मायबोली गणेशोत्सव २०२३ विशेष लेख - ’अक्ष’वृत्तांत

Submitted by वावे on 23 September, 2023 - 12:38

’युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतिची याचना’

पृथ्वी सूर्याभोवती फिरते, या खगोलीय वस्तुस्थितीचा कुसुमाग्रजांनी आपल्या ’पृथ्वीचे प्रेमगीत’ या अजरामर कवितेत लावलेला हा अर्थ.

सूर्याभोवतीच्या कक्षेत धावणारी पृथ्वी स्वतःभोवतीही फिरत असते. पृथ्वीचं सूर्याभोवतीचं ’परिभ्रमण’, स्वतःभोवतीचं ’परिवलन’, चंद्राचं पृथ्वीभोवतीचं परिभ्रमण, पृथ्वीच्या आसाची स्वतःची गती, या सर्वांचा परस्परसंबंध आणि त्याचे होणारे परिणाम या विषयाचा थोडक्यात आढावा मी इथे घेणार आहे.
पृथ्वी स्वतःभोवती ज्या काल्पनिक रेषेभोवती फिरते, त्या रेषेला आपण पृथ्वीचा ’आस’ किंवा ’अक्ष’ (Axis) म्हणतो. हा आस पृथ्वीच्या पृष्ठभागाला ज्या दोन बिंदूंमध्ये छेदतो, ते दोन बिंदू म्हणजे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव (North pole and south pole). पृथ्वीचा अक्ष उत्तरेकडे ज्या बाजूला रोखलेला आहे, त्या दिशेला आपल्याला रोज रात्री जो तारा दिसतो, त्याचं नाव आहे ध्रुव तारा (Polaris). हा तारा पृथ्वीच्या आकाशातलं आपलं स्थान बदलत नाही, म्हणजेच तो ’अढळ’ आहे, या कल्पनेवरून निर्माण झालेली उत्तानपाद राजा, त्याच्या सुनीती आणि सुरुची या राण्या आणि ध्रुव या राजपुत्राची गोष्ट आपल्या सर्वांना माहितीच आहे.

पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार (Elliptical) आहे. त्यामुळे पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर वर्षभर कायम रहात नाही. जुलै महिन्यात हे अंतर जास्त असतं, तर जानेवारीत ते कमी असतं.

physicalgeographydotnet.jpgwww.physicalgeography.net

या कक्षेशी पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष काटकोन करत नाही, तर तो काटकोनापासून साडेतेवीस अंशांनी कललेला आहे. पृथ्वीच्या मध्यभागावरून जी काल्पनिक रेषा जाते, ती म्हणजे विषुववृत्त. म्हणजेच, पृथ्वीची सूर्याभोवतीची कक्षा आणि विषुववृत्त यांच्यात साडेतेवीस अंशाचा कोन आहे.

पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य पृथ्वीभोवती फिरत आहे असा भास होतो. या भासमान मार्गाला ’क्रांतिवृत्त’ (ecliptic) असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे, विषुववृत्ताची रेषा जर आकाशाच्या काल्पनिक गोलापर्यंत वाढवली, तर त्या काल्पनिक रेषेला ’खगोलीय विषुववृत्त’ (celestial equator) असं म्हटलं जातं. खगोलीय विषुववृत्त आणि क्रांतिवृत्त यांच्यातही साडेतेवीस अंशांचा कोन आहे. याचं कारण म्हणजे अर्थातच पृथ्वीचा कललेला आस.

celestial_equator_wikipedia.jpghttps://en.wikipedia.org

पृथ्वीच्या कललेल्या आसाचा एक ठळक परिणाम म्हणजे ऋतुचक्र. २१ जूनला उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो, तर २२ डिसेंबरला सर्वात मोठी रात्र. (दक्षिण गोलार्धात बरोबर उलटं.) कारण २१ जूनला आस उत्तर दिशेने सूर्याच्या बाजूला जास्तीत जास्त कललेला असतो.

almanacdotcom.jpgwww.almanac.com

जसजशी पृथ्वी कक्षेत पुढे पुढे प्रवास करते, तसतशी आसाची कलण्याची दिशा सूर्यापासून बाजूला जाते. २२ डिसेंबरला तो सूर्याच्या जास्तीत जास्त विरुद्ध दिशेला कलतो. २३ सप्टेंबरला आसाची दिशा या दोन्ही दिशांच्या मधे असते. त्याचप्रमाणे २१ मार्चलाही आसाची दिशा अशीच मधोमध असते. २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दोन तारखांना दिवस आणि रात्र समसमान असतात.

farmers_almanac.jpgwww.almanac.com
उदाहरणासाठी आपण उत्तर गोलार्धातील कुठलंही एक अक्षवृत्त घेतलं तर आपल्या लक्षात येईल की २१ मार्चनंतर आणि २३ सप्टेंबरपूर्वी रोज या अक्षवृत्ताचा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भाग सूर्यप्रकाशित असतो. याचाच अर्थ असा की या काळात या अक्षवृत्तावरचा कुठलाही बिंदू दिवसातला पन्नास टक्क्यांहून जास्त काळ सूर्यप्रकाशित असेल. त्यामुळे उत्तर गोलार्धात या काळात उन्हाळा असतो. याउलट उरलेल्या सहा महिन्यांमधे हा बिंदू दिवसातला पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त काळ काळोखात असेल. अर्थातच तेव्हा हिवाळा असतो. मात्र उत्तर (आणि दक्षिण) ध्रुवाजवळचा काही भाग असा असतो की जो सहा महिने कायम प्रकाशात असतो आणि उरलेले सहा महिने काळोखात. म्हणजेच तिथे सहा-सहा महिने दिवस आणि रात्र असतात. अर्थात ध्रुवीय प्रदेशात सूर्यकिरण खूप तिरपे पडत असल्यामुळे तिथे ’उन्हाळ्यातही’ तीव्र थंडी आणि बर्फ असतो. पृथ्वीची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. जुलैमधे पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर जास्त असतं, तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो आणि जानेवारीत जेव्हा हे अंतर कमी असतं तेव्हा तिकडे उन्हाळा असतो. म्हणजे मुळात पृथ्वी सूर्यापासून जवळ आणि शिवाय दिवसातला जास्त काळ सूर्यप्रकाश, यामुळे दक्षिण गोलार्धातला उन्हाळा जास्त तीव्र असतो. त्याचप्रमाणे तिथला हिवाळाही तीव्र असतो.

पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती (परिवलन), सूर्याभोवती फिरण्याची गती (परिभ्रमण) याबरोबरच पृथ्वीला अजून एक सूक्ष्म गती आहे, ती म्हणजे परांचन गती (Precession motion). इंग्रजीत ज्याला wobbling म्हणतात, तशा प्रकारची ही गती आहे. पृथ्वीचा आस या गतीमुळे सावकाशपणे ( सुमारे २६००० वर्षांमधे एकदा) एक वर्तुळ पूर्ण करतो. आपल्याला परिवलन आणि परिभ्रमण या गती जशा जाणवतात, तशी परांचन गती जाणवण्याचं कारण नाही. परंतु, काही रोचक बदल मात्र या गतीमुळे घडतात आणि ते आपल्याला समजू शकतात.

human_origin.jpgwww.humanoriginproject.com

परांचन गतीचा एक परिणाम आपल्या सगळ्यांना माहिती असेल, तो म्हणजे मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारीवरून १५ जानेवारीला जाणं. काही वर्षांपूर्वीपर्यंत दरवर्षी १४ जानेवारीला येणारी आणि फक्त लीप वर्षीच १५ तारखेला येणारी मकरसंक्रांत आता जवळजवळ दर वर्षी १५ जानेवारीला येऊ लागली आहे. या शतकाच्या उत्तरार्धात ती हळूहळू दर वर्षी १६ जानेवारीला येऊ लागेल. सर्वसाधारणपणे दर ७१ वर्षांनी ही तारीख एक-एक दिवसाने पुढे जाते. आपल्या संस्कृतीत जेव्हा मकरसंक्रांत साजरी करायला सुरुवात झाली, तेव्हा हा दिवस आणि दक्षिणायन संपण्याचा दिवस एकच होता ( आजच्या आपल्या कालगणनेनुसार २२ डिसेंबर). त्यामुळेच काही वेळा ’मकरसंक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होतं’ असं वाचायला मिळतं. पण ही माहिती चुकीची आहे (शेकडो वर्षांपूर्वी ती बरोबर असली तरी). उत्तरायण २२ डिसेंबरनंतरच सुरू होतं. मकरसंक्रांतीचा दिवस मात्र पुढे गेला आहे आणि जात राहणार आहे.
हे नेमकं कसं होतं? आपण वापरत असलेल्या ग्रेगरियन ( जानेवारी, फेब्रुवारी वगैरे महिने ज्यात असतात) दिनदर्शिकेमधलं वर्ष हे ’Tropical’ म्हणजे ’सांपतिक’ किंवा ’सायन’ सौर वर्ष असतं. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका हीदेखील सौर दिनदर्शिका आहे आणि ती सूर्याच्या संपातबिंदूवर येण्यावर आधारित आहे. क्रांतिवृत्त (पृथ्वीभोवती सूर्य ज्या भासमान मार्गावरून वर्षभरात एक फेरी पूर्ण करतो तो मार्ग) आणि खगोलीय विषुववृत्त (अवकाशाच्या काल्पनिक गोलापर्यंत वाढवलेलं विषुववृत्त) हे दोन्ही भासमान मार्ग एकमेकांना ज्या दोन बिंदूंमध्ये छेदतात, ते बिंदू म्हणजे संपातबिंदू. सूर्य क्रांतिवृत्तावरून प्रवास करत करत जेव्हा संपातबिंदूंवर येतो तेव्हा पृथ्वीवर दिवस-रात्र समसमान असतात. या दोन्ही वेळी सूर्य विषुववृत्ताच्या बरोबर डोक्यावर येतो. यापैकी ज्या वेळी सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश करतो, तो बिंदू म्हणजे वसंतसंपात आणि ज्या वेळी सूर्य उत्तर गोलार्धाकडून दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो तो बिंदू म्हणजे शरदसंपात. कालगणना सामान्यतः वसंतसंपातबिंदूशी जोडलेली असते. ( वसंतसंपाताच्या दुसर्‍या दिवशी भारतीय सौर दिनदर्शिकेचं नवीन वर्ष सुरू होतं.) ही कालगणना, सूर्य कुठल्या नक्षत्राच्या किंवा राशीच्या पार्श्वभूमीवर दिसत आहे, यावर अवलंबून नसते.

सांपतिक किंवा Tropical वर्षाव्यतिरिक्त ’Sidereal’ किंवा ’नाक्षत्र’ सौर वर्षही असतं. ते सूर्य कुठल्या तार्‍यांच्या पार्श्वभूमीवर दिसतो, याच्याशी निगडित असतं. या दोन्ही पद्धतींमधल्या वर्षाच्या कालावधींमध्ये अतिशय कमी, म्हणजे वीस मिनिटे, इतकाच फरक असतो. नाक्षत्र वर्ष हे सांपतिक वर्षापेक्षा वीसच मिनिटांनी मोठं असतं. पण शेकडो-हजारो वर्षांमध्ये हा फरक साठत जाऊन खूप वाढतो.

मकरसंक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. राशी किंवा नक्षत्रांमधले तारे हे आपल्यापासून अनेक प्रकाशवर्षे लांब आहेत. (एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाश एका वर्षात जेवढं अंतर कापतो तेवढं अंतर. प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख किलोमीटर.) सूर्य मात्र आपल्यापासून अगदी जवळ, म्हणजे साडेआठ प्रकाश मिनिटांवर आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजे पृथ्वीवरून सूर्याकडे पाहताना सूर्य आपल्याला मकर राशीच्या पार्श्वभूमीवर दिसू लागतो. पण आपली कालगणना सांपतिक असल्यामुळे दर काही वर्षांनी आपल्या दिनदर्शिकेनुसार ही तारीख पुढे जात राहते. मकरसंक्रांत साजरी करायला सुरुवात झाली तेव्हा दक्षिणायनाच्या शेवटी सूर्य मकर राशीत प्रवेश करत होता. सध्या दक्षिणायन संपत असताना सूर्य धनु राशीत असतो. हळूहळू तो अजून मागच्या राशीत (वृश्चिक राशीत) जाईल. म्हणजेच आपल्या दिनदर्शिकांमधली मकरसंक्रांतीची तारीख पुढे पुढे जात राहील. खालील चित्रावरून हे अधिक स्पष्ट होईल.

human_origin1_0.jpghttps://humanoriginproject.com/

संपातबिंदू स्थिर मानला, तर त्याच्या संदर्भाने राशीचक्र मेष, मीन, कुंभ, मकर असा ’उलटा’ प्रवास करतं. आज जर सूर्य संपातबिंदूवर असताना मीन राशीत असेल, तर सावकाशपणे तो संपातबिंदूच्या वेळी कुंभ राशीत दिसू लागेल, त्यानंतर मकर राशीत, इत्यादी. वरच्या चित्रात हे संपातबिंदूच्या अनुषंगाने दाखवलेलं असलं तरी विषुवदिनाच्या ( आणि कुठल्याही दिवसाच्या) बाबतीतही हेच लागू आहे.

आपण जर कालगणनेसाठी नाक्षत्र सौर वर्ष वापरायला सुरुवात केली, तर मकरसंक्रांतीची तारीख कायम तीच राहील, पण ऋतू मागे मागे जात राहतील.

आज पृथ्वीचा आस ज्या दिशेला रोखलेला आहे, त्या दिशेला आपल्याला ध्रुवतारा (Polaris) दिसतो. पण १२,००० वर्षांपूर्वी तो ’अभिजित’ ( Vega) या तार्‍याकडे रोखलेला होता. अजून १३,००० वर्षांनी परत अक्ष अभिजितकडेच रोखलेला असेल. इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पृथ्वीचा अक्ष नेहमी कुठल्या तरी विशिष्ट तार्‍याच्या दिशेने रोखलेला असलाच पाहिजे, असं नाही. ध्रुव तार्‍याचा पृथ्वीच्या अक्षाशी तसा काहीच थेट संबंध नाही. किंबहुना, पृथ्वीचा अक्ष ध्रुव किंवा अभिजित या तार्‍यांकडेही अगदी १००% अचूकपणे रोखलेला आहे/ होता असंही नाही. पण दिशा समजण्यासाठी ही अचूकता पुरेशी आहे.

पारंपरिक हिंदू कालगणना ही आकाशातल्या सूर्य आणि चंद्र, या दोन्हीच्या (भासमान) भ्रमणावर आधारित आहे. वर्ष मोजण्याची पद्धत सूर्यावर आधारित असली तरी महिने मोजण्याची पद्धत मात्र चंद्रावर आधारित आहे. याला Lunisolar दिनदर्शिका असं म्हणतात. एक चांद्र महिना २९ ते ३० दिवसांचा असतो. असे बारा महिने मिळून ३५४-३५५ दिवसांचं एक वर्ष होतं. जवळपास सगळे हिंदू सण (मकरसंक्रांत सोडल्यास) चांद्र कालगणनेनुसार असल्यामुळे दरवर्षी हे सण १० ते ११ दिवसांनी मागे येतात. हे जर असंच चालू राहिलं तर कालांतराने दिवाळी पावसाळ्यात, गणेशोत्सव उन्हाळ्यात येऊ लागेल. तसं जर झालं, तर बराच गोंधळ होईल, कारण सणांचा आणि ऋतूंचाही जवळचा संबंध असतो. दिवाळीत थंडीच हवी आणि अक्षय्यतृतीया उन्हाळ्यातच हवी. सण ऋतूनुसार येत राहतात, कारण दर तीन वर्षांनी ’अधिक महिना’ येतो आणि दरवर्षीची दहा-बारा दिवसांची ’तूट’ एकदम भरून काढतो. यावर्षी श्रावण महिना ’अधिक’ होता. हा ’अधिक’ महिना कधी येणार आणि कुठला महिना ’अधिक’ येणार, हे कसं ठरतं ते आता पाहू.

सूर्य वर्षभरात क्रांतिवृत्तावरून एक फेरी पूर्ण करतो. यावेळी तो बारा राशींमधून प्रवास करतो. म्हणजेच एका वर्षात बारा ’संक्रांती’ असतात. (आपण त्यातली फक्त मकरसंक्रांत साजरी करतो.) दोन संक्रांतींच्या मधला कालावधी म्हणजे एक सौर मास. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्र, पृथ्वी आणि सूर्यामधल्या सापेक्ष भूमितीवर चंद्राच्या ’कला’ ठरतात. आपले चांद्र मास ( चैत्र, वैशाख इत्यादी) ’अमान्त’ असतात, म्हणजे शुद्ध प्रतिपदेला सुरू होऊन अमावस्येला संपतात. सामान्यत: ते २९-३० दिवसांचे असतात आणि या प्रत्येक चांद्र मासात एक सौर संक्रांत येते. पण सौर वर्ष ३६५ दिवसांचं आणि चांद्रवर्ष ३५४-३५५ दिवसांचं असल्यामुळे दर तीन वर्षांनी एकदा अशी परिस्थिती येते की एखाद्या चांद्र महिन्यात सौर संक्रांत येतच नाही. तो महिना सुरू होण्यापूर्वी एक सौर संक्रांत येऊन जाते आणि महिना संपल्यावर पुढची संक्रांत येते. हा महिना मग ’अधिक’ महिना म्हणून ओळखला जातो आणि त्यानंतरचा महिना, ज्यात सौर संक्रांत येते, तो ’निज’ महिना म्हणून ओळखला जातो. अधिक महिन्याचं खगोलशास्त्र हे असं आहे.
निसर्गाकडे, आकाशाकडे आपण आपापल्या नजरेने पाहतो. प्राचीन भारतीय, ग्रीक संस्कृतींमधल्या लोकांनी तारकासमूहांच्या आकारांवरून अनेक कल्पक कथा रचल्या आणि त्यायोगे ते तारकासमूह आणि त्यांचे परस्परसंबंध पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवले. वर उल्लेख केलेल्या ’पृथ्वीचे प्रेमगीत’ कवितेत आकाशात स्थिर दिसणारा ध्रुवतारा, पृथ्वी आपल्याकडे लक्ष देत नसल्यामुळे ’निराशेत संन्यस्त’ होऊन बसल्याची कल्पना कुसुमाग्रज करतात. पहाटे किंवा संध्याकाळी आकाशात दिसणा‍र्‍या शुक्र ग्रहाला पाहून तर अनेक सुंदर कविकल्पना निर्माण झाल्या.
चंद्राच्या बदलत्या कला, बदलणारे ऋतू, सूर्याचं आकाशातलं बदलणारं स्थान या सगळ्याची निरीक्षणं माणसाने शतकानुशतकं घेतली आणि त्यात अधिकाधिक अचूकता आणली. अनुकूल बदल (उदा. वसंत ऋतूची सुरुवात) साजरे करण्याचीही पद्धत पडली. सण आणि उत्सवांमध्ये आनंद असतोच, निसर्गाशी, ऋतुचक्राशी निगडित उत्सवांमागचं कारण समजल्यावर अनेक शतकांपूर्वी आकाशाची आणि निसर्गाची निरीक्षणं करून हे उत्सव साजरे करण्याची सुरुवात करणार्‍या अनामिक पूर्वजांशी एक धागाही जुळतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छान आहे. वावे, तुम्ही नेहमीच माहितीपूर्ण रोचक लिहिता.
मला परत एकदा विद्यार्थी झोनमध्ये जाऊन मन लावून वाचायचा आहे. >>>> + १

नवीन प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद!

मामी, निलेश ओक हे नाव ऐकलं आहे बहुतेक, पण वाचलं/ ऐकलं नाहीये त्यांचं काही.

परिवलन आणि परिभ्रमण या गतींच्या मानाने परांचन गती खूप कमी असते त्यामुळे कल्पना करायला कठीण जातं.

उपाशी बोका, क्लिष्ट मराठी पारिभाषिक शब्द वापरण्याऐवजी सोपे इंग्रजी शब्द वापरायला माझीही हरकत नसते Happy ओढूनताणून तयार केलेले काही मराठी शब्द मलाही खटकतात. हा आपापल्या threshold चा प्रश्न आहे Wink

पण 'विज्ञानाची भाषा इंग्रजीच आहे' हे तुमचं म्हणणं मात्र मला पटत नाही. आपण मराठीत लिहिल्याशिवाय मराठीत चांगलं विज्ञानविषयक साहित्य कसं निर्माण होणार? मी मराठीत जो लेख लिहिलाय तो इंग्रजीत भाषांतरित केला तर तो समजायला जास्त सोपा होईल का? मला नाही वाटत. अजून सोप्या प्रकारे कसं लिहायचं, यावर विचार नक्कीच करायला हरकत नाही, पण त्यात 'मराठी की इंग्रजी' हा मुद्दा आणावा असं मला वाटत नाही.

वावे व मामींशी सहमत. अमांशीही सहमत आहे Happy पण अमा - त्यांनी ऑलरेडी एक दोन तसे केले आहेत. त्यांच्या दुसर्‍या लेखात लिन्क आहे Happy

परिवलन, परिभ्रमण हे दोन शब्द मलाही माहीत होते. शाळेतच आले होते. पण क्रांतीवृत्त, परांचन गती वगैरे शब्द जर संदर्भ न देता आले असते तर माझ्याही डोक्यावरून गेले असते. पण यामुळेच मला हा लेख जास्त आवडला - कोठेही नेहमीच्या वापरात नसलेला शब्द असेल तर तेथे त्याचा अर्थ किंवा इंग्रजी शब्दही दिलेला आहे.

काही वाक्ये:
पृथ्वीचं सूर्याभोवतीचं ’परिभ्रमण’, स्वतःभोवतीचं ’परिवलन’
या भासमान मार्गाला ’क्रांतिवृत्त’ (ecliptic) असं म्हटलं जातं
पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती (परिवलन), सूर्याभोवती फिरण्याची गती (परिभ्रमण)
तर त्या काल्पनिक रेषेला ’खगोलीय विषुववृत्त’ (celestial equator) असं म्हटलं जातं
ती म्हणजे परांचन गती (Precession motion). इंग्रजीत ज्याला wobbling म्हणतात, तशा प्रकारची ही गती आहे.

विविध विषयांवर अशा लेखांची मराठीत खूप गरज आहे असे मला वाटते.

वावे +१.
परांचन गतीचा इंग्रजी शब्दही (मला) तितकाच माहिती नसलेला होता. रादर दहावी पर्यंत विज्ञान मराठीत शिकलेले असल्याने परांचनगती हाच शब्द ओळखीचा होता. पण त्याबद्दल जास्त माहिती करुन घेण्यासाठी तो शब्द पुरेसा न्हवता कारण काय गूगल करू हा प्रश्न पडला असता. पण लेखात दोनही शब्द असल्याने तो प्रश्न पडला नाही आणि सुबोध मराठी शब्द वापरुन ते बोजड किंवा हेकट असं वाटलं नाही. मराठीचा वापर दुराग्रह न वाटता तो सहज असल्याने लेख आणखी वाचनीय झाला आहे.
वावेचे युट्युब व्हिडिओ ही खूप आवडतात.
>>विविध विषयांवर अशा लेखांची मराठीत खूप गरज आहे असे मला वाटते.>> फा, +१

वावेंनी भाषे संबधी विषयावर छान प्रतिसाद दिला आहे. अजून सोपे करून सांगण्यास वाव आहे पण त्याचा भाषेशी संबंध नाही हे अगदी पटले.

परांचनाची कल्पना करण्यास "भोवरा फिरतो तसा" असे वर प्रतिसादात लिहिले आहेच. त्यात पुढे अशी भर घातली तर कळायला अजुन सोपे जाईल का, लेखी अथवा पॉडकास्ट सांगताना? (व्हिडीओ असेल तर अर्थात ते सर्वोत्तम.):

"भोवरा किंवा भिंगरी फिरताना नंतर जेव्हा हळु फिरू लागतात तेव्हा ते इकडे तिकडे न फिरता कसे एका जागील पण कसे कलून फिरू लागतात. यात भिंगरीची मधली दांडी म्हणजेच अक्ष तो सरळ उभा न रहाता जसा कलुन फिरू लागतो तेच परांचन. जसजसे अजुन हळूहळू फिरू लागतात तसे तसे परांचन वाढत जाते आणि शेवटी ते पडतात. पडण्या आधीची असे फिरणे परांचन दर्शविते. "

हो Happy

बरोबर मानव. पण भोवरा अगदी बरोब्बर सरळ सुरुवातीला तरी फिरतो का? मी भोवरा फारसा फिरवलेला नाही Lol मला वाटत होतं की सुरुवातीपासूनच तो थोडा कललेला असाच फिरतो.
मी रेडिओ खगोलशास्त्राची ओळख करून देणारे दोन यूट्यूब व्हिडिओ केले होते. अजून एक दोन भाग करणार होते, पण ते राहून गेलं. माझ्या
रेडिओ खगोलशास्त्र आणि जीएमआरटी (रेडिओ दुर्बीण

या लेखाखालच्या प्रतिसादात लिंक्स आहेत.
(लेखाची लिंक यासाठी दिली की आधी लेख चाळून बघितला तर विषयाचा अंदाज येईल.)

भोवरा सुरवातीला जागा सोडून इकडे तिकडे पळतो, त्यात कलून परत जरा सरळ होऊन जागा बदलतो वगैरे. मग एका जागी स्थिरावतो तेव्हा परांचन स्पष्ट दिसते.
भिंगरीतही, यात उभा दांडा म्हणजे अक्ष असे मुलांना सहज कल्पता येईल असे वाटले.

----
रच्याकने पृथ्वीच्या मुख्य परांचना (precession) व्यतिरिक्त उप-परांचन (nutation) पण त्याही व्यतिरिक्त Chandler wobble हे तिसऱ्याच प्रकारचे आहे हे आताच कळले. ही तर भयंकर गुंतागुंत आहे.

या सर्वांमुळे खगोलशास्त्रात पृथ्वीवरून अवकाशातील दिशा ठरवणे आणि तारांगणाचा संदर्भ घेऊन पृथ्वीवरील global positioning केवढे किचकट होत असावे ना!?

रच्याकने पृथ्वीच्या मुख्य परांचना (precession) व्यतिरिक्त उप-परांचन (nutation) पण त्याही व्यतिरिक्त Chandler wobble हे तिसऱ्याच प्रकारचे आहे हे आताच कळले. ही तर भयंकर गुंतागुंत आहे.

>>>>> अरे बापरे. थांबा थांबा. आधी त्या परांचनचं विरेचन होऊ द्या.

अप्रतिम लेख लिहिला आहेस. अतिशय माहितीपूर्ण, सोप्या भाषेत व परिपूर्ण माहिती आहे. भाषेवरील प्रभुत्व नेहमीच जाणवते. गणेशोत्सव झाल्यावर शांतचित्ताने वाचायला राखून ठेवला होता.

कॅनडात असताना' Why Canada has winter?' वाचलं होतं. त्यात प्राथमिक स्वरूपाची माहिती होती. अधिक मास , सणांच्या तिथी, मकर व सौरसंक्रांत, राशीचक्रातलं परिभ्रमण, ध्रूवपद सुद्धा अढळ नसणं, हे आणि इतर गोष्टी वाचून खूप मस्त माहिती मिळाली. हे इतकं छान गणेशोत्सवानिमित्त वाचायला मिळालं यासाठी अनेक आभार. पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे आहे.

मानवदादांचे प्रतिसादही आवडले.
भोवरा फिरताना नेहमीच कललेला दिसतो. त्याचा आकार पृथ्वीसारखा कुठे ? Happy
ही तर भयंकर गुंतागुंत आहे.+1

छान माहितीपूर्ण लेख. लिहिलंयही सोप्या भाषेत. दोनदा वाचला तेव्हा थोडा कळला पण हा माबुदो. परत वाचण्यासारखा आहे हे नक्की. मुलाला ही वाचायला देईन.

उत्तम लेख. या संदर्भात एक आठवलं. नारळीकरांनी एका लेखात टिळकांनी खगोलशास्त्र अभ्यासातून वेदांचा काळ कसा ठरवला याबद्दल लिहिले आहे. त्यात वसंत संपात आणि परांचन गतीचा अभ्यास त्यांनी कसा केला, तसच विविध पौराणिक ग्रंथांमध्ये वसंत संपात वेगवेगळ्या नक्षत्रात असल्याचे उल्लेख टिळकांनी शोधले आणि त्याप्रमाणे संपात बिंदू सरकल्याचा अभ्यास केला असा उल्लेख आहे.(टिळक खगोल शास्त्राचे अभ्यासक होतेच). या सगळ्याची सुरुवात त्यांना बहुतेक " मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनांकुसुमाकर: " या श्लोकामुळे झाली.

रोचक. पण मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनांकुसुमाकर: ह्यात नक्षत्र कुठे आहे? मार्गशीर्ष आणि कुसुमाकर (वसंत) हे काही फारसे बदलले नसावेत. बहुधा महिन्यांची नावं जी येतात तेव्हा सूर्य सध्या त्या नक्षत्रात नसतो असा काही विचार त्यांनी केला का? ( अश्विन - अश्विनी, कार्तिक - कृत्तिका, मृगशिरस - मार्गशीर्ष, पुष्य - पौष वगैरे... नक्षत्रांच्या यादीत साधारण २-३ gaps सोडून एकेक घेत गेलं की ही नावं बरोबर त्या क्रमाने जुळतात. २७/१२ साधारण सव्वा दोन होत असल्यामुळे). पूर्वी कदाचित ह्या नक्षत्र - महिना जोड्या जुळत असाव्यात. आता नक्षत्रे कालसापेक्ष सरकत सरकत गेली असावीत.

पूर्वी कदाचित ह्या नक्षत्र - महिना जोड्या जुळत असाव्यात. आता नक्षत्रे कालसापेक्ष सरकत सरकत गेली असावीत>>> नक्षत्र आणि महिनाण्या जोड्या कायमच जुळतात. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते त्या महिन्याचे नाव. मृग नक्षत्रात असतो म्हणून मार्गशीर्ष. वेदांच्या अभ्यासातून असे त्यांना दिसले की विविध ठिकाणी ज्या नक्षत्रात वसंत संपात लिहिला आहे ती वेगळी आहेत. साधारण एका नक्षत्रात ९५६ वर्षे( वरचे वावेचे चित्र पाहा ९५६*२७ वर्षे साधारण परांचनासाठी). म्हणजे काही हजार वर्षांपूर्वी वसंत संपात मृगात होता. तेंव्हा गीता लिहिली असावी. असं काहीसं.

>>>>>नक्षत्र आणि महिनाण्या जोड्या कायमच जुळतात. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते त्या महिन्याचे नाव. मृग नक्षत्रात असतो म्हणून मार्गशीर्ष.
अरे हे माहीतच नव्हते. बरोबर डिसेंबरात मार्गशीर्ष येतो तेव्हा सूर्य असतो धनुमध्ये म्हणजे पोर्णिमेस चंद्र मिथुनेत असणार. पण तो दर वर्षी 'मॄगातच' असतो ते माहीत नव्हते मला वाटायचे आर्द्रा वगैरे मिथुनेच्या कोणत्याही नक्षत्रात येत असावा.

उत्तम लेख... आवडला.. तुमचे लिखाण नेहमीच आवडते...
बऱ्याच जणांना हे माहित नसेल कि सूर्य एकाच ठिकाणी स्थिर नाहीय.. तो सर्व प्लॅनेट्स बरोबर घेऊन मिल्की वे ला रिव्हॉल्व करतो... हा मेसेज वाचायला तुम्हाला 2 सेकंड लागले असतील तर समजून घ्या - आपण 440 किमी प्रवास केलेला असेल.
सूर्याचा वेग आहे 220 किलोमीटर पर सेकंड.

punekarp, डॉ. नारळीकरांच्या लेखाचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद Happy हा लेख मी वाचला नव्हता. थोडं शोधल्यावर हा लेख सापडला.
https://bharatabharati.in/2011/01/15/how-tilak-dated-the-vedas-jayant-v-...
तुम्ही म्हटलं आहे तो हाच लेख असावा. मस्त आहे.
लोकमान्य टिळकांनी याबाबतीत काम केलं आहे हे माहिती असलं तरी मला सविस्तर माहिती नव्हती आणि मार्गशीर्षाचा संदर्भ तर अजिबात माहिती नव्हता. आर्य उत्तर ध्रुवाकडच्या प्रदेशातून आले हे त्यांनी काढलेलं अनुमान तेवढं माहिती होतं.

तुम्ही लिहिलेली महिन्यांच्या नावाबद्दलची माहितीही एकदम बरोबर आहे. चंद्र पौर्णिमेला ज्या नक्षत्रात असतो, त्यावरून त्या महिन्याचं नाव ठरतं.

फक्त, वर उल्लेख आलेला मार्गशीर्ष महिना हा 'सौर' आहे. सूर्य मृग नक्षत्रात.
वर्णिता, च्रप्स, धन्यवाद Happy

फक्त, वर उल्लेख आलेला मार्गशीर्ष महिना हा 'सौर' आहे. सूर्य मृग नक्षत्रात.>> धन्यवाद वावे. हे सौर आहे हा महत्त्वाचा मुद्दा सांगितला त्याबद्दल.
मी वाचलेला लेख लोकसत्ताने टिळकांच्या १०० व्या पुण्यतिथीच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या विशेषांकात होता. पण या इंग्रजी लेखात लिहिले आहे तेच साधारण होते. फक्त आकृत्या वगैरे जास्त होत्या.

वर उल्लेख आलेला मार्गशीर्ष महिना हा 'सौर' आहे. >> ते का? महाभारतकाळी सौर कालगणना होती का? तो श्लोक गीतेतला आहे, म्हणून विचारतोय.

ता.क. तो लेख चाळून पाहिला आणि श्लोकाचा संदर्भ बघितला. त्यात मार्गशीर्ष महिना सरकण्याबद्दल उल्लेख आहे. मला आता लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. धन्यवाद punekarp आणि वावे. शिवाय चांद्रमास-नक्षत्र संबंध ध्यानात आणून दिल्याबद्दलही आभार.

>>>>>>>फक्त, वर उल्लेख आलेला मार्गशीर्ष महिना हा 'सौर' आहे. सूर्य मृग नक्षत्रात.
अहो मार्गशीर्ष डिसेंबरात येतो ना? तेव्हा सूर्य धनु राशीत असतो.

बरोबर आहे सामो, तेव्हा पौर्णिमेला चंद्र मृग नक्षत्रात असतो. भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणेही तेव्हाच अग्रहायण (मार्गशीर्ष) महिना असतो.
पण टिळकांनी शेकडो-हजारो वर्षांमध्ये वर्षारंभ आणि महिने मोजण्याची पद्धत, महिन्यांची नावं ठेवण्याची पद्धत कशी बदलत गेली (असावी) याचं विवेचन केलं आहे.

कालगणना हा विषय खोल आहे आणि माझा यातला अभ्यास खोल नाही. Happy

नारळीकरांच्या लेखात त्यांनी 'वसंतसंपाताच्या वेळी सूर्य मृग नक्षत्रात' असा उल्लेख केला आहे आणि मार्गशीर्ष महिना वसंत ऋतूत येण्याबद्दल लिहिलं आहे म्हणून मी वर तसं लिहिलं आहे.
सध्या आपण ज्याला मार्गशीर्ष म्हणतो तो (चांद्र आणि सौर) महिना नोव्हेंबर-डिसेंबरमधे येतो. पण टिळकांना म्हणायचा आहे तो मार्गशीर्ष महिना हाच का, हे मला माहिती नाही. एक नक्की की परांचन गतीशी या विवेचनाचा जवळचा संबंध आहे, रादर परांचन गतीच्या अभ्यासावर आधारितच हा सगळा अभ्यास आहे!

Pages