मायबोलीकरांनो, वाहतुकीमध्ये दुचाकीवरून जाताना अपघात झाला तर हेल्मेट न वापरल्यामुळे होणाऱ्या परिणामांची तीव्रता जास्त असते. प्रसंगी जीवसुद्धा जाऊ शकतो. हेल्मट जर वापरले तर हाच जाणारा जीव वाचू शकतो. दुचाकीवर बसताना जर हेल्मेट घालायचे टाळावेसे वाटले तर घरी आपले कुटुंब आपली वाट बघत आहे हे लक्षात घ्या आणि हेल्मेटचा वापर अनिवार्य आहे हे मनाशी पक्के करा. हाच या चित्रकला स्पर्धेचा विषय आहे, 'वाहतूक सुरक्षा आणि हेल्मेटचा वापर'. यात तुम्हाला हेल्मेटच्या वापराचे महत्व सांगणारे चित्र काढून ते रंगवायचे आहे. समर्पक असे घोषवाक्य सुद्धा तुम्ही देऊ शकता.
तर चला ,या स्पर्धेत सहभागी होऊन समाजामध्ये हेल्मेट वापरण्यासाठी प्रबोधन करूया.
हि मोठ्यांसाठी स्पर्धा आहे.
स्पर्धेचे नियम व अटी -
१. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' या ग्रुपमध्ये नवीन धागा काढून त्यात फोटो द्यावे. 'मायबोली गणेशोत्सव २०२३' हा ग्रुप १९ सप्टेंबर २०२३ रोजी उघडेल.
२. धाग्याचे नाव चित्रकला स्पर्धा-१ - मोठा गट - 'वाहतूक सुरक्षा आणि हेल्मेटचा वापर' - मायबोली आयडी किंवा खरे नाव (ऐच्छिक- जर प्रशस्तिपत्रकावर खरे नाव पाहिजे असेल तर ) अशा प्रकारे द्यावे.
३. कोणीही कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
४. चित्र काढतानाचे आणि पूर्ण चित्राचा फोटो असे मिळून किमान तीन फोटो द्यायचे आहेत.
५. प्रवेशिकेची अंतिम तारीख अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरील प्रमाणवेळेनुसार (पॅसिफिक टाइमझोन) २८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार २९ सप्टेंबर २०२३ दुपारी १२:३० वाजेपर्यंत )
|| गणपती बाप्पा मोरया ||