स्त्री असणं म्हणजे? स्त्री असणं म्हणजे स्त्री असणं.
जीवशास्त्रानुसार 'स्त्री प्रजनन प्रणाली' असलेली शरीर रचना घेऊन जन्माला आलेला मानवी जीव म्हणजे स्त्री. या व्याख्येनुसार मी स्त्री आहे.
आणि
Gender identity is defined as a personal and internal sense of oneself as male, female, or other. - या नुसारही मी female gender आहे
खरतर जेंडर आयडेंटिटी हा मुद्दा इथे संयोजकांना अपेक्षित नसावा. पण स्त्री म्हणजे? हे डिफाईन करताना मला जीवशास्त्रीय दृष्टीने असलेले वेगळेपण, हॉर्मोनमुळे दिसणारे वेगळेपण या बरोबरीने हा देखील फॅक्टर विचारात घेऊन त्याचा स्त्री असण्याशी असलेला बंध तपासून घ्यावा असे वाटले.
तसेही या व्यतिरिक्त पर्सनॅलिटीमधले हे अमुक एक गूण किंवा दोष हे म्हणजे निव्वळ आणि निव्वळ स्त्री असल्याची खूण किंवा ओळख म्हणून वेगळे उचलून काढता नाही आले.
समाजव्यवस्थेतून झिरपत गेलेले आणि स्त्री या रोल कडून अपेक्षीले गेलेले गूण, जबाबदाऱ्या या म्हणजे स्त्रीत्व नाही. त्या अपेक्षा किंवा त्या चौकटी आहेत मी अमान्य करत नाही. काही अपेक्षा मला झेपण्यासारख्या आहेत त्या मी पुर्णही करते. सगळं सोडून चक्र परत उलट फिरवणं किंवा दुसरे टोक गाठणं मला गरजेचे वाटत नाही. पण त्यातल्यात्यात मध्यम मार्ग गाठायचा प्रयत्न करणं आणि हे करताना फक्त हक्क नाही तर जबाबदारीमधेही वाटा उचलणं आणि दुसऱ्याला उचलू देणं हे जमेल तितकं सहज असू देण्याचा प्रयत्न करते. पण तरी
हे बाकी जे काही आहे ते ते सगळे म्हणजे, 'माझी बलस्थानं म्हणून आहे ते ही आणि माझे weakness म्हणून आहे ते ही' सगळे माझ्या पर्सनॅलिटीतले गुणदोष आहेत. ते माझे माझे आहे. ते निव्वळ स्त्री आहेत म्हणून आहेत का? याचे उत्तर नाही असेच येते. स्त्री असण्याचा वाटा यात नाही असे नाही पण हे निव्वळ स्त्री असल्यामुळे असलेले गुणदोष नाहीत.
पण पुरूष असते तरी अशीच असते? याचे उत्तर मात्र ठामपणे हो किंवा नाही असे देता येणार नाही. कदाचित अशीच असते. कदाचित थोडा फरक असता. विशेषतः सामाजिक सांस्कृतिक प्रेशर असत प्रत्येकावर त्याचा डायरेक्ट इंडायरेक्ट प्रभाव पडत असणारच. पुरुष असते तरी हा प्रभाव असताच. पण तरी निव्वळ स्त्री आहे म्हणून अमुक गूण अमुक दोष आहेत असे नाहीये. त्यामुळे त्या फ्रंटवर मी स्वतः स्त्री म्हणजे अमुक तमुक गूण दोषवाली व्यक्ती किंवा अमुक पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणजे स्त्रीत्व, तमुक म्हणजे पुरुषत्व अशा व्याख्या रचायला जाणार नाही. ते गूण दोष हे व्यक्ती म्हणून आहेत माझे. त्यावर असलेला सामाजिक सांस्कृतिक वगैरे इंपॅक्ट नाकारत नाही मी पण तो एकमेव फॅक्टर नाही आहे.
म्हणजे परत मी त्याच जागी आले. स्त्री म्हणजे नेमके काय? स्त्रीत्व म्हणजे नेमके काय? बायोलॉजीकली स्त्री असणं हा एकमेव क्रायटेरिया आहे का स्त्री डिफाईन करायचा? आणि हे डिफाईन करताना ट्रान्सफिमेलही स्त्री या वर्तुळाचा भाग म्हणूनच बघायला हवी असे असे वाटते का, मग भलेही ती बायोलॉजीकली स्त्री / female gender म्हणून जन्माला आली नसेल तरी? या लेखाच्या निमित्ताने स्वतःशीच या विषयावर डायलॉग्ज झाले.
जीवशास्त्रीय दृष्ट्या स्त्री असणे हे स्त्री म्हणजे कोण आहे हे उलगडण्याचे सध्याच्या घडीला सर्वमान्य सोपे असे एक परिमाण आहे पण एकमेव नक्कीच नाही.
एखाद्या पुरूष म्हणून जन्माला आलेल्या गणेशला (श्रीगौरी) किंवा अंगदला (त्रिनेत्रा) मनातून आतून ते स्त्री आहेत असे वाटत असेल तर माझ्यालेखी ते स्त्रीच आहेत.
मी स्त्री आहे. शरीरशास्त्रानुसार काही गोष्टी स्त्री म्हणून पुरुषापेक्षा वेगळ्या आहेत. हॉर्मोन्सचे प्रामाण आणि त्यामुळे असलेले आणि नसलेले दोन्ही फिचर्स हे स्त्री म्हणून पुरुषापेक्षा नक्कीच वेगळे आहेत. त्यादृष्टीने माझ्यात आणि जगातल्या दुसऱ्या टोकाच्या स्त्री मधेही काही गुणधर्म समान आहेत.
मी माझी तुलना जर प्रत्येक काळातील/खंडातील/ सामाजिक/ आर्थिक/ शैक्षणिक वगैरे प्रतलातील दुसऱ्या स्त्री बरोबर केली तर काही शारिरीक गोष्टीत साम्य वगळलं तर इतर गुणदोष, स्वभाव, strength and weakness बाबतीत सगळ्या गोष्टी समान आढळणार नाहीत. काही आढळतील. ज्या समान आढळतील त्यातल्या काहीवर हार्मोन्स किंवा xx जीनचा प्रभाव असू शकतो पण सगळं कसं त्यावर ठरेल ना. ते माझा स्वभाव, आजुबाजूची परिस्थिती, काळाचा प्रभाव वगैरे वगैरे घटकांवरही अवलंबून असेल म्हणजे ते निव्वळ लिंगावर आधारीत नसणार.
मी स्त्री आहे कारण मी शरिराच्या जोडीने मनानेही स्वतःला स्त्री म्हणून बघते..
त्रिनेत्रा हलदर आणि श्रीगौरी या ट्रान्सवुमन स्त्री आहेत कारण त्या स्वतःला स्त्री म्हणून बघतात.
माझ्या दृष्टीने याचा अर्थ इतकाच की मी जितकी स्त्री आहे तितक्याच त्या देखील स्त्री आहेत.
स्त्री म्हणजे काय ठरवण्यासाठी बायोलॉजीकल घटक हा माझ्यामते एक भाग आहे पण एकमेव नाही. दुसरा भाग आहे बायोलॉजीकलच्या पलीकडे जाऊन एखाद्या व्यक्तीला स्वतःबद्दल काय वाटते? हे वाटणे जेंडर आयडेंटिटी स्वरुपातले असेल किंवा व्यक्तीमत्वाबद्दलचे असेल. पण जे काही वाटणे आहे ते देखील 'स्त्री म्हणजे काय?'ठरवताना बघायला हवे हे मला मनापासून वाटते.
आणि तिसरा भाग आहे आपल्या समाजचौकटीने स्त्री / पुरुष म्हणून आखून दिलेल्या चौकटी आणि त्यांच्याकडे मी कसे बघते? त्यात बदलाची अपेक्षा करताना मी स्वतःमधे काय बदल करते. समोरच्या व्यक्तीला (irrespective of gender) मी व्यक्ती म्हणून स्विकारते का? माझ्यापेक्षा वेगळे मत असलेल्या व्यक्तीला मी agree to disagree म्हणून स्विकारते की सरळ काळा पांढरा रंग फासून मोकळी होते? माझ्याकडून असलेल्या अपेक्षांना आणि मी करत असलेल्या अपेक्षांना मी काय मापदंड लावते? सगळं त्याज्यं म्हणत पुसून टाकते की व्यवहार्य फिल्टर लावत काही स्विकारते, काही बदलते आणि आणखी काही बदलण्यासाठी प्रयत्न करते? मी स्वतःला चूकण्याची मूभा देते का? इतरांना तशी मूभा देते का? अपेक्षांकडे मी कसे बघते? माझ्याकडे मी कसे बघते? या सगळ्या प्रशांची प्रत्येक स्त्रीची उत्तरे समान नसतील ना? कारण त्या उत्तरापर्यंत पोहोचताना आणि मुळात त्या प्रश्नांपर्यंतही पोहोचताना बरेच घटक आणि घटना कारणीभूत असतील, इंपॅक्ट करणाऱ्या असतील आणि त्यातली एक जेंडर असेल.
त्यामुळे प्रत्येकीच्या लेखी स्त्रीत्व म्हणजे काय हे असेच काही समान सूत्रात मांडता येईल असे तर काही तिचे तिचे तिच्यापुरते सच्चे पण कदाचित कुठल्याही एका सुत्रात ओवता न येणारे असेही असेल.
त्यामुळे याची माझ्यापुरती उत्तरे जी आहेत ती माझ्यासाठी माझ्या 'मी' असण्याशी निगडीत आहेत आणि या मी असण्यात माझ्या स्त्री असण्याचा पुसट का होईना भाग आहे आणि तो माझ्या व्यक्ती असण्यात बेमालूम मिसळून गेला आहे.
त्यामुळे स्त्री म्हणजे काय किंवा स्त्रीत्व म्हणजे काय याचे उत्तर माझ्यासाठी वर उल्लेखलेले सगळेच आहे जे जे माझ्याशी निगडीत आहे, जे माझ्या विचारांचा महत्वाचा भाग आहे, जे माझ्या आचरणाचा आरसा आहे कारण मी एक अशी व्यक्ती आहे जी स्त्री देखील आहे.
Viola Davis चा एक कोट इथे उधृत करुन मी माझ्या लेखाची सांगता करते.
“Do not live someone else’s life and someone else’s idea of what womanhood is. Womanhood is you. Womanhood is everything that’s inside of you.”
छान लेख आहे. मला पुन्हा एकदा
छान लेख आहे. मला पुन्हा एकदा वाचावा लागेल. माझ्या लेव्हलला फार उच्च मराठी आहे
transgender woman. हा उल्लेख देखील मी कोणाच्या लेखात येईल हे बघत होतो..
धन्यवाद ऋन्मेष
धन्यवाद ऋन्मेष
छान लेख + मनोगत + विवेचन.
छान लेख + मनोगत + विवेचन.
पुन्हा एकदा वाचावा लागणार आहे
पुन्हा एकदा वाचावा लागणार आहे.
छान लिहिले आहेस.
छान लिहिले आहेस.
कविन, विषयापेक्षा खूप उच्च
कविन, विषयापेक्षा खूप उच्च पातळीवर चिंतन केलं आहेस. अगदी फारच भावलं .
यापुढे जाऊन असा विचार येतो की सेक्स, जेंडर आणि मनुष्याच्या उत्क्रांतीपासून आजपर्यंतच्या समाज+संस्कृतीपर्यंतच्या वाटचालीतून वाट्याला आलेली भुमिका या सगळ्याची सरमिसळ होऊन जे अदभुत रसायन बनतं त्याला स्त्री अथवा पुरुष अथवा स्पेक्ट्रमचे इतर घटक असं काही लेबलं देण्याची गरजच काय? सगळे केवळ मनुष्यप्राणीच का नाही?
स्त्री पुरुष फरकाची सुरुवात स्त्रीची जननक्षमता आहे. जर सर्व जीव आपल्यापासून दुसरा जीव निर्माण करू शकले असते तर चित्रं खूप वेगळ दिसलं असतं. हे आपलं असंच.
छान लिहिले आहेस कवीन. आवडलं.
छान लिहिले आहेस कवीन. आवडलं.
तुझा लेख पाहून लगेच्च
तुझा लेख पाहून लगेच्च वाचायला घेतला. त्याचे चिज झाले. स्वगत खूप आवडले.
>>> आणि तिसरा भाग आहे .......
हे विवेचन, हा मोनोलॉग तर इतका आवडलाय. निवडक १० मध्ये या लेखाचा अंतर्भाव करते आहे.
--------------
इतकं सुस्पष्ट आणि तरीही कोणत्या एका गृहीतकाला झुकतं माप न देता, रॅशनली मी ना लिहू शकले असते ना मी तेवढा विचार केला. sex is biological gender is social - असे म्हणतात. हे पटते. म्हणजे होमोफोबिआ पासून ते हे पटण्यापर्यंत आता प्रगल्भ झालेले आहे. आणि तरीही तू पोझ केलेले, दिलेले प्रश्न पुनश्च तपासून पहाणार आहे.
-----------
बक्षिसाकरता मनापासून शुभेच्छा.
चांगला विषय आणि चांगले मुद्दे
चांगला विषय आणि चांगले मुद्दे मांडले आहेस, कविन.
काही निरीक्षणं नोंदवल्याशिवाय राहवत नाही.
>>>
मी स्त्री आहे कारण मी शरिराच्या जोडीने मनानेही स्वतःला स्त्री म्हणून बघते. ती माझी निवड आहे.
त्रिनेत्रा हलदर आणि श्रीगौरी या ट्रान्सवुमन स्त्री आहेत कारण त्या स्वतःला स्त्री म्हणून बघतात. ती त्यांची निवड आहे.
<<<
हे माझ्या वाचनानुसार टेक्निकली खरं नाही. बायोलॉजिकल सेक्सपेक्षा जेन्डर आयडेन्टिटी निराळी असण्यात चेतासंस्थेचा रोल आहे, आणि ती 'निवड' नाही. ट्रान्स व्यक्तीला तसं नसायचा 'चॉइस' नसतो, जसा तो सिस्जेन्डर व्यक्तीलाही नसतो.
सिस्जेन्डर असणं ही तुझीमाझी निवड नव्हती. आपल्याला त्या बाबतीत कधी शंकाच आली नाही याचा अर्थ आपली बायोलॉजी आणि आपली चेतासंस्था यांच्यात जेन्डरच्या संदर्भात समन्वय आहे.
सिस आणि ट्रान्सजेन्डर्स यांच्यात (मेंदू, चेतापेशी आणि चेतातंतू यांनी बनलेल्या) चेतासंस्थेच्या जडणघडणीत फरक दिसून आले आहेत.
हे आवर्जून आणि वारंवार स्पष्ट करायचं कारण 'ट्रान्स असणं हे मनाचे खेळ किंवा व्याधी किंवा फॅडं आहेत' आणि 'जरा समजावलं, धाक दाखवला, शिक्षा केली, तर ती 'निवड' बदलू शकेल' अशा प्रकारच्या गैरसमजांना खतपाणी मिळू नये. (मी हे सगळे आक्षेप ऐकलेवाचले आहेत.)
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
हे माझ्या वाचनानुसार टेक्निकली खरं नाही. बाह्यशारीरिक गुणधर्मांशी जेन्डर आयडेन्टिटी निराळी असण्यात चेतासंस्थेचा रोल आहे, आणि ती 'निवड' नाही. ट्रान्स व्यक्तीला तसं नसायचा 'चॉइस' नसतो, जसा तो सिस्जेन्डर व्यक्तीलाही नसतो.
सिस्जेन्डर असणं ही तुझीमाझी निवड नव्हती. आपल्याला त्या बाबतीत कधी शंकाच आली नाही याचा अर्थ आपली बायोलॉजी आणि आपली चेतासंस्था यांच्यात जेन्डरच्या संदर्भात समन्वय आहे.>> हो हे बरोबर आहे. खरतर निवड म्हणण्या मागे विचार हा होता की मी जितकी स्त्री आहे तितकेच त्या ही स्त्री आहेत. फक्त sex organs वेगळे आहेत.
कदाचित वाक्यरचना अजून नीट क्रिस्टल क्लिअर होईल अशी करता आली असती मला.
कदाचित पहिला ड्राफ्ट लिहिला गेला त्यात या सिस ट्रान्स वर भर दिल्याने हे वाक्य त्यावेळी मला परत वाचताना ऑड वाटले नाही. आणि विषय कैच्याकै लंबकात खेचला जाऊन बोअर होण्याची शक्यता जास्त वाटल्याने नंतर जे काटछाट केले मी त्यात हा मुद्दा आणि हे वाक्य मला नेमके काय म्हणायचे आहे ते पोहोचवणार नाही हे लक्षात आले नाही (कारण माझ्या डोक्यात ते संदर्भ आणि अर्थ होतेच. कागदगावर लेख काटछाट केल्यावर डोक्यातही ही काटछाट करायला हवी यापुढे हे लक्षात आले या निमित्ताने)
>>> मी जितकी स्त्री आहे
>>> मी जितकी स्त्री आहे तितकेच त्या ही स्त्री आहेत.
येस!
मुद्दा योग्य स्वाती.
हे आवर्जून आणि वारंवार स्पष्ट करायचं कारण 'ट्रान्स असणं हे मनाचे खेळ किंवा व्याधी किंवा फॅडं आहेत' आणि 'जरा समजावलं, धाक दाखवला, शिक्षा केली, तर ती 'निवड' बदलू शकेल' अशा प्रकारच्या गैरसमजांना खतपाणी मिळू नये.
>>>>>> मुद्दा योग्य स्वाती.
या ट्रान्सवुमन स्त्री आहेत
या ट्रान्सवुमन स्त्री आहेत कारण त्या स्वतःला स्त्री म्हणून बघतात. ती त्यांची निवड आहे.>>>
मी जितकी स्त्री आहे तितकेच त्या ही स्त्री आहेत>>>
दोन्ही घोंगडीविधानं (blanket statements) वाटतात. एक या बाजूचं आणि एक त्या बाजूचं.
कुठलं तरी एक टोक धरून उभं राहिलंच पाहिजे असं नाही. Its ok not to conform and have your own opinion.
दोन्ही घोंगडीविधानं (blanket
दोन्ही घोंगडीविधानं (blanket statements) वाटतात.>> माझी वाक्यरचना स्पष्ट नसल्याने किंवा सदोष असल्याने असे वाटले असल्यास तो लेखणीचा माझ्या लेखी मायनर असला तरी दोष आहे म्हणेन.
have your own opinion.>> हे बाकी योग्य लिहिलेत. म्हणूनच मी माझे स्वतःचेच मत लिहिले आहे. लेखातही आणि प्रतिसादातही.
लेख वाचला. पुन्हा एकदा
लेख वाचला. पुन्हा एकदा वाचावा लागेल. पण स्वाती यांनी ज्या दोन वाक्यांबद्दल लिहिलं , त्याबद्दलच मलाही लिहावंसं वाटतं.
<मी स्त्री आहे कारण मी शरिराच्या जोडीने मनानेही स्वतःला स्त्री म्हणून बघते. ती माझी निवड आहे.
त्रिनेत्रा हलदर आणि श्रीगौरी या ट्रान्सवुमन स्त्री आहेत कारण त्या स्वतःला स्त्री म्हणून बघतात. ती त्यांची निवड आहे.>
निवड हा शब्द तीव्रतेने खटकला. ती दोन्ही वाक्ये बदलायची गरज आहे. हा दोष मायनर नाही.
त्यातला निवडीचा भाग असलाच तर त्यांना जे जाणवतं ते समाजासमोर आणायचं की नाही यापुरताच आहे.
Being transgender is a choice असं गुगल करा आणि येणारी उत्तरं बघा.
धन्यवाद भरत
धन्यवाद भरत
निवड या शब्दामुळे मांडायचे आहे ते योग्य अर्थाने पोहोचत नव्हते. शब्दाची निवड चुकली त्यादृष्टीने. सबब अर्थ पोहोचवणे जास्त महत्वाचे असल्यामुळे वाक्यरचना बदलली आहे.
मी कर्मणी प्रयोग वापरला असता.
मी कर्मणी प्रयोग वापरला असता.
कविन, वेगळ्या कोनातून या
कविन, वेगळ्या कोनातून या विषयावर लिहिले आहेस. खूप आवडला लेख.
कविन, विषयापेक्षा खूप उच्च
कविन, विषयापेक्षा खूप उच्च पातळीवर चिंतन केलं आहेस. अगदी फारच भावलं . >>> अगदी अगदी.
छान लिहीलं आहेस.
अभिनंदन कविन !
अभिनंदन कविन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक
छान आहे प्रशस्तिपत्रक
अभिनंदन!
अभिनंदन!