सप्टेंबरची सकाळ, शहर कॅलगरी. रात्री पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण एकदम कुंद-धुकट होते. कोंबडं झाकलं तरी उगवायचं काही राहत नाही अशी म्हण आहे पण कॅनडात हिवाळा असला तर कोंबडं झाकायचीही गरज भासत नाही. सप्टेंबर मध्ये मात्र हे अपेक्षित नव्हते. धुक्यातून वाट काढत बस शहरातून बाहेर पडली तरीसुद्धा धुक्याचा वेढा काही फुटला नाही. मोजके अनोळखी प्रवासी आणि बसच्या काचांवर लागलेला धुक्याचा पडदा यामुळे आतल्या आत विचार करू लागलो. मी इथे का आणि कसा आलो.
खिशात चार सुट्ट्या आणि चार पैसे खुळखुळले की माळ्यावरच्या अडगळीत टाकून दिलेल्या इच्छा खाली डोकावतात. त्यातलीच ही एक. वीस वर्षांपूर्वी "कोई मिल गया" चित्रपट बघण्यात आला आणि माझ्यावर जादू करून गेला (आणि हो, मी त्यातल्या परग्रहावरून अवतरलेल्या मती-मंद, निळ्या "जादू" या पात्राबद्दल बद्दल बोलत नाहीये तर आपल्याच ग्रहावरच्या अद्भुत जादुई निळाईबद्दल बोलतोय). बर्फाळ शिखरांनी वेढलेले मोरपंखी निळे तलाव आणि दाट हिरव्यागार जंगलांच्या पार्श्व-भूमीवर प्रीती आणि ह्रितिक सारखे "स्टार्स" निस्तेज आणि आऊट ऑफ फोकस झाल्यासारखे वाटले. गूगल मॅप्स आणि माझ्याकडचे नॅशनल जिओग्राफिक चे जुने अंक चाळून ह्रितिक-प्रीती सारखा मीही त्या ठिकाणी (आभासी पातळीवर का होईना) फिरून आलो. पण “सगळ्याच मनोकामना काही पूर्ण होत नाहीत बेट्या!” असं सांगून मनाने ही इच्छा सुद्धा इतर इच्छांच्या अडगळीत ढकलून दिली. अर्थात काही गोष्टी आपण ठरवून होत नाहीत. माझ्या कुंडलीतल्या ग्रहांचं भ्रमणमंडळच मला एक दिवस अलगद कॅनेडियन रॉकीज मध्ये फिरायला घेऊन आलं.
कॅलगरी सोडून आता पाऊण-एक तास झाला असेल आणि अचानक कॅनेडियन रॉकीज ची शिखरं धुक्यामागून डोकावू लागली. एका-मागून एक आणि दोनही बाजूंनी...आजवर जितक्या पर्वतशृंखला बघितल्या त्यात ही वेगळीच.
मन परत भूतकाळात गेलं. शाळेत असताना पानगळीच्या जंगलांच्या सातपुड्यात हिंडलो. कॉलेजात शिकायला पुण्यात आलो तेव्हा काळ्याकभिन्न सह्याद्रीतल्या गड-कोटांतून कित्येकदा इतिहासाच्या सफरीवर जाऊन आलो. नोकरी-धंदा करून थकलेलं-तापलेलं डोकं हिमालयाने बोलावून वेळोवेळी थंड केलं. पुढे परदेशी जायचा योग आला तेव्हा फक्त हॉलिवूड चित्रपटात बघितलेली लाल-बुंद ग्रँड कॅनिअन तसंच ओमानच्या वाळवंटातली करडी जबेल-अखदर भटकता आल्या. यातली सगळ्यात जास्त कुठली आवडली असं विचारलं तर चटकन नाही सांगता येणार.
कॅनडा सारख्या अवाढव्य देशाला साजेसा असा कॅनेडियन रॉकीज, कॅनडासारखाच विस्तीर्ण आहे. बर्फाच्छादित शिखरं, दाट जंगलं, हिरवीगार कुरणं, शेकडो हिमनद्या आणि असंख्य निळीशार तळी यांनी समृद्ध आहे. कॅनडातल्या अनेक राष्ट्रीय उद्यानांपैकी रॉकीज मधले "बँफ राष्ट्रीय उद्यान" हे सगळ्यात जुने.
बस बँफ मध्ये शिरली तेव्हा डोंगरगर्दीत वसलेले हे लहानसे गाव नुकत्याच पडून गेलेल्या सरींमुळे अधिकच टवटवीत दिसत होते. साडे-दहा वाजून गेले असले तरी सूर्य-प्रकाश अजूनही कोवळाच होता. चहू-बाजूंनी लक्ष ठेऊन असेलेले कॅस्केड माऊंटन, माऊंट रुंडल, सल्फर माउंटन आणि माऊंट नॉर्क्वे सारखे उंच पर्वत आणि विचारपूस करत जाणारी निळीशार "बो" नदी. कदाचित...कदाचित कशाला, नक्कीच बँफ हे कॅनडातले सगळ्यात सुंदर गाव असावे.
पाठीवरची जड सॅक माझ्या बॅकपॅकर्स हॉस्टेल मध्ये ठेवली आणि भटकायला बाहेर पडलो. शाळांच्या सुट्या संपल्या असल्याने पर्यटकांचे बरेच तांडे एव्हाना परतले होते. बँफ ऍव्हेन्यूच्या दुतर्फा असलेली छोटी छोटी सुवेनर्स शॉप्स, एक छोटेसे चर्च, एक पर्यटक माहिती केंद्र, एक लहानसा मॉल, बरीचशी लहान-मोठी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स हाच काय तो एक-दिड किमी चा पट्टा थोडाफार गजबजलेला होता. उरलेले बँफ गाव शांत होते.
दुपार झाली. पोटात भूक होती आणि आज योगायोगाने माझा वाढदिवस होता. बँफ ऍव्हेन्यू वाकून बघणाऱ्या एका रेस्टोरेंटच्या सज्जात स्वतःच स्वतःला ग्लास उंचावून चीअर्स केले आणि विचार करू लागलो. काय काय बघावे ?
आजच्या माहितीच्या आणि आभासी जगात तर सगळं काही घरबसल्या मोठ्ठया स्क्रीन वर बघता येतं. कुठल्याश्या नवीन ठिकाणाची एखाद्यानं यू-ट्यूब वर माहिती टाकायचा अवकाश, पुढच्या काही दिवसात - महिन्यात तिथे उत्साही लोकांचं मोहोळ उठतं आणि अजून तसेच शेकडो व्हिडिओ बघायला मिळतात. दोन वर्षांपूर्वी एका नामांकित कंपनीचा "व्हर्चुअल रिऍलिटी हेडसेट" घेतला. कॅनडातला नायगरा फॉल्स, रशियातला लेक बेकल, यूरोपातला आल्प्स, दक्षिण अमेरिकेतला जगातला सर्वात उंच धबधबा अंजेल फॉल्स असा कुठे कुठे घरबसल्या फिरून आलो. वाटलं अरे हे तर फारच मस्त आणि स्वस्त आहे. पंधरा-वीस हजारात कुठलीही तोशीस न लागताच जगप्रवास घडला. मग स्वतःहून कुठे जाण्याचा एवढा खटाटोप कशासाठी?
पण नुसतं बघणं आणि अनुभवणं यातला फरक फार मोठा आहे. तेव्हा म्हटलं लेक लुईसचा खरा रंग स्वतः जाऊन बघितल्याखेरीज उमजणार नाही, मोरेन लेक ची निळाई प्रत्यक्षात जाऊन पडताळल्याशिवाय अस्सल वाटणार नाही आणि खूप पायपीट करून थकल्यानंतर सल्फर माऊंटनवरच्या गरम झऱ्यात डुंबायचं सुख हे काही घरबसल्या मिळणार नाही.
दोन वर्षांपेक्षाही जास्त काळ उलटून गेल्यावर डोंगर चढायची वेळ होती. स्वतःची ताकद आजमवावी म्हणून जवळच्या आणि सोप्या अश्या "टनेल माउंटन" ची वाट धरली. "आधी नीट तयारी करून ये !" असं म्हणत त्याने पाऊस पाडून लगेच परत पाठवलं. बँफ ऍव्हेन्यू वरच्या एका दुकानात "पॉन्चो" (एक ढगळ पण उपयुक्त असा रेनकोट) घेतला आणि परत एकदा धापा टाकत डोंगर चढू लागलो. मनातल्या आदर्श गावाच्या व्याख्येत बँफ अगदी चपखल बसलं. आटोपशीर गाव, गावाला लागून असलेली फार उंच नसली तरी सर्व गाव दाखवणारी एक लहानशी टेकडी, छोटीशी टुमदार घरं, एक लहानसं सुबक रेल्वे स्टेशन आणि या सगळ्याला वळसा घालून जाणारी एक नदी. नशीबवान असलात तर या हिरव्या-निळ्या कॅनव्हॉस वर रंगीबेरंगी डब्यांची नक्षी काढत जाणारी कॅनेडियन रेल्वेसुद्धा दिसेल.
टनेल माऊंटन विनातक्रार सर करून छाती थोडी फुगल्यावर (धापा टाकून नव्हे) पायात थोडं अधिक बळ आलंच होतं, त्यात लेक लुईस च्या काठावरची "सेल्फी-गर्दी" बघून पावलं आपोआप तिथूनच थोड्या उंचावर असलेल्या लेक ऍग्नेसकडे वळली. तिथे एक लहानसे कॉफी-हाऊस आहे पण तिथल्या कॉफीची हौस तिथे बाहेर लागलेली लांबलचक रांग बघूनच फिटली. अर्थात इथे थकवा दूर करायला विकतची कॉफी कशाला लागतेय? लेक ऍग्नेसची साधी झलकही त्यासाठी पुरेशी आहे.
लेक ऍग्नेस मध्ये डोकावून बघणारा "डेव्हील्स थम्ब" आपल्याला अंगठा उंचावून चिअर अप करतो का तळ्यात पडलेल्या प्रतिबिंबातून "थंब्स डाऊन" करतो हे पुढची चढाई सर केल्याशिवाय कळत नाही. पण त्याआधी जवळच असलेल्या बिग बी हाइव्ह डोंगरावरच्या गझीबो मध्ये टेकून जरा श्वास घ्यावा, ओणवे होऊन गर्द झाडीतला मिरर लेक न्याहाळावा आणि ताज्या दमाने डेव्हिल्स थम्ब कडे निघावे.
इथल्या पाऊलवाटेवरून दिसणारं दृश्य अफाट आहे. माउंट लेफ्रॉय तर कैलास-पर्वताची आठवण करून देतो. थोडा वेळ इथंच एखाद्या पाषाणावर बसून समोरचं विराटपर्व बघत बसावं. काही क्षण स्थल-कालाचं भान नाहीसं होतं.
नावाला साजेसा डेव्हील्स थम्ब चालायला थोडा भीतीदायकच. दोन-एक फुटांच्या खोल भेगा असलेला तो डोंगरमाथा काळजीपूर्वक ओलांडून कड्याच्या पार टोकावर पोहोचलो की एखाद्या जहाजाच्या सुकाणूवर उभे असल्याचा भास होतो. सुकाणूच्या डावीकडे गडद निळा लेक ऍग्नेस, उजवीकडे वेगळ्याच निळाईचा लेक लुईस आणि पलीकडे लांबच लांब पसरत जाणाऱ्या डोंगर-लाटा.
आजवर केवळ कल्पनातीत असलेले ते निसर्गवैभव पाहून तृप्त झालो आणि तुकारामांचा अभंग आठवला.
याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा॥
आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया॥
इथून परत फिरताना पावलं जड झाली .... पण पायथ्याशी येईस्तोवर पोटऱ्या, गुडघे आणि मांड्या सगळंच जड झालं. अभंगातल्या शेवटच्या दोन ओळींचा आतापर्यंत विसर पडला होता. म्हणून परत त्याची उजळणी करायला एका छानश्या ब्रूवरी मध्ये तृष्णा भागवली आणि पुन्हा एकदा तृप्तीची नव्याने अनुभूती झाली.
दिवसभराच्या कामगिरीसाठी बक्षीस म्हणून संध्याकाळी बँफ ऍव्हेन्यू वरच्या ग्रिझली हाऊस मध्ये जेवायला गेलो. इतकं भटकूनही वाटेत नं दिसलेला कॅरिबू (एक दुर्मिळ हरीण) मेनू कार्ड मध्ये दिसला. तो किती दुर्मिळ आहे याची खात्री तो ताटात (खरं सांगायचं तर लहानश्या बशीत) समोर आल्यावर लगेचच पटली. ग्रिझली हाऊसचं मेनू कार्ड बसल्या बसल्याच जंगलात शिकार करायला घेऊन जातं. धाडसी असलात तर कॅरिबू, एल्क, बायसन, शहामृग, जंगली डुक्कर एवढंच नाही तर ऍलीगेटर आणि रॅटल स्नेक आदी प्राण्यांची शिकार करू शकता. घाबरट लोकांसाठी कोंबड्या आणि मासे अश्या सोप्या शिकारीची सोय आहे.
ताटातली जंगल-सफारी उरकली आणि सिक्स-पॅक घेऊन माझ्या हॉस्टेलवर परतलो (अर्धा डझन बिअर-कॅन्सला सिक्स पॅक म्हणतात. पोटाच्या सिक्स पॅकचा आणि माझा आजवर कधीही संबंध आला नाही. अनोळखी लोकांबरोबर सहजपणे मिक्स व्हायला मात्र बिअरचा हा सिक्स पॅक फार उपयुक्त आहे).
बॅकपॅकर्स हॉस्टेल म्हणजे एक मजेशीर अनुभव असतो. एका खोलीत चार ते सहा बंक बेड्स आणि त्यावर पूर्णपणे अनोळखी व्यक्ती. लहानपणी शाळेच्या एका सहलीला गेलो असताना शिडी लावलेले बंक बेड्स प्रथमच बघितले. शिडी चढून वरच्या बेड वर झोपताना तेव्हाही मजा वाटली आणि अजूनही वाटते. एकाच खोलीत किती तऱ्हेची लोकं भेटावीत? नुकताच कॉलेज संपवून फिरायला म्हणून बाहेर पडलेला क्युबेकचा उत्साही गॅब्रिएल, व्हॅन्कुव्हरचा पन्नाशी उलटलेला थोडासा चिडचिडा प्रोफेसर क्रेग, तिशीत असलेली चेक-रिपब्लिकहून तब्बल सहा महिन्यांच्या लांबलचक सफरीवर निघालेली चुणचुणीत मॅगी, बाईकवर स्वार होऊन अमेरिका-खंडाच्या स्वारी वर निघालेला चाळिशीतला स्वर्णेश. स्वभाव, वय,शैक्षणिक-व्यावसायिक पार्श्वभूमी असल्या अनावश्यक मर्यादा न राहता आपण फक्त "प्रवास" या एकाच गोष्टीने सहज कनेक्ट होतो.
रामदास सांगून गेलेत... ब्राम्हणू हिंडता बरा! त्यामुळे गात्रांना रात्रीची थोडी विश्रांती मिळाली की उजाडल्यावर शुचिर्भूत होऊन लगोलग बाहेर पडावे. फार लांब जायचे नसेल तर बो नदीच्या काठाकाठाने बो-फॉल पर्यंत फेरफटका मारावा, नाहीतर जवळच्याच पाणथळीवरच्या लाकडी केबिन मध्ये आरामात बसून थोडे पक्षी निरीक्षण करावे आणि परत बँफ ऍव्हेन्यू वर येऊन न्याहारी करावी.
कॅनेडिअन रॉकीज च्या एवढ्या मोठ्ठया पसाऱ्यात बघायचं काय आणि किती. नुसते बँफ नाही तर जॅस्पर, कूटनी आणि योहो ही अजून तीन राष्ट्रीय उद्याने आणि लहान मोठी तर कितीतरी. यात जॅस्पर हे तर बँफच्या दुप्पट विस्तार असलेले. एखाद्या उत्तम रेस्टोरेंट मधला सर्वच्या सर्व मेनू काही आपण एकाच भेटीत संपवू शकत नाही. तेव्हा आपल्याला एका वेळी जेवढं झेपेल तेवढंच मागवावं आणि चवी-चवीने खावं. त्यातल्या त्यात तिथली प्रसिद्ध डिश चाखावी. पण प्रत्येक वेळी प्रसिद्ध ते चांगलं असतंच असंही नाही. अशावेळी थोडा अभ्यास आणि स्थानिक लोकांशी संवादही आवश्यक असतो. इथली प्रसिद्ध ठिकाणं तर निःसंशय सुंदर होतीच पण थोड्या आडवाटेवरची लहानशी तळी, फारशी वर्दळ नसलेल्या पायवाटा वेगळाच आनंद देऊन गेल्या. थोडं अंतर राखून चालणारा पण तसा निर्धास्त एल्क, सतत पोटपूजेत मग्न असलेले आणि आपल्या उपस्थितीची फारशी दखल न घेणारे बिग-हॉर्न शिप्स, स्वतःच्याच तंद्रीत डुलत डुलत जाणारा पण आपल्याला मात्र धडकी भरवणारा आडदांड ग्रिझली हे सर्व याच आडवाटांवर भेटले.
कॉन्सोलशन लेकच्या काठाने एकटाच फिरत असतांना आस्थेने चौकशी करणारा छोटा मित्र
बँफहून कॅलगरीला जाणाऱ्या परतीच्या बस मध्ये बसलो. कधी-काळी असलेलं कुठलसं एक मनोरथ अचानक पूर्ण झालं आणि भूतकाळातही गेलं. सहज विचार आला, मी इथे परत येऊ शकेन (किंवा येईन) का ? प्रथमदर्शनी प्रेमाला- द्वितीय दर्शन उतारा असतो हे जर खरं असलं तर बँफ मला दुसऱ्या भेटीतही इतकेच आवडेल? पण याचं उत्तर हवं असलं तर परत यावंच लागेल.
... आणि नशिबानं मला तसं परत येता आलं. बँफ ओलांडून कॅनेडिअन रॉकीजच्या पार उत्तर टोकावर जॅस्पर मध्येही भटकता आलं. त्याची गोष्ट नंतर कधीतरी.
छन्दिफन्दि - बॉब रोस बद्दल
छन्दिफन्दि - बॉब रोस बद्दल माहीत नव्हते. छान वाटली पेंटिंग्स.
अस्मिता - कितीही वेळा गेलं तरी कमीच आहे. तुम्हाला अनेकवेळा जाता आलं, नशीबवान आहात. माऊंट लेफ्रॉय खरंच कैलास पर्वतासारखा वाटला.
रायगड - धन्यवाद.
अस्मिता - थँक्स! जायचे आहेच
अस्मिता - थँक्स! जायचे आहेच कधीतरी.
कितीही वेळा गेलं तरी समाधान
कितीही वेळा गेलं तरी समाधान होत नाही आणि सगळं पाहूनही होत नाही असा भाग आहे हा.
सुंदर लेख.
सुंदर !
सुंदर !
(विशलिस्टीत काय काय म्हणून टाकायचं असा प्रश्न पडलेली बाहुली)
जॅस्पर/ बॅन्फला गेलं की
जॅस्पर/ बॅन्फला गेलं की रिटायरमेंटला इकडे यायचं असं ठरवतो.
झेलम - "कितीही वेळा गेलं तरी
झेलम - "कितीही वेळा गेलं तरी समाधान होत नाही आणि सगळं पाहूनही होत नाही असा भाग आहे हा" खरंय.
ललिता-प्रीति -
अमितव - "जॅस्पर/ बॅन्फला गेलं की रिटायरमेंटला इकडे यायचं असं ठरवतो" - काश ...
'प्रथमदर्शनी प्रेमाला-
'प्रथमदर्शनी प्रेमाला- द्वितीय दर्शन उतारा असतो' त्यामुळे हा लेख आणि फोटो पुनःपुन्हा वाचला परंतु मन अजूनही भरले नाही. अतिशय सुंदर
ग्रिझली भेटला हे किती कॅजुअली
ग्रिझली भेटला हे किती कॅजुअली लिहिलंय कालच बॅन्फ मध्ये ग्रिझलीने एका जोडप्याला मारल्याची बातमी वाचून हा धागा आठवला.
बॅन्फ बालदीयादीतून काढलं आहे
खरंय मोरोबा...
खरंय मोरोबा...
पण ग्रीझली जरा लांब होता म्हणून कॅज्युअली लिहिलं... थोडा अजून जवळ असता तर कल्पनाच करवत नाही. बॅन्फ मात्र बादलीयादीतून काढू नका.
Pages