एखादा विषाणू वेगाने पसरतो, तसेच एखादे गाणे किंवा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे काही मिनिटांत जगभर व्हायरल होते हे आपण समजू शकतो. पण मला एक कळत नाही की, एखादी घटना घडली की, तशाच एकापाठोपाठ घटना कशा काय घडायला लागतात? यामागे नकारात्मक व्हायरल मानसिकता तर नसेल?
मला जे म्हणायचे आहे ते जरा सविस्तरपणे सांगतो. त्यामुळे लेख मोठा होण्याची शक्यता आहे पण प्लीज तेवढी सहनशीलता ठेवा. माझे नियमित वाचक हा लेख शेवटपर्यंत वाचतील अशी मला खात्री आहे!
"बाजीगर" प्रदर्शित झाला तेव्हा बिल्डिंग वरून प्रेमिकेला ढकलून देण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या.
"थ्री इडीयट्स" चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अचानक इंजिनिअरिंगच्या तसेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढायला लागल्या होत्या.
"सैराट" चित्रपट आल्यानंतर ऑनर किलिंगच्या घटना कमी होण्याऐवजी वाढायला लागल्या.
ही झाली चित्रपटाविषयीची काही प्रतिनिधिक उदाहरणे! अशी अनेक उदाहरणे देता येतील.
एखाद्या ठिकाणी मॉब लिंचींगची घटना घडली की लगेच सगळीकडे तशा घटना अचानक वाढल्या होत्या.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा सध्या एका पाठोपाठ एक हत्या घडायला लागल्या आहेत. त्यांची मोडस ऑप्रंडी पण सारखीच! म्हणजे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणे किंवा तुकडे वेगवेगळे ठिकाणी टाकणे.
इतकेच नव्हे तर मध्यंतरी अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कारसुद्धा एकापाठोपाठ एक व्हायला लागले होते.
आणखी अशी एक विचित्र घटना, जी एकदाच घडू शकेल असे वाटले होते ती घटनासुद्धा सध्या परत परत घडायला लागली आहे. ती म्हणजे विमानात सह प्रवाशांवर केलेली लघुशंका! अरे काय चाललंय काय? डोळसपणे पेपर वाचत असाल तर तुम्हाला याची प्रचिती आली असेल.
तसेच एखाद्या नेत्याने एखाद्या महापुरुषाबद्दल अपशब्द वापरले आणि त्यावर गदारोळ सुरू झाला की, आणखी इतर नेत्यांना महापुरुषांवर टीका करायला चेव चढतो!
एखादया सिनेमा अभिनेता किंवा अभिनेत्रीने एखादी फॅशन केली की ती लगेच व्हायरल होते. मध्यंतरी सर्व मराठी टीव्ही सिरियलचे हिरो अचानक दाढी ठेवायला लागले होते. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील हिरोंनी दाढी ठेवली म्हणून इतर अभिनेते तसेच तरुण युवक पण तशीच दाढी ठेवायला लागले.
एकदा पुण्यात दहशत माजवण्यासाठी सोसायटी पार्किंगमधील गाड्या टोळक्याकडून जाळण्याची एक घटना घडली आणि लगेच तशा घटना इतर ठिकाणी वाढायला लागल्या होत्या.
पुण्यात कोयता गँगने दहशत पसरवली असे वाचले की लगेच पुढच्या काही दिवसांत अचानक कोयता गँगची दहशत सगळीकडे वाढलेली बघायला मिळते.
एका चारचाकी वाहनाने दुचाकी वाल्याला किंवा पादचाऱ्याला एक किलोमीटर पर्यंत फरफटत नेले आणि त्याचा मृत्यू झाला. आता ही घटना पुन्हा पुन्हा घडण्यासारखी वाटते का? ही घटना योगायगानेच होऊ शकते असेच आपल्याला वाटेल. पण अशाच घटना सध्या वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा पुन्हा घडू लागल्या आहेत. कमाल आहे!
एखादी घटना घडली की टीव्ही आणि पेपरमध्ये सतत त्याची चर्चा सुरू होते. "नाटकीय रूपांतरण" करून त्यावर आणखी वेगवेगळे कार्यक्रम बनवले जातात.
तसेच टिव्ही चॅनल वाले (मीडिया) काय करतात की, टीआरपी मिळवण्यासाठी सीसीटिव्ही मध्ये रेकॉर्ड झालेल्या खून, दरोडा, काठ्या लाठ्यानी मारहाण, अपघात, रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या, एखाद्या माणसाला उघडे करून झाडाला बांधून मारहाण, अशा घटना मोठ्या चवीने वर्णन करून करून बातम्यांमध्ये दिवसभर दाखवत राहतात. काय गरज आहे?
हे सीसीटिव्ही फुटेज सगळीकडे, सर्व वयोगटातील आणि सर्व मानसिकतेची लोकं बघत असतात. हे असले लाईव्ह सीसीटिव्ही फुटेज मधले गुन्हे सर्व जनतेला दाखवून काय साध्य होते?
हे फुटेज ज्यांना (मनाने निगरगट्ट आणि कणखर असलेले) बघायची इच्छा आहे ते व्हॉट्सॲप वर बघतातच की! परंतु बातम्यांमध्ये सगळ्या जगाला ते दाखवण्याची काय गरज आहे?
खरे तर गुन्हा कसा घडला हे व्हॉट्सॲप वर का होईना, पण चवीने बघण्याची खरंच गरज आहे का? अशा घटना सारख्या सारख्या बघून कोवळ्या वयाच्या किंवा किशोरवयीन असणाऱ्या मनाची जडणघडण काय होईल?
सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्यामुळे गुन्हेगार पकडले जातात, ही चांगली गोष्ट आहे, पण ते फुटेज तुम्ही पोलीस तपासासाठी वापरा ना! कशाला सगळ्या दुनियेला दाखवत बसता? त्यातून प्रेरणा घेऊन आणखी तसे घटना पुन्हा घडण्यासाठी?
सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारे दृश्य खरे असते. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मनावर जास्त होतो. याचा आधार घेऊन चित्रपट सृष्टीने मध्यंतरी काय केले होते माहित आहे?
चित्रपटातील घटना सीसीटीव्ही मधून कसे दिसतील तशा चित्रित करून चित्रपट बनवायला सुरुवात केली. पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी, रागिनी एमएमएस, लव्ह सेक्स और धोका असे चित्रपट बनवणे सुरू केले. अगदी खऱ्या वाटाव्या म्हणजे सीसीटीव्ही मधून बघतोय अशा वाटावे अशा पद्धतीने चित्रपटातील प्रसंग चित्रित केले होते. का? तर म्हणे चित्रपट अधिक परिणामकारक होण्यासाठी! म्हणजे चित्रपटापासून प्रेरणा घेऊन घटना घडू शकतात तसे घटनांपासून प्रेरणा घेऊन चित्रपट बनतात. हे सुध्दा एक व्हायरस चे आदान प्रदान म्हणता येईल.
मागे सद्दाम हुसेनला फाशी दिली होती तेव्हा दोन चार दिवस सतत त्याच्या फाशीचे व्हिडिओ सगळ्या न्यूज चॅनल वर दाखवत होते. त्यानंतर लहान मुलांनी फाशी फाशी खेळत गळ्यात दोर अडकवून घेतल्याच्या घटना घडायला लागल्या होत्या.
दोषींना शिक्षा होईल तेव्हा होईल, परंतु या सगळ्यातून आणखी गुन्हे करण्याची प्रेरणा मात्र नक्की मिळत जाते. एक प्रकारे गुन्ह्याची मानसिकताच व्हायरल होताना दिसते. हे सगळे खूप घातक आहे, हे नक्की!
न्युज चॅनल वाले तर कधी कधी हद्द करतात. यांच्या दुपारच्या बातम्यांच्या कार्यक्रमाचे नाव असते: "लंच टाईम न्यूज!" आणि त्या दरम्यान जाहिराती कोणत्या दाखवतात? हर्पिक टॉयलेट क्लिनर, झुरळ मारण्याचा स्प्रे. मी म्हणतोय ती अतिशयोक्ती नाही. तुम्ही आजपासून निरीक्षण करायला सुरुवात करा!
मध्यंतरी एक नवीन न्यूज चॅनल सुरू झाल्याचे पाहिले, त्याचे नाव आहे "गुड न्यूज टुडे". या चॅनेलवर दिवसातून चार-पाच तास तरी जगातील काहीतरी पॉझिटिव्ह घटना बघायला मिळतील असे वाटले होते, परंतु नाही! येथेही तेच दळण दळले जाते जे इतर चॅनल दळतात!
पण प्रश्न असा आहे की, एखाद्या ठिकाणी चांगली घटना घडली की त्यापासून प्रेरणा घेऊन तशा चांगल्या घटना सगळीकडे व्हायरल होतांना मात्र दिसत नाहीत.
मग लक्षात आले की, कोरोना सारखा आजार पसरविणारे या जगात अनेक "विषाणू" आहेत. तो "आजार पसरवतो" म्हणून नकारात्मक आहे. म्हणूनच तर त्याच्या नावात "विष" हा शब्द आहे! आणि म्हणूनच लवकर व्हायरल होतो, जसे विष मानवी शरीरात पटकन पसरते. निसर्गाचा हा नियम मानवी मानसिकतेला पण लागू होतो असे वाटते. म्हणजे नकारात्मक मानसिकता ही लवकर व्हायरल होते. अफवा ह्या लगेच पसरतात. कुणाची निंदा नालस्ती असणारी गोष्ट लगेच पसरवली जाते आणि त्यावर लोक विश्वास पण पटकन ठेवतात.
मग सकारात्मक गोष्टी म्हणाव्या तितक्या वेगाने का पसरत नाहीत? किंवा मग असेही असू शकेल की सकारात्मक घटना घडत असाव्यात पण त्यांना मीडियातर्फे म्हणावी तितकी प्रसिद्धी दिली जात नसावी!
त्यात भरीस भर म्हणून, नैसर्गिक आपत्तीसुद्धा एकापाठोपाठ एक यायला लागल्या आहेत. तुर्कस्तानमध्ये आलेल्या भूकंपानंतर जगभर अनेक ठिकाणी लागोपाठ भूकंप झाले.
उन्हाळ्यात एकदा एके ठिकाणी वणवा पेटला की सगळीकडे वणवे पेटायला लागतात. एखाद्या ठिकाणी आगीची घटना घडली की लगेच सगळीकडे आगी लागायला लागतात. बरेचदा अशा घटनांत संशय यायला लागतो की उन्हाळ्यातील तापमानामुळे नैसर्गिकरित्या लागणाऱ्या आगींचा फायदा घेऊन कुणी मुद्दाम घातपात करून आगी लावतात आणि त्या आगीत आपली पोळी भाजून घेतात की काय? सांगता येत नाही. नैसर्गिक आपत्तींनासुद्धा अशा व्हायरल होण्याचा छंद जडला आहे की काय असे वाटते.
हा लेख मात्र व्हायरल होऊ द्या. आणि लेखावर ब्लॉगवर प्रतिक्रिया देण्यास विसरू नका!
घातक वास्तव न दाखवणे हा
घातक वास्तव न दाखवणे हा त्यावर उपाय नाही. त्यावर प्रबोधनाचा वापर करुन तेच वास्तव बदलण्याचा प्रयत्न करणे हा उपाय आहे. घातक वास्तवतेचे वैज्ञानिक विश्लेषण हे धक्कादायक असू शकते
अनुकरण करणे ही मानवाची अंत
अनुकरण करणे ही मानवाची अंत:प्रेरणा असावी. ती सकारात्मक गोष्टींतही होते. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर मेणबत्ती संचलन हा ट्रेंड झाला होता. दिवेकर आणि दिक्षित डाएटची क्रेझ आली, कुठे भूकंप किंवा आणखी काही आपत्ती आली तर अचानक सगळे त्यासाठी निधी दान करायला लागतात आणि ते करणे व्हायरल होते. मध्यंतरी चिनी मालावर बहिष्कार करा अशी क्रेझ आली होती. लोकोपयोगी कामे व्हावीत किंवा सरकारकडून निर्णय घेतले जावेत म्हणून अधून मधून वेगवेगळे पीटिशन साईन करण्याची क्रेझ येते. अश्या अनेक गोष्टी होत असतात. केवळ नकारात्मक गोष्टींचंच अनुकरण होतं असं काही नाही. आता ह्या सर्व गोष्टी पूर्ण विचारांती होत नसाव्यात. कारण सदसद्विवेबुद्धी ही अंत:प्रेरणा नाही.
दोषींना शिक्षा होईल तेव्हा
दोषींना शिक्षा होईल तेव्हा होईल, परंतु या सगळ्यातून आणखी गुन्हे करण्याची प्रेरणा मात्र नक्की मिळत जाते. एक प्रकारे गुन्ह्याची मानसिकताच व्हायरल होताना दिसते. हे सगळे खूप घातक आहे, हे नक्की! >>>> स ह म त
मग सकारात्मक गोष्टी म्हणाव्या तितक्या वेगाने का पसरत नाहीत? किंवा मग असेही असू शकेल की सकारात्मक घटना घडत असाव्यात पण त्यांना मीडियातर्फे म्हणावी तितकी प्रसिद्धी दिली जात नसावी! >>>>> स ह म त
त्यात भरीस भर म्हणून,
त्यात भरीस भर म्हणून, नैसर्गिक आपत्तीसुद्धा एकापाठोपाठ एक यायला लागल्या आहेत. तुर्कस्तानमध्ये आलेल्या भूकंपानंतर जगभर अनेक ठिकाणी लागोपाठ भूकंप झाले. >>>>>>>>>>ते झाले न झाले तर लगेच तिकडे पूर आला व सगळे वाहून गेले .
पण मला एक कळत नाही की, एखादी
पण मला एक कळत नाही की, एखादी घटना घडली की, तशाच एकापाठोपाठ घटना कशा काय घडायला लागतात? यामागे नकारात्मक व्हायरल मानसिकता तर नसेल? >> नाही, एका घटनेमुळे सिमिलर घटना एकापाठोपाठ घडत नाहीत. त्या नेहमीच घडत असतात.
सवंग मिडीया खोदून खोदून, कधी फॅक्ट्स चेंज करून एकाच प्रकारच्या गुन्ह्याला वा नकारात्मक घटनांना प्रसिद्धी देण्याच्या मागे लागते. समाजात ह्या घटनांचे चर्वित चर्वण होत राहून अजून सिमिलर प्रकरणांना हवा मिळत राहते व मिडिया वाल्यांचे फावते. जे सोशल मिडियात चघळले जात आहे ते मिडिया तश्या बातम्या फ्रंट पेज वर , चॅनेल वर आणून चर्चा घडवतात. खाजवून खरूज काढायची सिक मानसिकता.
ऊदाहरण पी गेट प्रकरण... शेकडो वर्षांच्या विमान प्रवासाच्या ईतिहासात पी गेट सारखी प्रकरणे (दारू पिऊन गोंधळ घालण्याचे प्रकार) झाली असतील नसतील. पण एका एअर ईंडिया प्रकरणानंतर मिडियातून जणू भारतात आता हे सर्रास होत आहे असे चित्र ऊभे केल्या गेले.
एखाद्या गोष्टीला जास्त
एखाद्या गोष्टीला जास्त प्रसिद्धी मिळाली म्हणून त्या गोष्टी वाढतात ह्याबाबत मी शंकास्पद आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये माहिती पसरण्यामध्ये क्रांतिकारक बदल झाले आहेत पण सेन्सेशनल गोष्टी खपतात, ही काही नवी गोष्ट नाही. धक्कादायक, सनसनाटी बातम्या यापूर्वी सुध्दा पसरायच्या, पण माध्यम मर्यादित असायची. आज समाजमाध्यमांमुळे लहान व मोठ्या गोष्टींना चटकन सर्वदूर पसरणे शक्य झाले आहे. ह्याचा अर्थ नेहमीच सनसनीखेज गुन्ह्यांमध्ये वाढ झालीय किंवा तश्या बातम्यांना लोकांपर्यंत पोहोचवले तर त्यात वाढ होते असा काढता येईल का ह्याबाबत साशंक आहे.