माणसाच्या क्षमतेची गरूडझेप!

Submitted by मार्गी on 26 August, 2023 - 09:27

✪ चांद्रयान ३ च्या उपलब्धीसंदर्भात युट्युबवर मुलाखत
✪ भारत देश म्हणून खूप मोठी उपलब्धी
✪ हजारो प्रक्रियांवर अचूक कार्यवाही आणि अनेक दशकांची मेहनत
✪ डोळ्यांनी साथ सोडली तरी जिद्द न सोडणा-या मुलाखतकार वेदिकाताई
✪ Visually impaired असूनही उच्च शिक्षण घेऊन समाजात योगदान
✪ ISRO आणि अशा जिद्दी व्यक्तींकडून खूप काही घेण्यासारखं

सर्वांना नमस्कार. सध्या आपण सगळे चांद्रयान- ३ ला मिळालेलं यश बघतो आहोत आणि वैज्ञानिकांचं कौतुक करतो आहोत. चांद्रयान- ३ ने गाठलेली मजल ही खूप मोठी गोष्ट आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर हजारो प्रक्रिया अचूक प्रकारे करणं, अनेक कमतरतांवर जिद्दीने मात करणं आणि अनेक दशकांच्या मेहनतीवर हे कळस चढवणं आहे. ह्यासंदर्भातच युट्युबरच्या GAARGEE चॅनलच्या वेदिकाताईंनी माझी मुलाखत घेतली. आज जिथे आपण फिल्मस्टार्स, क्रिकेटर्स, राजकीय नेते ह्यांच्यामागे धावत असतो तिथे विज्ञानाला फार कमी स्थान दिलं जातं. पण चांद्रयानाच्या निमित्ताने हे चित्र हळु हळु नक्कीच बदलताना दिसतंय. ही मुलाखत https://youtu.be/EnB10Cx1HM0 इथे बघता येईल. मुलाखत बघताना तुम्हांला जाणवणारही नाही की वेदिका ताई visually impaired आहे.

मुलाखतीच्या विषयाइतकीच मुलाखतकारसुद्धा प्रेरणादायी आहे. वयाच्या चौथ्या- पाचव्या वर्षी आधी एक आणि नंतर दोन्ही डोळ्यांनी त्यांची साथ सोडली. नजरेसमोर अंधार आला. पण वेदिका ताई- कु. वेदिका माधव फडके आणि त्यांचे पालक- श्री. माधव फडके व सौ. मेघना फडके ह्यांनी हार मानली नाही. सौ. मेघनाताईंनी जिद्दीने ब्रेल लिपी शिकून घेतली व कोल्हापूरातल्या अंध शाळेत वेदिका चौथीपर्यंत शिकली. शिकता शिकता इतरही दृष्टिहिन विद्यार्थ्यांना तिने मदत केली. पुढे जिद्दीने सामान्य शाळेतून दहावी व पुढचं शिक्षण घेतलं. ब्रेल लिपीमध्ये वाचायचं किंवा लिहायचं तर सामान्य अक्षराच्या तुलनेत पाच पट तरी जास्त मेहनत लागते. हे सगळं वेदिका करत गेली आणि रायटर्सच्या मदतीने पुढे परीक्षा देत गेली. दहावीच्या परीक्षेत रायटरला सांगताना होणा-या फरकामूळे संस्कृतमध्ये एक गुण गेल्याची खंत तिला होती. नंतर कंप्युटरवर ती टायपिंग शिकली आणि तिला लिहीलेलं मोठ्याने वाचून दाखवणारं सॉफ्टवेअरही मिळालं. एम कॉममध्ये डिस्टिंक्शन घेऊन ती सीएसाठी जवळ जवळ पात्र ठरली. आणि आता ती जॉबसुद्धा करते. त्याबरोबर अनेक विषयांवर लिहीते आणि तिचं युट्युब चॅनलसुद्धा तिने काढलं आहे. इतर अनेक दिव्यांगांना ती मदत करते. नवीन गोष्टी शिकतसुद्धा असते. तुम्ही युट्युबवर तिचे व्हिडिओज बघाल तर वाटणारसुद्धा नाही की ती आपल्यापेक्षा वेगळी आहे. पण निश्चितच ती आपल्यापेक्षा वेगळी आहे.

ISRO व वैज्ञानिकांनी करून दाखवलेली सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे कमीत कमी साधनांमध्ये जास्तीत जास्त मोठं काम. आणि ISRO ने घेतलेली गरूडझेप जितकी मोठी आहे, तितकीच वेदिका व तिच्या पालकांनी दाखवलेली जिद्द मोठी आहे असं वाटलं. जे करता येऊ शकत नाही त्याची खंत न करता जे करता येण्यासारखं आहे ते करत जायचं ही प्रेरणा त्या देतात. आज जिथे किरकोळ कारणांमुळे अनेक जण हिंमत हारतात किंवा फुटकळ कारणांमुळे ताण करून घेतात तिथे इतकी मोठी जिद्द व हिमतीची गोष्ट खरं तर लोकांपुढे आली पाहिजे. मुलाखत नक्की बघा आणि हा लेखसुद्धा आपल्या जवळच्यांना शेअर करा. धन्यवाद!

(निरंजन वेलणकर 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचं ज्ञान- रंजन असे उपक्रम.)

Group content visibility: 
Use group defaults

उत्तम!! मुलाखत ऐकेन.
चांद्रायन-३ जिथे उतरले त्या पॉइन्टला शिवशक्ती पॉइन्ट नाव देण्यात आलेले आहे.

व चाद्रायन-२ वाला 'तिरंगा पॉइन्ट.'