कशासाठी ... तर पाटयासाठी! पोटासाठी तर असतेच हो..... काही दिवसांपूर्वी बाजारात हा पाटा दिसला अन् काय आनंद झाला सांगू... ती सुलेखा नाही का सेलिब्रिटींना खास पाथरवटांकडून तयार करून घेतलेल्या छोटी छोटी उपकरणी पाटा वरवंटा, जातं, चूल खलबत्ते वै पाहून मनातली जुनी इच्छा डोकं वर काढत राहते. पण मला शोपिस म्हणून नको होता खराखुरा हवा होता फार मोठा नको होता. मला हवा तसा अनपेक्षितपणे तो दिसताच इंपल्सईव्ह बायिंग का काय म्हणतात तसं घेऊन टाकला. एका मैत्रिणीला त्याचा आकार बघून त्यावर वाटलं जाईल की नाही शंका आली. प्रथेप्रमाणे त्यावर आधी वाटले कचकच निघून जायला . भरड चिमण्यांना टाकली....मग थोडीशी साखर वाटली... आणि हो मसालाही वाटला गेला बरं का!
मसाला वाटताना, करंगळी ते मनगटाने स्वच्छ पाटा धुवत वाटीत गोळा केलेलं पाणी आणि भाजीत घातलेले ते पाणी ... काहीही वाया न जाऊ देण्याचे संस्कार ....टोटल नॉस्टॅल्जिक मोमेंट! पाटा वरवंटा,खलबत्ता, जातं, उखळ वै स्वयंपाकाची उपकरणी पाहिलेली, वापरलेली कदाचित आमची शेवटची पिढी असावी... इति पाटा पुराण!
पूर्वी म्हणजे आईच्या काळात कांदा, टोमॅटो,आलं लसणाची पेस्ट भानगडच नव्हती क्रीम वै तर बातच नाही. भाजीची मूळ चव कळायची त्यामुळे चवीत वैविध्य असायचे. कोणी आलं आणि भाजी नसेल तर घरात असेल ते साहित्य (बटाटे व इतर साहित्य असायचेच)वापरून केलेली ही
आईच्या हातची रेसिपी! बटाट्याऐवजी तांबडा भोपळा
पाककृती: तांबडा भोपळा एक पाव, वाटण:- खसखस दोन चमचे पाण्यात दोन तास भिजवलेली, खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी, एक मिरची, धण्याची पूड एक चमचा, अर्धा चमचा जिरे, थोडी कोथिंबीर
फोडणीचे साहित्य: तेल, जिरे मोहरी, कढीपत्ता,हिंग हळद, चवीनुसार मीठ व चवीला साखर
कुकरमध्ये नेहमीप्रमाणे फोडणी करून भोपळ्याच्या टाका. तेलावर फोडी पाच मि. परतून घ्या. त्यात वाटणाचा गोळा टाकून एक मि. परता. वाटणाचं पाणी टाकून मीठ, साखर टाका. उकळी आली की कुकर बंद करून शिटीला आला की गॅस बंद करा. वाफ बसली की लगेचच कुकरचे झाकण काढा नाहीतर भाजी गाळ शिजेल.
टीपा: कुकरचा अंदाज नसेल तर पातेल्यात करा. इतर दोडकी, दुधी, तोंडली अशा वेलवर्गीय भाज्या चांगल्या लागतात. सौम्य चवीची !
भगरीचे/भरड धान्याचे घावने , पोळी बरोबर चांगली लागते. भाकरी प्रकार नको.