योगाचे सांस्कृतिक अपहरण (Cultural appropriation of Yoga)

Submitted by चामुंडराय on 20 June, 2023 - 21:58

योगामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक स्तरावरचे सुपरिणाम लक्षात आल्यावर आणि योगाला जगभर प्रसिद्धी मिळाल्यावर त्या मागचे अर्थकारण लक्षात घेऊन पाश्चिमात्य देशांमध्ये व इतरत्र देखील योगाचा आर्थिक प्राप्तीसाठी व्यावसायिक पद्धतीने वापर सुरु झाला. योगासने आणि प्राणायाम शिकवण्यासाठी योग प्रशिक्षण वर्ग जागोजागी सुरु झाले. पुढे त्यांची संख्या एव्हढी वाढली कि त्याला मॅकयोगा (McYoga) अशी संज्ञा मिळाली. आजकालच्या सोशल मीडिया आणि डिजिटल जगाचे अर्थप्राप्तीसाठी योगाकडे लक्ष न जाते तर नवलच त्यामुळे आंतरजालावर योगाचा प्रसार झाला. प्रकृतिस्वाथ्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी, विविध व्याधी मुक्तीसाठी, इतर अनेक कारणांसाठी तसेच केवळ कुतूहलापोटी एक कुल ट्रेंड किंवा फॅशन स्टेटमेंट म्हणून योगाभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढली. योगाचा जगात सर्वत्र प्रसार झाल्याने आणि त्यातील फायदे लक्षात आल्याने विविध वंश, संस्कृती, भाषा, वर्ग, वयोगट, लिंग, आर्थिकस्तर, राष्ट्रीयत्व आणि धार्मिक श्रद्धा, संप्रदाय असणाऱ्या लोकांनी योगाचा अंगीकार केला त्यामुळे योग सर्वसामावेशक झाला. पर्यायी औषधोपचार पद्धती म्हणून व्याधी प्रतिबंध आणि निवारण यासाठी योगाचा वापर सुरु झाला (Yoga-Chikitsa) अशा रीतीने McYoga पासून सुरु झालेला योगाचा प्रवास RxYoga पर्यंत येऊन पोहोचला. उपजीविकेसाठी योगावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. योग व त्या अनुषंगाने इतर व्यवसायांची उलाढाल अब्जावधी डॉलर्स वर जाऊन पोहोचली आणि जगभरात योग-व्यवसाय सुस्थापित झाला, त्याला Yoga Inc. असे नाव मिळाले. पुढे अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवण्यासाठी कोणताही विधिनिषेध न बाळगता योगाचे सांस्कृतिक अपहरण करून विकृतीकरण केले गेले त्याचा आढावा घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

योग हि शारीरिक आणि मानसिक स्वाथ्यासाठी 'वसुधैव कुटुंबकम्' ह्या भावनेने भारताने जगाला मोफत दिलेली Open source bio-technology आहे. भारतामध्ये हजारो वर्षांच्या परंपरेने चालत आलेले योगासने, मुद्रा, प्राणायाम, ध्यानधारणा प्रत्येकासाठी उपलब्ध असून त्याचा कोणीही ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे उपयोग करून त्यापासून होणारे फायदे मिळवू शकतो. योगावर भारतामध्ये भरपूर ग्रंथ संपदा उपलब्ध असून गेली हजारो वर्षे आणि शेकडो पिढ्या भारतीय त्यांच्या पारंपारिक ज्ञानावर आधारित योगाभ्यास करत आलेले आहेत. भारताबाहेर विशेषतः पाश्चात्य देशांतील योगाचा शिरकाव फार तर एका शतकाहून थोडा अधिक आहे आणि गेल्या काही दशकांमध्ये खऱ्या अर्थाने जनसामान्यांमध्ये योगाचा प्रसार झाला आहे. खरं तर योग हा केवळ एक प्रकारचा व्यायाम प्रकार न मानता सर्वांगीण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबरोबर अध्यात्मिक प्रगतीसाठी लागणारी जीवन पद्धती आहे परंतु आर्थिक प्राप्तीचे उद्दिष्ट ठेवून योगाचे व्यावसायिकरण करण्यात आले आहे.

योग पाश्चात्य देशांमध्ये दाखल होऊन जेव्हा त्याला हळूहळू प्रसिद्धी मिळत होती त्या कालावधीत महर्षी पतंजलींच्या योग सूत्रातील "योग: चित्तवृत्ती निरोधः" ह्या महत्वाच्या सूत्राला आणि योगातील मंत्र, प्रार्थना, प्राणायाम इत्यादींना वगळून केवळ आसनांवर आधारित शारीरिक आकृतिबंध, कसरत किंवा कवायत काही विशिष्ट साधनांच्या साहाय्याने करून स्नायूंची ताकद, संतुलन आणि लवचिकता मिळवण्यासाठी योग सदृश्य व्यायाम प्रकार अस्तित्वात आला. ज्यांना व्यायामशाळेतील ताकदीचे, कष्टप्रद, वजन उचलण्याचे किंवा एरोबिक्स वा ऍक्रोबॅटीक्स प्रकारचे व्यायाम करायचे नव्हते आणि ज्यांना योगातील अध्यात्मिक तत्त्वांमुळे, प्रार्थनेमुळे व त्यांच्या स्वतःच्या धार्मिक श्रद्धेमुळे योगाची नावड होती असे लोक त्या नवीन प्रकारच्या व्यायामाकडे वळले. योग स्टुडिओ प्रमाणे त्या व्यायाम प्रकाराचे स्टुडिओ सुरु झाले. ज्यांचा योगाबद्दलचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित होता आणि ज्यांना भारतीय परंपरेबद्दल अनास्था होती अश्या लोकांसाठी योगासारखेच फायदे देणारा पर्याय उपलब्ध झाला.

पाश्चात्य देशांमध्ये आणि विशेषतः अमेरिकेमध्ये योग प्रसिद्ध होऊन जनसामान्यांमध्ये रुळल्यावर योगातील विविध आसनांची संस्कृतोद्भव नावे लक्षात ठेवणे आणि उच्चारणे गोऱ्या मंडळींना अवघड जाऊ लागले त्यामुळे आसनांना हेड स्टॅन्ड, शोल्डर स्टॅन्ड, डॉग पोज, कॉर्प्स पोज अशा प्रकारची इंग्रजी नावे मिळाली. मात्र काही ठिकाणी योगासनांना विचित्र नावे देऊन अवहेलना केली गेली. पद्मासनाला दिलेले 'criss-cross applesauce' किंवा प्राणायामाला दिलेले 'water, whiskey, coffee breathing' हि नावे याचे उदाहरण आहे. अर्थात इंग्रजी नावांमुळे योगवर्गांमध्ये शिकवताना योगशिक्षकांना सोपे जाऊ लागले परंतु पुढे काही शिक्षकांनी योगाची परंपरा (lineage) नाकारली. योगातील प्रार्थना, मंत्रोच्चार आणि योगाच्या भारतीय मुळाचा ऋणनिर्देश करणे टाळायला सुरवात केली. काही योगशिक्षकांनी योगाला तंदुरुस्तीसाठीचा व्यायाम प्रकार (fitness regime) असे स्वरूप दिले. योगाभ्यास करताना केवळ शारीरिक कार्यक्षमता, लवचिकता, समतोल समन्वय, स्नायूंची ताकत व सहनशक्ती ह्या बाबींवर लक्ष केंद्रित करून एका पाठोपाठ, सलग, न थांबता वेगवेगळी आसने व दमछाक करून घाम गाळून कॅलरी जाळण्यासाठी प्राधान्य दिले. योग हा विक्रेय-वस्तू (commodity merchandise) झाला. त्यामुळे पाश्चात्य देशातील योगाभ्यास त्याच्या मूळ तत्त्वांपासून दूर गेला. परंतु केवळ योगासने करून शारीरिक स्वाथ्य मिळवताना त्याचा चांगला साईड इफेक्ट म्हणजे संज्ञानात्मक कार्य (cognitive functioning), भाव भावना नियंत्रण, ताण तणाव मुक्ती व नियंत्रण, मनो-देह भान (mind body awareness - mindfulness) हे मानसिक स्वास्थ्याचे फायदे आपोआप झाले हा भाग अलाहिदा.

योगातील तत्वे समजून न घेता केवळ योगासने व काही प्राणायामाचे प्रकार शिकून आणि योगशिक्षकाचे विकांत चे अतिजलद अभ्यासक्रम (weekend crash courses) करून अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या व स्वतःला योगी अथवा योगिनी (postural Yogi / Yogini) म्हणवणाऱ्या काही अति चतुर, ढोंगी व बनावट योगशिक्षक मंडळींनी बर्गरानंद किंवा पिझ्झादेवी तत्सम नावे धारण करून मूळ योगासनांमध्ये काही किरकोळ फेरबदल केले व ते स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला. विविध प्रकारच्या शारीरिक व्याधींसाठी वेगवेगळे योगोपचार सुरु करून काही योगासनांचा विशिष्ट क्रम ठरवून किंवा योगवर्गामध्ये उच्च तापमान आणि आर्द्रता ठेवून योगाला वेगळे स्वरूप दिले. स्वतःच्या आर्थिक फायद्याच्या हव्यासापोटी भारतातील प्राचीन, सार्वजनिक आणि प्रताधिकार मुक्त असलेल्या योगासनांवर स्वतःची 'बौद्धिक संपदा' असल्याचा हास्यास्पद आणि निरर्थक दावा केला. स्वतःचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी पेटंट ऑफिसमध्ये अर्ज दाखल केले. भारतातील आयुर्वेदिक आणि पारंपारिक ज्ञानावर आधारित हळद आणि कडूलिंबाच्या औषधी गुणधर्मांसाठी केलेल्या पेटंट संदर्भातील दाव्याच्या अनुभवातून धडा घेऊन भारताने योगासने आणि प्राणायामाचे Traditional Knowledge Digital Library (TKDL) च्या माध्यमातून digital दस्तऐवजीकरण केले व अशा प्रकारच्या योगाच्या चाचेगिरीच्या गैरप्रकारांना आळा घातला हि समाधानाची बाब आहे.

योग वर्गांमध्ये जाऊन योगाभ्यास करण्याच्या कारणांचा मागोवा घेतला तर मुख्यतः शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य (general wellness), व्यायाम (physical exercise), तणाव व्यवस्थापन (stress management), अध्यात्मिक अनुभूती (seeking a spiritual experience) ह्या कारणांचा समावेश होतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करून शारीरिक स्वास्थ्य मिळून मानसिक आरोग्यामध्ये देखील सुधारणा होते (Psychophysiology of Yoga) असे आढळून आल्याने योगाची लोकप्रियता वाढत गेली. योग साधना मूलतः 'स्व' चा (self - मनस) वैश्विक चैतन्याकडे (universal consciousness - चित्त) होणारा अंतर्गत प्रवास असला आणि योगाला कोणत्याही धार्मिक चौकटीत बद्ध करण्याची गरज नसली तरी जगातील काही अति उजव्या मंडळींचा योगाला विरोध आहे. केवळ भारतीयांना ज्ञात असलेल्या पंचप्राण, इडा-पिंगला-सुषुम्ना नाडी, कुंडलिनी, षटचक्रे, चक्रभेदन इत्यादी संकल्पना इतरत्र आणि आधुनिक वैद्यक शास्त्राला देखील माहित नसल्याने अज्ञान, द्वेष आणि योगफोबिया (Yoga-phobia) मुळे योगाला अशुभ, आसुरी (demonic) स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला. योगातील विविध आसने आणि प्रार्थना भारतीयांच्या तीन तोंडे आणि चार हात असणाऱ्या देवतांचे प्रतीक असल्याचे सांगून धर्ममार्तंडांनी त्या विरुद्ध आदेश काढले व लोकांना योग करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु योगातील फायदे लक्षात आल्याने लोकांनी नेटाने योगासने करणे चालू ठेवले त्यामुळे मूळ योगातील प्रार्थना, मंत्रोच्चार आणि पूजा, इष्ट देवतेची ध्यानधारणा इत्यादी अध्यात्मिक भाग (spiritual aspect of Yoga) काढून टाकून योगाला आपल्या प्रार्थना जोडून योगासनांना नवीन नावे देऊन नव्या स्वरूपात सादर केले. हे योगाचे सांस्कृतिक अपहरण (cultural appropriation of Yoga) आहे असे म्हणता येईल.

योग साधनेतील आसने, प्राणायाम, आणि ध्यानधारणे द्वारे शारीरिक तंदुरुस्ती (fitness), स्वयंनियमन (self-regulation), जाणीव व जागरूकता (awareness), अध्यात्म (spirituality) अशा बाबींमध्ये सुधारणा होऊन सर्वांगीण मानवी कार्यक्षमतेमध्ये (global human functionality) सकारात्मक बदल होतो आणि त्यामुळे जीवनाची गुणवत्ता (quality of life) उंचावते परंतु हे लक्षात न घेता पाश्चात्य देशांमध्ये योगाला फक्त फिटनेस कमोडिटी केले गेले. अशा रीतीने योग एक ग्राहकोपयोगी उत्पादन (consumer product) झाला. हा 'योग' प्रॉडक्ट विकण्यासाठी मोठी इंडस्ट्री (Yoga Inc.) तयार करण्यात आली. अगदी व्यावसायिक पद्धतीने विविध वृत्तपत्रे, मासिके या मध्ये कमनीय बांध्याच्या सुपर मॉडेल्स गौरांगणांच्या विविध आसनांच्या फोटो द्वारे जाहिराती करण्यात आल्या. दूरदर्शन आणि आंतरजालाच्या माध्यमातून योगासनांची प्रात्यक्षिके दाखवण्यात येऊन योगाचे कॉस्मिक ब्युटी ऐवजी 'कॉस्मेटिक ब्युटी' असे प्रोमोशन करण्यात आले. व्यवसाय वाढीसाठी योगाचे वेगवेगळे प्रकार शोधण्यात आले. योगाची आधुनिक व्यायामशाळेतील HIIT व्यायाम प्रकाराशी भेसळ करून HIIT-Yoga तयार करण्यात आला. त्या व्यतिरिक्त Trapeze Yoga, Aerial Yoga, Goat Yoga, Forrest Yoga, Beer Yoga, Chocolate Yoga, Acro Yoga, Power Yoga, Yin Yoga, Holy Yoga, Partner Yoga, Boxing Yoga, नाईट क्लब मधील Rave Yoga असे विविध प्रकारचे 'योग' बाजारात आले. सद्य स्थितीला पन्नासहून अधिक भ्रष्ट भेसळासनाचे योगचौर्य प्रकार उपलब्ध आहेत. आंतरजालावर योग आणि 'नमस्ते' सारख्या अभिवादना संबंधित विकृत वेब सेरीजचा सुळसुळाट झाला आहे. मोठी रक्कम आकारून कुंडलिनी जागृत करून देण्याचा दावा करणारे पोटभरू, तथाकथित योग-गुरु उपलब्ध आहेत. हे देखील योगाचे सांस्कृतिक अपहरण आहे.

भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे मानवी जीवनाचे अंतःस्थ जग (मनातील - inner world) आणि बहि:स्थ जग (बाहेरचे, भौतिक - outer world) असे दोन भाग असतात. बाह्य जग कितीही चांगले असले तरी अंतःस्थ जग चांगले नसेल तर बाह्य भौतिक जगाचे सौख्य पूर्णतः मिळत नाही मात्र अंतःस्थ जग चांगले असेल तर बाह्य जगातील अडीअडचणींचा समर्थपणे सामना करता येतो. योगामुळे अंतःस्थ जग शांत, आनंदी होते परंतु सद्यकालीन पाश्चात्य जगातील योगाचे स्वरूप Yoga by the body for the mind, for the intelligence असे न राहता दुर्दैवाने Yoga by the body for the body असे झाले आहे. योग साधना आणि योग जीवनशैलीमुळे उपभोगवाद किंवा चंगळवाद यावर अवलंबून न राहता मानसिक समाधान, आनंद आणि शांती मिळणे शक्य असून देखील आजकालच्या internet च्या जमान्यात योगाच्या माध्यमातून inner-net कडे प्रवास करण्याची संधी आपण गमावत आहोत काय? आत्मानुभूती तंत्रज्ञान (Technology of Enlightenment) असलेल्या सांख्य आणि द्वैत वादी योग साधनेला मूळ स्वरूप पुनश्च प्राप्त होऊन त्याद्वारे सर्व जगाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा लाभ होवो हीच योग महर्षी पतंजलींच्या चरणी प्रार्थना.

सर्वे सन्तु निरामया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पारंपरिक ज्ञान हे बरेचसे मौखिक होते. काही ग्रंथ संस्कृतमध्ये होते. त्या पोथ्या गोळा करून परदेशी नेल्या. त्यावर आधारित तिकडे योगवर्ग चालतात. त्यांना मूळ स्रोत मिळाले. आमच्याकडे ते कुठे कोणाकडे आहेत?

Open source होतं म्हणताय ना? मग ते सी, मोडिफाय आणि डिस्त्रीब्युट करण्यावर निर्बंध नकोच. आणि तेच तर सौंदर्य आहे ओपन सोर्स चे.

FDA ने योगाच्या सगळ्या दाव्यांचा तपास करून खोट्या दाव्यांवर आळा घातला पाहिजे.

एक प्रश्न आहे - आपण पाश्चात्यांचे काहीच घेतले नाही का? मग त्यांनी आपले थोडे तंत्रज्ञान घेतले तर बिघडले कुठे? त्यात विकृतीकरण काय आहे? इट इज कस्टमायझेशन. आपापल्या गरजांनुरुप बदल करणे.

हे योगाला उद्देश्युन नाही पण इन जनरलच 'माझं माझ"' , 'कॉपीराईट' या मुद्द्यांबद्दल थोडी तेढच आहे.

>>> बर्गरानंद किंवा पिझ्झादेवी
Lol

फॅड्स ही बाय डेफिनिशन अल्पजीवी असतात.
योगासनं ही नाहीतरी अष्टांगयोगातली फक्त एक पायरी आहे. कोणाला कुठल्याही नावाने तेवढीच शिकून काही शारीरिक फायदे मिळत असतील तर मिळोत की. वर अमित म्हणाला तसं ओपन सोर्सचं गमकच ते नाही का?

>>>>>ते स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या आर्थिक फायद्याच्या हव्यासापोटी भारतातील प्राचीन, सार्वजनिक आणि प्रताधिकार मुक्त असलेल्या योगासनांवर स्वतःची 'बौद्धिक संपदा' असल्याचा हास्यास्पद आणि निरर्थक दावा केला.

लिंक?

खरं म्हणजे योगा हे व्यायाम हिमालयात गुहेत राहून बैठी तपश्चर्या करणाऱ्यांसाठी होते. गावांत,नगरांत हिंडून फिरून कामं करणाऱ्यांना त्याची गरज नाही.

आपण 'हे विश्वचि माझे घर', 'वसुधैव कुटुम्बकम' वाले आहोत ना? मग संकुचित विचार सोडून द्या.

तसंही जगभर भारतीय लोकं पसरलीयेत, त्यांच्या पुढच्या पिढ्या inter-racial लग्न करणार/ पार्टनर्स शोधणार. ते ऑलरेडी योगा वगैरे करून आरोग्यपूर्ण असतील तर उत्तम नाही का?

अवांतरः पुरुष जोडीदाराला पार्टनर आणि स्त्री जोडीदाराला पार्टनारी का म्हणू नये? इथे अर्धनारीनटेश्वराची कन्सेप्ट फिट बसेल.

माहितीपूर्ण लेख. योग प्रसार आणि प्रचार विविध मार्गाने आजवर झाला आहे. नावे, संकल्पना मूळ संस्कृत भाषेतील असल्याने त्याचे उर्वरित जगासाठी सुलभीकरण झाले असेल तर त्यात वाईट काही नाही. मूळ गाभा न बदलता योग प्रणालीचे व्यावसायिकरण करून त्याचा लाभ भारतीयांनी (आर्थिक दृष्टया)घेतला तर ती चांगली गोष्ट आहे.

जाऊ द्या हो.. पाश्चात्यानी लोकप्रिय केला म्हणुन भारतीयांना योग समजला. नैतर गेली हजारो वर्षे योग धुळीत पडला होता.

आज भारतीयसुद्धा योगाकडे एक आरामात करायचा व्यायाम म्हणुनच पाहताहेत आणि इथेही योगाची दुकाने उघडलीत.

योग साधनेला मूळ स्वरूप पुनश्च प्राप्त होऊन त्याद्वारे सर्व जगाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा लाभ होवो हीच योग महर्षी पतंजलींच्या चरणी प्रार्थना.>>>>> सहमत.

पुर्ण जगाला आज चांगल्या मानसिक स्वास्थ्याची गरज आहे. सगळ्या जगाचे मानसिक स्वास्थ्य निट होवो हीच प्रभुचरणी प्रार्थना. शारीरीक स्वास्थ्य नंतर मिळाले तरी चालेल.

>>>>>ते स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या आर्थिक फायद्याच्या हव्यासापोटी भारतातील प्राचीन, सार्वजनिक आणि प्रताधिकार मुक्त असलेल्या योगासनांवर स्वतःची 'बौद्धिक संपदा' असल्याचा हास्यास्पद आणि निरर्थक दावा केला.
लिंक?>>>>

लिंक नसेल तर अस्तित्वच नाही असे व्हायला लागलेय का?

>>>>>>>>शारीरीक स्वास्थ्य नंतर मिळाले तरी चालेल.
हाहाहा भीक नको पण कुत्रा आवर झालेले आहे.
किंवा
पादा पण नांदा Lol

लेख छान आहे.

कॉलेज नंतर अंबिका योग कुटीर मध्ये (अल्पकाळ का होईना,) धडे घेतल्यानंतर, तिकडचा अनुभव इतका शांत करणारा होता..

की
इकडे अमेरिकेत विक्रम योगा घराच्या अगदी जवळ असूनही कधी जायची इच्छा ही झाली नाही.

***
मध्ये आमच्या ( school) डिस्ट्रिक्ट मध्ये हायस्कूल च्या मुलांच्या काही विपरीत घटना घडल्या... त्याचा मुलांना पालकांना ताण आला, काळजी वाटू लागली.
तेव्हा शाळेत meditation सारखे प्रशिक्षण देऊन मुलांना स्ट्रेस मॅनेजमेंट शिकवावे असा विचार/ प्रस्ताव बऱ्याच मोठ्या पालकांच्या समूहाने मुख्याध्यापकांना दिला.

त्यांनी तो काही कारणे देऊन पूर्णपणे फेटाळला.

मग नंतर झालेल्या चर्चेत समोर आलं की आधी सुध्दा कित्येक वेळा असे प्रस्ताव डावलले गेले कारण मुख्याध्यापक स्वतः Catholic असून .. ते meditation / yog हिंदू धर्माशी जोडतात त्यामुळे त्यांचा नेहेमीच विरोध राहिला आहे..