनिंद्य, पण गर्दीचंच म्हणत असलात तर बरोबर आहे. माथेरानची गर्दी तीन चार वर्षांपूर्वी बघितली आहे. कूर्गलादेखील सगळ्या प्रेक्षणीय ठिकाणी भरपूर गर्दी होती. पण गैरप्रकार, आरडाओरडा, गोंधळ, चेंगराचेंगरी असा अनुभव मात्र कुठेही आला नाही!
मनिम्याऊ, चितमपल्लींचा कूर्गशी असलेला संबंध माहिती नव्हता.
माडिकेरीत होम स्टे रानात
माडिकेरीत होम स्टे रानात असल्याने पक्षी पाहता येतात. पण शहरात काही दिसेल असं वाटतं नाही. मोठा कोतवाल,बुलबुल फारच आवडले.
नाल्कनाड, भाग मंडला ,तलेकावेरीसाठी steps together ch. Video चांगला आहे.
तडियांडमूल आणि ब्रह्मगिरी हे ट्रेकस आहेत.
कुमारपर्वता हा माडिकेरीच्या उत्तरेला पण तिकडचा ट्रेक कुके सुब्रमण्यमकडून आहे.
वाह !
वाह !
अजून प्रचि हवे
आणि पक्ष्यांकरता वेगळा स्वतंत्र धागा
छान
छान
वावे ह्यांचा लेख म्हणजे सुंदर पक्षी फोटोंची रेलचेल
कूर्गबद्दल बरचं ऐकलंय जे जाऊन
कूर्गबद्दल बरचं ऐकलंय जे जाऊन आलेत त्यांच्याकडून..!
तुझी लेखमाला कामी येईल जेव्हा कूर्गला जायचं असेल तेव्हा..!
कूर्ग खरंच खूप सुंदर आहे.
कूर्ग खरंच खूप सुंदर आहे..आम्ही बाळकृष्ण होम स्टे म्हणून आहे तिथे उतरलो होतो..फार सुंदर होत..आम्ही जवळपास १५ जण होतो.. भर मे महिन्यात पूर्ण कूर्ग मध्ये मस्त धुक होत आणि थंडी...
छान वर्णन आणि फोटोही!
छान वर्णन आणि फोटोही!
धार्मिक माहितीबरोबर तेथील निसर्गाबद्दलही माहिती द्यायला हवी हे अगदी खरे आहे. लोकांना जितकी माहिती होते तितके त्याचे संवर्धन्/जपणूक होण्याची शक्यता वाढते.
ती उगमापाशी गुप्त होते व काही किमीवर पुन्हा जमिनीवर येते ही लोकांची श्रद्धा आहे की खरोखरच तसे आहे? तसे असेल तर पूर्वीच्या साधनांवरून तेव्हाच्या लोकांनी हे कसे शोधले असेल याचे आश्चर्य वाटते.
वावे.. मस्त फ्रेश वाटलं वाचून
वावे.. मस्त फ्रेश वाटलं वाचून !
वावे.. मस्त फ्रेश वाटलं वाचून
वावे.. मस्त फ्रेश वाटलं वाचून !
छान लेख. फोटो अजून आवडले असते
छान लेख. फोटो अजून आवडले असते. दुसर्या भागात असतीलही.. कुर्गबद्दल ऐकून नेहमीच जावेसे वाटते. बघूया कधी योग येतो. मला अश्याच जागी जायला आवडते.
<<< खरं तर अशी माहिती मिळाली असती तर आवडलं असतं >>> या पॅराला +७८६ .. मलाही धार्मिक स्थळांची माहीती रुची नसल्याने बोअर करते. तिथल्या राजे रजवाड्यांचा ईतिहास सुद्धा आवडत नाही. उलट भौगोलिक माहिती, वा तेथील वन्य जीव सृष्टीची माहिती च जास्त मिळाली तर बरे वाटते. कुठे पाट्या दिसल्या अश्या माहितीचा तर त्यांचा फोटो काढतो.
कावेरी तलकावेरीला उगम पावून
कावेरी तलकावेरीला उगम पावून गुप्त होते आणि खाली भागमंडलाला परत प्रकट होते हे कसं शोधून काढलं असेल हा प्रश्न मलाही पडला. तिथे कुठे काही लिहिलेलं नव्हतं, विकीपिडियावर वगैरे एवढीच माहिती आहे.
'शोध' कादंबरीत त्या डोंगरातल्या गौळांमध्ये असलेल्या पाण्याबद्दल जे लिहिलंय की एका ठिकाणी पाण्यात फुलं टाकली की थोड्या वेळाने तरंगत ती दुसऱ्या गौळातल्या पाण्यात दिसायला लागतात, तसं काही कावेरीच्या बाबतीत आहे ( जमिनीखालून थेट वाहता प्रवाह आहे ) की वर ते पाणी जमिनीत मुरतं आणि तेच खाली बाहेर पडतं अशी नुसती समजूत आहे, हे नाही माहिती. मी लेखात लिहिल्याप्रमाणे तिथे धार्मिक बाबींनाच इतकं महत्त्व आहे की इतर काही कुणाला विचारावं आणि त्यांनी सांगावं हे कठीणच आहे. आम्ही गेलो त्याच्या आदल्या आठवड्यात तिथला 'कावेरी संक्रमणा' नावाचा मोठा उत्सव पार पडला होता. त्या दिवशी उगमाच्या ठिकाणी पाणी उसळून वर येतं असं वाचलं. ते खरंतर बघायला आवडेल, पण गर्दीची कल्पना करवत नाही
प्रतिसादांसाठी सर्वांना धन्यवाद


अजून फोटो पुढच्या भागात टाकते
ऋन्मेष, मला इतिहास आवडतो ऐकायला
वावे, सुंदर वर्णन
वावे, सुंदर वर्णन
फोटोही छान. फार पूर्वी गेलो होतो छानच आहे हा परिसर.
कुंडाचा फोटो व बागेतून पश्चिमेच्या डोंगर रांगांचा फोटो मस्तच.
पक्ष्यांचे फोटो छान असतातच.
शोध मुरलीधर खैरणारांची का?
हो मुरलीधर खैरनारांची. विशाखा
हो मुरलीधर खैरनारांची. विशाखा कुर्ग मधुन परत येताना निसर्गधाम ला भेट दिलीत का ? सुरेख आहे ते ठिकाण पण.
छान आहे लेख. वाचून मागच्या
छान आहे लेख. वाचून मागच्या वर्षी केलेली कूर्ग ची ट्रीप आठवली .
मस्त लिहिलं आहेस वावे, कूर्ग
मस्त लिहिलं आहेस वावे, कूर्ग माझ्या ही लिस्ट वर आहे.बघू कधी योग येतो ते...
फोटो ही मस्तच काढतेस तू.
विशाखा, आम्ही देखील
विशाखा, आम्ही देखील बेंगलोरहुन by road गेल्याने मैसूरला एक रात्रीचा मुक्काम केला होता. S L भैराप्पा वाचल्यामुळे चामुंडा हील पहायची होती. शिवाय राजवाडा आणि चर्च ही.
मैसुर - कूर्ग करताना रस्त्यात कुशलनगरची गोल्डन monestry पाहिली की नाही? आमची club Mahindra membership असल्याने home stay चां अनुभव miss केला. पण कूर्ग मधील club Mahindra location आणि तेथील food उच्च आहे, त्यामुळे home stay परत कधी तरी.
मीरा, म्हैसूरला गेल्यावर आता
मीरा, म्हैसूरला गेल्यावर आता प्रत्येक वेळी चामुंडी टेकडीचं नाव वाचताना भैरप्पांची 'काठ' आठवतेच.
प्राजक्ता, निसर्गधाम नाही बघितलं. नाव वाचल्याचंही आठवत नाही. पण सगळीकडेच गर्दी असणार आत्ता.
ऋतुराज, अश्विनी, मनीमोहोर, धन्यवाद

'शोध' मुरलीधर खैरनारांचीच
दोन्ही भाग छान झालेत. आम्ही
दोन्ही भाग छान झालेत. आम्ही गेलो होतो, दहा वर्षे झाली. अमनवा स्पा ला राहिलो होतो. फारच भारी स्टे होता. तेंव्हा पण शांतता अशी नव्हतीच सगळीकडे अमाप गर्दी, पण बेशिस्त गर्दी नाही. मला ती monastery प्रचंड आवडली होती. पाय ठेवायला पण जागा नव्हती एवढी गर्दी होती तिथे, हजारो भिक्खू जमले होते आणि त्यांच्या प्रार्थना चालू होत्या. पण त्या वाद्यांचा आवाज आणि मंत्र ह्यांचा मिलाफ, फारच भारी अनुभव. आम्ही पण बेंगलोर मैसूर बाय रोड गेलो होतो. मैसूर ला जेवण केले होते दोन्ही वेळेस. कॉफी बाग पण बघितली होती. कूर्ग छान आहे.