चना दाल - घिंया ची भाजी (चण्याची डाळ - दुधी)

Submitted by योकु on 14 September, 2023 - 01:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ही ऑनेस्ट किचन या युट्यूब चॅनल वर पाहीलेली रेस्पी. घिंया म्हणजे गोलमटोल लोटीच्या आकारांतला दुधी. तो तर काही इकडे कधी पाहिला नाही म्हणून साधाच दुधी वापरून केलेय. दुधी-चणाडाळ अन मुळात दुधी... बोअरच होते. ही जरा वेगळ्या धाटणीची भाजी आहे, मस्त चविष्ट होते. नुसत्या दुधीची चोरटी होते तशी होत नाही. करून पाहा...

एक लहान दुधी
तीन ते चार कमी तिखट हिरव्या मिरच्या
दोन मध्यम टोमॅटो
एक मध्यम मोठा कांदा
चार पाच लसणीच्या पाकळ्या
इंचभर आल्याचा तुकडा
थोडी कोथिंबीर
एका वाटीहून थोडी कमी पण पाऊण वाटीहून जास्त - चण्याची डाळ
दोन मसाला वेलच्या
दोन तमालपत्रं
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा काश्मिरी तिखट
अर्धा चमचा हळद
चमचाभर कसूरी मेथी
अगदी थोडा - दोन चिमटीभर - गरम मसाला
चवीनुसार मीठ
चिमूटभर साखर (काही केल्या ही घातल्याशिवाय पदार्थ होतच नाही घरी... असो)
तीन ते चार टेबलस्पून तेल
चमचाभर जिरे
मोठी चिमूटभर हिंग

क्रमवार पाककृती: 

ही भाजी डायरेक्ट कुकरात करायचा प्रकार आहे. साहित्य जास्त वाटत असलं तरी कृती फार वेळखाऊ नाही.
तर,
चण्याची डाळ चार ते पाच तास आधी भिजत घालावी (हा वेळ अर्थातच कृतीत धरलेला नाही)
दुधी सोलून शेंडा, बुडखा काढून टाकून एक बारकीशी फोड खाऊन पाहावी. गोडसर आणि शुभ्र पांढरा असेल तरच पुढे वापरावा. दुधीच्या मध्यम मोठ्या फोडी करून तयार ठेवाव्यात
कांदा - टोमॅटो मध्यम आकारांत चिरून घ्यावेत
लसणी सोलून, आलं आणि लसूण ठेचून घ्यावं
मिरच्यांचे मोठे उभे तुकडे करावेत आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी

कुकर तापत घालावा आणि तापल्यावर तेल घालून जिर्‍याची फोडणी करावी त्यातच हिंग, तमालपत्रं आणि मोठ्या वेलच्या घालाव्या
जरा फोडणी खरपूसली की यात कांदा घालून त्याच्या कडा सोनेरी होइस्तो परतावा
यात आता कसूरी मेथी, आलं-लसणीचा पेंड आणि टोमॅटोच्या फोडी घालून चांगलं परतावं
मसाल्याला तेल सुटलं की उरलेले सगळे कोरडे मसाले घालून अजून एक दोन मिनिटे परतून घ्यावं. या स्टेज ला फारच कोरडं पडलेलं असेल मिश्रण तर जरासा पाण्याचा हबका मारता येइल.
मसाला नीट परतल्या गेला, त्याला तेल सुटलं, घरात सुगंध उधळला की यात निथळलेली चण्याची डाळ घालून अजून दोन-तीन मिनिटं भाजायचंय. मसाला नीट मिक्स झाला की यात आता दुधीच्या फोडी घालून एकदा व्यवस्थित मिसळून थोडं पाणी घालयचं. कुकर बंद करून तीन - चार शिट्ट्या मध्यम मोठ्या होऊ द्याव्यात आणि नंतर अगदी कमी आचेवर अजून २ मिनिटं ठेवून नंतर आच बंद करावी.
कुकरचं प्रेशर निवलं की यात कच्च्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि गरम मसाला घालून सजवावं आणि गरमगरमच खायला घ्यावं.
एखादा साधा पुलाव किंवा जिरा-राईस, बासमतीच्या भातासोबत, गरम साध्या पराठ्यांसोबत सुरेख लागते.

आज फोटोही आहे - ताटलीत ही भाजी, बाजूला डब्याकरता केलेली पत्ताकोबीची बटाटा मटार घालून परतून केलेली सुकी भाजी आहे. साधे फुलके, सलाद आहे सोबत. चटणी - लसूण, भाजलेले शेंगदाणे-लाल सुक्या मिरच्या, सुकं खोबरं जिर्‍याची आहे.

IMG_0582.jpeg

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे
अधिक टिपा: 

फोटोत मोहोरी दिसतेय हे माहितीये मला. चुकून आणि नेहेमीच्या सवयीनं जराशी मोहोरी घातल्या गेली तेलात Sad
फार पाणी घालायचं नाहीये कुकर मध्ये. दुधीचंही पाणी सुटतंच.
दुधी असला तरी अगदी गाळ होत नाही या भाजीत, कुकरमध्ये केली असली तरी

माहितीचा स्रोत: 
ऑनेस्ट किचन युट्यूब चॅनल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पाकृ. फोटोही मस्त आलाय.
दुधीची भाजी नेहमी मी मूगडाळ घालून करते. तिचा कंटाळा आला की कधीकधी कांदा टॉमेटो घालून आणि सांबार मसाला घालून करते. तीही छानच लागते. आता हा प्रकार करून बघितला पाहिजे.

तोंपासू ताट आहे..
मी डिट्टो अशी करते कुकरमध्ये हि भाजी.. फक्त जरा दालचिनी चा तुकडा पण घालते..झारखंड वाल्या एका मैत्रिणीकडे शिकलेले..

मस्त रेसिपी. फोटूसाठी स्पेशल थँक्स. Happy
(पण मला आता भूक लागली फोटो बघून! थोडं कच्चं तेल घाला चटणीवर आणि आणा ते ताट इकडे! Proud )

मस्त रेसिपी योकु. आमच्याकडे दुधी -दोडकी -वांगी वगळता एकही भाजी न खाणारे लोक असतात तेंव्हा ही भाजी पण करता येईल रोटेशनमधे

तोंपासू फोटो... एकदम परिपूर्ण जेवणाचं ताट.. कोबीची भाजी पण मस्त दिसतेय.

दुधी-चना आवडीचं काँबिनेशन आहे मी करते नेहेमी पण कांदा टॉ न घालता. आता हे वर्जन करुन पाहते. अजून एक म्हणजे नुसतं ओलं खोबरं आणि सांबार मसाल्यची एमटीआर पेस्ट घालून पण छान लागते दुधी. मात्र अगदी एकसारखा क्युब्स मधे चिरलेला असला पाहिजे. सुट्टा पण शिजतो वाफेवर.
मला तरी ३-४ शिट्ट्या जास्त वाटत आहेत.

मी परवाच veg recipes of इंडिया साइट वरून दुधीची अशीच भाजी केलेली. मस्त चमचमीत झालेली. चणा डाळ addition चांगली वाटतेय, प्रथिने मिळतील. शिट्ट्या मला ही जास्त वाटताहेत. मी इन्स्टंट pot मध्ये 0 मिनीट ठेवते. 5 मिनिटांनी steam release करते.

छान फोटो आणि रेसिपी. युट्यूब वरच्या गुजराती बाया अशी कुकर मध्येच करतात ही भाजी. मस्त होते कुकरला. दुधी, दोडका, कोबी, कांदा पातीला चणा डाळच आवडते. मूग डाळ एकदम जास्त शिजते.

घ्या की ताट... णो पिराबलेम. सोबत सुरेखसा इंद्रायणीचा भातही होता.

चटणी जरा इम्प्रॉव्ह आहे. झालं असं की आठवडी बाजारात किलोभर सुक्या खोबर्‍याच्या वाट्या मात्र १३०/- रुपयांत मिळाल्या तर त्या इम्प्ल्स मोड मध्ये घेतल्या गेल्या. त्या आता संपवणं आलं तर अक्षय पात्रासारखं हे चटणी पात्र झालंय.
तर्‍हेतर्‍हेच्या आणि यात ते त्यात हे असं करून चटण्या करतो आहोत सध्या.
तसंही अद्वैत करता रोजचा स्वयंपाक काश्मिरी मिरची चा असल्यानी तो अजिबातच तिखट नसतो तर चटणी प्रकार लागतोच.
तर यावेळी मी लाल सुक्या मिरच्या भाजून मग त्याची खोबर्‍याची चटणी केली तर ती जहाल तिखट झाली म्हणून मग त्यात जरा शेंगदाण्याचं कूट घालून तिला माईल्ड केलेय.

पत्ताकोबीच्या भाजीला कुणी लापी वाजवली तर देइन रेस्पी कोपच्यात Wink तशी काही विशेष नाहीचे म्हणा...

योकु!! या रेसिपीने २-३ भाजी करुन झाली, गणपतिच्या गडबडित इथे येवुन लिहायच राहिल, फार मस्त भाजी होते...अन्गासरशी रस्सा ठेवल्याने पोळीला काट मारुन साध-वरण भात आणी ही भाजी अस पण जमुन येत.
पहिल्यादा करताना जशिच्या तशीच फॉलो केली पण खडे मसाल्या मुळे असेल मला जरा उग्र वाटली मग पुढच्या वेळे तमालपत्र-वेलची वैगरे वगळून फक्त किचन किन्ग मसाला घालुन केली.

ताट मस्तच दिसत आहे.
आमच्याकडे मसाले न वापरता घरची चटणी घालून दूधी/दोडका/शेवगा असाच करतात. चण्याची डाळ भिजवलेली नसेल तर मुगाची डाळ वापरतात.

मस्त फ़ोटो आणि पाकृ.
Note : मला दुधी खूप आवडतो
छान कोवळा हिरवा असेल तर मज्जा
परतून साधी भाजी, थालीपीठ, धपाटे, धिरडे, अवकुरा, sandwitch, taco... कशाही फॉरमॅट मध्ये चालतो Happy