मराठी भाषा गौरव दिन 'द स्टोकर'- फ्रान्झ काफ्का - साजिरा - भाग १

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 28 February, 2023 - 10:04

१८८३ साली प्रागमध्ये जन्मलेला फ्रान्झ काफ्का जेमतेम ४० वर्षं जगला. हा थोर लेखक आणि तत्त्ववेत्ता 'अस्तित्ववाद' या संकल्पनेच्या जनकांपैकी एक. जॉं पॉल सार्त्र, आल्बर्ट कामू, गॅब्रिएल गार्शिया ही काफ्काचा प्रभाव पडलेली काही मंडळी. या नावांवरूनच काफ्काचं मोठेपण लक्षात येतं. 'मेटॅमोर्फॉसिस' या एकाच जबरदस्त कथेने काफ्काला लोकप्रिय केलं. अनेक भाषांत अनुवादित झालेल्या या दीर्घकथेची आजही जगभर चर्चा होते. जगण्याचं प्रयोजन शोधण्याच्या दुर्दम्य इच्छेपोटी काफ्काने बरंच लिखाण केलं खरं; मात्र आपल्या मृत्यूनंतर ते जाळून टाकावं, असंही त्याने आपल्या ब्रॉड या मित्राला सांगून ठेवलं. मित्र की त्याचं लोकोत्तर लिखाण?- अशा पेचात सापडलेल्या ब्रॉडने शेवटी त्याच्या मित्राच्या कालातीत अशा साहित्याच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि काफ्काच्या मृत्यूनंतर काफ्काच्या ‘द ट्रायल’ (१९२४), ‘द कॅसल’ (१९२६) आणि ‘अमेरिका’ (१९२७) या तीन कादंबऱ्या प्रकाशित केल्या. यातल्या 'अमेरिका' या कादंबरीच्या पहिल्या प्रकरणाचं नाव 'द स्टोकर' असं आहे. काफ्काने हयात असताना या प्रकरणाचं स्वतंत्र कथेत रूपांतर 'द स्टोकर' याच नावाने १९१३ साली केलं होतं आणि या कथेला प्रतिष्ठेचा फाँटेन पुरस्कारही १९१५ साली मिळाला होता. त्याच कथेचा हा स्वैर अनुवाद / भावानुवाद.
*****

'द स्टोकर'- फ्रान्झ काफ्का

*****
आर्थिक परिस्थिती फारशी बरी नसलेल्या आईबापांच्या पोटी जन्माला आलेला कार्ल रॉसमन सोळा वर्षांंचा असताना घरातल्या मोलकरणीने त्याला फूस लावली. ती गर्भार आहे असं लक्षात आलं तेव्हा कार्लची रवानगी एका जहाजातून सरळ अमेरिकेला झाली. जहाज मजल दरमजल करत न्यूयॉर्क बंदराच्या दिशेने जात असताना एके सकाळी दूरवर लख्ख सूर्यप्रकाशात चमकत असलेला 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' कार्लला दिसला. समुद्राकडून येणार्‍या मोकळ्या हवेच्या झुळुका अंगावर घेत उभ्या असलेल्या त्या स्वातंत्र्यदेवीच्या हातातली ती मशाल त्याला त्वेषाने उगारलेल्या तलवारीसारखी भासली.

'किती उंच आहे हा पुतळा!' किनार्‍याजवळ आल्यावर त्याची भव्यता लक्षात आल्यावर कार्ल उद्गारला. इतर लोक आणि सामान हलवण्याच्या लगबगीत असलेले हमाल आणि कामगार मात्र पुतळ्याकडे बघायला वेळ नसल्यागत वावरत होते. प्रवासात एका तरुणाशी त्याची जुजबी ओळख झाली होती, तो शेजारून जाताना म्हणाला, ''काय, किनार्‍यावर जायचा विचार आहे की नाही तुझा?'' "अरे हो,! हा काय, निघालोच की.." कार्ल हसत म्हणाला, आणि नव्या ऊर्जेने त्याने आपली सामानाची पेटी खांद्यावर घेतली. एव्हाना तो तरुण त्याची काठी हलकेच हलवत निघूनही गेला होता. अचानक त्याला आठवलं, आपली छत्री डेकच्या खालीच आपण विसरून आलो आहोत. 'जरा सामानाकडे लक्ष ठेवा' असं कुणालातरी सांगून खाली जावं असा विचार करून तो आजूबाजूला बघू लागला, पण इतका वेळ कुणाहीकडे दिसत नव्हता. कसंबसं आपलं सामान एका आडोशाला ठेवून तो खाली निघाला. मघाशी लोकांच्या रेट्यामुळे ज्या मार्गाने तो आपोआप ढकलला जात वर आला होता, तो मार्ग आता जवळजवळ सुना होता. असंख्य खोल्या, त्यांवरून जाणारे चिंचोळे पॅसेजेस, खूप सारी वळणे आणि छोटेमोठे कितीतरी जिने पार करताना तो गोंधळून गेला. या गडबडीत तो एका छोट्या दारापाशी येऊन थबकला. आता छतावरून बाहेर पडण्याच्या घाईत असलेल्या लोकांच्या पायांचे आणि खालून जहाजाची महाकाय इंजिने इतके दिवस श्रम केल्यानंतर क्रमाक्रमाने बंद होत आपली गुरगूर आटोपती घेत असल्याचे आवाज येत होते.

आता कुठच्या दिशेने जावे, हे न कळून कार्ल चक्रावून तिथंच थांबला. मग त्याने दारावर हलकेच थाप मारली. ''दार उघडेच आहे," आतून खेकसल्यासारखा आवाज आला, " मूर्खासारखा दरवाजा का बडवतोयस?"

तो दरवाजातून किंचित पुढे आला , तर त्या एवढ्याशा केबिनमधल्या शिळ्या, मंद प्रकाशात एक पलंग, एक कपाट, एक खुर्ची आणि अजून काही सामानाच्या गर्दीत दाटीवाटीने कोंबला गेल्यागत अजस्र देहाचा एक माणूस उभा होता. "माफ करा," कार्ल जरा पडत्या आवाजात म्हणाला, "मी रस्ता चुकलोय असं वाटतंय. प्रवासादरम्यान कधी लक्षात आलं नाही, पण हे जहाज फारच मोठं आहे असं दिसतंय.."

" हं, आहे खरं हे अजस्र जहाज." तो माणूस गुरगुरला. खाली वाकून सामान कोंबलेल्या बॅगेची कुलूपं दाबून बसवण्याची त्याची खटपट चालू होती. "मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाहीये ना?" कार्ल म्हणाला. "आत ये की, दारातच का उभा आहेस?" तो माणूस म्हणाला. कार्ल अजूनही संकोचत होता. एकवार त्याच्याकडे बघत त्या माणसाने अचानक पुढे येऊन कार्लला ओढून आत घेतलं आणि दार खाडकन बंद केलं.

"मला हे असं कॉरिडॉरमधून कोणाचं तरी माझ्याकडे डोकावून पाहणं सहन होत नाही," तो म्हणाला, " मूर्खासारखे सगळे दाराबाहेरून धाडधाड आवाज करत धावत जातात आणि दरवाजा थोडा उघडा दिसला की डोकावून बघतात! हे असलं कोण सहन करेल?" हे बोलता बोलता त्याची त्या बॅगेशी असलेली कुस्ती चालूच होती. "पण आता कॉरिडॉर अगदीच रिकामा आहे," कार्ल दबक्या सुरात म्हणाला, "सहजच विचारतो, तुम्ही जर्मन आहात का?" अमेरिकेत येणार्‍या नवख्या तरुणांना होणार्‍या त्रासाबद्दल, विशेषतः आयरिश लोक दादागिरी करत त्याबद्दल त्याने ऐकलं होतं. त्या माणसाने एक क्षण रोखून पाहिलं, आणि मग म्हणाला, "हो तर! पण तू बस की त्या पलंगावर आरामात. असं अवघडल्यागत कोपर्‍यात का उभा आहेस?"

हा माणूस जरा अवघडच दिसतोय, कार्लने विचार केला. मग अचानक आठवल्यागत तो म्हणाला, "अरे देवा, माझं सामान मी वर डेकवरच ठेऊन आलोय की..!"
"काय? कुणाला सांगितलं नाहीस तू लक्ष ठेवायला?"
कार्ल जरा घोटाळला, मग उगाच म्हणाला "हो, हो तर!. एक गृहस्थ होते तिथे. काय बरं त्यांचं नाव..?" नाव काय सांगावं याचा विचार करत तो म्हणाला. मग खास या प्रवासासाठी त्याच्या आईने शिवलेल्या जॅकेटचा चोरखिसा त्यानं चाचपला. त्यात एक व्हिजिटिंग कार्ड सापडलं, ते काढून त्यावरचं नाव वाचत कार्ल म्हणाला, "हा.. बटरबॉम. फ्रान्ज बटरबॉम."
"तू अनोळखी माणसाकडे सामान सोडून आलास?"
"हो, काय करणार. माझी छत्री खालीच राहिल्याचं लक्षात आलं. आणि पुन्हा सोबत ते सामान मिरवत आणणं जरा अवघड होतो. पण मग मीच या अरुंद बोळी आणि जिन्यांमध्ये हरवून गेलो.."
"तू एकटा आहेस?"
"हो.." कार्ल म्हणाला, आणि मग त्याला वाटू लागलं- इतकाही हा मनुष्य वाईट दिसत नाही. या अशा नवीन ठिकाणी कुणीतरी तर सोबत हवंच. यालाच मित्र बनवावं झालं..
"पण आता तुझं सामन आणि छत्रीही तुला मिळेल असं वाटत नाही." खुर्चीवर बसत कार्लच्या समस्येबद्दल काळजी वाटू लागल्याच्या आवाजात तो म्हणाला.
"पण मला वाटतं, सामान कुणी नेणार नाही माझं."
"असं तुला वाटतं." डोक्यावरचे बारीक राठ केस कराकरा खाजवत तो म्हणाला, "इथं बंदरं बदलली की नीतिमत्ता बदलतात. हॅम्बर्गला तुझ्या त्या बटरबॉमने तुझ्या सामानावर लक्ष ठेवलंही असेल पण इथे तो आणि तुझं सामान- दोन्ही गायब होऊ शकतात!"
"बाप रे!" कार्ल उठून उभा राहत म्हणाला, "मला वर जाऊन बघितलं पाहिजे आता पटकन.."
"काही उपयोग नाही. बस इथंच." कार्लच्या छातीवर हाताने ढकलून त्याला पुन्हा बेडवर बसवत तो म्हणाला, "मीही निघालोच आहे आता काही मिनिटांत. तुझं नशीब बर्‍यावर असेल आणि तुझं सामान कुणी लंपास केलं नसेल, तर रिकाम्या झालेल्या जहाजावर ते कदाचित लवकर सापडेलही. बाय द वे, मी स्टोकर आहे. म्हणजे जहाजाचं इंजिन ज्या भट्टीवर चालतं, तीवर आणि तिच्या इंधनावर लक्ष ठेवणारा."
"स्टोकर!" कार्ल उत्तेजित स्वरात म्हणाला, "मी आणि आमचा एक सहप्रवासी- स्लोवॅक- आम्ही ज्या केबिनमध्ये होतो ना, तिच्या बाहेर एक पोर्टहोल होतं. त्यातून इंजिनरूम दिसायची."
"येस. तिथंच काम करतो मी."
"मला तंत्रज्ञानामध्ये फार रस आहे. मला असं अचानक अमेरिकेत यावं लागतं नसतं तर मी नक्की इंजिनियर झालो असतो!"
"मग का निघून आलास म्हणे?"
"म्हणजे... ते...त्याचं..." कार्ल हात झटकत म्हणाला. मग त्याने स्टोकरकडे पाहिलं, तर तो एखादं रहस्य जाणून घेण्याच्या अविर्भावात कार्लकडे बघून म्हणाला, "नक्कीच काहीतरी कारण असेल.."
"आता मीही कदाचित स्टोकर होईन.." कार्ल विषय टाळत म्हणाला, "माझ्या आईवडिलांना तर माझं काय होणार आहे, याची काळजीच नाही."
"हं. हो स्टोकर. म्हणजे मी माझ्या कामातून मोकळा!"
"का? हे काम तुम्हाला आवडत नाही?"
"आवडतं की नाही याचा प्रश्नच येत नाही. काय करावं लागतं हा प्रश्न आहे. विचारतोच आहेस तर - नाही आवडत मला हे काम. आणि तूही नको करूस हे. आता तू तिकडे युरोपात शिकणार होतासच ना? मग इथं अमेरिकेतही शिकू शकशील. इथल्या युनिवर्सिटीज तिथल्यापेक्षा जास्त चांगल्या आहेत."
"ते खरं आहे. पण पैसे कुठून आणणार हा प्रश्न आहे. काही लोक दिवसभर काम करून पैसे मिळवतात आणि मग रात्रभर अभ्यास करून पदव्या वगैरे मिळवतात; आयुष्यात पुढे जातात- अशा कथा मीही ऐकल्या आहेत. पण अशी चिकाटी वगैरे माझ्यात आहे असं काही मला वाटत नाही. शाळेतही विद्यार्थी म्हणून मी बरा नव्हतो. इथली शाळाकॉलेजे तर आणखीच कडक असतील. मला इंग्रजी जवळजवळ येतच नाही. आणखी एक म्हणजे इथल्या लोकांच्या मनात आमच्यासारख्या परदेशी लोकांबद्दल आधीच अढी आहे म्हणे.."
"अच्छा म्हणजे तुला आधीच हे सारं समजलं आहे तर! आपलं जमेलच बघ मग. आता असं बघ, हे जहाज जर्मन आहे, आणि जर्मनीच्या हॅम्बर्ग ते अमेरिका अशा प्रवासावर हे असतं. मग इथले सारे लोक जर्मन का नाहीत? तो शुबल नावाचा चीफ इंजिनियर रोमानियन आहे. हा हरामखोर साक्षात एका जर्मन जहाजावर आपल्यालाच गुलाम करून ठेवतो!"-स्टोकरच्या नाकपुड्या आता रागाने फुलल्या होत्या-" नुसत्याच फालतू तक्रारी करायच्या म्हणून बोलत नाहीय मी. आता तू एवढा तरणाताठा आहेस चांगला. पण तुलाही स्टोकर बनायचं आहे! लाजिरवाणं आहे हे. मी आता कितीतरी जहाजांवर काम केली.." आणि तो धडाधड एका पाठोपाठ एक जहाजांची नावं सांगू लागला. ही अशी सरबत्ती सुरू झाल्याने कार्ल गांगरलाच. स्टोकर टेबलावर मुठी आदळत पुढे म्हणाला, "प्रत्येक ठिकाणी माझं कौतुक झालं. मला बक्षीसं मिळाली. कॅप्टन लोक नेहमी खुश असायचे माझ्या कामावर. आणि इथं? इथं सगळं पुस्तकी पद्धतीने चालतं! अनुभव आणि मेंदू यांना इथं काही कामच नाही. मी इथं जसा रिकामटेकडाच आहे; केव्हाही मला बाहेर फेकता येईल असा अडचण होऊन बसलेला धोंडा! समजतंय का तुला?"

कार्ल हे सारं ऐकून अस्वस्थ झाला. "अहो, तुम्ही हे सहन कसं करता? कॅप्टनशी तुम्ही स्पष्ट बोला ना. इतकी वर्षं काम केल्यावर तुमचे हक्क म्हणून काही चीज आहे की नाही?" सात्त्विक संतापाने तो बोलला. स्टोकरच्या प्रश्नाशी तो जणू इतका एकरूप झाला होता, की इथं एका जहाजावर आपल्या देशापासून फार दूर आलोय याचा जणू त्याला विसर पडला.

"तू जा इथून!" स्टोकर वैतागून म्हणाला, "मी इथं काय बोलतोय, आणि तू मला सल्ले देतोस?" मग तो होन्ही हातांत आपला चेहेरा लपवून हताश बसून राहिला.

आता याहून आणखी वेगळं काय सांगणार होतो मी?- कार्ल मनात म्हणाला. मीही माझं सामान शोधायचं सोडून इथं मूर्खासारखा काय करतो आहे? वडिलांनी त्यांची ती किंमती सामानाची पेटी प्रवासाला निघताना मला दिली तेव्हाच त्यांनी विचारलेलं- किती दिवस नीट ठेवशील ही पेटी तू? आणि आता ती गायब झाल्यात जमा आहे. आणि पेटीच कशाला? माझ्याबद्दल जरी वडिलांनी चौकशी केली तरी त्यांना काय सापडणार आहे? शिपिंग कंपनीला विचारलं तरी- तुमचा कार्ल एव्हाना न्युयॉर्क बंदरत पोचलेला असायला हवा- असं उत्तर ते देतील.

कार्लने त्या पेटीतल्या वस्तूही धड वापरलेल्या नव्हत्या अजून. अंगातला शर्टच किती दिवस बदलला नव्हता. आता इथं एखादं काम सुरू करून तिथं नीटनेटक्या कपड्यांत हजर व्हायची वेळ येईल तेव्हा या मळक्या विटक्या शर्टशिवाय पर्याय नव्हता. आईने फार मायेने दिलेल्या खाण्याच्या वस्तूही त्याने जेमतेमच चाखल्या होत्या कारण प्रवासात नीटशी भूकच लागत नव्हती. आता ती पेटी जवळ असती तर या निराश झालेल्या स्टोकरला सॉसेजेस तरी देता आले असते. तसे खिशात पैसे होते, पण ते आता कुणाला देऊन चालणार नव्हते. सामान हरवल्यावर तर त्या पैशांची किंमत आणखीच वाढली होती. प्रवासात तर डोळ्यांत तेल घालून त्याने ती ट्रंक जपली होती, त्यापायी रात्रीच्या झोपेचीही बोंब झाली होती. कारण त्याच्यासोबत प्रवास करणार्‍या त्या स्लोवॅकची नजर त्या पेटीवर आहे, असं त्याला अनेकदा जाणवलं होतं. अंधार पडला की धसका घेऊन तो जागा राही. आणि अशा कितीतरी रात्री.

आता एका बेसावध क्षणी ती पेटी तो गमावून बसला होता. तो फ्रान्झ बटरबॉम, खरंच अस्तित्वात असला तर, कुठे दिसेल का? कुठे सापडेल तो?

तेवढ्यात आतापर्यंत शांत असलेल्या कॉरिडॉरमधून अनेक लोक शिस्तीत चालत येत असल्यासारखा आवाज आला. चाहूल घेऊन स्टोकर म्हणाला, "हा जहाजाचा बँड आहे. पॅकअप करण्याची ही सूचना आहे. चला, आपल्यालाही आता निघालं पाहिजे.." मग त्याने पलंगाशेजारच्या भिंतीवरून आपल्या आईचा फोटो काढून एका पिशवीत टाकला, त्याची ट्रंक घेतली आणि कार्लचा हात धरून तो केबिनच्या बाहेर निघाला. आपले जाड पाय उचलत तो हळू चालू लागला. वाटेत आलेल्या एका उंदरावर पाय उगारत तो म्हणाला, "आता या लोकांना मी नीट सांगणार आहे- त्यांची काय लायकी आहे ते. असंही सगळं संपलं आहे, अजून जास्त गुलामगिरी करायची गरज नाही."

मग चालत ते स्वयंपाकघराच्या एका बाजूला आले. इथं गचाळ अ‍ॅप्रन्स घालून काही बायका भांडी धुवत होत्या. त्याने एका मुलीला हाक मारली. ती
चीत्कारत जवळ आली, तसं त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. "पगाराचे पैसे घ्यायला चाल्लोय. येतेस सोबत?" त्याने विचारलं. "नको काही. तूच आण जा माझेही पैसे. आणि हा देखणा मुलगा कुठे सापडला तुला?" असं डोळे मिचकावून बोलत तिने त्याच्या मिठीतून आपली सुटका करून घेतली.

मग ते दोघे चालत एका दारापाशी आले. इथले नक्षीदार खांब ग्रीक पद्धतीच्या पुतळ्यांसारखे दिसत होते. एखाद्या जहाजासाठी अशी सजावट केलेली बघून कार्लला जरा विचित्रच वाटलं. ही जागा बहुधा फर्स्ट आणि सेकंडक्लासवाल्यांसाठी होती, आणि थर्डक्लास मधून प्रवास करत असल्याने तो या बाजूला कधीच आला नव्हता. तिथं सफाई करत असलेले कामगार मात्र त्याला ओळखीचे वाटले. आता प्रवास संपवून सगळेच निघून गेल्याने फर्स्ट-सेकंड वगैरे वर्गवारीही आपोआप गायब झाली होती. जणू सगळ्या जागा आता सफाई कामगारांच्या झाल्या होत्या.

स्टोकरने जरा अदबीने दरवाजा ठोठावला आणि आतून “आत या” असा आवाज आला तेव्हा तो कार्लला म्हणाला, "ये आत. घाबरू नकोस." कार्ल आत आला, आणि समोरच्या मोठ्या तीन खिडक्यांतून दिसणारा समुद्र बघून थबकला. या लाटांचं असं सुंदर, उत्साहित करणारं दृश्य जणू त्याने आधी पाहिलंच नव्हतं. अजस्र प्रवासी आणि मालवाहू नौका एकमेकांना ओलांडत आपापल्या दिशांना जात होत्या. मध्येच एखाद्या लष्करी जहाजावरून सॅल्युट शॉट्स किंवा संचलनाचे आवाज येत होते. या सार्‍यांतून चिमुकल्या बोटी आणि होड्याही आपला रस्ता शोधत होत्या. या सार्‍या दृ श्याच्या मागे न्युयॉर्क शहर हजारो खिडक्या असलेल्या गगनचुंबी इमारती आपल्या अंगावर मिरवत, एखाद्या नाट्यापाठच्या नेपथ्यासारखं उभं होतं.

खिडकीजवळच्या एका टेबलावर एक बुटका माणूस पाठमोरा बसून काहीतरी काम करत होता. शेजारी एक बुकशेल्फ होतं आणि एक तिजोरीही, जी आता रिकामी दिसत होती. दुसरी खिडकी मोकळी होती आणि तीतून समुद्राचं ते अल्हाददायक दृश्य जास्तच सुंदर दिसत होतं. तिसर्‍या खिडकीजवळ नाविक दलाच्या आपल्या गणवेशावर बरीच पदकं मिरवणारा एक अधिकारी आणि दुसरा बांबूची काठी हातात घेऊन तीवर जवळजवळ टेकूनच उभा राहिलेला, बहुधा प्रशासकीय सेवेतला एखादा अधिकारी- असे दोघे गप्पा मारत उभे होते.

जवळ आलेल्या एका नोकराने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि स्टोकरने त्याला शांतपणे सांगितलं, "मला चीफ अकौंटंटशी बोलायचं आहे." नोकराने कपाळावर आठ्या चढवल्या पण चीफ अकौंटंटला निरोप मात्र दिला आणि चीफ अकौंटंट जोरजोरात मान हलवून स्टोअरच्या दिशेने हातवारे करत ओरडला, "नीघ, नीघ आधी इथून!"

आता स्टोकरने इतर काहीही करायच्या आधी कार्लकडे पाहिलं, जणू कार्ल त्याचा मायबापच होता! कार्लला हे जरा अनपेक्षितच होतं. तो जरा वेळ स्टोकरकडे पाहत राहिला, आणि काहीतरी ठरवल्यासारखा तीरासारखा त्या चीफ अकौंटंटच्या टेबलाच्या दिशेने निघाला. तिथला तो नोकर घाबरून त्याच्या दिशेने धावला. जहाजावरच्या त्या खोलीत आता इतकी हालचाल झाल्यावर पहिल्या खिडकीत बसलेला तो बुटका आपलं काम सोडून पण जागा न बदलता काय होतंय हे बघू लागला. तिसर्‍या खिडकीशी गप्पा मारत असलेले ते दोन अधिकारीही दोन पावलं पुढे सरसावले, आणि इतके मोठे लोक आता यात लक्ष घालताहेत म्हटल्यावर तो अस्वस्थ झालेला नोकर जागीच थबकून उभा राहिला.

आईने शिवलेल्या त्याच्या त्या जॅकेटच्या चोरखिशातून आपला पासपोर्ट बाहेर काढून दाखवत कार्ल म्हणाला, "माफ करा सर, पण त्यांनी स्टोकरचं काम अनेक जहाजांवर केलं आहे. त्यांच्याबद्दल तुमचा जरा गैरसमज झालायसं दिसतंय. तुम्ही विचारलं, तर ते त्या सार्‍या जहाजांची अख्खी यादी घडाघडा म्हणून दाखवतील. कारण त्यांनी त्यातल्या प्रत्येक ठिकाणी फार जीव ओतून काम केलं आहे. त्या सार्‍या ठिकाणी त्यांच्या कामाचं कौतुक झालंय. जहाजांच्या कॅप्टन्सनी त्यांना शाबासक्या दिल्या आहेत. इतका अनुभव आणि ज्ञान असलेला हा माणूस इतक्या लोकांच्या ऑर्डर्स कशा निमूट ऐकून घेतो हेच एक नवल मला वाटतं आहे. मला वाटतं, त्या इंजिनियर शुबल साहेबांनी यांना विनाकारणच जरा दडपणात ठेवलं आहे." आता कार्ल फक्त चीफ अकौंटंटशीच बोलत नसून तिथल्या सगळ्यांना उद्देशून बोलतो आहे असं चित्र तयार झाल्याने सारेच त्याच्याकडे लक्ष देऊन बघत होते. "मला खरं तर जे मनापासून वाटलं आणि मी बघितलं, ते मी तुम्हाला सांगितलं. खरं तर त्यांच्या काही खास तक्रारी आहेत, त्या ते सांगतीलच." कार्ल म्हणाला. खिडकीजवळ काठी घेऊन उभा असलेल्या त्या अधिकार्‍याचा लालबुंद चेहेरा त्याने बघितला नसता तर आणखी बोलत राहिला असता तो.

"खरं आहे हे. शब्दशः खरं." स्टोकर इतर कुणी काही बोलण्यापुर्वी पटकन म्हणाला. खिडकीजवळ गप्पा मारत थांबलेल्या त्या दुसर्‍या अधिकार्‍याने स्टोकरला 'जरा इकडे ये' म्हणून फर्मावलं आणि हा अधिकारी म्हणजेच या जहाजाचा कॅप्टन आहे, हे कार्लच्या लक्षात आलं. एव्हाना आपण जहाजांवरून सारं जग फिरून आलो आहोत, हे दाखवण्यासाठी स्टोकरने आपल्या ट्रंकेतून कागदांचं मोठं भेंडोळं बाहेर काढलं होतं आणि तो कॅप्टनकडे न जाता चीफ अकौंटंटकडे पुन्हा जाऊ लागला होता. जणू स्टोकरचं फक्त त्याच्याशीच काम होतं!

"हा एक नंबरचा कामचुकार आणि सनकी माणूस आहे. तुम्हाला सांगतो सर, हा माणूस कामाच्या ठिकाणापेक्षा पगार मागण्याच्या ठिकाणीच जास्त वेळ असतो! आणि तू रे, ए स्टोकर," चीफ अकौंटंट किंचाळला, "हे अजस्र शरीर घेऊन सगळीकडे उंडगेगिरी करत, लोकांना धक्के मारत फिरताना तुला मजा वाटते नाही? पण तुझ्या फालतू नि अवास्तव मागण्या ऐकून घेतल्यावर तुला किती वेळा धक्के मारून माझ्या ऑफिसच्या बाहेर घालवून दिलं गेलं आहे, आठवतं? कितीवेळा लोकांनी तुला जाणीव करून दिली आहे, की चीफ इंजिनियर शुबल आपल्यापेक्षा फार सिनियर आणि वरच्या पदावर आहेत आणि त्यांचं ऐकायचं असतं? आणि आता तू थेट कॅप्टनसाहेबांसमोरच अशी ही मूर्खासारखी बोंबाबोंब करतोयस, तेही एखादा थोर वक्ताबिक्ता असल्याच्या थाटात बोलणार्‍या या छटाक पोराला सोबत घेऊन??"

"आपण या माणसाचं ऐकून घेऊ या." कॅप्टन म्हणाला, "असंही मिस्टर शुबल जरा जास्त स्वातंत्र्य घेतायत आणि हे मला फार काही आवडलेलं नाही. पण मिस्टर स्टोकर, मी तुमच्याशी सहमत होईनच असाही याचा अर्थ नाही."

मग स्टोकर बोलू लागला. बोलताना अगदी जाणीवपूर्वक आपल्या बोलण्यात उद्धटपणा दिसणार नाही, याची काळजी घेऊ लागला. म्हणजे एक तर तो त्या चीफ इंजिनियर शुबलचा उल्लेख 'मिस्टर शुबल' असा करू लागला- मिस्टर शुबलचं वागणं न्यायाला धरून नाही. मिस्टर शुबलना परदेशी लोकच जास्त आवडतात. मिस्टर शुबलनी मला मशिन रूममधून हाकलून देऊन बाथरूम साफ करायला पाठवलं, जे माझं कामच नव्हतं. मिस्टर शुबलना जहाजासंदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी तर माहीतच नव्हत्या ; पण असं एकदा सांगितल्यावर ते चिडले- अशा कितीतरी गोष्टी स्टोकर अगदी घाईघाईने आणि पोटतिडकीने सांगू लागला. या अनेक तक्रारी सांगताना संयम विसरून तो आवाज वाढवू लागला. अगतिकतेने आणि संतापाच्या भरात त्याचा आवाज शेवटी शेवटी तर टिपेला पोचला.

कार्ल कॅप्टनकडे टक लावून पाहत होता. भावनेच्या भरात स्टोकर काहीतरी उद्धटासारखं किंवा विचित्र बोलेल आणि सारा खेळखंडोबा होईल अशी त्याला भीती वाटत होती. कॅप्टन स्टोकरचं बोलणं ऐकत असला तरी स्टोकरला नीट आणि ठोस असं काही सांगता येत नाहीये- असंही कार्लला वाटत होतं. कारण कॅप्टन ऐकत असला - कदाचित आपलं कर्तव्य आहे असं त्याला वाटल्यामुळे असेल, तरी बाकीचे लोक मात्र स्टोकरकडे फार लक्ष देत नव्हते. वेळ उगाचच वाया चालल्याप्रमाणे खिडकीजवळच्या त्या प्रशासकीय अधिकार्‍याने त्याची ती बांबूची काठी जमिनीवर हलकेच आपटायचा चाळा सुरू केला होता. बाकीचे लोक काय करावं असा प्रश्न पडल्यागत इकडेतिकडे बघत होते. जहाजाचं दैनंदिन काम बघणारे अकौंटंट लोक, यापेक्षा आमचं काम जास्त महत्वाचं आहे- अशा आविर्भावात पुन्हा त्या कागदांच्या आणि फायलींच्या ढिगात बुडून गेले होते. चीफ अकौंटंट तर, 'हा मूर्ख माणूस काय बडबडतोय बघितलं ना? म्हणूनच मी मघाशी याला हाकलून द्यायला निघालो होतो,' असं म्हणायचं असल्यागत मान हलवत आणि उसासे टाकत बसला होता. फक्त स्टोकरला बघून मघाशी आठ्या चढवणारा तो नोकर मात्र स्टोकरच्या बोलण्याशी सहमत असल्यागत दिसत होता.

दरम्यान, या खोलीतल्या तीन खिडक्यांतून दिसणारं दृश्य अजूनही तसंच होतं. बंदरावरची लगीनघाई असल्यागतची पळापळ अगदी तशीच चालू होती. अनेक जहाजं दखल घेतल्याचं दाखवत एकमेकांना ओलांडत होती. एक भलंमोठं, कितीतरी कंटेनर्स एकावर एक रचून माथ्यावर जणू टेबललँड तयार झाल्यागत दिसणारं प्रचंड आकाराचं मालवाहू जहाज धीरगंभीरपणे खिडकीच्या चौकटीत एका बाजूने आलं आणि दुसर्‍या बाजूने निघूनही गेलं. छोट्या मोटारबोट्स या सार्‍या प्रचंड पसार्‍यात अल्लडपणे मासोळी असल्यागत इकडून तिकडे हिंडत होत्या. एरवी कार्ल हे सारं बघण्यात बुडून गेला असता. पण आता मात्र त्याला वाटलं- ही अशी वरून कुठूनतरी झिरपलेली अस्वस्थता, कसलाही शेवट नसलेली निरर्थक दैनंदिन धावधूप, काहीतरी करत राहण्याची निकड, वरच्या वर्गाकडून आलेलं सततचं अगम्य दडपण- हे सारं जहाजावरच्या बिचार्‍या असहाय कामगार लोकांना फरपटत कुठे घेऊन जात असेल?

साजिरा

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त अनुवाद. वाचतोय.