पाक कृती स्पर्धा क्र.३: 'मिलेटचे डोही मिलेट तरंग' अर्थात मिलेट चाट बास्केट - धनि

Submitted by धनि on 24 September, 2023 - 20:30
millet chat  basket
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बास्केट साठी -
ज्वारीचे पीठ ८ टेबलस्पून
मैदा २ टेबलस्पून
बेकिंग सोडा १/२ टीस्पून
बेकिंग पावडर १/२ टीस्पून
मीठ
तिखट
हळद / काश्मिरी लाल (रंगासाठी)
ओवा
जिरे
तेल

चाटसाठी -
ज्वारीचा हुरडा
कांदा
कोथिंबीर
लिंबाचा रस
हिरवी मिरची
मीठ
चाट मसाला
शेव

क्रमवार पाककृती: 

या गणेशोत्सवात संयोजकांनी मिलेट्स वापरून काही तरी करून दाखवा असे आव्हान दिले. रमडशी चर्चा करत असताना हुरड्याचे काही तरी करता येईल अशी टूम निघाली. खरे तर इथल्या दुकानातले ते फ्रोझन हुरड्याचे पाकीट बरेच दिवस खुणावत होते आणि ज्वारीचे पीठ सुद्धा पँट्री मध्ये ठेवलेले होते. मग काय रमड म्हणाली की बास्केट चाट करताना ती ज्वारीच्या पिठाचीच कर म्हणजे ज्वारीच्या बास्केट मध्ये ज्वारीचा हुरडा - 'मिलेटचे डोही मिलेट तरंग'!

थोडी ओळख झाल्यावर आता क्रमवार पाककृती लिहीतो.

१) सुरूवातीला ज्वारी, मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून घेतले. त्यात थोडे जिरे आणि ओवा हातावर मळून घातला (बाकी काही मळत असाल तर हात नीट धुवून घ्या नाही तर लोकांना खाताना किक बसायची Lol )
२) आता त्याचे दोन वेगळे भाग केले. (मला दोन रंग हवे होते म्हणून. तुम्हाला एकच रंग हवा असेल तर सगळे एकत्र ठेवले तरी चालेल.)
३) एका भागात हळद आणि दुसर्‍या भागात काश्मिरी लाल घातले.
४) त्यात थोडे तेल घालून ते मळून घेतले.
५) आता पाणी घालून खूप पातळ न करता भिजवले.
६) परत तेल घालून नीट मळून घेतले. हे तेल आपल्याला बास्केट खुसखुशीत करण्याला मदत करणार आहे त्यामुळे कंजुसी करू नका.
७) हे पीठ १० मिनीटे झाकून ठेवले.
८) तो पर्यंत ओव्हन ३५० फॅ. ला प्रीहीट केला.
९) मळलेले पीठ मफिन कप लायनर्स मध्ये घालून ते मफिन टिन मध्ये ठेवले. याने बास्केटला नीट आकार आणि नक्षी पण मिळेल.
१०) हे २५ मिनीटे बेक केले. (१५ आधी मग १० फिरवून)
या आपल्या तयार बास्केट्स!
G23MilletCups.jpg

चाटकरता -

१) आमच्याकडे फ्रोझन हुरडा मिळाला आम्ही तोच वापरला. तुम्ही ताजा भाजलेला हुरडा वापरू शकता. हुरडा पार्टी झाल्यावर थोडा शिल्लक राहिला असेल तर तो घेवून या आणि मग वापरा.
२) कांदा, कोथिंबीर, मिरची बारीक चिरून घेतली.
G23Sahitya.jpg
३) हे सगळे हुरड्यात मिसळून घेतले.
४) त्यात चाट मसाला, थोडे मीठ आणि लिंबाचा रस घालून हलवून घेतले.

G23Hurda.jpg

५) हे मिश्रण बास्केट्स मध्ये भरून घेतले.
६) वरतून थोडी बारीक शेव टाकली. ( ही ऑप्शनल नाही)
७) रणवीर म्हणतो तसा एक पान प्रिय मित्र धनिया सजावटीकरता लावले.

खायला आपली मिलेट बास्केट चाट तय्यार!

G23MilletBasket2.jpg

खरं म्हणजे आम्ही साशंक मनानेच पहिला घास तोंडात टाकला. पण खूपच आवडली.

वाढणी/प्रमाण: 
४ बास्केट्स
अधिक टिपा: 

१) तुमच्या बास्केट्स किती वजन घेतील त्याप्रमाणे आणि आवडत असेल तर गोड / तिखट चटणी वापरू शकता.
२) हुरड्याची चाट न करता त्यात लसूण चटणी / तिखट टाकून ते बास्केट मध्ये भरू शकता.
३) बास्केट गूळ घालून गोड करून त्यात गूळ आणि तूप घातलेला कोवळा हुरडा घालू शकता म्हणजे एक गोड पदार्थ पण होईल.

माहितीचा स्रोत: 
कथा संकल्पना - रमड (rmd) , निर्मिती दिग्दर्शन - धनि
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

मस्त आहे पाककृती.
>>>>>>>> बास्केट गूळ घालून गोड करून त्यात गूळ आणि तूप घातलेला कोवळा हुरडा घालू शकता म्हणजे एक गोड पदार्थ पण होईल.
वाह!

छान दिसत आहे बास्केट..
मागच्या वर्षी सुद्धा आलेली कोणाची तरी टोकरी कटोरी..

छन्दिफन्दि , सिंडरेला, दत्तात्रय साळुंके , मानव पृथ्वीकर, अनिंद्य , ओजस, देवकी, सामो, मनीमोहोर, चना@12 , अश्विनीमामी , ऋन्मेऽऽष , लंपन, अन्जू, sanjana25 >> तुम्हाला सर्वांना धन्यवाद.

खरे तर लोकांना आवडेल का असा प्रश्न पडला होता पण तुमच्या प्रतिसादांनी हुरूप आला.

ज्वारीचे पदार्थ व्हायलाच हवेत... >> हो ना. ज्वारीचे पीठ पडलेले असते आणि भाकरी खुप आवडातात. पण असे बरेच पदार्थ आहेत थालिपीठ, उप्पीट सारखे जे करता येतील पण केले जात नाहीत. नीट लक्षात ठेवून करायला पाहिजेत. Happy

बास्केट गूळ घालून गोड करून त्यात गूळ आणि तूप >> पुढच्या वेळेस हुरडा आणला की करून बघायला हवा हा पदार्थ Wink

मागच्या वर्षी सुद्धा आलेली >> टोकरी ही हीट आयडीया आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात आणि वेगवेगळे पदार्थ भरता येतात. Lol

वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात आणि वेगवेगळे पदार्थ भरता येतात. Lol >>>> या टोकर्‍या बाजारतून विकत आणून भरायचे काम घरी करणे असते तर मी सुद्धा पाककृती स्पर्धात एंट्री दिली असती Lol

ऋन्मेऽऽष >> अरे टोकरी करण्यात तर खरी गम्मत आहे Wink

तू म्हणत असशील तर आपण टोकर्‍या करून विकायला लागू - तुझे मार्केटींग झकास आहे Lol

मला या बास्केटस कितपत खुसखुशीत झाल्या असतील अशी शंका आहे!
कडकडीत झाल्या तर मजा नाही!

आंबट गोड >> खुसखुशीत होण्याकरताच बेकिंग सोडा आणि पावडर घातलेली आहे. आणि मळताना दोन वेळेस तेल घातले आहे. पाणी घालायच्या आधी शॉर्टनिंग सारखे आणि पाणी घालून भिजवल्यावर सुद्धा. त्यामुळे एक दिवस ठेवल्या तरी खुसखुशीत राहतात. नक्की करून बघा. शंका असेल तर आर्धी बॅच करा Wink

धन्यवाद हर्पा.

सायो >> हो आम्हाला इंग्रो मध्ये फ्रोझन सेक्शन मध्ये मिळाला. दीप ब्रँडचा पोंक नावाने मिळाला.

Pages