सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ९: मन्नेखेली- संगारेड्डी (८२ किमी)
✪ हैद्राबाद के लोगां
✪ वंदे मातरम फाउंडेशनच्या सदस्यांसोबत भेट
✪ “रजनीशजींसोबत” भावुक करणारी भेट
✪ अनपेक्षित कनेक्शन्स- दुनिया छोटीसी जगह है!
✪ ९ दिवसांमध्ये ७८५ किमी पूर्ण
✪ मनाला वर्तमानात ठेवणं कठीण काम
✪ अर्धा प्रवास पूर्ण, दुर्गम भागाची उत्कंठा सुरू
सर्वांना नमस्कार. गेल्या ऑक्टोबरमध्ये पूर्ण झालेल्या सोलो सायकल प्रवासातील अनुभव व आनंद ह्या लेखाद्वारे आपल्यासोबत शेअर करत आहे. मोहीमेचा नववा दिवस, २ ऑक्टोबर. गांधी जयंती आणि रविवार आहे आज. सलग ग्रामीण भागातून आणि अगदी थोड्या शहरांमधून सायकल चालवत आल्यानंतर आज मी भारतातल्या मुख्य महानगरांपैकी एक असलेल्या हैद्राबादला पोहचेन! हे सोपं नसेल. इतके दिवस मोकळ्या रस्त्यांवरून आणि शांत परिसरातून राईड केल्यानंतर ट्रॅफिक जाम, सिग्नल आणि खोळंबलेली वाहनं ह्यातून राईड करायची आहे! आज अर्धा टप्पाही पूर्ण होईल आणि इथून पुढे शेवट वेगाने जवळ येत जाईल. पुढच्या टप्प्यांना फार वेग असतो. सुरुवातीला एक एक दिवस अगदी संथ जातो. पहिला दिवस गेला, दुसरा गेला असं. पण इथून पुढे मानसिक दृष्टीने हे खूप जलद होईल. कारण एकदा अर्धा टप्पा ओलांडल्यानंतर मनाच्या पातळीवर ही मोहीम पूर्ण झाल्यासारखी होते. मनातले अंतर्विरोध निघून जातात (ते तसे पहिल्या दिवसापासून जवळ जवळ नव्हतेच म्हणा). आणि सायकलीचं कौतुक करायला तर शब्दच नाहीत! काय साथ देतेय ती मला!
(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/03/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)
.
संगारेड्डी हैद्राबादच्या जवळच आहे. सकाळी ६.३० ला निघालो. हिवाळा जवळ येत असला तरी मी पूर्वेकडे जातोय, त्यामुळे ह्या वेळेपर्यंत रोज उजाडलेलं असतं आणि कुत्र्यांचीही काही अडचण आली नाहीय आत्तापर्यंत! रोजच्याप्रमाणे सुरू केलं पेडलिंग. हे आता फारच सोपं झालंय. आणि एक पंक्चरसुद्धा नाही! सायकलीला पंक्चर होईना आणि चैन पडेना मला असं झालंय. म्हणजे सायकलही पंक्चर झाली नाहीय आणि मीसुद्धा पंक्चर झालो नाहीय! जेव्हा अजिबातच चैन पडत नव्हती, तेव्हा बिचारी चेन फक्त पडली! एका लयीत राईड करत हैद्राबादच्या जवळ पोहचलो आणि कुकटपल्ली, सायबराबाद असे उपनगर ओलांडले. हैद्राबाद! मुख्य शहरातून जाताना अनेकदा रस्ते विचारावे लागले. हैद्राबाद के लोगां बहुतइच हेल्प करते हैं! रविवारची सकाळ असल्यामुळे ट्रॅफीक काहीच नाहीय. सहजपणे सिकंदराबादला पोहचलो आणि मग सांगितलेला मार्ग घेतला. ट्रॅफिक लागू नये व जाममध्ये अडकू नये म्हणून तसंच जात राहिलो आणि त्यामुळे शहरातला नीट फोटो घ्यायचा राहून गेला. मुक्कामाच्या नेरापल्लीला आरामात पोहचलो. श्री. माधवजी रेड्डींनी मला हैद्राबादच्या थोडं पुढे वारंगलकडे जाणा-या रस्त्याच्या जवळ असलेल्या नेरापल्लीला मुक्काम करायला सांगितला आहे. वाटेत त्यांनी मला हैद्राबादमध्ये एका संस्थेतही भेट द्यायला सांगितलं होतं, पण त्या संस्थेशी संपर्कच होऊ शकला नाही.
नेरापल्लीमध्ये माधवजींचे मित्र पवनजी कुमार ह्यांच्याकडे थांबलो. हा परिसर इतका जास्त शांत आहे की, हैद्राबादमध्ये आहे असं वाटतच नाहीय. मला विश्रांतीची तीव्र गरज आहे. दुपारी फार आराम झाला नाही. पण इथलं वातावरण अगदी शांत आहे. संध्याकाळी वंदे मातरम फाउंडेशनचे अध्यक्ष व भारत विकास संगमचेही वरिष्ठ सदस्य असलेले माधवजी मला भेटायला आले. वंदे मातरम फाउंडेशन दूर् असलेल्या ठिकाणी आहे, त्यामुळे माझं तिकडे जाणं झालं नाही. पण त्यांचं काम मला खूप रंजक वाटलं. ते मुख्यत: युवक, महिला व विद्यार्थ्यांसोबत काम करतात. नावीन्यपूर्ण अध्ययन, आनंदासह अध्यनन, शिक्षण, प्रयोगशीलता अशा बाबींवर ते काम करतात. तसंच ते सायकलिंगचेही उपक्रम आयोजित करतात आणि आकाश दर्शनाचेही कार्यक्रम घेतात!
माधवजींसोबत वंदे मातरम फाउंडेशनचे अजून एक सदस्य आणि त्यांचे सायकलपटू रजनीशजी आले आहेत. सायकलिंगच्या उपक्रमांचं आयोजन ते करतात. त्यांना भेटून विशेष आनंद झाला. त्यांना फोनवर आधी बोललो होतो तेव्हाच वाटलेलं होतं की, त्यांचं नाव ओशो रजनीशांवरून ठेवलेलं असणार आणि ते खरं निघालं! त्यांचे आजोबा रजनीशांचे भक्त होते, त्यांनीच त्यांचं नाव ठेवलं होतं. ते मूळचे बिहारचे असल्यामुळे हिंदी छान बोलतात. शिवाय सायकलिस्टही आहेत. छान गप्पा झाल्या. ओशो प्रेमी असल्यामुळे त्यांना भेटणं हा भावुक करणारा क्षण होता आणि डोळ्यात अश्रू तरळत होते.
अजून एक खूप अनपेक्षित असं जुनं कनेक्शन सापडलं. जेव्हा मी पवन कुमारजींना मुळचा परभणीचा असल्याचं सांगितलं, तेव्हा ते म्हणाले की मीसुद्धा पूर्वी परभणीत येऊन गेलोय. थोडी चौकशी केली तर कळालं की, ते अनेक वर्षांपूर्वी परभणीत आले होते आणि तेही माझ्या लहानपणीच्या एका खास मित्राकडे! आणखी थोडं विचारल्यावर आणि मित्राला फोन केल्यावर लगेच लक्षात आलं की, पवनजींची आई माझ्या मित्राच्या आजोबांची नातेवाईक होती. लगेच त्यांचं एकमेकांशी बोलणं करून दिलं! त्यांनाही खूप आनंद झाला! किती अनपेक्षित हे कनेक्शन सापडलं! खरोखर दुनिया छोटीसी जगह है! आजचा दिवस अजूनच अविस्मरणीय ठरला!
.
तसाही आज अर्धा टप्पा पूर्ण झाल्यामुळे दिवस महत्त्वाचा आहे. पुढे वारंगल आणि भूपालपल्ली अशा शहरांनंतर मी महाराष्ट्राच्या दुर्गम गडचिरोली जिल्ह्यात- आदिवासी भागात जाईन! त्या भागाबद्दल अनेक प्रश्न मनात आहेत. गूगल मॅप सांगतंय की, रस्ते खूप वाईट आहेत. तसंच रस्त्यावर किमान चहा- बिस्कीटाचे हॉटेल व साधनं मिळतील का ही शंका आहे. आणि अर्थातच गडचिरोलीची असलेली प्रसिद्धी आणि तिथलं घनदाट जंगल! पण म्हणून पुढचा टप्पा थरारकही असेल! तिथे राईड कशी होईल, ह्याबद्दल काहीच सांगू शकत नाही. पण तो दिवस यायला अजून वेळ आहे. अजून तेलंगणातले तीन मुक्काम बाकी आहेत. पण आपलं मन! ते असंच उड्या मारतं आणि फिरत राहतं. ते वर्तमानात राहातच नाही. वर्तमानात मनाला धारण करणं अति कठिण काम आहे. आणि वर्तमान हा आहे की, आज प्रवास अर्धाच पूर्ण झाला आहे! आणि अजून इतकेच म्हणजे नऊ दिवस बाकी आहेत (कदाचित काही जास्तीचे दिवसही लागू शकतील)! पण सायकलीला किती व कसे धन्यवाद देऊ! खरं तर सायकलच रोज चालते आहे. लवकरच तिला दुकानात तपासून घेईन! इतक्या अंतरामध्ये तिला काहीच कसं झालेलं नाहीय!
.
पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १०: हैद्राबाद- जनगांव (७६ किमी)
(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)
हा ही भाग मस्त. मिस्सिन्ग
हा ही भाग मस्त. मिस्सिन्ग हैद्राबाद.
छानच सुरुय
छानच सुरुय